शुक्रवार, २२ मे, २००९

इच्छामृत्यु एक वरदान...

आता थोडे गंभीर विषयावर बोलू या...
कधी मनाची खुशी समाधान किंवा काव्य कविता कथा ह्या सगळ्यांच्या पलीकडे पण मला विचार करावासा वाटतो। असे कितीतरी विषय आहेत समाजात ज्याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता तर आहेच... त्यावर कृति पण व्हावी असे पण वाटून जाते. 'इच्छामृत्यु एक वरदान' हा पण विषय तसाच आहे. चर्चेचा विषय असून किंवा त्यावर खोलवर दृष्टि सगळयांचीच जावी अथवा विचार व्हावा असे वाटत असून पण काही इलाज नसल्याने पुढे कोणीच धजावत नाहीत. वैद्यकीय नियमांत किंवा आपल्या संविधानांत अशा प्रकारचा काही नियम नाही.

सुलभ मृत्युची इच्छा प्रत्येक प्राणीमात्र बाळगून आहे. पण कोणाच्या नशिबाचे ह्या बाबतीत दार उघडेल हे सगळे अंधारातच आहे. समाजात किती तरी प्रकारचे लोक आहेत- गरीब आणि श्रीमंत. असे पण काही ज्यांना संपूर्ण आयुष्यभर काही न काही तरी त्रास भोगावा लागतो, हाडाची काडे करून एका हातावर मिळविणे आणि दूसर्या हातावर खाणे हा पण एक वर्ग तर ऐश्वर्यात लोळणारा- कष्टाची झळ न पोहोचणारा दूसरा वर्ग, पण शेवटी जीवन हे सगळयांचेच आहे आणि जगायचेच आहे. प्रत्येक माणूस जगतोच आहे.

जीवन
सुरू झाले तर अंत निश्चित आहे, पण सुलभ होवो ही मनीषा. आपण आपल्या आजूबाजूला असे किती तरी जीव बघतो जे जगताहेत पण बघणार्यांचे काळीज पिळवटून निघते व आपसूकच मनांत का होईना पण 'देवा हयाला सोडव रे बाबा' असे आल्याशिवाय रहात नाही. इतक्या यातना, इतके शरीराला कष्ट, मृत्युजवळ तर जवळपास पोहोचलेलेच असतात पण त्याला हात लावू शकत नाहीत. अशा लोकांसाठी 'इच्छामृत्यु' एक वरदानच ठरेल. हया संदर्भात फादर लुई वेदरहेड ने म्हंटले होते, "असाध्य रोगांनी ग्रासलेल्या, शरीराची बरीचशी इंद्रियांनी काम करण्यास नाकारलेल्या जीवाला कृत्रिम मशीन लावून त्याच्या इच्छेविरूद्ध त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार्यांना देव शिक्षा का देत नाही." आणि हे लोक म्हणजे डॉक्टर्सच न! पण जर त्यांनी जीव वाचविण्याची शप्पथ घेतली आहे तर ते जीव कसा घेणार हो!

हे
सगळे नजरेसमोर ठेवता इच्छामृत्यु चा कायदा किती महत्वपूर्ण आहे आणि त्यावर विचार केला जाणे जरूरी आहे हे ठळकपणे जाणवू लागले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपली मते सांगण्याचा आणि स्वयं निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, जर आपल्या शारीरिक त्रासदींना कंटाळून तो असे जाहिरपत्र लिहून देतो - "जर डॉक्टरांच्या मते आता हयापुढे मला हया शारीरिक यातनांपासून मुक्ति मिळू शकणार नसेल तर अश्या दुर्भाग्यपूर्ण अवस्थेमधे कृत्रिम उपचारांवर परावलंबी आणि लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा मला इच्छामृत्यु देऊन मुक्ति द्यावी." तर अशा इच्छामृत्यपत्राचा आदर केला गेला पाहिजे. इच्छामृत्यु एक वरदान सिद्ध होऊ शकते असे फक्त म्हणून काय उपयोगाचे? हया म्हणवल्या जाणार्या वरदानाला जगात कुठेही मान्यता मिळालेली नाहीये. 'इच्छामृत्यु' वा 'दयामृत्यु' हा सध्या एक मोठा वादाचा विषय होऊन बसला आहे. विषयाच्या बाजूने आणि विरूद्ध वाद सुरूच आहे.

आजारपणांत
रोग्याचा त्रास दूर करण्यात प्रत्येक डॉक्टर प्रयत्नशील असतोच. असेच एक डॉक्टर आहेत ऑस्ट्रेलियाचे डॉ.फिलिप. त्यांच्या मते जर उपलब्ध डॉक्टरी उपाय रोगीच्या वेदना कमी करण्यात सक्षम नसतील आणि मृत्यु हा अखेरचाच उपाय डॉक्टरांच्या नजरेसमोर असेल तर त्या जीवघेण्या (पण लवकर न संपणार्या) वेदना सहन करत राहण्या व मृत्युची वाट बघत बसण्यापेक्षा त्या रोग्याला सुखद मृत्यु देण्यात यावा. त्यांचे हया बाबतीत प्रयत्न सुरू आहेतच. खूप विरोध सहन करावा लागत असतांना पण ते आपल्या हया मताशी चिकटून आहेत. इच्छामृत्यु किंवा दयामृत्यु, हयाचा ते इतक्या प्रखरतेने प्रचार करत आहेत की ऑस्ट्रेलिया मधे त्यांना 'डॉ ड़ेथ' हयाच नावाने आता सगळे ओळखू लागले आहेत.

ह्या
इच्छामृत्यु साठी तत्काळ मृत्य यावा म्हणून त्यांनी एक खास मशीन 'डेथ मशीन' पण बनविली आहे. ते कायद्याच्या विरूद्ध तर जाऊ शकत नाहीत पण त्यावर पर्याय शोधण्याच्या मागे मात्र जरूर आहेत. आंतर्राष्ट्रीय समुद्रात जहाजावर इच्छामृत्यु देणे व येथे ऑस्ट्रेलियन कायद्याला चालू न देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना पक्का विश्वास आहे की त्यांना यश नक्कीच मिळेल. त्यांनी असा पण दावा केला आहे कि त्यांना आजपर्यंत २०० हून अधिक लोकांनी इच्छामृत्यु मागितला आहे.

तीव्र
वेदना सहन करणारा व्यक्तिची अशी इच्छामृत्युची विनवणी समोरच्या माणसाला हलवून सोडते. जर सगळयांनी हया विषयावर थोडा जरी विचार करायला सुरूवात केली तरी कदाचित काही पर्याय शोधता येईल. प्रजासत्ताक देशात जेंव्हा सत्तापक्ष असा सामाजिक क्रांति घडवून आणणारा प्रस्ताव आणतो तेंव्हा विरूद्ध पक्षाकडून तो हाणून पाडला जातो. भारतासारख्या परंपरावादी देशात असे कायदे लागू होण्याची शाश्वती वाटत नाही. असा कायदा कदाचित लागू होणे अशक्य असेल पण रोगी स्वत: जर का ही इच्छा व्यक्त करत असेल आणि त्याच्या यातना बघवत नाहीत असे म्हणणार्या त्याच्या कुटुंबातील लोकांचे त्याला सहकार्य मिळाले तरच हे काही प्रमाणात शक्य होऊ शकते. पण कितीही झाले तरी कुटुंबातील लोक कधी हयाला तयार होतील? इच्छामृत्यु हया विषयाची दूसरी बाजू अशी पण आहे की डॉक्टर जेंव्हा पूर्णपणे रोगीच्या बाबतीत हताश आहेत तेंव्हा ते स्वत: रोग्याच्या बाजूने उभे राहू शकतात। असहय वेदनेतला रोगी सोप्या मृत्युला जवळ करू शकतो. इच्छामृत्यु आणि सहज सोपा मृत्युसाठी रोग्याला मदत करण्याला 'रोग्याचा जीव घेणे' असे म्हणू शकत नाही. सेवाधर्म हया डॉक्टरांनी सोडून दिला आहे असा विचार करणे पण बरोबर नाही.

वेळा जन्मत:च असे रोगी असतात जे मानसिक व शारीरिक दृष्ट्या लाचार असतात। समाज किंवा कुटुंबातील व्यक्ति त्यांना परावलंबी व बोझ समजत नसतील पण, पण ही सत्यपरिस्थिति आहे। हया लोकांना ही समज पण नसते। अशा व्यक्तिंसाठी डॉक्टर व कुटुंबातील सदस्य ह्यावर निर्णय घेऊ शकतात. नीदरलैंडमधे अश्या इच्छामृत्युला सुरूवात झाली आहे. हयाचबरोबर जेंव्हा नुकतेच जन्मलेले बाळ बर्‍याच गोष्टींची कमी घेऊन जन्मले असेल व पूढचे आयुष्य त्याचे अंधारात आणि खूपच भयावह असेल तर त्याला पण असा मृत्यु देऊ शकतो. फक्त सगळयांचा सहयोग इथे पण आवश्यक असतोच.

डॉ.केव्होरकीयन ने पण अमेरिकेत ८० च्या वर अशा प्रकारच्या लोकांना मृत्यु देण्यात मदत केली आहे पण त्यांना आवश्यकतेनुसार सहयोग प्राप्त झाला होता हे विशेष. इच्छामृत्यु व तो ही एकदम कमी त्रासाचा व ताबडतोब मिळवून देणार्या पद्धतींवर अधिक जोर दिला जातो.काही रोगी असे असतात जे आपल्या इच्छाशक्ति आणि आत्मशक्तिच्या जोरावर ओढवणारे कुठलेही दु:ख झेलायला तयार असतात पण काही असा वर्ग आहे जो आजाराचे नाव व तीव्रता समजताच हातपाय गाळू लागतात. अशा निराशावादी लोकांना पण जीवनाचा अंत करण्याचा हा एक पर्याय आहे.

तसे बघितले तर ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की असा मृत्यु कोणाला देणे सोपे काम नाही। पण रोग्याची एक सारखी इच्छामृत्युची इच्छा, डॉक्टरांची सहमती आणि कुटुंबाचा सहयोग असला तर 'इच्छामृत्यु' सफल होऊ शकतो. आता हेच बघायला हवे की 'इच्छामृत्यु' ला न्यायिक सम्मति मिळून हा व्यवहारात येऊ शकतो का?

दीपिका 'संध्या'
११ जानेवारी २००८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: