रविवार, २ ऑगस्ट, २००९

आमच्या मैत्रीला सलाम....

आज ऑगस्ट महीन्याचा पहिला रविवार म्हणजे जागतिक मित्रता दिवस

जागतिक मित्रता दिवस येतो आणि जातो...खास दिवसाची मैत्रीला गरज असतेच कुठे...मैत्री जुनी असो की नवीन.....पण टिकवणे तितकेच कठिण. एकतरफी मैत्री टिकवणे जमत नाही त्यामुळे उदासीनतेत ती कमी होत होत संपुन जाते. वाईट वाटतं... आजपासुन ३०-३५ वर्षापुर्वी फक्त 'पत्र पाठवणे' हा एकच दुवा होता मैत्री मधे. शाळेतल्या, कॉलेजमधल्या मैत्रिणी ह्याच कारणाने दुरावल्यात. खरं तर माझा पत्र लिहीणे हा एक छंद आहे. सगळ्यांनीच तेव्हढ्या उत्साहाने आणि आत्मियतेने पत्र पाठवावे हा माझा आग्रहच नाही त्यामुळे दोष कोणाला देत नाही पण असं घडून जातं आणि पोकळी निर्माण होते कारण ती शाळा-कॉलेजमधील मित्रता मला आज खूप मोलाची वाटते. सध्याच्या ऑरकुट मधे पण मी खूप प्रयत्न केला की कुठे ही जुनी नाती गवसतात का....पण निराशाच पदरी आली.

इतके सगळे असतांना रुचिर शिशिर च्या लग्नाच्या वेळी मैत्री कशी असावी आणि जपावी ह्याचा प्रत्यय आला. १९७९ साली लग्न होऊन आम्ही फरीदाबाद ला गेलो. हरियाणामधे असल्यामुळे मराठी लोक जवळ येणारच. नागपुरकर, पुणेकर, मुंबईकर..सगळे खूप जवळ आलोत. सुमंत, देशमुख, मराठे, दिक्षित आणि आम्ही अशी पंचकोनी मित्रता तेंव्हा फरीदाबाद मधे प्रसिद्ध होती. नंतर बाकी मंडळी पण येऊन मिळालीत आम्हाला..पण आम्ही थोडे जुने होतो. वर्षानुवर्ष उलटलीत...सगळ्यांनी आपापली घरे बांधलीत की असेच भासत होते की आता तिथेच स्थायिक होणार पण कालांतराने आमचे, दिक्षितांचे, मराठ्यांचे फरीदाबाद सुटले.... सुरुवातीला २ वर्षात एकदा तरी फरीदाबाद चक्कर ही मैत्री आम्हाला खेचून करायला भाग पाडायची पण पुढे जमेनासे झाले त्यामुळे नंतर जेंव्हा आम्ही भारतात जात असू...फोनवर भेट होतच असते. फोनने सान्निध्य साधलेलेच आहे. मुलं मोठी झाली आहेत..एकेकाची लग्नं होत आहेत...आम्हाला कुवैतहून प्रत्येक वेळी जाणे जमलेच असे नाही. पण खर्‍या मैत्रीची साथ इथे मिळाली आणि कुठलाही किंतु मनांत न ठेवता सगळेच्या सगळे पुण्याला लग्नाला आले होते. मांडवात अभिमानाने सांगत होतो आम्ही उभयतां आमच्या ३० वर्षांच्या जुन्या पण परिपक्व मैत्रीबद्दल...

१९८९ साली फरीदाबादच्या मित्रप्रेमात नाहून नोकरीच्या निमित्याने औरंगाबादला येणं झालं. सिडको मधे बंगलेवजा घरं होती. अशा ठिकाणी रहायचे म्हणजे आधी थोडं कठिण वाटत होतं कारण लोकं फारसे मिसळत नसल्याचंच कानावर होतं. पण काय नशिब घेऊन आलो आहोत आम्ही...जिथे जाऊ तिथे खासच मित्रपरिवार तयार होतो. बिंदू काका काकू (काकूंची मुलगी स्वाती आता पुण्यातच आहे..), भैरवी-उज्वल, पद्मा-अनिल...इतकी छान मंडळी सगळी. औरंगाबाद सोडेपर्यंत खूप जगलो ह्या सगळ्यांबरोबर..खूप आठवणी साठवून आहोत मनांत. वर्ष-दीड वर्षातच पद्मा ने बदलीमुळे औरंगाबाद सोडले तर सहवास फार नव्हता पण आमची जोडी अशी जमली होती की बस....मुलांच्या मुंजीला खास अमरावती हून आली होती. प्रेम तसेच होते पण भेट मात्र अगदीच दुर्मिळ झाली होती. मध्यंतरीच्या वर्षात बाकी सगळ्यांशी फोनवर बोलणं होत असे पण पद्माला गाठणे जमलेच नाही. आठवण खूप यायची. मधे एक दोनदा बिंदू काकांनी नंबर मिळवला तिचा आणि खूप गप्पा झाल्या फोनवर.

सगळ्यांशी कधी बोलणे झाले... कधी नाही.. कधी भेट झाली...कधी नाही...पण १५ एप्रिल च्या रुचिर शिशिर च्या लग्नाला फरीदाबादकर आणि औरंगाबादकर... सगळेच्या सगळे हजर होते....फरीदाबादच्या सगळ्यांचेच रुचिर शिशिर हे पुतणे....औरंगाबादच्या बिंदू काका काकूंच्या नातवांचं लग्न, भैरवी व पद्माच्या भाच्यांचं लग्नं होतं..खरं तर ह्या सगळ्यांशी नातं मनांचं आहे...त्याला कोणतीच व्याख्या नाही..कोणतेच नांव नाही.. प्रेम किती ती तुलना नाही...तर असे सगळे लग्नाला येणारच नं...कदाचित आपले काही कार्यक्रम त्यांना मागे पुढे करावे लागले असतील...पण लहानाचे मोठे त्यांच्यासमोरच झालेल्या रुचिर-शिशिर च्या बरोबर लग्नाचं औत्सुक्य व आनंद त्यांना चैन कसे पडू देणार....

बाकी सगळ्याबरोबर ह्या सगळ्यांच्या उपस्थितिने लग्नाची शोभा नक्कीच वाढली.....आपका प्यार सर आँखों पर...

ह्या ऋणानुबंधाला आणि आमच्या मैत्रीला माझा सलाम...

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनांत मैत्रीमधे ठेच पण लागली आहे कधी तरी.......इलाज नाही.... जीवन ह्यालाच तर म्हणतात... अशा कटु अनुभवांमुळेच आमची जुनी प्रेमाची नाती अधिकच दृढ आहेत हे जाणवतं आणि अजूनच मजबूतीकडे वळतात नं...

मैत्रीवर थोड्या चार ओळी.....

असे कधी न होणे की मित्रच नसेल
वरवर पण मैत्री ही नक्कीच असेल

रक्ताच्या नात्याची ओढ असेल खरी
मैत्रीच्या नात्यात ती अधिकच असेल

लिहीले खूप गेले काव्य मैत्रीचे तरी
सूर प्रत्येक मैत्रीचा खासच असेल

गंध नसेल मैत्रीला, छंदात रंगलेली
जुनी झाली तरी रुप नवीनच असेल

विश्वासघाताने मन ठेचाळू दे कधी
अपुल्या मैत्रीत फक्त विश्वासच असेल

दीपिका 'संध्या'

तू थांब ना...

कसला पसारा आठवांचा
देही येतो आता शहारा
गुंफून घे हात या हाती
सौख्य ते वेचण्यास तू थांब ना

डोकावली नयनात तुझ्या
बावरी रे ही प्रीत माझी
पापण्यांच्या कोरीत त्या
मला वसविण्यास तू थांब ना

रात्र आजची पुरती ढळली
असतील झाल्या गुजगोष्टी
परी आहे रे मी मनकवडी
मना उमगण्यास तू थांब ना

श्रावणाच्या ह्या वीराण रात्री
आळविता सूर मेघ मल्हारी
चिंब नभासम बेहोश मिठी
धुंद धुंद होण्यास तू थांब ना

दीपिका 'संध्या'