शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

महाराष्ट्र मंडळाचा वार्षिक कार्यक्रम... अफलातून....

बघता बघता २०१० संपत आले. महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतिक्षा सुरूच असते. आपल्याच सगळ्यांमधील कलांना ह्या कार्यक्रमात खूप वाव असतो. बच्चे कंपनी आपल्यापरी तर मोठे आपल्यापरी कसून प्रयत्न करत असतात. ३-३ महीन्यांचा सराव.. कोणासाठीच इतका सोपा नाही.
१० डिसेंबर ला दुपारी २.३० ला केंब्रिज शाळेत जमणार होतो. कोणी छान छान साड्यांमधे..कोणी पंजाबी ड्रेस मधे... रंगबिरंगी..चमचम... महाराष्ट्र मंडळ व सगळेच सदस्य चमकत होते. थोडा उशीरा कार्यक्रम सुरू झाला. छुटकू मुलांनी मज्जा आणली. ह्या ३-४ वर्षात महाराष्ट्र मंडळात खूप बदल जाणवतो की नाटकाव्यतिरिक्त मोठ्यांचे नाच किंवा तत्सम कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. लग्नानंतर थोडी संवय कमी झाली असेल असे वाटणे आजकाल महिलांची नाच करण्याची कमाल बघून एकदम चुकीचे ठरते. उत्कृष्ट संयोजन व दिग्दर्शन दिसून येते. प्रेरणा वलिवडेकर तर ह्या क्षेत्रात माहीर आहेच पण यंदा मुग्धा सरनाईक चे पण कौतुक करावे तितके कमी आहे. ‘राधा ही बावरी’ ही तिची दिग्दर्शित दर्जेदार नृत्यकला आणि सगळ्यांची सारखी वेषभुषा... सगळ्यांच मैत्रिणींनी छान नृत्य केले.
श्रृति हजरनीस ने नेहमीप्रमाणे मुलांवर किती मेहनत घेतली असेल ह्याचा प्रत्यय आलाच.
एकाच वेळी ३-४ कार्यक्रमात भाग घेणे किती अवघड पण ते मुलांना सोपेच असते हेच तिने दिग्दर्शित नाचांमधे करून दाखवले. लहान मुलांना आपल्या तालावर नाचवणे किती कठिण असेल हे तीच जाणे. तिला सलाम... व कौतुक आहे.

मधेच गणपति बाप्पांच्या आगमनाचे आणि बाल्या नृत्याची ओळख कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी करून देऊन एकदम मज्जा आणली.

ऐकुन होतो की शेवटच्या नंबरवर असलेली लावणी बघण्यासारखी आहे. सौ.मुग्धा सरनाईक दिग्दर्शित व सौ. भारती वासेकर आणि सौ. तृप्ती पराडकर यांनी सादर केलेली लावणी म्हणजे कार्यक्रमाची पर्वणीच होती. कौतुकाला शब्द नाहीत. ‘वाजले की १२’ ही नावाजलेली लावणी  इतक्या ताकदीने पेलणे म्हणजे खेळ आणि मजा नाही.. अप्रतिम.. वन्स मोर मिळाल्यावर असे वाटले की बाप रे.. आधीच ह्या दोघी इतक्या थकल्या आहेत..(जवळपास ६-७ मिनिटांची ती लावणी आहे) आम्हाला काय लागतंय पुन्हा नाचा म्हणायला.. पण त्या दोघींची कमाल की त्या पुन्हा हजर झाल्या. त्यांची पावले तितक्याच जोमाने थिरकत होती. प्रेक्षक पण उत्साहात आले.. थिरकले... आणि धम्माल आली... इंग्रजीत म्हणायचेच झाले तर मुग्धा आणि भारती व तृप्ती पुढे hats off…..

मध्यांतरात गरम मस्त मसालेदार चहाचा आस्वाद घेऊन नंतर आता नाटकाची प्रतीक्षा संपणार होती. प्रसन्न देवस्थळी चे दिग्दर्शन असलेले नाटक दरवर्षीच अफलातुन असते. यंदा होते ‘चार दिवस प्रेमाचे’. कलाकार मंडळी नेहमीचीच.. नावाजलेली... क्या कहने... विशेष कौतुक जयश्री अंबासकर आणि मृदुला रानडे ह्या दोघींचे... थोडा कंटाळा आल्यासारखा झाला होता तो ह्याने पुन्हा तजेला देऊन गेला.
थोडा उशीर झाला कार्यक्रम संपायला पण आनंददायी होता हे नक्कीच. पण लहान मुलांचा अंत बघितला गेला.. बिचारे फारच कंटाळले होते. ‘आई-मम्मी.. चल घरी जाऊ नं..’ हेच कानांवर पडत होते सारखे.

अध्यक्ष श्री अष्टीकर ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सगळा अहवाल सांगितला जो की आम्हाला आधी छापील देण्यात आलाच होता. सदस्यांचे व समितीचे कौतुक करून झाल्यावर त्यांनी काही वक्तव्य केले ते जरा खटकले. कुठल्याही कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया यायला पाहीजे ही अपेक्षा पण त्या अनुकूलच व चांगल्याच असाव्यात हे बरोबर नाही. प्रतिकूल प्रतिक्रिया आपल्याला काही सुधारणा करायला कामी येतात. सध्याच्या कार्यकारी मंडळाला किंवा भावी मंडळाला सुद्धा. त्यांनीच आधी आपल्या भाषणात सांगितले होते की प्रत्येक कार्यक्रम प्रत्येकाला आवडेल असे नाही. कोणत्या कारणाने तो कार्यक्रम आवडला नाही हे समजले तर मंडळाच्या ते फायद्याचेच आहे. कारण आजकाल पाहुणे कलाकार भारतातुन येणारे विविध लोक विविध कला घेऊन येतात. व अशा चांगल्या कामाचे कौतुक मंडळाला सतत मिळतच असते. पण त्यातही अशा थोड्या हटके प्रतिक्रियांनी कार्यक्रम कोणते आणायला हवे किंवा साधारण कोणते कार्यक्रम प्रेक्षक बघु इच्छितात हे ठरवायला मदतच होणार आहे. तरी कुठल्याच कार्यकारी मंडळाने नेहमी चांगलीच प्रतिक्रिया द्या हा आग्रह धरणे मला आक्षेपार्ह आहे.

करता करता कार्यक्रम सुरू व्हायला ३.३० पेक्षा ज्यास्त वाजून गेले होते. लोक येत नाहीत म्हणुन कार्यक्रम सुरू करता येत नाही .. आणि कार्यक्रम वेळेवर सुरू होत नाही म्हणुन लोक १ तास उशीरा येतात.. हे समीकरण कोणी तरी बदलायलाच हवे. आमच्या सारखे पण हाताच्या बोटावर मोजण्याइतके तिथे २.३० ला जे हजर होते ते नंतर कंटाळून जाणे साहजिक आहे.

बाकी वार्षिक सम्मेलनाचा हा सोहळा उत्कृष्ट पार पाडल्याबद्दल सगळ्याच कार्यकारी सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!!

आगामी नव्या स्थापित मंडळाला भरपूर शुभेच्छा. व नव-नवीन मनोरंजन व सम्मेलन-भेटीगाठींच्या अपेक्षेत....

दीपिका

रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

कठिण... खूपच कठिण....

समस्यांना मर्यादा नाहीत असं भासतंय. आजच्या सकाळ मधे बालवाडीच्या प्रवेशाबाबत पानंच्या पानं आणि संदर्भी फोटो बघून हैराण झाले. बालजगत आणि ३ वर्षाच्या बाळांचे विश्व आधी काय होते आणि आता काय आहे. खरं तर त्यांच्या विश्वात थोडाफारच बदल झाला असेल पण त्यांच्या पालकांचे आपल्या मुलांच्या बालवाडीच्या प्रवेशाचा प्रश्न अत्यंत जिकरीचा झाला आहे. त्यांची ही ससेहोलपट कशी टाळता येईल किंवा ही प्रक्रिया कशी थोडी सोपी केली जाईल अशी पण चर्चा आहे. काही वर्षांनी कदाचित असे पण होईल की बाळ येऊ घातलेय कळल्याबरोबर कोणती शाळा चांगली ह्याबाबतच्या विचारांनी भावी आई वडिल चलबिचल होतील.

परवाच माझ्या बंगलोर च्या भाचीने बालवाडी मधे तिच्या मुलाच्या प्रवेशाबद्दल फेसबुक मधे लिहीले होते. मग मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्यात. कोणाला काय प्रश्न विचारले माहीत नाही पण नंतर कळले की दोन शाळांमधे त्याला प्रवेश मिळाला आहे. कुठे जायचे ते ठरवले नव्हते अजून. जिंकलीच म्हणायची...

आमची पीढी तर हेच बोलतेय की आमच्या वेळी असे नव्हते... आमच्या मुलांच्या वेळी पण असे नव्हते. आमच्या मुलांच्या वेळी बालवाडीसाठी असे नक्कीच नव्हते पण आज आठवण आली रुचिर-शिशिर च्या १० वीच्या रिझल्ट नंतरचे दिवस. नागपुरला अभ्यंकर नगर मधे गणिताच्या शिकवणुकीसाठी पत्तरकिनी सरांकडे प्रवेश घ्यायचा होता. रविवारी सकाळी फॉर्मस् मिळणार होते तर मी सकाळी ७ वाजता जाईन ठरवून आपल्या बाकीच्या कामात होते. त्यांच्या राहत्या घरीच ते क्लासेस होते. समोरच माझा भाऊ राहत होता. शनिवारी संध्याकाळी ५ वाजताच त्याचा फोन आला की इथे तर आत्तापासूनच रांग लागायला सुरूवात झालीय. त्यांच्या क्लासचे नांव खूपच होते त्यामुळे इथे जर क्लासला नाही गेलीत आपली मुले तर कसे होणार हाच विचार प्रत्येक पालकांचा होता. म्हणून सगळी धडपड. मी पण तिकडे डोकवून बघायचे ठरवले. मी पोहोचेपर्यंत रांग बरीच वाढली होती. सोसा-सोसाने मी पण तिथे उभे राहिले. तास दोन तासाने कंटाळा आला व हे प्रकरण काही इतके सोपे नाही. आत्ता तर फक्त ६ च वाजले आहेत संध्याकाळचे.. उद्या सकाळी ७ ला दार उघडणार आहे. विचित्रच सगळे... आणि विचारांनी बधिर झाले होते.

रात्र होऊ लागली तशी हळू हळू लोकांनी पथार्‍या पसरायला सुरूवात केली. आम्ही पण चटई घातली... सगळ्यांचाच थोडा राग... थोड्या शिव्या... पण शेवटी हे जे काय घडतेय ते काही त्या सरांनी थोडीच सांगितले होते. हे तर आपणच करतो आहोत हे कोणाच्याच लक्षात येईना. आई च्या ऐवजी बाबा आले.. बाबांना जेवायला घरी पाठवायला आजोबा त्यांच्या जागी येऊन बसले. असेच आम्ही पण केले. मुलांसाठी मध्यरात्री पर्यंत मी व रात्री २ नंतर ह्यांनी तिथे नंबर पकडून ठेवला होता. आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्याचा फायदा कोणी कसा करून घ्यावा.... गल्ली लहानशीच होती ती. कोणी थर्मास मधे चहा बनवून आणून तो विकायला सुरूवात केली. त्याचे बघून एका दांपत्याने चक्क टेबल ठेवून त्यावर गॅस ठेवला व सरळ सरळ मिरची भजी- कांदा भजी.... आणि अस्सा खप झाला होता सगळ्याचा. लोकं दूर-दूरून आली होती. रात्री झोप येणार नव्हती तिथे मातीत बसून.. मग वेळ घालविण्याचे हेच एक साधन होते. गप्पांबरोबर चाय पकौडे हो जाए...

सकाळी ७ ला दार उघडले, आमचा नंबर लागला फॉर्मस मिळालेत.. हुश्श.. काय अगदी एवरेस्ट सर केल्यासारखा सगळ्यांचा आनंद होता. काय तर म्हणे पत्तरकिनी सरांकडचा प्रवेश-फॉर्म मिळाला... फॉर्म चे पैसे वेगळे.. मग प्रवेश घेतला.. पैसे भरले.....अजून एकदा जीवात जीव आला...(भांड्यात जीव तर काय म्हणेन.. जीवातच भांडे पडले होते..) आणि सरतेशेवटी झाले असे की काही कारणास्तव रुचिर शिशिर त्या क्लासला गेलेच नाहीत. पैसे.. वेळ... सगळाच हिशोब जिथल्या तिथे राहीला...आहे नं गम्मत.

आता ह्या बालवाडी प्रवेशासाठी जर का पंधरा तास रांगेत उभे रहावे लागणार असेल तर.... उफ्.... फोटोंमधे दिसतेच आहे.. चहापाणी.. कदाचित खाली बसता येत नसणारे.. म्हणुन खुर्चीवर बसलेले आजोबा. कोणी काका कोणी मामा मदतीला आलेले. हातात सकाळचा चहा व त्याबरोबर वर्तमानपत्र, पण आज ते पण त्या रांगेतच... काही थकलेले चेहरे.. पण त्यातही काही हसणारे.. भान हरपणारे की आता आमचे बाळराजे बालवाडीत जाणार. व्यक्ति तितक्या प्रकृति....

माझ्यासारखेच १५ वर्षांनी ह्यातील काही लोक असाच लेख लिहीतील आणि मनांत हसत असतील...

दीपिका

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

कुवैत ची सुरेल दिवाळी पहाट

महाराष्ट्र मंडळाची अनपेक्षित अशी  ‘दिवाळी पहाट ’ ची इमेल आली व दरवर्षी आपण पुण्यात असतो तर ह्या दिवाळी पहाटेत सामिल झालो असतो.. त्या दिवाळी पहाटेची सुरम्य महफिलीचा हिस्सा झालो असतो... ही खंत आता दूर होणार... हा आनंद खूपच आगळा-वेगळा होता. 

महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी सदस्यांना थोडी चिंता असणं साहजिकच होते कारण दिवाळीचा दिवस आणि तो पण शुक्रवार.. वेळ सकाळी ७.३० ची आणि तो पण किर्तनाचा कार्यक्रम.. थोडी आशा नंतरच्या नाट्यगीतांमुळे होती पण तरीही किती प्रतिसाद मिळेल ही धाकधुक असेलच.   


चारुदत्त आफळे बुवांचे नांव खूप ऐकले होते पण ऐकण्याचा योग आला नव्हता तो महाराष्ट्र मंडळाने आणलाय त्यामुळे शुक्रवार ५ नोव्हेंबर ची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो आणि तो दिवस आला. 


छान तयार होऊन.. भरजरी साडी दागिने घालून कार्यक्रमाला गेलो. स्वागत पण मस्तं... प्रवेशद्वारापासुनच सगळे शालु पैठण्या दागिने.. झब्बे-कुरते...छान सजलेले... सुंदर रांगोळी, हळदी कुंकू टिळा व अत्तर चा सुगंध.... एकदम मराठी-मराठी... मराठमोळे वातावरण फुलले होते. बहुतांश लोकांना पण अमुच्या मायबोलीमधेच ‘शुभ-दीपावली-दिवाळीच्या शुभच्छा’ असे म्हणताना ऐकुन तर मस्तं वाटले. 


पोहोचलो तेंव्हा बुवा हजर होते. मंच सुदंर सजलेला होता. टिमटिम दिव्यांच्या माळांनी चमकत होता. दीप प्रज्वलन झाले. बुवांबरोबर त्यांच्या साथीला असलेले तबल्यावर मिलिंद तायवाडे व पेटीवर रेशमा मरकळे ह्यांची पण ओळख करून देण्यात आली. आफळे बुवा नाटक पण करतात अशी ओळख न करून देता आफळे बुवा संगीत नाटकात काम करतात असे सांगितल्याने जाम खुश होते. खोडकरी मजाच नं !!!


त्यांनी जशी बोलायला सुरूवात केली तसेच सगळ्यांना जाणवले असणार की आजचा हा कार्यक्रम रंगणार व आपल्याला एका जागी खिळवून ठेवणार. प्रथम किर्तन व मध्यांतरानंतर थोडी नाट्यगीते गायीली जातील असे त्यांनी सांगितले.  सुरूवात झाली किर्तनाला. अहाहा... काय त्यांचा प्रसन्न चेहरा.. सतत हास्यवदन. त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, कदाचित फारशी कोणाला नसलेली वृत्तांची ओळख, सुरेल सुंदर भजनं व पदं... आणि नरकचतुर्दशी वरील किर्तनाने व त्यांच्या मधल्या मिश्किल हावभावाने कोणत्याही वयोगटाचा पण मंत्रमुग्ध झाला नसेल तरच आश्चर्य आहे. एक दीड तास कसा संपला कळलेच नाही व पांडुरंगाच्या आरतीनंतर मध्यांतर झाले. 

आफळे बुवांनी मंत्रमुग्ध केलेच होते.. त्यावर दिवाळीच्या फराळाने जिभेचे चोचले पण किती पुरवावे... चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू व गरम गरम उपमा.. दिवाळी पहाटेच्या कौतुकाचे बोल सगळ्यांच्याच तोंडी होते..गरमागरम चहा घेता घेता नाश्ता प्रकरण आवरते घेतले कारण पुढचे नाट्यसंगीत खुणावत होते. 

तासाभरानंतर पुन्हा बुवांसह सगळेच आपापल्या जागेवर येऊन बसलेत. नाट्यसंगीताची ओळख करून द्यावी ती आफळे बुवांनीच. नाट्यसंगीत काय असते, त्यातील हरकतींबद्दल, कशा तर्‍हेने बदलतात.. त्यांचे महत्व गाता गाताच सांगत होते. सुरुवात तर नांदी ने झाली पण पुढे ‘चंद्रिका ही जणू’ ‘ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी...’ जो रंग चढत गेला तो दाट दाट होत गेला. ‘ऋणानुबंधाच्या... ह्या गाण्याबद्दल बोलतांना द्वंद्व गीत का म्हणतात.. प्रेमाच्या गाण्यामधे द्वंद्व कशाला असे मिश्किलपणे सांगुन प्रेक्षकांत हशा पिकवला. गाण्यातला लटकेपणा गातांना त्यांच्या चेहर्‍याचे हावभाव अफलातुन होते. आलाप वेगळे ताना वेगळ्या.. स्वरांना सजवणे हे त्यांनीच करावे.

नाट्यगीत नाटकांत गाताना किती कठिण असते.. हात हलवु नका.. तोंड असे करू नका.. चिकटवलेल्या मिशा संभाळा... मजेदार किस्से...तासभर कसा संपला व भैरवीची वेळ आली. भैरवीने कार्यक्रमाची सांगता होणार हे कळल्याबरोबर मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षक भानावर आलेत. भैरवी गायनानंतर पुढे काही बोलायचे नसते म्हणुन त्यांनी मधेच आभार मानलेत व कुवेतच्या मराठी लोकांचे आई वर (मराठी भाषेवर व आपल्या मातृभूमिवर) असलेल्या प्रेमाचे कौतुक केले. टाळ्यांच्या कडकडात भैरवी संपली पण टाळ्या तशाच सुरू होत्या. खुर्चीवर खिळलेले प्रेक्षक भानावर आल्यावर जागीच उभे होते व जणु आफळे बुवांना शतशः धन्यवाद देत होते... सुरेल कार्यक्रम झाल्याची ती त्यांना पण ही एक पावतीच होती.


मला नेहमीच महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक आहे तसेच ह्या वेळी पण अप्रतिम व उत्कृष्ट कार्यक्रम दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचे खुप खुप आभार. इच्छा असलेल्या पण आत्तापर्यंत योग न आलेल्या चारुदत्त आफळे बुवांचे किर्तन, त्यांची सुरेल व सतत स्मरणात राहतील अशा नाट्यगीतांचा अनुभव दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समितीचे कौतुक!!!!

आगामी कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा !!!    


दीपिका 

रविवार, २७ जून, २०१०

ह्या नदीकिनारी...


धुंद हास्य त्या क्षणी
सांज होती रंगलेली
मोगरा गंधित आठवांचा
फुलवु आज ह्या नदीकिनारी

एकांताच्या त्या क्षणी
नजर काही बोललेली
होते काय ते शब्द मुके
अठवु आज ह्या नदीकिनारी

अबोल तु मी, त्या क्षणी
स्पर्शात गोडी भासलेली
अंतरीच्या त्या सुखाला
भिजवु आज ह्या नदीकिनारी

ओल्या चिंब त्या क्षणी
गर्दी मेघांनी केलेली
श्रावणाच्या त्या सरींना
खुणवु आज ह्या नदीकिनारी

दीपिका 'संध्या'

मंगळवार, २२ जून, २०१०

मध्यंतरी खुप रिकामपण आलंय असं वाटत होतं. कंप्युटर वर वेगवेगळे प्रयोग करून बघणे चालुच असते. नेट वर मैत्रिणी मस्तं मस्तं पेंटिंग्ज करतांना मी बघत होते. बस आता आपण पण सुरू करायचेच असं ठरवलं. क्लासची शोधाशोध सुरू करून अखेर माझ्या कलाकृति तयार व्हायला सुरूवात झाली. खिळे आणि मजबुत चकाकणार्‍या दोर्‍यांच्या सहाय्याने मोर व फुलपाखरू तयार झाले. फोटो काढुन मुलांना-मुलींना दाखवले तर आईची करामत इतकी पसंतीस उतरली की अमेरिकेहुन मागण्या आल्या आहेत त्याच्या. बघु या मी किती पुर्ण करू शकते ते....
नंतर पेन्सिल ने कृष्णधवल चित्र काढायला सुरूवात केलीय. आधीपासुनच मला रंगीत चित्रांपेक्षा फक्त पेंसिलीने काढलेले चित्रत भावते. त्यात ज्यास्तं कलाकारी दिसते असं वाटतं. असाच आता थोडा वेळ आपल्यातील कलाकाराला जिवंत ठेवण्यासाठी द्यायचा असे ठरवले आहे.


मंगळवार, १८ मे, २०१०

आनंददायी दोन दिवस...

पिकनिक व महाराष्ट्र दिन.... अविस्मरणीय... !!! 

१३-१४ मे.. ह्या आठवड्याचा शेवट छान जाणार असे माहितच होते. १३ तारखेच्या गुरुवारी मसीला बीच वर बारबीक्यू चा कार्यक्रम ठरला होता. बारबीक्यू म्हंटले की च धम्माल येतेच. कोळसे आणा.. काड्या लावा...पेटवण्यापासुनच मजा सुरू. वारं असलं की तर कधी खूप जोरात आच असते तर कधी मंद होते. कांदे बटाटे रताळी भाजायला घातली की जळायच्या भीतिने कोणीतरी लक्ष ठेवण्याची जबाबदारी घेतलेली असतेच. शाकाहारी-मांसाहारी बारबीक्यू चा सगळ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. गप्पा, हसणे-खिदळणे, वेळ कसा गेला कळलेच नाही. संध्याकाळपासुन धुळवड चालूच होती थोडी थोडी. रात्री ११ वाजेपर्यंत फारसे जाणवले नाही पण नंतर मात्र एकदमच वाढू लागली. त्यामुळे २४ मे ला कल्पनाच्या वाढदिवसानिमित्य केक कापण्याचा कार्यक्रम लवकर-लवकर आटोपला. भऱाभर सगळ्यांनी खाल्ला आणि बारबीक्यू चा चहा राहीलाच करायचा ही खंत मनांत घेऊन आम्ही आमचे चंबूगबाळे गुंडाळले. पण तरी सगळ्या छान छान पदार्थांच्या छान छान चवी तोंडावर रेंगाळवत आम्ही निघालो हेच म्हणत की 'उद्या संध्याकाळी ४ वाजता भेटूच... !!!'

१४ मे ला कुवेत महाराष्ट्र मंडळा चा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आहे हे माहीतच होते. महाराष्ट्र मंडळा कडुन वर्षाच्या सुरुवातीला जी दिनदर्शिका दिली जाते त्यात वर्षाच्या कार्यक्रमाचा आराखडा दिलेला असतो. खूप छान उपक्रम असतो हा मंडळाचा. काही अडचणी आल्या तरच तो दिवस बदलला जातो. ह्यावेळी सलील कुलकर्णी, सारेगमप ची विजेती उर्मिला धनगर व समुह येणार होते. १३ तारखेच्या संध्याकाळपासुन हे धुळीचे थैमान शुक्रवारी दुपारी पण बर्‍यापैकी सुरूच होते. उत्सुकतेपोटी संध्याकाळी ४ वाजता कार्यक्रम होता म्हणुन वेळेवर पोहोचलो. खेतान शाळेच्या त्या सभागृहावर सुंदर तोरण होते.

आत गेल्यावर महाराष्ट्राच्या भल्या मोठ्या नकाशाने लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील एकापेक्षा एक प्रसिद्ध व्यक्ति... संत तुकाराम-ज्ञानेश्वरांपासुन गावस्कर-तेंडुलकर पर्यंत, वैज्ञानिकांपासुन तर संगीतसम्राटांपर्यंत, टिळक, पु.ल.. ज्योतिबा फुले... किती नांवे घ्यावीत पण सगळे त्या आपल्या अभिमानी महाराष्ट्राच्या नकाशावर दिमाखात विराजमान होते. स्टेज पण छान सजवलेले होते. केळीचे
खांब सगळे शुभ आहे हे वर्तवित होते.थोडा वेळ मागे-पुढे.. पण भारताचे राजदूत अजय मल्होत्रा आलेत व त्यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळाच्या च्या पुस्तिकेचे अनावरण झाले. मंडळाचे अध्यक्ष व राजदूतांचे दोन-दोन शब्द संपून मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. संगीताचा कार्यक्रम सादर करणारे सगळे कलाकार मंचावर येऊन बसले होते. सलील कुलकर्णी ची गाणी तर आधी ऐकली होती पण उत्सुकता उर्मिला च्या लावण्यांची होती. कृष्णा मुसळे ह्यांनी वाजवलेल्या ढोलकीला तर तोडच नाही. त्यांचे हात ढोलकीवर वाजत होते आणि प्रेक्षकांना काय आणि कशी तारीफ करावी हे कळेनासे झाले होते. एकदा पुन्हा.. एकदा पुन्हा.. टाळ्यांचा कडकडाट सुरूच राहीला. अतिशय उत्कृष्ट लावण्या तिने सादर केल्याच पण रेशमा ने गायलेले 'लंबी जुदाई... ' हे गाणे तर फारच अप्रतिम सादर केले. बरोबर असलेली मेघना सरदार हीने 'देही वणवा पिसाटला...' हे गाणे गाऊन बसलेल्या हौशी-उत्साही प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. नाचण्याची झलक इथे बघायला मज्जा येईल....
http://www.youtube.com/watch?v=ow9mglVfREA

आदित्य आठल्ये आणि कृष्णा मुसळे ह्यांच्या तबला व ढोलकी ची जुगलबंदी ने तर स्तिमित केले. नुलकरांचे अप्रतिम सूत्रसंचालन उत्कृष्ट होतेच. भडकमकरांनी कीबोर्ड वर खूप छान साथ-संगत दिली. दोन भागांत विभागलेला हा कार्यक्रम ९.३० वाजता संपला. भुर्रकन वेळ संपली.


ह्यावेळी कार्यक्रम सुरू असतांना लिंबाचे सरबत बसल्या जागी मिळाले तर खूप मजा आली. शेवटी जेवणाचा आस्वाद घेत असतांना एकच चर्चा होती... काय छान गाणी झालीत उर्मिला आणि मेघना ची.

महाराष्ट्र मंडळ नेहमीच स्तुत्य उपक्रम राबवत आले आहे. त्यातलाच हा एक ठरला ह्यात जरा ही शंका नाही. पुढील अशाच छान छान कार्यक्रमांच्या प्रतिक्षेत सगळेच सभासद असतीलच हे नक्की. कार्यकारी मंडळाच्या सगळ्या सदस्यांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

दीपिका 'संध्या'

गुरुवार, ६ मे, २०१०

माझ्या बालपणीचा पहिला थांबा...

लेखन सुरू केल्यापासुन कधीचेच मनांत होते की लहानपणीच्या पण इतक्या छान छान घटना असतील ज्या पुन्हा उजळायला मज्जा येईल. तर आजच श्रीगणेशा करतेय... कुठे आणि कशा वळणावर ही माझी पावले थांबतील सांगता येत नाही... जे जे आठवेल ते ते च सही....

स्वतःची मदत स्वतःच केली पाहीजे ह्या वक्तव्यात किती सत्य आहे हे आज मी जाणते आहे. माझ्या स्वभावाचा असा एक पैलू प्रकर्षाने वयाच्या ह्या ५३ व्या वर्षात पोहोचल्यावर जाणवतो आहे. खंत नाही पण माझ्या ह्या लेखनांतुन कदाचित कोणाला त्याचे सहाय्य होऊ शकते. आजकाल खूप कार्यक्रम दूरचित्रवाणी वर येतात जे ज्ञानवर्धक आहेतच, मार्गदर्शक पण आहेत. परवा एका मैत्रिणीबरोबर फोनवर बोलतांना ती सहज म्हणली की आजकाल कुठले न कुठलेतरी तणांव आपल्या रोजनिशीमधे स्थान ग्रहण करून आहेत. त्यातुन थोडे दूर जायचे असेल.. मनःशांति शोधत असशील... काही कारणाने येणारी उदासी पळवायची असेल तर फक्त डोळे मिटून बस व जसे ध्यान करतो (मला कधीच ध्यान करणे जमले नाही. चंचल मनांस कसे ते जमावे.. ) तसे फक्त जेव्हढे शक्य आहे तितके खोल खोल बालपणांत डोकावून बघ. खूप हलके वाटते. नकळत आपल्या चेहर्‍यावर हसू उमटेल. व मन हलके नक्कीच होईल.

मी तसेच करून बघितले. खऱंच खूप छान वाटले. अर्थात आयुष्यात उलटी उलटी पावले टाकत माझ्या शाळेच्या दिवसांपर्यंत जाऊन एक थांबा आला. त्याला कारण तसेच आहे. सुरूवातीला जसे म्हंटले की स्वतःची मदत स्वतःच केली पाहीजे हे 'साम' टीवी वर बालाजी तांबे सांगत होते. त्यांचे बोलणे खूप छान वाटते. सगळ्यांतून जे आपल्याला आवडेल तेच घेणे असे माझे तत्व आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटेलच असे नाही... मग ते कोणीही कोणालाही सांगत असो. आमच्या लहानपणी नागपुर आकाशवाणीवर दर रविवारी मुलांसाठी एक कार्यक्रम येत असे. त्यात कुंदाताई आणि अरविंद मामा असे दोघे असत. त्यांची खऱी नांवे वेगळीच होती. पण आम्ही बालमंडळी त्याना ह्याच नांवाने जाणत होतो. दोघेही छान लाडिक-लाडिक आवाजात खूप गोड बोलत. एकदा मी कार्यक्रमाबद्दल पत्र लिहीले आणि त्यांना खूप भेटावेसे वाटते असे लिहीले होते. आवाजावरून दोघांची ही अशी प्रेमळ व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर होती. एका कार्यक्रमात माझ्या पत्राचा उल्लेख तर केला पण मला भेटण्याचे आश्वासन दिले नाही. त्या ७-८ वर्षाच्या वयात मी खूप हिरमुसले. ही गोष्ट लहानशी होती पण मनांत घर करून राहीली. ह्याचाच परिणाम की मला रेडिओ स्टेशनवर काम करावेसे वाटू लागले. तोपर्यंत माझ्या बारीक आवाजाची तारीफ ऐकून माझे (उंहं!! उंहं...!!) हे विचार पक्के होऊ लागले. एकदा आई बाबांना म्हंटले असेल बोलता बोलता... पण फारसे लक्ष दिले गेले नाही. मी ८-९वीत असतांना नागपुर रेडिओ स्टेशनसमोरून खूप चकरा मारत असे. पण उगीचच कोणी बरोबर असेल तर जाता येईल... ओफऽऽऽ त्या रेडिओ स्टेशनच्या आवारांत सायकल नेण्याची हिम्मत काही झाली नाही. गाणे शिकायचा, पेटी वाजवायला तरी यावी म्हणून तो पण प्रयत्न झाला. पण स्वप्न स्वप्नच राहीले. नंतर कॉलेज संपले, लग्न झाले, संसारात पडले. बाकी छंद खूप जोपासले. त्या गोष्टी मागे पडल्या. जे आहे त्यात आनंद मानून पुढचा प्रवास चालू आहे. आयुष्याच्या नवीन वळणांवर नवीन नवीन शिकतेच आहे. तरीही...... रेडिओवर आजकालच्या भाषेत जॉकी चे बोलणे ऐकले की नागपुर रेडिओ स्टेशन समोरची सायकलवरची मी आणि झी टीवी वर 'सारेगम' कार्यक्रम सुरू झाला की हातात गाण्याच्या क्लासची वही घेऊन जाणारी मी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.

पुढे पाऊल टाकण्यास थोडा विचार करणारा स्वभाव आणि त्या वेळी कदाचित मनाचा खंबीरपणा व ध्येय मजबूत करता आले नसेल पण किती खरे आहे नं की स्वतःची मदत स्वतःच करावी लागते. (जर्रासे उशीरा ध्यानी आले किंवा पटले ह्याला इलाज नाही..)

उलटी पावले टाकतांना ह्या थांब्यावर हे आठवले. अजून अशाच आठवणी खूप असतील त्या पुन्हा कधी...!!!!

दीपिका 'संध्या'

शनिवार, १ मे, २०१०

सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिनमहाराष्ट्र दिन

आज १ मे, महाराष्ट्र दिन. कालच्याच वृत्तपत्रात वाचले की महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी वेगळे खाते तयार केले आहे. असे करून मायमराठीचा किती सन्मान केला जाईल हे बघणे आहे. ''मी महाराष्ट्रात जन्माला आलो-आले ह्याचा मला अभिमान आहे, मी मराठी-माझी मराठी'' वगैरे वगैरे आजकाल खूपच ऐकायला येतंय. किती खरंय हे पडताळून पाहण्याची वेळ आता आली आहे आणि ही वेदना देणारी बाब आहे. मुंबई-पुणे सारख्याच शहरांमधे मराठीला तितके महत्व दिले जात नाही. आणि त्यातल्या त्यात दुःखाची गोष्ट अशी पण आहे की मराठी विषयाची मानसिकता न्यूनगंडाची आहे. घरांत जरी मराठी बोलत असतीलही तरी घराबाहेर हीच आपली मराठमोळी मुले सर्रास फक्त इंग्रजीच बोलतात. परप्रांतात राहणारे आपले मराठी लोक घरांत पण मराठी बोलतांना दिसत नाहीत. आंतरजातीय विवाहांचे सध्या चलन आहे त्यातही पुढच्या पीढीसाठी भाषेचा तोडगा म्हणून इंग्रजी भाषाच निवडली जाते. मातृभाषा व जर पितृभाषा वेगळी असेल तर ती पण घरांत शिकवली जायला हवी असे वाटते. मातृभाषा उपेक्षिली जाऊ नये हा मराठी माणसाने प्रयत्न सतत करायला हवा. परदेशातील महाराष्ट्र मंडळांमधे इंग्रजी चे च चलन असते. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे.

वर्षानुवर्षे गेलीत.. काही शब्द इंग्रजी मधले मराठी मधे आले आणि ते मराठीचेच होऊन राहीले आहेत ज्याचा वापर झाला तरी गैर वाटत नाही. त्याला समानार्थी मराठी शब्द वापरला तर अर्थ समजेल की नाही अशी परिस्थिति आहे. सकाळ ची सुरूवात Good morning ऐवजी सुप्रभात, Good night ऐवजी शुभ रात्री,  Happy b'day ऐवजी वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा hi च्या जागी नमस्कार व्हायला हवे.  

 मी स्वतः मातृभाषा मराठी व अधिकृत मानली जाणारी हिंदी ह्या भाषांना प्रामाणिक पणे जगणारी व जगवणारी आहे. सतत मराठी लोकांबरोबर मराठीतच व अन्य भारतीयांबरोबर आपल्या हिंदीचा वापर करणे ह्यावर माझा कटाक्ष असतो. 'मी मराठी-माझी मराठी' म्हणणारेच पुढच्या पावलांवर इंग्रजी बोलतांना दिसतात. संगणकावर आता प्रत्येक भाषेमधे काम करण्याची संधी आहे व उपलब्धता पण आहे. देवनागरी वापरण्यास थोडेच प्रयत्न करावे लागतात. जीटॉक, एमएसएन, याहू सारख्या ठिकाणी पण बोलतांना मिंग्लिश लिहीण्याची आता गरज नाही. ऑरकुट मधे सोय असून पण ६० टक्के लोक तर मराठी असून पण इंग्रजी मधेच बोलताना आढळतात. उरलेले कदाचित २० टक्के मिंग्लिश व २० टक्केच देवनागरीचा वापर करतांना दिसतात. जीटॉक मधे देव काकांनी 'मराठी माणसाशी संवाद साधतांना रोमन लिपीत न लिहीता देवनागरीतच लिहावे आणि कटाक्षाने मराठीत बोलावे' असे लिहून ठेवले आहे. हे शंभर टक्के खरे आहे पण किती जण ही गोष्ट अमलांत आणतात? आमचे नेहमी ह्या विषयावर बोलणे होत असते. परदेशांत एकीकडे खूप मराठी लेखन होतेय.. मराठीमधे ब्लॉग्स बनवले गेले आहेत. उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वाचकांच्या पुढे येतेय. त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. एक आहे ह्या गोष्टी अशाच हळूहळू पुढे जातील व मराठीचे साम्राज्य महाराष्ट्रात व भारतात हिंदी ला पण प्रोत्साहन मिळेल अशी आशा आपण का ठेवू नये? भारतात व भारताबाहेर आपल्या मराठी जनांनी मराठीला आपलेसे करण्याची जबाबदारी समजायला हवीय.

दूरदर्शन वर मराठी वाहिन्या बर्‍याच सुरू झाल्या आहेत. मराठी आणि हिंदी वाहिन्यांवर इतके प्रत्येक वाक्यागणिक इंग्रजी असते की ज्याला पर्यायी मराठी शब्द आहेत जे अगदी नेहमीच्या वापरातले आहेत पण लक्ष दिले जात नाही. असे पण आहे की हल्ली दूरदर्शन गावोगावी पोहोचला आहे जिथे हिंदी मराठी समजण्यास सोपे असेल जितके की शिक्षणा अभावी इंग्रजी समजणे कठिण आहे. पण कोण विचार करतो ह्याचा.. चालू आहे.. चालू आहे... जसे तसेच चालू आहे!!!!

परप्रांतात राहून मुलांना आम्ही मराठीची व्यवस्थित संवय लावली होती पण आता परदेशात स्थायिक झालेल्या त्याच मुलांची पुढची पीढी किती मराठी भाषेशी प्रामाणिक राहते तेच बघणे आहे. जसे मातृभाषेचे व हिंदी भाषेचे प्रेम त्यांना घालून-समजावून दिले तसेच पुढे तो वारसा चालवणे सर्वस्वी त्यांच्या हाती आहे.

चला तर आजच्या ह्या महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्याने ठरवू या की शक्यतोवर मराठी माणसाशी बोलतांना मराठीतच बोलू या...

दीपिका 'संध्या'

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

२८ एप्रिल तारीख आली.. सकाळपासून बहीण भावांचे फोन, मुलांचे फोन येऊन शुभेच्छांना सुरुवात पण झाली. पण मलाच कुठेतरी कमी जाणवत होती म्हणुन तासांभरात हा सगळा खटाटोप केला. प्रेमामधे असे पण घडते... वेळ कितीही कमी असो... तर...

माझ्या जीवलगाला ह्या प्रेमाने ओथंबलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... !!!  दीपिका 'संध्या'

बुधवार, २१ एप्रिल, २०१०

अघटित आणि अजबच सारे... !!!


वातावरणांत बदल घडत आहेत.. हवामानांत बरेच उतार चढाव झाले आहेत. ४-५ वर्षापासुन पृथ्वीतलांवर सपाटून घडामोडी झाल्या आहेत व होत आहेत. विज्ञान प्रगतिपथावर अतिशय वेगवान आहे. आइसलैंड मधे ज्वालामुखीचा धूर आणि धूळ लंडन वर पसरून विमाने रद्द झालीत.. बरेच भारतीय आणि एअर इंडियाची विमाने तिकडे अडकली आहेत. सगळी कडेच ह्या सगळ्याचा खूप परिणाम झाला आहे. असो...

इथे कुवैत मधे पण काहीसे असेच वेगळेच पुढे येतंय.. २६ मार्च ला महाराष्ट्र मंडळाची सहल मिशरेफ उद्यानांत होती. प्रत्येक वर्षी ह्या सहलीला उन्हाचा इतका त्रास होतो की नको ते खेळ.. नको ते जेवण... सगळे जण जमेल तसे सावली शोधत बसलेले असतात. पण ह्या वेळी सकाळी घरून निघालो तेंव्हा सकाळी ९ पासुनच आभाळी हवा होती. थोडा पावसाचा शिडकांव आधी होऊन पण गेलेला दिसत होता. पुर्ण दिवस पाऊस येतोय... आम्ही सगळे भिजतोय.. मग थोडी उघाडिप की सगळे वाळत होतो. खेळ खेळत होतो. पुन्हा पाऊस येत होता. खूप छान दिवस गेला.. उन्हाचा त्रास झाला नाही त्यामुळे सगळे आनंदात घरी गेले. पण काही तरी वेगळेच वातावरण होते हे नक्की सगळ्यांच्या मनांत आल्यावाचुन राहीले नसेल.

गेल्या शनिवारचा १० एप्रिल चा दिवस अगदी साधारण उजा़डला होता. सकाळी ७.४५ ला थोडी धूळ उडतेय असं वाटून दारं बंद केलीत. पाच मिनिटांत अंधारून आले आणि इतका ज्यास्त अंधार झाला की जसे रात्रीचे आठ वाजले असावे. खूप जोरात वारे सुरू झाले. कामांवर जाणार्‍या लोकांच्या गाड्या दिवे लावून रस्त्यावर धावत होत्या. रस्त्यावरचे व घरांतले दिवे लागले होते. थोड्याच वेळात तुफान व जोरांत पाऊस सुरू झाला. कोसळत होता अक्षरशः. खिडकी च्या काचेतून बघायला पण भिती वाटत होती. विमानतळावर भितीचे वातावरण.. विमाने जी उतरण्यात होती त्यांच्यासाठी तर परिस्थिति वाईटच होती. अर्धा तास हे सगळे नाटक सुरू होते. काळे ढग जाऊन उजेड झाला.. तासांभराने कोणी विश्वास ठेवणार नाही की काय घडून गेले आहे. एकदम सगळे सामान्य झाले होते. आणि विशेष असे की ह्या घटनेने पूर्ण कुवैत व्यापले होते. व अशी घटना बहुतेक कुवैत च्या इतिहासात पण नसेल. एरव्ही इथे असेच एका भागात पाऊस पडतोय तर दुसरीकडे असेलच असे नाही.

रविवारचा दिवस उन्हाने गरम होता. संध्याकाळी साडे सहा च्या सुमांरास थोडासाच वारा वाहत होता. बीच वर चालायला जाण्याच्या तयारीत होतो. तेव्हढ्यात बाहेर पावसाचा आवाज आला. वर आकाशाकडे बघितले तर कुठे आभाळ-पावसाचे ढग काहीच नव्हते. पण सुरू झालेला पाऊस असा वाढला की समोर बाल्कनी मधे जाऊन मजा घेत होतो आम्ही. इतक्यात मोठ्या मोठ्या गारा बालकनी मधे गोळा झाल्या. काही कळेना हे काय?... रस्त्यावर होणारी पादचार्‍यांची धावपळ.. गाड्यांची पँ-पँ.... एकदम हो-हल्ला. १५ मिनिटांचा गारांसह तुफान पाऊस नंतर थांबला. पाऊस सुरू असतांना दुसर्‍या भागांत राहणार्‍या मैत्रिणीला विचारलं तर तिकडे अगदी कोरडे ठणठणीत..

थंडी ह्यावर्षी आलीच नाही.. गरमी ने भारतात मार्चपासुनच हैराण करायला सुरूवात केलीये. सगळंच बिघडलंय हे नक्की. कुवैत मधे नोव्हेंबर डिसेंबर मधे थंडीत फक्त आम्ही पाऊस थोडा अनुभवतो. ह्यावर्षी तेंव्हा फारसा पाऊस आलाच नाही तर आता हा एप्रिल मधला पाऊस म्हणजे सगळेच विचित्र. ह्यापुढे तर जे जे होईल ते ते पहावे.... विज्ञानामधे व मानवाने केलेल्या असंख्य शोधांमधे आनंद तर मिळतोय पण असंतुलनाला सीमाच उरली नाही. भविष्याची चिंता सगळ्यांनाच असेल हे नक्की... !!!!

दीपिका जोशी 'संध्या'

शनिवार, १७ एप्रिल, २०१०

विवाहबंधन वर्षगाठ... प्रेमाने भरलेले आशीश...

१२ एप्रिल चा दिवस उजा़डला आणि गेल्या वर्षीचे हे दिवस मी जगू लागले. रुचिर शिशिर १२ एप्रिलला भारतात आले होते. १५ एप्रिल २००९ ला लग्नं झाले दोघांचे व आपापल्या राण्यांना घेऊन २५ एप्रिल ला अमेरिकेला रवाना झालेत.

वर्ष कसे गेले खरंच कळलेच नाही. इंटरनेट मुळे सतत संपर्कात असल्यामुळे जरी दूर असले तरी वेबकॅम मुळे बघत होतो, माझ्या फिरक्यांनी त्यांना बेजार करणे माझे अगणित सुरू होते. बर्‍याच छान छान गोष्टी ह्या काळांत घडल्या... सुखावून गेल्यात. ऑगस्ट-सप्टेंबर मधे रुचिर-प्राची व शिशिर-लीनू ने आपापले मोठे बंगले घ्यायचे ठरवले... घेतलेत आणि ऑक्टोबर मधे वास्तुपूजा आणि दिवाळी साधून आम्ही अमेरिका गाठली व सगळेच एकमेकांना आनंद देऊन गेलो.

नोव्हेंबर मधे अजून एक खुशखबरी कानांवर आली आणि मी मुलींच्या प्रेमात वेडी पुन्हा एकदा जानेवारी मधे तीन आठवड्याची अमेरिकेची फेरी करून आले. आता काळजी व कौतुकाने हे दिवस सरताहेत. आनंदोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू झालीच आहे... व त्याच्या प्रतिक्षेत आम्ही सगळेच आहोत...

ह्या सगळ्यांत वर्ष संपले आणि पुन्हा १५ एप्रिल चा दिवस उजाडला पण २०१० चा... एक जोडी हवाई ला आणि दूसरी जोडी न्यूयार्क-वॉशिंग्टन फिरायला गेले आहेत.. धम्माल करताहेत. १५ एप्रिल ला फोन ने शुभेच्छा देऊन झाल्याच आहेत पण तरीही..अशा हौशी व उत्साहाने भरलेल्या माझ्या राजाबेट्यांसाठी व त्यांना पुरेपूर साथ देणार्‍या माझ्या मुलींसाठी माझे प्रेम ह्या भेटकार्डात व्यक्त केले आहे.रविवार, ११ एप्रिल, २०१०

तुझे माझे स्वप्न....!!!

आठवते नजर पहिली?
भाषा तिची न कळली
कसे व्यक्त व्हावे आपण
माझी जीभ न वळली

अवसेच्या राती त्या
जणु चांदणे पाहिले
खोल डोळ्यात तुझ्या
गुपित काय दडविले

नांव मनी कोरण्या
शब्द शब्द जुळविले
बांधली प्रीत पुजा
मी प्रेम फूल अर्पिले

गाली खट्याळ हास्य
मन अधीर हरवले
अधरावरील दवाने
चिंब मजसि भिजवले

प्रीत मेघ अनंत
लोचनांत विसावले
अस्तित्वाने तयाच्या
सखया मी भारावले

आता नको दुरावा
नको क्षण विरहाचे
रंग नभी रंगवू
अपुल्याच स्वप्नांचे

दीपिका 'संध्या'

रविवार, ४ एप्रिल, २०१०

आनंद कशास म्हणू.....

असे म्हणू शकतो आपण की आनंदाचा पाठपुरावा करत आणि शोधतच आयुष्य वेचले जाते. वाचन-लेखनाचा जसा जोर वाढतो तसा तसा साहित्याच्या आपण ज्यास्तं जवळ जातो. अभि-अनु च्या कामामुळे माझे तसेच झाले. हिंदी मधे लेखन सुरू करून मातृभाषेत पण सुरू झाले. अभि-अनु च्या कामांत खूप शिकायला मिळाले आणि मिळतेय. हास्य कवि अशोक चक्रधर भारतांत व भारताबाहेर अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेख व कविता अभि-अनु मधे आम्ही प्रसिद्ध करत असू. त्यात त्यांच्या लेखांची एक खूप विशेषता होती ती अशी की लेख ज्या पण विषयावर असेल त्याला अनुसरून लेखाचा शेवट ते एका कवितेने करताना मला दिसले. त्यांचे तसे ते लेख वाचणे व नंतर ची ती कविता... मला फारच आनंद देऊन जात असे. कसा प्रभाव पडतो बघा एखाद्या व्यक्तिचा की आताशा लेख कुठल्याही विषयावर लेख लिहून झाला की मला त्याचा शेवट कवितेने करण्याची हुक्कीच येते म्हणा. नेहमीच कविता तिथे चांगली दिसेल किंवा मी करेनच असेही नाही. कुठल्याही वाचनानंतर त्याची प्रतिक्रिया लिहीणे जसे आवश्यक वाटते किंवा लेखकाला पण त्याने समाधान मिळते तसेच असे काहीसे खूप शिकायला पण मिळते. कित्येकांचे लेखन वाचून आपली विचारदृष्टि, लेखन शैली पण प्रभावित होते. आजकालच्या परिस्थितित... बदलत्या वातावरणात चांगलेपणा घडवायला हे चांगले मध्यस्थी करतात. विचारवंत बनवतात.

संगणक व इंटरनेट चा विषय तर नेहमी असतोच... कुवैत मधे राहून नेट वरच सगळे मराठी वर्तमानपत्रं आणि बाकी पण बरेच वाचन करावे लागते. नेटमुळेच खूप जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या आहेत. प्रोत्साहन व आनंद देणारे दिवसांतले खूप क्षण त्यांच्याबरोबर पण पडद्याच्या मागेच राहून रोज जगता येतात. माऊ ला माझ्या बोलण्याची पद्धत तर मोनिका ला माझा आवाजच आवडतो. एक-दोनदा जीटॉक मधे बोललो तर तिला समजले की माझा आवाज कसा आहे. त्यानंतर तिचा रोज आग्रह असे की मी माझ्या आवाजात तिला जीटॉक मधे मेसेज ठेवावा. म्हणते... माझी दिवसाची सुरूवात तुझा आवाज ऐकुनच व्हावी. आता काय बोलणार ह्या प्रेमाला. जसे जमेल तसा माझा प्रयत्न असतो. ती वाट बघत असेल रोजच पण मला कधी जमते तर कधी नाही पण तक्रार नाही तिची. जयश्री च्या प्रोत्साहनाने ब्लॉग लेखनाची सुरूवात झाली. जानेमन करून बोलणारी हास्यवदनी प्रफुल्लित करूनच जाते. कुवैतमधेच असल्यामुळे भेटी-गाठी सुरूच असतात. गद्य-पद्य दोन्ही लेखन शैलीसाठी तिचे मार्गदर्शन मला मिळतच असते. ह्या सगळ्या मैत्रिणींबरोबर जान्हवी, स्मिता सारख्या सख्या माझे लेख वाचून अभिप्राय देतच असतात. सगळ्यांशी एक भावनिक बांधिलकी तयार झाली आहे. ब्लॉग तर इतके आहेत जिथे खूप वाचायला आहे आणि ज्ञानांत भर पाडणारे आहेत.

प्रत्येक वयाच्या टप्प्यात आनंद शोधणे शिकलेच जाते. बालवयात... कोवळ्या मनांचा आनंद अतिशय निर्भेळ व निर्मळ असतो. आपल्या खेळण्यांबरोबर खेळण्यात तर आहेच पण त्याहीपेक्षा बरोबरच्या भावंडाच्या किंवा मित्राच्या हातातील खेळणे खेचून घेण्यातच सार्थकता मानली जाते. किती ती निरागसता...वय वाढते तसे सगळेच बदलते.

११-१२ वर्षाच्या वयांत शाळेतल्या मैत्रिणींमधले सख्य अधिकच वाढले. कोणी मैत्रिणी सोडून गेल्या त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. त्या पत्रांतले मैत्री-प्रेम उचंबळून वहात असे. बोलक्या स्वभावामुळे... नेहमी आनंदी रहायला आवडत असल्यामुळे असेल.. ह्या अशा लहान गोष्टी सुखावून-आनंद देऊनच जात असत.

मग कॉलेजमधल्या सख्या वेगळ्या ज्या अजून ही संपर्कात आहेत. बॅडमिंटन क्लब मधला आमचा कंपू खूपच उत्साही होता. सगळे विखुरलेत पण मनांत घर करून आहेत.

१०-१२ वर्षापासुन ह्या संगणक जगताशी असे नाते जुळले आहे की तिथेच मी माझे सगळे आयुष्य वेचू लागलेय. निर्भेळ आनंद देवाण-घेवाणीचा हा एकदम मस्तं स्रोत आहे हे नक्कीच. ऑरकुट च्या जगात जुन्या मैत्रिणी पुन्हा एकदा भेटल्या. सगळ्याच आपापल्या जगांत आहेत. कोणाच्या जबाबदार्‍या संपल्या आहेत, कोणाच्या नवीन सुरू झाल्या आहेत.... जुन्या आठवणींच्या सरी येत असतात.. आम्ही
चिंब भिजत असतो त्यात. हा आनंद काही वेगळाच आहे.

मग रुचिर-शिशिर च्या आगमनानंतर चे उल्हासदिन कसे सरले कळलेच नाही.... जगतच गेले जगतच गेले... अजूनही जगतेच आहे. त्यांच्या लहानपणांत माझे लहानपण पुन्हा जगण्यातला आनंद खरा होताच. आज त्याच्या पुढे एक पाऊल उचलले गेले आहे. त्या आनंदाच्या प्रतीक्षेत आता आहोतच सगळे....

बर्‍याच वर्षापासुन एक आनंद हरवून बसले होते... पत्र लिहीण्यात जो मिळायचा तो.. अचानक मुलींना पत्र लिहीण्याचे मनांत आले आणि लगेच छानशा फुलापानांच्या कागदावर माझ्या हस्ताक्षरांत फुलपाखरांच्या-चांदण्यांच्या स्टिकरने सजवलेले दोन-दोन पानी पत्रं... अर्थातच माझ्या इश्टाइलने छोटेसे ह्या आईबाबांच्या नांवे व वतीने प्रेमकार्ड घालून पाठवण्याचा उपक्रमच केला म्हणा नं.. रुचिर-शिशिर ला पण असे पत्र लिहीण्याचा योग कधी आलाच नाही. त्यामुळे थोडक्यात ही माझी स्वहस्ताक्षरांतली पत्रे माझ्या दोन्ही मुलांना व दोन्ही मुलींना एक सुखद धक्का असेल. आनंद होईल बघून ह्यात शंका नाही. प्रथम आनंदात मी नाहले आहे... आता त्यांची वेळ येऊ घातली आहे.... आनंद आणि आश्चर्य व्यक्त करण्याची... पत्र पोहोचण्याच्या प्रतिक्षेत ही आई आहेच...

सगळा सारासार विचार करता कसे ठरवणार की कधी जीव ज्यास्त आनंदला होता? ज्या काही कधी कोणत्या थोड्या फार मनाचा विरस करणार्‍या घटना असतील त्या पण ह्या आनंदाच्या आठवणींमुळे माझ्या मनःपटलावरून मिटल्यातच जमा आहेत.... सरतेशेवटी मी आनंदी... मी आनंदी....

दीपिका 'संध्या'

सोमवार, २९ मार्च, २०१०

खिन्नता मनाची...

१२वीच्या परीक्षा झाल्यात की कळत-नकळत माझ्या मनांत जुन्या आठवणी दरवर्षी डोकवत असतात. कठिण वर्ष असते सगळ्यांनाच ते. मुलांचे पुर्ण भविष्यच थोडक्यात ह्यावर आहे. दरवर्षीचे बदलते नियम, किती टक्के मिळतील ही....एडमिशन कुठे मिळेल... ह्या काळज्या, पैशाचे चाळे तर आता आहेतच. साधारण परिस्थितीच्या आई वडिलांना जोडीला ही पण चिंता. मुलांचे हट्ट असतात.. इथे नको तिथे हवी... मित्र तिथे जाणार... जिवलग मैत्रिण ह्या ठिकाणी एडमिशन घेणार तर मला पण तिकडेच जायचंय...नाना प्रकार....

आजकाल सगळ्याच ठिकाणी एडमिशन च्या पूर्व परीक्षा होतात. आयआयटी मधे सुरुवातीपासुनच आहे. निरनिराळ्या शहरांत हल्ली ह्या ७-८ वर्षात खूप संस्था निघाल्या आहेत जिथे आयआयटी च्या पूर्व परीक्षेची तयारी करवली जाते. अभ्यास इतका कठिण आहे की आधी-आधी दोन वर्ष तरी (१०वीच्या उन्हाळ्यापासुन तर १२वी चे वर्ष संपून मे मधे ही परीक्षा होईपर्यंत चा काळ) करावीच लागत असे. आता तर ऐकिवात आहे की ८वी संपले की त्याचा अभ्यास सुरू करतात.

३-४ वर्षापुर्वीच मी कोटा येथील बन्सल इंस्टीट्यूट चे नांव ऐकले होते. त्याचा हौवा इतका वाढला आहे हे आज टीवी वरील एक कार्यक्रम बघुन जाणवले. मन विचारांनी भरकटले व त्याही पेक्षा सगळ्याचा विचार करण्यात गढले....

कोट्याच्या निरनिराळ्या संस्थांमधे निदान पन्नास हजार मुलं येतात. कोणत्या क्लास मधे एडमिशन मिळणार ह्याची प्रचंड मारामारी असते. ह्या आयआयटी च्या पूर्वतयारी च्या क्लास मधे पण पुर्व परिक्षा घेतली जाते. आहे नं कमाल... त्याचे फॉर्मस विकत घेणे... ठरल्यावेळी तिथे हजर राहून परीक्षा देणे. मग रिझल्ट ची वाट बघणे. सगळे पार पडणारच कारण हे सगळे पैशाचे खजिने भरण्यासाठीच आहेत. लाखो रुपये फी आहे तर एडमिशन सगळ्यांना मिळतेच मिळते. गणितासाठी कोणत्या तरी प्राध्यापकांची ख्याति तर कोणते प्राध्यापक केमिस्ट्री मधे प्रसिद्ध. मग चढाओढ तिथे जाण्याची. ह्या प्राध्यापकांचा बोलबाला असणारच. पैशांचा पाऊस पाडणारे विद्यार्थी असतांना कोणी का त्यात चिंब भिजणार नाही.
आजकाल काही क्लासेस तर इतके हायटेक आहेत की स्टुडिओ मधे बसून-उभे राहून कोट्यालाच काय पण हे पुण्यापर्यंत पण पोहोचले आहेत असे म्हणतात.

मोठी मोठी स्वप्ने दाखवणार्‍या ह्या कोट्याचे... आधी थोड्या-फार प्रमाणात लहान शहराचे आता मोठ्या व उन्नत शहरात रुपांतर झाले असल्यास नवल नाही. ह्याचे सगळे श्रेय कोटा निवासी ह्या आयआयटी च्या पूर्वतयारीच्या संस्था-तिथले प्राध्यापक... अर्थातच हुशारीला देतात. इतके नांव झाले आहे तर प्राध्यापक निश्चित हुशार असणार ह्यात शंका नाही.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेंव्हा पन्नास हजार विद्यार्थी बाहेरून येणार तर त्यांच्या जीवनांची प्रत्येक गरज पुरविणार्‍या लोकांना पण रोजगार मिळणार. राहण्यासाठी घरे बांधली गेलीत, खानावळी वाढणार... पुस्तकांच्या दुकानांचे तर विचारूच नका.. सगळ्यात आधी तेच हवे. सेकंड हँड पुस्तकांच्या दुकानांच्या रांगाच रांगा. सगळ्याच दुकानांची चांदी झालीये.

सायबर कॅफे रात्रभर उघडे असतात. अभ्यासाव्यतिरिक्त बाकी नेटवर जे उपलब्ध आहे त्याचाच उपयोग केला जातो. नाही नाही ते ज्ञान मुलं गोळा करत असतात. ह्या मुळे पण गुन्हे वाढतात. महागाई मुळे ४-५ मुलं मिळून राहणे भाग पडते व पटत नसेल तर त्यातुन वैमनस्य... संतप्त स्वभावामधुन कधी विपरित घडत असतं... खुनाखनी प्रकारांना पण सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे कधी कधी एकमेकांशी जी चुरस असते त्यातुन मनःसंतुलन गमवून आत्महत्येचे प्रमाण वाढतंय. पोलिसांच्या मते दरवर्षी ५-७ मुले अशी आत्महत्या फक्त कोट्यामधे होतात व तीच मुले करतात जी बाहेरून आली असतात... जी जीवावर दडपण घेऊन जगत असतात.

काही आई वडिल मुलांच्या ह्या ध्येयासाठी जमीन विकुन... जर तेव्हढ्याने पण नाही झाले तर कर्ज घेऊन पोटाला चिमटा देऊनच हा खर्च पूर्ण करतात. जाणीव असणार्‍या मुलांच्या ह्या गोष्टी मनांत घर करून असतात. खूप दडपणाखाली वावरतांना दिसतात. स्वतःच्या स्वप्नांबरोबर आई वडिलांची स्वप्नपूर्ति करण्याची दोन ध्येये समोर मांडून असतात. ह्या सगळ्या प्रकरणांत थोडे कमी ज्यास्तं झाले तर मानसिक तणावाचे शिकार होतात. त्यातुन परीक्षेच्या रिझल्ट चे तर सोडाच... परीक्षा होण्याआधीच मृत्युला कवटाळतात.

येणारे विद्यार्थी सगळ्या स्तरांतील येतात. १०वी नंतर तिथे जावे लागणार म्हणजे ११वी-१२वी तिथेच करावे लागणार म्हणजे कॉलेजमधे जाणे आलेच. त्याचा अभ्यास असणारच. शिवाय बोर्ड वेगळे. तिथे गेल्यानंतर कळतं की ११-१२वी ला अजिबात महत्व दिले जात नाही कारण प्राधान्य आयआयटी चे आहे नं तिथे. मुलं भारतभरांतुन येतात कारण आता प्रसिद्धि तशीच आहे कोट्याची. साधारण पन्नास हजारांपैकी साधारण ७-८ हजार मुलांना समजा सफलता मिळाली तरी बाकी मुलांचं काय होणार हा प्रश्न विचार करायला लावणारा व मन खिन्न करणारा आहे. १२वी मधे खूप चांगले पास होण्याची तिथे खात्री नाही. भविष्याचा रस्ता अंधारमय भासू लागतो. पुढे शिक्षणासाठी बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागण्याची ही सुरुवात असते कधी कधी.

एक रस्ता यशाकडे जाणारा आणि दुसरी गल्ली अपयशाकडे जाणारी आहे. धैर्याने आणि संभाळून पावले टाकणार्‍या मुलांना यशाच्या उंबरठ्यावर पोहोचायला वेळ लागत नाही.

आयआयटी चा अभ्यास करतांना दोन्ही गोष्टींची मनाची तयारी ठेवावीच लागते. कारण ही आयआयटी ची परीक्षा अतिशय कठिण व पारखुनच विद्यार्थी घेतले जातात.

रुचिर शिशिर च्या वेळी पण आमचा अनुभव असाच होता. दोघांनी ह्या आयआयटी च्या प्रवेश परीक्षेला बसावे ही आमची नितांत इच्छा... पण १२वी कडे दुर्लक्ष करणे आम्हाला मंजूर नव्हते. तेंव्हा खूप चांगले क्लासेस फक्त चेन्नई ला ब्रिलियंट टुटोरियल्स च असे क्लासेस होते जे नावाजलेले होते. ते तर आमच्या पोहोचण्याच्या पलीकडचे होते. पण त्यांचे पोस्टाने अभ्यासाची पुस्तके येण्याची सोय होती तर तो असा पोस्टल कोर्स त्यांना लावून दिलाच होता. नागपुरलाच नशिबाने एक मॅडम भेटली व तिने १२वी व आयआयटी चा खूप छान अभ्यास करवून घेतला. तिच्याकडे ही पहिलीच बॅच ह्या ५ मुलांची होती. तिचा ही पूर्ण प्रयोगच होता पहिला. त्यावर्षी आयआयटी ची पेपर फुटीमुळे पुनःपरिक्षा झाली व नशिबाची साथ नसल्यासारखे कोणालाही व त्या मॅडमला यश मिळाले नाही. पण आज १० वर्षानी तिची संस्था नागपुरमधे किंवा विदर्भात एक नंबरची संस्था म्हणून तिचे नांव आहे. व विशेष म्हणजे ७० टक्के मुलं यशस्वी होत आहेत दर वर्षी हे ही नसे थोडके.... त्या मॅडम चे खूप अभिनंदन...

जरी आता आमचा ह्या शिक्षण-विषयाशी संबंध नसला तरी पण सगळा सारासार विचार करता मन विषण्ण होऊन जातंय. शिक्षणाचा हा खेळखंडोबा.. मुलांची होणारी दयनीय अवस्था... ह्या सगळ्यात आई वडिलांची मानसिक-शारीरिक-आर्थिक होणारी होरपळ... ओफ....... !!!!!!

दीपिका 'संध्या'

रविवार, २८ मार्च, २०१०

तू गीत नवीन द्यावे

अवचित येणे तुझे
घोर लावून गेले
हुरहुर क्षणाक्षणाची
मन विषण्ण झाले

अलवार मुक्त थेंब
ओठावरी दवाचा
अलगद गोड भास
तुझ्या प्रेम स्पर्शाचा

बंद केलीच होती
किवाडे पापण्यांची
चाहूल तुझी लागली
लोचनी डोकावण्याची

रुसवे तुझ्यावरीचे
खोटेच ते ठरावे
आर्जवाने नव्या
गालात मी हसावे

रित्या रित्या मैफिलीत
सुरांनी का अवघडावे
सुन्या सुन्या स्वरांना
तू गीत नवीन द्यावे

दीपिका 'संध्या' 

गुरुवार, २५ मार्च, २०१०

जपणार का रे ही नाती....

ह्या इंटरनेट आणि संगणकामुळे सगळे जवळ आलेत असं म्हणतात.. खरं पण आहे. अशा-तशा कारणाने नाती दूर होऊ लागली आहेत. ह्या नात्यांमधे टिकवून ठेवलेली जवळीक दुरावत चालली आहे. आमच्या पीढी ने संभाळलेले संबंध कसे टिकवून ठेवायचे किंवा काय करायला पाहीजे म्हणजे पुढची पीढी ते जपू शकेल हे कळेनासे झाले आहे. १५-२० वर्षापुर्वी पत्राद्वारेच संपर्कात राहता येत असे. तेंव्हा सगळे व्याप.. घरचे बाहेरचे.. पत्र लेखन सगळे करतच असत. कारण जीवाला जीव लावलेला असायचा. जरी भारंभार पत्र नाही लिहीले तरी आंतर्देशीय पत्र.. नाहीच तर निदान पोस्टकार्ड खरडायला वेळ मिळतच असे. महीन्यात एखाद्या अशा पत्राची देवाण-घेवाण झाली की प्रत्येक पत्रामधुन कोणाकडे लग्न ठरले..कोणाकडील काही दुःखद समाचार.. कोणी पास झाले.. कोणाकडे गोड बातम्या.... बरंच काही काही कळत असे.

सध्याच्या धावपळीत म्हणायला सोपे काम इमेल करण्याचे पण होईनासे झालेय. दिवसभर संगणकाची साथ आहे पण त्याचा उपयोग ही नाती टिकवण्यासाठी होऊ शकतो हे आजकालच्या पीढी ला कसे लक्षात येत नाही. परदेशात विखुरल्या गेलेल्या अशा अनेक कुटुंबांच्या ह्या व्यथा आहेत. अंतराचे कारण पुढे येऊन आपुलकी दूर ढकलली जातेय. आधी होणारा दुतर्फी पत्रव्यवहार आज ई-मेल्स एकतर्फी होऊन पुढे खुंटला जातो.

गेल्या ऑक्टोबर मधल्या अमेरिका भेटीत मुलांच्या घरी समोर खूप मोठी पत्रपेटी प्रत्येक घराची वेगळी... अशी लावलेली आहे हे बघून खूप आनंद झाला होता. मुलींना सांगितले होते की आता मी तुम्हाला पत्र पाठवणार. रोज होणार्‍या संगणकावरील भेटीमुळे पत्रात काय लिहू असा विचार येऊन पत्र माझ्या हस्ताक्षरांत लिहीण्याचे राहूनच गेलेय. पत्र लिहीण्याची संवय पण इतकी गेली आहे की अक्षर कुठे जाईल ह्याचा ही नेम नाही राहीला.. पण प्रयत्न करायला कुठे हरकत... शुभस्य शीघ्रम् करणे आलेच.....

जेंव्हा जेंव्हा लग्नाच्या निमित्याने भारतात जाणे होते (मी बहुतेक नातेवाईकांबरोबर आप्तस्वकीयांच्या.. जुन्या मित्र परिवारातील लग्नांना आवर्जून जातेच). शक्यच नसेल तरच जाणे जमत नाही. सगळ्यांची भेट, त्यातील मिळणारा आनंद हा सांगुन कळणारा नाही. आत्ता नोव्हेंबर मधे लग्नाला गेलो असतांना आम्ही सगळे भाऊ (माझे चुलत दीर-जावा... कधी काळी कोणाचे काही मतभेद झाले असतील तरी ते विसरून..) रात्री १२ पर्यंत गप्पा मारत बसलो होतो. आमच्या लग्नापासुन च्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. आमच्या पेक्षा वयस्कर असणारी (सगळे आजी-आजोबा झोपले होते...)लहान मुलांना काही त्यातले कळत नव्हते त्यामुळे जरासे कंटाळल्यासारखे करत होते म्हणुन कोणी तरी म्हंटले 'चला आइस्क्रीम खायला जाऊ'. आता इतक्या रात्री कुठले दुकान उघडे असणार. पण पुण्यात हे शक्य आहे किंवा पुणेरी लोक रात्री १ पर्यंत आइस्क्रीम पार्लर उघडे ठेवू शकतात ह्याचा प्रत्यय त्यादिवशी आला. आम्ही तीन गाड्यांमधे सगळे कुचकुन आइस्क्रीम च्या शोधात भटकत होतो. पुण्याचे रस्ते खोलात जाऊन खास कोणाला माहीत नव्हते. शोध-शोध शोधून रात्री एक ला पाच मिनिट कमी असतांना शोध लागलाच व जिंकल्याच्या आनंदात मुलांनी याऽऽऽऽऽऽहू सुरू केले. १५-१७ जणांची धाड आलीये म्हंटल्यावर त्याने 'दुकान बंद होतंय' हा पुणेरी खाक्या दाखवला नाही. नॅचरल्स च्या आइस्क्रीम मुळे अजूनच सोने पे सुहागा. बाजुलाच असलेल्या पानाच्या दुकानातुन मस्तं मसाला पानाचा आनंद त्यावर लाल रंग चढवून गेला. सगळे आनंदात परत गेलोत.... सकाळी लग्नासाठी लवकर उठायचे होते....

हे सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की आम्ही सगळे फक्त लग्न-कार्याच्या निमित्यानेच एकत्र येत असतो. बाकी वेळी हल्लीच्या नियमाप्रमाणे पत्र-ईमेल्स ला वेळ मिळत नाही तर संपर्कात नसतो. पण आधीच्या टिकवलेल्या मजबूत असलेल्या नात्यांना आता त्याची गरज वाटत नाही. सगळे भेटतो.. प्रेमाच्या गप्पा... मोठ्यांची आस्थेने-आपुलकीने चौकशी.. आजी-आजोबांची नातवांसाठी होणारी काळजीची घालमेल वगैरे वगैरे.... पुढच्या पीढीला हा आनंद कधीच मिळणार नाही. आमच्या मुलांच्या चुलत-आते-मामे बहिण-भावांची आपापसात कधी भेटच होत नाही. लहान असतांना बघितलेले ५-७ वर्षात सगळ्यांमधेच इतके बदल होतात की समोर आले तरी ओळखू शकतील की नाही शंकाच आहे. परदेशात असल्यामुळे कुठल्याही प्रसंगाला यायला जमेनासे होते. भेट नाही.. नाती माहीत नाही... संबंध नाही त्यामुळे भेटण्याची ओढ नाही.. म्हणून येणे दुरापास्त आहे.

अशा सगळ्या भानगडीत आजकालच्या ह्या मुलांना सख्खे असो... चुलत असो... नातेवाईक कसे टिकणार... आजकालच्या प्रथेप्रमाणे एकुलत्या एक मुलांना तर कोणीच राहणार नाही पुढे... त्यांच्या मुलांना कोणी काका-मामा राहणारच नाहीत... आपुलकीची किती कमतरता भासेल ह्या सगळ्या विचारानी माझे मन सुन्न आणि खिन्न होते. विज्ञानाच्या व बाकी पण असंख्य क्षेत्रांमधे चमकणारी....आपापल्या विश्वात रममाण होणारी ही पीढी खुप गोष्टींना मुकणार आहे. मित्र तर असतील... अडचणीला धावून पण येतील पण बाकी वेळी ह्या नेटच्या स्वच्छंदी होणार्‍या स्वैराचारात त्यांना आपलेपणा मिळेल का? दुनिया गोल है म्हणणार्‍या ह्या जगात... होणार्‍या नव-नवीन शोधांमधे... हिंडुन-फिरून पुन्हा खो दिलेल्या त्या नात्यांना आपल्या जागेवर येऊन बसता यावे ही सदिच्छा!!!

आजच्या माझ्या मुलांच्या पीढीला थोडं सांगावसं वाटतंय....

शब्द-ओळींच्या मोत्यांनी
अतुट स्नेहबंधने गुंफावी
घट्ट असाव्या रेशीमगाठी
कधी न ही नाती सुटावी

रक्ताची वा असो मनाची
काळी वेळी सदा वसावी
स्वार्थ स्वत्वापायी अशी
कधी न ही नाती विखरावी

प्रेम मेघ दवबिंदु तुषारी
सगळी नाती चिंब भिजावी
अळवावरील पाण्या सम
कधी न ही नाती ढळावी

प्रेम जिव्हाळ्याने जपावी
ही नाती जरूर टिकवावी
आजीवन ही मनी वसावी
विस्मरणात कधी न जावी

दीपिका 'संध्या'

मंगळवार, १६ मार्च, २०१०

चैत्र शुद्ध१ वर्षप्रतिपदा... गुढीपाडवा..

आज पाडवा.. गुढीपाडवा... युगाब्द ५११२. शालीवाहन शके १९३२. विकृति नाम संवत्सर आरंभ. म्हणजेच मंगळवार १६ मार्च २०१०.जुने दिवस आठवले तर गुढीपाडव्याचे महत्व किती वेगळे होते. होळी झाली की दिवस मोठा होतो. गरमी सुरू होते. मग चैत्राचे आगमन... नवीन वर्ष सुरू होते गुढीपाडव्याने. साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त. नवीन कपडे, साग्रसंगीत स्वयंपाकाबरोबर गुढीच्या.. ह्या दिवसाच्या महत्वाच्या कथा सांगितल्या जात असत आम्हाला. तेंव्हाच्या शिक्षणपद्धति मधे शाळेतच हे कथा-कथन असावे. माझ्या मुलांच्या वेळेपर्यंत नोकरीमुळे प्रदेश बदललेत, त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणांत फरक पडला. (मुले लहान असतांना फरीदाबादला होतो जेंव्हा त्यांना हे सण-वार समजावून द्यायची वेळ व जबाबदारी आमची होती. घरी आजी होतीच ह्यासाठी.. मुलांबरोबर दारी उभारलेल्या गुढीचे महत्व शेजार्‍या-पाजार्‍यांनाही समजावून सांगत असू. त्यांना मजा वाटत असे व आम्हाला आमच्या संस्कृतिचा अभिमान.) शाळांची माध्यमे बदलली. इंग्रजी माध्यमे आलीत..त्यामुळे जे घरी करू तेच मुलांना कळणार. अशा ठिकाणी असलेल्या मराठी मित्रमंडळींबरोबर वर्षभर सगळेच सण साजरे करण्याचा मुख्य उद्देश हाच असायचा.

साडेतीन मुहूर्त... दिवस चांगले.. तरी आधी लग्नाचे मुहूर्त वेगळे असत. पण आजकाल पूर्ण वर्षभर लग्नाचे मुहूर्त काढता येतात... श्रावण काय भाद्रपद काय...त्यामुळे हे साडेतीन मुहूर्त तर मग उत्तमच नं....
उत्तरेला आपले हे मराठी महीने जसे अमावस्येनंतर येणार्‍या प्रतिपदेला सुरू होतात तसे त्यांचे पौर्णिमेपासून सुरू होतात. त्यामुळे १५ दिवसांचा फरक. हा फरक श्रावण महीन्यात ज्यास्त जाणवतो.

चैत्र शुद्ध१ वर्षप्रतिपदा - ह्या दिवसाचे महत्व पिढ्यान्-पिढ्या तसेच आहे पण मन-मनांतून ते किती टिकून आहे? संगणक, इंटरनेट व त्यावरून ई-मेल ने निरनिराळी माहीती मिळत असते. ह्यावेळी तर पाडव्याला गुढीची पूजा कशी करायची पासून ई-मेल मिळाल्या आहेत. लेखाच्या सुरूवातीला जे मी लिहीले आहे ते मला असेच समजले आहे. माझ्या ज्ञानांत (ज्यांना ही ईमेल मिळाली आहे त्यांना पण बहुतेक) नक्कीच भर पडली आहे. इतकी साग्रसंगीत पूजा तर कोणी करत नसेल. संगणकाच्या आणि खाजगी नोकर्‍यांच्या दुनियेत बर्‍याच लोकांना सुट्टी पण नसते. सकाळी घाईनेच पूजा आटोपली जात असेल. गेल्या वर्षी पुण्यात होते गुढीपाडव्याला तर ३-४ आकारात लहान-मोठ्या गुढ्या ज्याला गोल पाया व अतिशय सुंदर रेखीव सगळ्या वस्तुंनी सजलेली गुढी बाजारात उपलब्ध होती. घरी आणा, देवाजवळ किंवा योग्य जागी ठेवा(उभारा), पूजा करा. उत्तरपूजा करून उचलून ठेवा व बहुतेक दुसर्‍या वर्षी पुन्हा तीच.... आहे नं सुटसुटीत पद्धत...
इतके खरे की सगळ्यांच्याच नजरेत ह्या सणांचे महत्व पटवून देण्याची वेळ आली आहे. प्रबोधन फेरी मधून गुढीपाडव्याचे महत्व पटवावे लागतेय. दिखाव्याच्या ह्या प्रत्येक क्षणाला, टीवी वर दिसणार म्हणून अगदी नथ, फेटे घालून सगळ्याच वयाचे मराठमोळी वेषभूषा करतात.

असे म्हणतात की गुढीवर ठेवले जाणारे.. तांब्याचा तांब्या किंवा ग्लास असो पण तो उलटा किंवा पालथा ठेवला जातो. त्यामागचे कारण संकल्प करा तो फक्त देण्याचा.. आणि वस्त्र जे आपण लावतो ते विणलेले असते व धाग्या-धाग्याने ते वाढत जाते तसाच तुमचा संकल्प पण वाढत जावा. साखर व कडुलिंबा चा समन्वय ठेवायला हवा व म्हणाल तर कडू आठवणींना विसरून जा आणि गोड आठवणी घेऊन पुढे जा.. संकल्प गोड असावा म्हणून श्रीखंड तर खायचेच पण सात्विक असावा म्हणून कडुलिंब, सुंठ, आलं पण खायचा संकल्प घ्यायला हवा म्हणून त्याचे महत्व.

एक छान संदेश वाचायला मिळाला. कडुलिंबाची फांदी आणा, गुढीला लावा, चटणी करून खा पण त्याचबरोबर एक कडुलिंबाचे वृक्षारोपण करा. खूपच आवडले.

ह्या सणांच्या निमित्याने बाजारपेठा सजतात. गुढी साठी गाठी, जर घरी शक्य नसेल तर आंब्याची व कडुलिंबाच्या डहाळ्या अशा वस्तुंच्या बरोबरच आता आकर्षणे मोठ्या मोठ्या वस्तुंची असतात. नवीन वर्षाची सुरूवात खरेदीने केली जाते. ह्याचबरोबर कुठल्या गोष्टींचा नियम पण आजच्या दिवसापासून करावा हे किती जणांच्या मनांत येतं? संकल्प केले तरी किती टिकतात? आणि वर म्हणायचे की संकल्प असतात ते मोडण्यासाठीच... (नियमित लेखनाचा संकल्प मी पण आज करतेय... मोडणार नाही ह्याचा वेगळा संकल्प करतेय.. हसा हसा.. ) असो..

ह्या दिवशी आजकाल पुण्यासारख्या संस्कृति-शहरामधे नव-वर्षाची पहाट संगीताने जागवली जाते. नागपुरला १११ फुट उंचीची गुढी उभारून वेगळेच आकर्षण निर्माण केले जाते. ईमेल्स ने निरनिराळी शुभेच्छापत्रे पाठवली जातात. मोबाईल वर छान छान शुभकामना दिल्या जातात. विज्ञानाच्या नव-नवीन शोधांबरोबर प्रत्येक सणाचे स्वरूप पण बदलत चालले आहे. सत्यनारायणाची पूजा, गणपतिची पूजा म्हणे इंटरनेटवरून करतात, पूजा मांडलेले चित्र दिसेल संगणकावर तर त्यालाच हळदीकुंकू वाहण्याचे दिवस पण दूर नाहीत. बदलत्या काळात आपल्या वडीलधार्‍यांना... त्यांच्या मतांना कुठे जागा उरली आहे? न बोललेच बरे...


दीपिका 'संध्या'

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

प्रेमाची ही अशीच बंधने....

वर्षभर प्रेम करत असावे.. प्रेम देत रहावे... माझा स्वभाव अतिशय हळवा... समोरच्या व्यक्तिच्या डोळ्यात आनंदाचे किंवा दुःखाचे दोन अश्रु असतील तर माझ्या डोळ्यांत त्याच्या शंभरपटीने. औषध तर नाहीच स्वभावाला. अनुभव नेहमीचेच आहेत त्यामुळे कदाचित माझ्या ह्या अश्रुंचे महत्व मीच कमी करून घेतले पण असेल. .. पुन्हा स्वभावच आडवा येतोय हो सारखा... समोरच्या प्रत्येक व्यक्तिवर विश्वास ठेवण्याचा.. जर ती रडतेय तर खरंच... जर ती हसतेय तर खरंच... पारख अजिबात नाही. ह्या नकळत घडणार्‍या प्रामाणिकपणाने धोके पण खूप खाल्ले आहेत आयुष्यात... जसे असेल तसे पण प्रत्येकावर माझ्या सगळ्या मैत्रिणी.. आप्तस्वकीयांवर मनांपासून प्रेम करते आणि करत राहीनच.

पुण्याच्या घरी जेंव्हा जेंव्हा आम्ही जातो तेंव्हा अल्पना नावाची एक बाई... (मी तिला कधी कामवाली किंवा एकेरी नांवाने संबोधले नाही..) माझ्यापेक्षा वयांने लहानच.. ती यायची आणि आमच्या वास्तव्याच्या दिवसांत बाकी सगळ्या घरची कामे संभाळून आमचे काम करून देत असे. कधी कुठली अपेक्षा नसायची. बाकी कामाबरोबर कधी वाटले तर गरम पोळ्या पण करून देत असे. पोळ्या अशा करत असे की अगदी मऊ सूत.

एप्रिल महीन्यात रुचिर-शिशिर चे लग्न झाले तेंव्हा अगदी घरच्यासारखे वेळांत वेळ काढून माझी मदत केली होती. अगदी दाणे भाजून कूट करणे, सामान ठेवायला धान्याच्या कोठ्या रिकाम्या करून धुवून देणे... रोजचे काम तर असायचेच. लग्नाच्या दिवशी गाड्या ठेवल्याच होत्या तर दुपारी तिला वेळ मिळेल तेंव्हा हॉलवर यायला सांगितले होते. जेवून लगेच परत गेली. तिला व तिच्या भावजयीला छान साड्या दिल्यात. साडी मुद्दाम आधीच दिली होती तर लग्नाच्या दिवशी नेसून आली होती. ''लाडू चिवडा आपल्या हाताने घे जितका हवा तेव्हढा...'' ह्या माझ्या वाक्याने ती किती सुखावली होती हे तिचा चेहराच सांगत होता. घेतला इतका कमी की मलाच तिला काढून द्यावा लागला.

नंतर नोव्हेंबर मधे माझ्या पुणे भेटीत तिला बरे नव्हते त्यामुळे माझी व तिची भेट होऊ शकली नाही. ताप-सर्दी-खोकला झाला असेल ह्याशिवाय फारसा काही विचार माझ्या मनांला शिवलाच नाही. परवा अचानक मला कळले की ती गेली... तिच्या आईला डायबिटीस आहे व तिचीच चौकशी मी नेहमी करत असे. नंतर समजले की तिला पण तसाच डायबिटीस होता पण आईकडे लक्ष देता देता कदाचित स्वतःला काही असे असेल हे दुर्लक्षिले गेले असे म्हणतात. बघता बघता सगळे अंग शिथिल होत गेले आणि ती नकळतच पडद्याआड गेली.. कळल्यापासून माझे चित्त कशातच लागत नाही. पुण्याला गेल्यावर अल्पना आता माझ्याकडे येणार नाही ही कल्पनाच मला सहन होत नाही....

तब्येतीनुसार कुवैतला २ वर्षापुर्वी कामाला बाई शोधली. ह्या तेलुगु बायकांबरोबर भाषेची खूप अडचण येते. मुलीची जात...वयाने लहान... प्रेमाने समजावून देत असे मी सगळे काम कुमारी ला. हळू हळू गप्पा मारता मारता तिला हिंदी शिकवले. आता तर बरेच चांगले हिंदी बोलू लागलीय की ती स्वतःला काय हवे किंवा मला काय हवेय ते नक्कीच समजू शकते. इथे नवरा, दीर व सासू बरोबर राहते. गरीब परिस्थितीतून वर येण्यासाठी हे लोक कुवैत ला येतात.... बर्‍याच वैध-अवैध मार्गाने पण इकडे यायचा अट्टाहास असतो. गप्पांमधे सांगते, ''उधर खेत में गरमी-धूप में काम करेगा.. पैसा नहीं... थक जाता था... इधर घर में काम.. अच्चा काम.. एसी में काम... बस आने जाने में धूप लगता है.. तो छाता है ही तुमने दिया हुआ...''

छान चालू सगळे.... तिला दिवस गेलेत. खूपच त्रासांत जीव होता तिचा. सुरूवातीचे तीन महीन्यांपैकी सगळे मिळून १ महीना तरी तिने काम केले की नाही शंकाच आहे. यायची ती दमल्यासारखीच... समोर कार्पेट वर झोपायची १ तास.. माझ्या सारखी हळव्या मनांची मी... तिला कॉफी करून द्यायचे... जेवायची इच्छा असेल तर जेवायला वाढायची... आणि ती निघून जायची उरलेले काम मी करत असे. नंतर थोडा त्रास कमी झाला पण माझी दयाळूवृत्ति कमी कुठली होणार... तिच्या कामांत माझे मदत करणे मात्र सुतभर कमी झाले नाही. रोज तिची चौकशी व मी देत असलेल्या आरामाने भारावून जात असे. मी कुठलेही ज्यास्तीचे काम करत असेल तर ''मॅडम मैं कर देगा'' म्हणून लगेच करू लागत असे. आठवा महीना लागायच्या २ दिवस आधी ती भारतात गेली. जायच्या दिवशी सकाळी बाकी ठिकाणी कामं करून माझ्याकडे आली...काम मी तिला करू देणारच नव्हते. छानसा गजरा व ५ फळांनी तिची ओटी भरली.. साडी दिली... पैसे दिले.. )होणार्‍या बाळासाठी दोन टेडी बेयर आणले होते पण ''किदर लेके जाएगा...'' म्हणून इथेच सोडून गेलीय)...काय तिचा जीव सुखावला कारण तिला हा प्रेमळ धक्काच होता. डोळे पाणावले तिचे व माझे... पाया पडली. हे घरी होतेच तर ह्यांचा पण आशीर्वाद घेतला. ''मायेला-प्रेमाला कुमारी सारख्या मुली भुकेल्या असतात का'' किंवा ''तिचे इतके काही करायची काय गरज?''.. ''अशांना त्यांच्या जागीच त्यांना राहू द्यावे...'' वगैरे वक्तव्य खरी की मी करते ते चांगले हे मी ठरवू शकत नाही..

तिची सासू आता कामाला येतेय .. कुमारीची मी चौकशी करतच असते पण ती पण सांगते ''कुमारी टेलीफुन बोलू.. दीपिका मॅडम कैसा है? उसका कंधे का दर्द कैसा है पूचता है...?'' ती २ महीन्याच्या बाळाला गरीबीपायी भारतात सोडून येणार आहे ह्या बातमीने मी हादरले आहे. पर मेरा कमज़ोर और दयावान दिल यहाँ शायद कुछ कर नहीं पाएगा ये बात मैं जानती हूँ...
आता जून मधे ती परत येणारेय... तिच्यासाठी मी तिच्या सासूचे काम चालवून घेते आहे कारण कुमारीच्या कामाला सर नाही... तिचे काम हिरावून मी दूसरी बाई ठेवू इच्छित नाही हीच ह्या सगळ्या मागची भावना आहे....

दीपिका 'संध्या'

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

प्रेमदिन हा आला आला... गेला गेला...

प्रेमदिवस म्हणून १४ फेब्रुवारी हा दिवस बांधला गेला आहे. प्रेमाला खरंच ह्या बंधनाची गरज आहे का हा प्रश्न बहुतांशांच्या मनांत येत पण असेल. आपण मानावे की न मानावे पण अनावधानाने हा दिवस सगळेच.. सगळ्याच वयांचे लोक अनुभवतात आणि त्याची मजा घेतात. ह्या वेळी प्रेमदिवस आला नेमका सुट्टीच्या म्हणजे रविवारच्या दिवशी. कुठे तरी वाचनांत आले ''लपून-छपून प्रेमदिवस अनुभवा.. कारणे शोधा...'' कारणे साधी सरळ सोपी वाटणारी जसे परीक्षा आली आहे तर महत्वाचे प्रश्न सांगायला सरांनी ट्यूशन क्लास मधे बोलवले आहे, ऑफिसमधे कोणी सोडून जातंय तर त्याला शुभेच्छा-जेवण आहे, मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस आहे तर पार्टी आहे वगैरे वगैरे.... मजा वाटते नं!!!


प्रेमदिनाच्या दिवशीच प्रेम व्यक्त करता येते असे नाही आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमदिनाची वाट बघण्याची तर त्याहून गरज नाही. इतके खरे की स्वतःला व्यक्त न करता येणार्‍या व्यक्तिंना कदाचित ही पर्वणीच ठरावी... गुलाबाचे फूल आपल्या प्रेयसीला दिले तर शब्दांची गरज निदान त्यादिवशी तरी भासत नसावी. वर्षाचे ३६५ दिवस प्रेमाचेच असावेत, शब्दांबरोबरच ते कृतीत पण दिसावे. प्रेमदिनाला महत्व द्यायचेच असेल तर आणि कृती मधे दाखवायचे असेल तर अशी पण बरीच नाती जोडता येतील ज्यांना ह्या सगळ्याची गरज आहे. बरेच लहानगे जीव प्रेमाला आसुसले असतील त्यांना प्रेम करावे... प्रत्येकाच्या अशा थोड्याशा प्रयत्नांनी बरेच लाल गुलाब फुलतील हे नक्कीच..

थोडे फार आमचे पण असे झालेच की प्रेमदिवस साजरा केलाच गेला. लाल गुलाबांची देवाण-घेवाण तर नाही झाली पण बाकी पारिवारिक मित्र-मैत्रिणींना शुभेच्छांचे आदान-प्रदान नक्कीच आवर्जून केले. मुलांना-मुलींना शुभेच्छा संदेश पाठवलेत, रात्री जेवायला सगळे मिळून बाहेर गेलो आणि प्रेमदिवस संपला.

माझ्या नजरेत मला ह्या अशा दिवसांचे जरा पण महत्व नाही. लग्नाला ३१ वर्ष झालीत... निरनिराळ्या तर्‍हेने प्रेम दर्शविले गेले असेल.. अशा दिवसांची संकल्पना भारतात इतक्यात रूजली आहे. त्यामुळे माझ्या शब्दांत माझ्या प्रियकरासाठी प्रेमदिनाची ही कथा-कविता......केसात माळूनी मोगरा
मिठीत ह्या श्वासास वाहिन
शिरशिरी ह्रदयांत दोन्ही
असे रोज अपुला प्रेमदिन

चंद्र पुनवेचा खुणवतो
चांदणकणां त्या मी शिंपिन
कधी न रिक्त राहू आपण
असे रोज अपुला प्रेमदीन

रेशीमगाठी बंध आपुले
जुन्या प्रेमाचे भास नविन
धुंदीत बेधुंद तू अन मी
असे रोज अपुला प्रेमदीन

दीपिका 'संध्या'