बुधवार, २१ एप्रिल, २०१०

अघटित आणि अजबच सारे... !!!


वातावरणांत बदल घडत आहेत.. हवामानांत बरेच उतार चढाव झाले आहेत. ४-५ वर्षापासुन पृथ्वीतलांवर सपाटून घडामोडी झाल्या आहेत व होत आहेत. विज्ञान प्रगतिपथावर अतिशय वेगवान आहे. आइसलैंड मधे ज्वालामुखीचा धूर आणि धूळ लंडन वर पसरून विमाने रद्द झालीत.. बरेच भारतीय आणि एअर इंडियाची विमाने तिकडे अडकली आहेत. सगळी कडेच ह्या सगळ्याचा खूप परिणाम झाला आहे. असो...

इथे कुवैत मधे पण काहीसे असेच वेगळेच पुढे येतंय.. २६ मार्च ला महाराष्ट्र मंडळाची सहल मिशरेफ उद्यानांत होती. प्रत्येक वर्षी ह्या सहलीला उन्हाचा इतका त्रास होतो की नको ते खेळ.. नको ते जेवण... सगळे जण जमेल तसे सावली शोधत बसलेले असतात. पण ह्या वेळी सकाळी घरून निघालो तेंव्हा सकाळी ९ पासुनच आभाळी हवा होती. थोडा पावसाचा शिडकांव आधी होऊन पण गेलेला दिसत होता. पुर्ण दिवस पाऊस येतोय... आम्ही सगळे भिजतोय.. मग थोडी उघाडिप की सगळे वाळत होतो. खेळ खेळत होतो. पुन्हा पाऊस येत होता. खूप छान दिवस गेला.. उन्हाचा त्रास झाला नाही त्यामुळे सगळे आनंदात घरी गेले. पण काही तरी वेगळेच वातावरण होते हे नक्की सगळ्यांच्या मनांत आल्यावाचुन राहीले नसेल.

गेल्या शनिवारचा १० एप्रिल चा दिवस अगदी साधारण उजा़डला होता. सकाळी ७.४५ ला थोडी धूळ उडतेय असं वाटून दारं बंद केलीत. पाच मिनिटांत अंधारून आले आणि इतका ज्यास्त अंधार झाला की जसे रात्रीचे आठ वाजले असावे. खूप जोरात वारे सुरू झाले. कामांवर जाणार्‍या लोकांच्या गाड्या दिवे लावून रस्त्यावर धावत होत्या. रस्त्यावरचे व घरांतले दिवे लागले होते. थोड्याच वेळात तुफान व जोरांत पाऊस सुरू झाला. कोसळत होता अक्षरशः. खिडकी च्या काचेतून बघायला पण भिती वाटत होती. विमानतळावर भितीचे वातावरण.. विमाने जी उतरण्यात होती त्यांच्यासाठी तर परिस्थिति वाईटच होती. अर्धा तास हे सगळे नाटक सुरू होते. काळे ढग जाऊन उजेड झाला.. तासांभराने कोणी विश्वास ठेवणार नाही की काय घडून गेले आहे. एकदम सगळे सामान्य झाले होते. आणि विशेष असे की ह्या घटनेने पूर्ण कुवैत व्यापले होते. व अशी घटना बहुतेक कुवैत च्या इतिहासात पण नसेल. एरव्ही इथे असेच एका भागात पाऊस पडतोय तर दुसरीकडे असेलच असे नाही.

रविवारचा दिवस उन्हाने गरम होता. संध्याकाळी साडे सहा च्या सुमांरास थोडासाच वारा वाहत होता. बीच वर चालायला जाण्याच्या तयारीत होतो. तेव्हढ्यात बाहेर पावसाचा आवाज आला. वर आकाशाकडे बघितले तर कुठे आभाळ-पावसाचे ढग काहीच नव्हते. पण सुरू झालेला पाऊस असा वाढला की समोर बाल्कनी मधे जाऊन मजा घेत होतो आम्ही. इतक्यात मोठ्या मोठ्या गारा बालकनी मधे गोळा झाल्या. काही कळेना हे काय?... रस्त्यावर होणारी पादचार्‍यांची धावपळ.. गाड्यांची पँ-पँ.... एकदम हो-हल्ला. १५ मिनिटांचा गारांसह तुफान पाऊस नंतर थांबला. पाऊस सुरू असतांना दुसर्‍या भागांत राहणार्‍या मैत्रिणीला विचारलं तर तिकडे अगदी कोरडे ठणठणीत..

थंडी ह्यावर्षी आलीच नाही.. गरमी ने भारतात मार्चपासुनच हैराण करायला सुरूवात केलीये. सगळंच बिघडलंय हे नक्की. कुवैत मधे नोव्हेंबर डिसेंबर मधे थंडीत फक्त आम्ही पाऊस थोडा अनुभवतो. ह्यावर्षी तेंव्हा फारसा पाऊस आलाच नाही तर आता हा एप्रिल मधला पाऊस म्हणजे सगळेच विचित्र. ह्यापुढे तर जे जे होईल ते ते पहावे.... विज्ञानामधे व मानवाने केलेल्या असंख्य शोधांमधे आनंद तर मिळतोय पण असंतुलनाला सीमाच उरली नाही. भविष्याची चिंता सगळ्यांनाच असेल हे नक्की... !!!!

दीपिका जोशी 'संध्या'