मंगळवार, २ जून, २००९

मागे वळून बघता...

एक दिवस रोजचा पेपर वाचत बसले होते, एका छोट्याशा लेखावर नजर गेली, अशी मनांत रूजलीय...तुम्ही पण ऐकाच...(वाचाच)

वेस्टमिनिस्टर एबे बिशप च्या कबरी वर एक संदेश लिहीलेला होता, ''माझ्या तारुण्यात ज्यास्त जबाबदारी माझ्यावर नव्हती. माझ्या कल्पनाशक्तिला पण काही मर्यादा नव्हत्या. त्यामुळे मी पूर्ण जगाला- त्यांच्या विचारांना बदलविण्याची स्वप्ने बघत असे. जसे माझे वय वाढले, अनेक अनुभव गाठीशी जमा झालेत. रोजच्याच व्यवहारात मी काही न काही तरी नवीन शिकत गेलो. त्यामुळे हुशार ही झालो. ह्या सगळ्यातूनच मला एक गोष्ट लक्षात आली की जगाला बदलणे इतके सोपे नाही जितके मला वाटत होते.

जीवनाची संध्याकाळ येऊ घालण्याआधीच विचार केला की आपल्या परिवारातच बदल घडवून आणावा आधी, मग बघू जगाचे पुढे. पण कसले काय..अतिशय कठिण..किती ती संकटे...मनांत विचार केला होता की हे तर मी यूं करीन..पण छे... सगळेच आपल्या मर्जीचे मालक आहेत. मुलं काय, पत्नि काय कोणीच ऐकायला तयार नाहीत. कोणीच मला काय म्हणायचे आहे ते समजुन घ्यायला तयार नाही. प्रयत्नांत अजुन थोडी वर्ष अशीच गेलीत. कदाचित हार मानली असावी मी की हे माझ्या आटोक्यात असणारे काम नाहीच. आज मी मृत्युशय्येवर आहे, आणि अचानक साक्षात्कार झाल्यासारखे भासू लागलेय की सर्वप्रथम मी स्वतःलाच बदलण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित असे पण झाले असते की माझा आदर्श समोर ठेवून घरातीलच बाकीच्यांमधे काही चांगले बदल घडून आले असते. आणि त्याच आशेने पुढे जाऊन, बदललेल्या आप्तस्वकीयांना बरोबर घेऊन पुढे पुढे पाऊल टाकत आपल्या समाजाला, देशाला आणि त्यानंतर जगाचा कायापालट करू पण शकलो असतो...पण...''

असा अनेक गोष्टींना आयुष्यात आपल्याला उशीर होत असतो. मागे वळून बघता तर येतंच पण हाती काहीच लागत नाही कारण सगळीकडेच गत गोष्टींचे मृगजळ दिसत असते. मी पण अशीच गत आयुष्याचा विचार करता करता कुठवर पोहोचते की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. काय काय ते पुन्हा कधी सांगेनच... पण गेल्या ७-८ वर्षात जी दिनचर्या बदलली, मार्ग बदललेत, वेळ घालवायचे साधन बदलले, मन साहित्यात गुंतू व रमू लागले. आता कुठलीच खंत नाही. वयाच्या ह्या पायरीवर हे ही नसे थोडके.......

दीपिका 'संध्या'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: