बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

प्रेमाची ही अशीच बंधने....

वर्षभर प्रेम करत असावे.. प्रेम देत रहावे... माझा स्वभाव अतिशय हळवा... समोरच्या व्यक्तिच्या डोळ्यात आनंदाचे किंवा दुःखाचे दोन अश्रु असतील तर माझ्या डोळ्यांत त्याच्या शंभरपटीने. औषध तर नाहीच स्वभावाला. अनुभव नेहमीचेच आहेत त्यामुळे कदाचित माझ्या ह्या अश्रुंचे महत्व मीच कमी करून घेतले पण असेल. .. पुन्हा स्वभावच आडवा येतोय हो सारखा... समोरच्या प्रत्येक व्यक्तिवर विश्वास ठेवण्याचा.. जर ती रडतेय तर खरंच... जर ती हसतेय तर खरंच... पारख अजिबात नाही. ह्या नकळत घडणार्‍या प्रामाणिकपणाने धोके पण खूप खाल्ले आहेत आयुष्यात... जसे असेल तसे पण प्रत्येकावर माझ्या सगळ्या मैत्रिणी.. आप्तस्वकीयांवर मनांपासून प्रेम करते आणि करत राहीनच.

पुण्याच्या घरी जेंव्हा जेंव्हा आम्ही जातो तेंव्हा अल्पना नावाची एक बाई... (मी तिला कधी कामवाली किंवा एकेरी नांवाने संबोधले नाही..) माझ्यापेक्षा वयांने लहानच.. ती यायची आणि आमच्या वास्तव्याच्या दिवसांत बाकी सगळ्या घरची कामे संभाळून आमचे काम करून देत असे. कधी कुठली अपेक्षा नसायची. बाकी कामाबरोबर कधी वाटले तर गरम पोळ्या पण करून देत असे. पोळ्या अशा करत असे की अगदी मऊ सूत.

एप्रिल महीन्यात रुचिर-शिशिर चे लग्न झाले तेंव्हा अगदी घरच्यासारखे वेळांत वेळ काढून माझी मदत केली होती. अगदी दाणे भाजून कूट करणे, सामान ठेवायला धान्याच्या कोठ्या रिकाम्या करून धुवून देणे... रोजचे काम तर असायचेच. लग्नाच्या दिवशी गाड्या ठेवल्याच होत्या तर दुपारी तिला वेळ मिळेल तेंव्हा हॉलवर यायला सांगितले होते. जेवून लगेच परत गेली. तिला व तिच्या भावजयीला छान साड्या दिल्यात. साडी मुद्दाम आधीच दिली होती तर लग्नाच्या दिवशी नेसून आली होती. ''लाडू चिवडा आपल्या हाताने घे जितका हवा तेव्हढा...'' ह्या माझ्या वाक्याने ती किती सुखावली होती हे तिचा चेहराच सांगत होता. घेतला इतका कमी की मलाच तिला काढून द्यावा लागला.

नंतर नोव्हेंबर मधे माझ्या पुणे भेटीत तिला बरे नव्हते त्यामुळे माझी व तिची भेट होऊ शकली नाही. ताप-सर्दी-खोकला झाला असेल ह्याशिवाय फारसा काही विचार माझ्या मनांला शिवलाच नाही. परवा अचानक मला कळले की ती गेली... तिच्या आईला डायबिटीस आहे व तिचीच चौकशी मी नेहमी करत असे. नंतर समजले की तिला पण तसाच डायबिटीस होता पण आईकडे लक्ष देता देता कदाचित स्वतःला काही असे असेल हे दुर्लक्षिले गेले असे म्हणतात. बघता बघता सगळे अंग शिथिल होत गेले आणि ती नकळतच पडद्याआड गेली.. कळल्यापासून माझे चित्त कशातच लागत नाही. पुण्याला गेल्यावर अल्पना आता माझ्याकडे येणार नाही ही कल्पनाच मला सहन होत नाही....

तब्येतीनुसार कुवैतला २ वर्षापुर्वी कामाला बाई शोधली. ह्या तेलुगु बायकांबरोबर भाषेची खूप अडचण येते. मुलीची जात...वयाने लहान... प्रेमाने समजावून देत असे मी सगळे काम कुमारी ला. हळू हळू गप्पा मारता मारता तिला हिंदी शिकवले. आता तर बरेच चांगले हिंदी बोलू लागलीय की ती स्वतःला काय हवे किंवा मला काय हवेय ते नक्कीच समजू शकते. इथे नवरा, दीर व सासू बरोबर राहते. गरीब परिस्थितीतून वर येण्यासाठी हे लोक कुवैत ला येतात.... बर्‍याच वैध-अवैध मार्गाने पण इकडे यायचा अट्टाहास असतो. गप्पांमधे सांगते, ''उधर खेत में गरमी-धूप में काम करेगा.. पैसा नहीं... थक जाता था... इधर घर में काम.. अच्चा काम.. एसी में काम... बस आने जाने में धूप लगता है.. तो छाता है ही तुमने दिया हुआ...''

छान चालू सगळे.... तिला दिवस गेलेत. खूपच त्रासांत जीव होता तिचा. सुरूवातीचे तीन महीन्यांपैकी सगळे मिळून १ महीना तरी तिने काम केले की नाही शंकाच आहे. यायची ती दमल्यासारखीच... समोर कार्पेट वर झोपायची १ तास.. माझ्या सारखी हळव्या मनांची मी... तिला कॉफी करून द्यायचे... जेवायची इच्छा असेल तर जेवायला वाढायची... आणि ती निघून जायची उरलेले काम मी करत असे. नंतर थोडा त्रास कमी झाला पण माझी दयाळूवृत्ति कमी कुठली होणार... तिच्या कामांत माझे मदत करणे मात्र सुतभर कमी झाले नाही. रोज तिची चौकशी व मी देत असलेल्या आरामाने भारावून जात असे. मी कुठलेही ज्यास्तीचे काम करत असेल तर ''मॅडम मैं कर देगा'' म्हणून लगेच करू लागत असे. आठवा महीना लागायच्या २ दिवस आधी ती भारतात गेली. जायच्या दिवशी सकाळी बाकी ठिकाणी कामं करून माझ्याकडे आली...काम मी तिला करू देणारच नव्हते. छानसा गजरा व ५ फळांनी तिची ओटी भरली.. साडी दिली... पैसे दिले.. )होणार्‍या बाळासाठी दोन टेडी बेयर आणले होते पण ''किदर लेके जाएगा...'' म्हणून इथेच सोडून गेलीय)...काय तिचा जीव सुखावला कारण तिला हा प्रेमळ धक्काच होता. डोळे पाणावले तिचे व माझे... पाया पडली. हे घरी होतेच तर ह्यांचा पण आशीर्वाद घेतला. ''मायेला-प्रेमाला कुमारी सारख्या मुली भुकेल्या असतात का'' किंवा ''तिचे इतके काही करायची काय गरज?''.. ''अशांना त्यांच्या जागीच त्यांना राहू द्यावे...'' वगैरे वक्तव्य खरी की मी करते ते चांगले हे मी ठरवू शकत नाही..

तिची सासू आता कामाला येतेय .. कुमारीची मी चौकशी करतच असते पण ती पण सांगते ''कुमारी टेलीफुन बोलू.. दीपिका मॅडम कैसा है? उसका कंधे का दर्द कैसा है पूचता है...?'' ती २ महीन्याच्या बाळाला गरीबीपायी भारतात सोडून येणार आहे ह्या बातमीने मी हादरले आहे. पर मेरा कमज़ोर और दयावान दिल यहाँ शायद कुछ कर नहीं पाएगा ये बात मैं जानती हूँ...
आता जून मधे ती परत येणारेय... तिच्यासाठी मी तिच्या सासूचे काम चालवून घेते आहे कारण कुमारीच्या कामाला सर नाही... तिचे काम हिरावून मी दूसरी बाई ठेवू इच्छित नाही हीच ह्या सगळ्या मागची भावना आहे....

दीपिका 'संध्या'

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

प्रेमदिन हा आला आला... गेला गेला...

प्रेमदिवस म्हणून १४ फेब्रुवारी हा दिवस बांधला गेला आहे. प्रेमाला खरंच ह्या बंधनाची गरज आहे का हा प्रश्न बहुतांशांच्या मनांत येत पण असेल. आपण मानावे की न मानावे पण अनावधानाने हा दिवस सगळेच.. सगळ्याच वयांचे लोक अनुभवतात आणि त्याची मजा घेतात. ह्या वेळी प्रेमदिवस आला नेमका सुट्टीच्या म्हणजे रविवारच्या दिवशी. कुठे तरी वाचनांत आले ''लपून-छपून प्रेमदिवस अनुभवा.. कारणे शोधा...'' कारणे साधी सरळ सोपी वाटणारी जसे परीक्षा आली आहे तर महत्वाचे प्रश्न सांगायला सरांनी ट्यूशन क्लास मधे बोलवले आहे, ऑफिसमधे कोणी सोडून जातंय तर त्याला शुभेच्छा-जेवण आहे, मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस आहे तर पार्टी आहे वगैरे वगैरे.... मजा वाटते नं!!!


प्रेमदिनाच्या दिवशीच प्रेम व्यक्त करता येते असे नाही आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमदिनाची वाट बघण्याची तर त्याहून गरज नाही. इतके खरे की स्वतःला व्यक्त न करता येणार्‍या व्यक्तिंना कदाचित ही पर्वणीच ठरावी... गुलाबाचे फूल आपल्या प्रेयसीला दिले तर शब्दांची गरज निदान त्यादिवशी तरी भासत नसावी. वर्षाचे ३६५ दिवस प्रेमाचेच असावेत, शब्दांबरोबरच ते कृतीत पण दिसावे. प्रेमदिनाला महत्व द्यायचेच असेल तर आणि कृती मधे दाखवायचे असेल तर अशी पण बरीच नाती जोडता येतील ज्यांना ह्या सगळ्याची गरज आहे. बरेच लहानगे जीव प्रेमाला आसुसले असतील त्यांना प्रेम करावे... प्रत्येकाच्या अशा थोड्याशा प्रयत्नांनी बरेच लाल गुलाब फुलतील हे नक्कीच..

थोडे फार आमचे पण असे झालेच की प्रेमदिवस साजरा केलाच गेला. लाल गुलाबांची देवाण-घेवाण तर नाही झाली पण बाकी पारिवारिक मित्र-मैत्रिणींना शुभेच्छांचे आदान-प्रदान नक्कीच आवर्जून केले. मुलांना-मुलींना शुभेच्छा संदेश पाठवलेत, रात्री जेवायला सगळे मिळून बाहेर गेलो आणि प्रेमदिवस संपला.

माझ्या नजरेत मला ह्या अशा दिवसांचे जरा पण महत्व नाही. लग्नाला ३१ वर्ष झालीत... निरनिराळ्या तर्‍हेने प्रेम दर्शविले गेले असेल.. अशा दिवसांची संकल्पना भारतात इतक्यात रूजली आहे. त्यामुळे माझ्या शब्दांत माझ्या प्रियकरासाठी प्रेमदिनाची ही कथा-कविता......



केसात माळूनी मोगरा
मिठीत ह्या श्वासास वाहिन
शिरशिरी ह्रदयांत दोन्ही
असे रोज अपुला प्रेमदिन

चंद्र पुनवेचा खुणवतो
चांदणकणां त्या मी शिंपिन
कधी न रिक्त राहू आपण
असे रोज अपुला प्रेमदीन

रेशीमगाठी बंध आपुले
जुन्या प्रेमाचे भास नविन
धुंदीत बेधुंद तू अन मी
असे रोज अपुला प्रेमदीन

दीपिका 'संध्या'