सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

प्रेमदिन हा आला आला... गेला गेला...

प्रेमदिवस म्हणून १४ फेब्रुवारी हा दिवस बांधला गेला आहे. प्रेमाला खरंच ह्या बंधनाची गरज आहे का हा प्रश्न बहुतांशांच्या मनांत येत पण असेल. आपण मानावे की न मानावे पण अनावधानाने हा दिवस सगळेच.. सगळ्याच वयांचे लोक अनुभवतात आणि त्याची मजा घेतात. ह्या वेळी प्रेमदिवस आला नेमका सुट्टीच्या म्हणजे रविवारच्या दिवशी. कुठे तरी वाचनांत आले ''लपून-छपून प्रेमदिवस अनुभवा.. कारणे शोधा...'' कारणे साधी सरळ सोपी वाटणारी जसे परीक्षा आली आहे तर महत्वाचे प्रश्न सांगायला सरांनी ट्यूशन क्लास मधे बोलवले आहे, ऑफिसमधे कोणी सोडून जातंय तर त्याला शुभेच्छा-जेवण आहे, मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस आहे तर पार्टी आहे वगैरे वगैरे.... मजा वाटते नं!!!


प्रेमदिनाच्या दिवशीच प्रेम व्यक्त करता येते असे नाही आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमदिनाची वाट बघण्याची तर त्याहून गरज नाही. इतके खरे की स्वतःला व्यक्त न करता येणार्‍या व्यक्तिंना कदाचित ही पर्वणीच ठरावी... गुलाबाचे फूल आपल्या प्रेयसीला दिले तर शब्दांची गरज निदान त्यादिवशी तरी भासत नसावी. वर्षाचे ३६५ दिवस प्रेमाचेच असावेत, शब्दांबरोबरच ते कृतीत पण दिसावे. प्रेमदिनाला महत्व द्यायचेच असेल तर आणि कृती मधे दाखवायचे असेल तर अशी पण बरीच नाती जोडता येतील ज्यांना ह्या सगळ्याची गरज आहे. बरेच लहानगे जीव प्रेमाला आसुसले असतील त्यांना प्रेम करावे... प्रत्येकाच्या अशा थोड्याशा प्रयत्नांनी बरेच लाल गुलाब फुलतील हे नक्कीच..

थोडे फार आमचे पण असे झालेच की प्रेमदिवस साजरा केलाच गेला. लाल गुलाबांची देवाण-घेवाण तर नाही झाली पण बाकी पारिवारिक मित्र-मैत्रिणींना शुभेच्छांचे आदान-प्रदान नक्कीच आवर्जून केले. मुलांना-मुलींना शुभेच्छा संदेश पाठवलेत, रात्री जेवायला सगळे मिळून बाहेर गेलो आणि प्रेमदिवस संपला.

माझ्या नजरेत मला ह्या अशा दिवसांचे जरा पण महत्व नाही. लग्नाला ३१ वर्ष झालीत... निरनिराळ्या तर्‍हेने प्रेम दर्शविले गेले असेल.. अशा दिवसांची संकल्पना भारतात इतक्यात रूजली आहे. त्यामुळे माझ्या शब्दांत माझ्या प्रियकरासाठी प्रेमदिनाची ही कथा-कविता......



केसात माळूनी मोगरा
मिठीत ह्या श्वासास वाहिन
शिरशिरी ह्रदयांत दोन्ही
असे रोज अपुला प्रेमदिन

चंद्र पुनवेचा खुणवतो
चांदणकणां त्या मी शिंपिन
कधी न रिक्त राहू आपण
असे रोज अपुला प्रेमदीन

रेशीमगाठी बंध आपुले
जुन्या प्रेमाचे भास नविन
धुंदीत बेधुंद तू अन मी
असे रोज अपुला प्रेमदीन

दीपिका 'संध्या'


२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Hi,

I am Shilpa. I read all your blogs and really enjoyed..
Would like to know more about the 'MUGS' which you have presented to your son and daughter in law.. (I want to present such thing to my dad.) Could you please give me your email id so that i can talk to you..
my email Id is : shilpaacharya1@gmail.com

Thank you very much..

Regards,
Shilpa

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

प्रिय शिल्पा...

अरे वा... बरेच खोलात जाऊन सगळे वाचलंत तर... खूप खूप धन्यवाद. मी मेल करते तुम्हाला...

दीपिका