गुरुवार, ४ जून, २००९

रातराणी पसरविली रे......

मज सवे स्वप्ने पाहिली रे तूच ती
रंगात मेंदीच्या रंगविली रे तूच ती

ओठावर रुळला होता मूक हुंदका
फुले हास्यांची सजविली रे तूच ती

दाही दिशा मजसि हळुवार वाटल्या
अचानक प्रीत जागविली रे तूच ती

झोपलेल्या रानांत काळोख अति गर्द
काजव्यांना वाट दाखविली रे तूच ती

दाटून आला उर कसा ह्या सांजवेळी
गोड मिठीत रात्र फुलविली रे तूच ती

चांदणे फुलांचे शिंपले कुणी आकाशी
धरावर रातराणी पसरविली रे तूच ती

दीपिका 'संध्या'

बुधवार, ३ जून, २००९

जर लक्षात आले असते तर......

आई चे स्थान अतिशय उच्च आहेच पण कधी कधी बघा कसे मनांत विचार उचंबळून येतात- तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांच्या मनांत..

जीवनाच्या एका वळणावर पोहोचल्यावर मागे वळून बघता.....साधारण व्यक्तिच्या मनांत येणारी ही गोष्ट आहे....
घरोघरी घडणारी पण....काळ जातो...वेळ निघून जाते...हातात काही नाही...


जेंव्हा मी चार वर्षाचा होतो तेंव्हा- 'माझी आई माझे सर्वस्व आहे.... शी इज द बेस्ट!!'
आठ वर्षांचा झालो तेंव्हा मित्रांमधे आई चे स्थान उंचावरच - 'माझ्या आई ला सगळे काही येते हं...काय वाटले तुला यार....'

बारा वर्षाचा होता होता - 'माझी आई ना मला समजूनच घेत नाही बघ...'
जेंव्हा पंधरा वर्षाचा झालो - 'माझी आई मला सगळ्या ठिकाणी टोकतच राहते, अजिबात काही करूच देत नाही..'

अठरा वर्षाचा वाढदिवस झाल्या झाल्याच - 'कमॉन आई, आता मी कायद्याने सज्ञान म्हणवला जातो हां, माझ्या मधे मधे केले नाहीस तर नाही का चालणार तुला...'

पंचवीस वर्षाचा झालो तर सल्ले मिळू लागलेत - 'काही पण करण्याच्या आधी जर एकदा आईला विचारशील तर बरे होईल नं..'

पन्नाशी गाठतांना वाटले होते.- 'आई समोर नाहीये पण असती तर आज ह्या गोष्टीवर आईचे म्हणणे काय राहीले असते काय माहीत..'

आज माझी सत्तरी येण्यात आहे...वाटतेय - 'आज आई राहीली असती तर.....'

आई समोर असतांना गृहित धरलेच जात नाही...विचारही होत नाही तिच्याबद्दल..पण ती मात्र करत झिजतच राहते सगळ्यांसाठी... जेंव्हा महत्व कळते तोपर्यंत नको तितका काळ लोटलेला आहे हे लक्षांत येते....आहे ना...

दीपिका 'संध्या'

मंगळवार, २ जून, २००९

कशी कशी ही प्रेरणा...

रोजच्या सकाळ संध्याकाळच्या चाल-चाल-चालण्याने टस से मस फरक न पडता वजन वाढतच होते इथे ह्या कुवैत मधे... :) ५ वर्षापुर्वी जेंव्हा वजन वाढलंय ते कमी करायलाच हवंय ह्या प्रेरणेने मी पुण्यात दाखल झाले. २ महीने राहिले व हवं तेव्हढं वजन कमी करून परत आले. येतांना रामदेवबाबांच्या योग साधनेची सीडी घेतली. वजन जिथल्या तिथे ठेवायचे ते योगा व बाकी व्यायामाने ह्या मतावर मी ठाम होते.

मी व माझे पति ईमानदारीने हे सगळं करत होतो. मित्रमंडळींमधे 'दीपिकाचं वजन कमी झालं' हा चर्चेचा विषय होता. (आता पुन्हा वजन वाढलंय हा चर्चेचा विषय असू शकतो.. :) )माझा तर हे योगा प्राणायाम व व्यायामावर इतका विश्वास बसला की मी त्याचा उगीचच बिनकामाचा प्रचार करू लागले.. :)  ज्यांना गरज आहे त्यांना आणि नाही त्यांना पण मी पटवून देण्याचा प्रयत्न करत असे. इतकंच काय तोंडी बोलून-सांगून काही उपयोग होत नाही हे बघून मी त्या रामदेवबाबांच्या सीडी च्या प्रति बनवल्या व त्या द्यायला सुरूवात केली. थोडी बारीक झालीय असं तेंव्हा कौतुक करणारे लोक आता माझी खिल्ली उडवायला लागलेत. आमचा ४-५ परिवारांचा समूह एका आठवडी सुट्टीच्या दिवशी..शुक्रवारी (इथे जुम्मे जुम्मे सुट्टी नं) सकाळी आमच्याच कडे ती सीडी आम्ही लावली की मिळून बघू या. प्राणायाम ची सीडी बघता-बघतांच इतक्या त्यावर वाट्टेल तशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात की दूसरी योगासनाची सीडी लावायची मी हिम्मतच केली नाही. ह्याच सगळ्यांमधे शैलेश पण होता.

कोणाला काहीच सल्ला किंवा ह्या विषयावर चर्चा न करण्याची शप्पथ घेऊन मधल्या काळांत आमचा दिनक्रम तसाच सुरू होता. शैलेश वर्षभरांपुर्वी जरा आजारी पडला. दवाखान्यात किडनी च्या थोड्या विकाराने भरती होण्याची वेळ आली. घरी आल्यावर त्याला एक दिवस लिफ्ट मधे 'आर्ट ऑफ लिविंग' बद्दल माहिती देणारा कागद मिळाला. काय विचार आला मनांत तर त्या कागदावर दिलेल्या फोन नंबर वर फोन केला. आणि 'आर्ट ऑफ लिविंग' च्या 'श्री श्री योगा' मधे जाऊ लागला. मला फक्त इतकंच कानांवर आलं त्याच्या पत्नी कडून की तो काही तरी योगा करायला जातोय. मी दुर्लक्ष केलं. :)

एक आठवडा झाल्यावर बघितलं तर भेटल्यावर फक्त योगा प्राणायाम, श्री श्री योगा, आर्ट ऑफ लिविंग शिवाय दुसरा विषयच नाही. आम्हा उभयतांना कळलंच नाही की हे काय होतंय...काय घडलंय.. आधी 'समय नहीं मिलता.. ऑफिस में बहुत काम है.. थक जाता हूँ...वगैरे वगैरे (शैलेश गुजराती आहे त्यामुळे आमचं संभाषण हिंदीत असतं). आता त्याला सकाळी ५ वाजता उठून योगा प्राणायाम व सुदर्शन क्रिया करायला वेळ मिळतोय, ऑफिसमधले काम वाढलंय पण तक्रार नाहीये, थकलो ही तक्रार तर कधी नंतर कानावर आलीच नाही.

त्याच्याच प्रोत्साहनाने त्याच्या पत्नी ने, मुलीने आणि नंतर आम्ही दोघांनी पण 'श्री श्री योगा' केले. इथे दर शुक्रवारी सकाळी ५ वाजता सराव करायला सगळे जमा होतात. कोणाला जबरदस्ती नसते पण तिथे शैलेश प्रथम क्रमांकावर आहे. (आहे नं गंमतशीर...) आम्ही नाही जात कारण एक दिवस आराम हवा तो आराम ही आम्ही इमानदारीने करतो पण बाकी आठवड्याचे सहा दिवस योगा प्राणायाम ही तितक्याच इमानदारीने करतो. हा पठ्ठा सातही दिवस करतोच करतो. त्या पुढचा कोर्स (पार्ट वन) केलाय. आता अशी परिस्थिति आहे की कुठे ही आर्ट ऑफ लिविंग चा काही ही कार्यक्रम असेल, कुठे कुठली सीडी ह्याच संदर्भातली दाखविणार असतील, कोणाचे भाषण असेल तर तिथे तो जातोच.

त्याला आता आम्ही असं चिडवतो की कुवैत ला आता नवीन श्री श्री रविशंकर म्हणून शैलेश शंकर नावारुपाला आणि त्यांची जागा घेणार, थोडेच दिवसांत 'आर्ट ऑफ लिविंग' च्या प्रचाराप्रित्यर्थ शैलेश शंकर कुवैत हून सगळीकडे जाणार....असो...हा विनोद झाला पण त्याच्या जीवनशैलीत असा वाखाणण्याजोगा बदल झालाय हे बघून खूप आनंद होतो. माझ्या सांगण्याचा न झाला तरी असाच का होईना...पण आदर्श वाटावा असा...

आयुष्यात कुठली गोष्ट कशी कधी आपल्या जीवनांत बदल घडवून आणेल, किती खोलवर परिणामकारक ठरेल काहीच सांगता येत नाही ह्याचे हे एक जीवंत उदाहरण आहे. जसे इथे कागदाचे साधे चिटोरे... ते पण लिफ्टमधे फेकलेले, पायदळी तुडवलेले, चुरगळलेले-मरगळलेले. पण बुद्धि व्हावी ते उचलून बघण्याची व वाचण्याची. त्याही पुढे जाऊन त्यावर विचार करण्याची..सगळेच योगायोग पण आनंद देऊन जाणारे...

फक्त असंच सांगावंसं वाटतं की शरीरात काही असे विकार होऊन मग शिकण्यापेक्षा आजकालच्या धावत्या-पळत्या जगात स्वतःसाठी रोजची १५-२० मिनिटं काढण्याची खूपच गरज वाटते. असेही मत असणारी लोकं भेटलीत की जेंव्हा काही होईल तेंव्हा बघू हो....पण....अहो..असं नको हो...आधीच सावरा की...पण कोणालाच जबरदस्ती नाहीये. आपल्या जीवनांवर पूर्णपणे आपलाच हक्क आहे हे ही तितकेच खरे...(आर्ट ऑफ लिविंग किंवा रामदेवबाबा..योगासन प्राणायाम हाच शेवटी दोघांचा एकच हेतु आहे.)

दीपिका 'संध्या'

मागे वळून बघता...

एक दिवस रोजचा पेपर वाचत बसले होते, एका छोट्याशा लेखावर नजर गेली, अशी मनांत रूजलीय...तुम्ही पण ऐकाच...(वाचाच)

वेस्टमिनिस्टर एबे बिशप च्या कबरी वर एक संदेश लिहीलेला होता, ''माझ्या तारुण्यात ज्यास्त जबाबदारी माझ्यावर नव्हती. माझ्या कल्पनाशक्तिला पण काही मर्यादा नव्हत्या. त्यामुळे मी पूर्ण जगाला- त्यांच्या विचारांना बदलविण्याची स्वप्ने बघत असे. जसे माझे वय वाढले, अनेक अनुभव गाठीशी जमा झालेत. रोजच्याच व्यवहारात मी काही न काही तरी नवीन शिकत गेलो. त्यामुळे हुशार ही झालो. ह्या सगळ्यातूनच मला एक गोष्ट लक्षात आली की जगाला बदलणे इतके सोपे नाही जितके मला वाटत होते.

जीवनाची संध्याकाळ येऊ घालण्याआधीच विचार केला की आपल्या परिवारातच बदल घडवून आणावा आधी, मग बघू जगाचे पुढे. पण कसले काय..अतिशय कठिण..किती ती संकटे...मनांत विचार केला होता की हे तर मी यूं करीन..पण छे... सगळेच आपल्या मर्जीचे मालक आहेत. मुलं काय, पत्नि काय कोणीच ऐकायला तयार नाहीत. कोणीच मला काय म्हणायचे आहे ते समजुन घ्यायला तयार नाही. प्रयत्नांत अजुन थोडी वर्ष अशीच गेलीत. कदाचित हार मानली असावी मी की हे माझ्या आटोक्यात असणारे काम नाहीच. आज मी मृत्युशय्येवर आहे, आणि अचानक साक्षात्कार झाल्यासारखे भासू लागलेय की सर्वप्रथम मी स्वतःलाच बदलण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित असे पण झाले असते की माझा आदर्श समोर ठेवून घरातीलच बाकीच्यांमधे काही चांगले बदल घडून आले असते. आणि त्याच आशेने पुढे जाऊन, बदललेल्या आप्तस्वकीयांना बरोबर घेऊन पुढे पुढे पाऊल टाकत आपल्या समाजाला, देशाला आणि त्यानंतर जगाचा कायापालट करू पण शकलो असतो...पण...''

असा अनेक गोष्टींना आयुष्यात आपल्याला उशीर होत असतो. मागे वळून बघता तर येतंच पण हाती काहीच लागत नाही कारण सगळीकडेच गत गोष्टींचे मृगजळ दिसत असते. मी पण अशीच गत आयुष्याचा विचार करता करता कुठवर पोहोचते की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. काय काय ते पुन्हा कधी सांगेनच... पण गेल्या ७-८ वर्षात जी दिनचर्या बदलली, मार्ग बदललेत, वेळ घालवायचे साधन बदलले, मन साहित्यात गुंतू व रमू लागले. आता कुठलीच खंत नाही. वयाच्या ह्या पायरीवर हे ही नसे थोडके.......

दीपिका 'संध्या'