प्राची चा वाढदिवस नेमका तेव्हढ्या काळात नव्हता. पण असा भेदभाव हे आई बाबा कधीच करणार नाहीत. एका लेकीचे कौतुक झाल्यावर दुसरीचे होणारच.. रुचिर ने तिला काही भेटवस्तू व फुले पाठविल्यानंतरच्या आठवड्यात आम्ही तिला एक छानशी पर्स आणि फुले पाठवलीत. तिच्यासाठी आम्ही पाठविलेली भेट आश्चर्य देणारी असेल..... फोन करून तिने सांगितले की सकाळी सकाळी मला अकस्मात आनंद मिळून पुढचा दिवस छान गेला.

असेच उरलेले दिवस प्रतीक्षेत चिंब भिजत गेलेत. तिकडे त्यांची दोघींची वेगळी चलबिचल असेल आणि इकडे आमची वेगळीच.... ह्या ३-४ महीन्यांच्या मधल्या काळात अशा गप्पा मारून आमच्यात नातं निर्माण झालेच होते. त्यांना सुरूवातीपासूनच 'ए आई' वर सीमित केले होते त्यामुळे लेकींची जवळीक झाली असं म्हणता नाही येणार कारण आम्ही दूर कधी नव्हतोच... बस आता त्यांच्या आगमनाची तयारी करता करता दिवस गेलेत व लग्नं होऊन राण्या आपल्या घरी आल्यात.... क्षण असे भाग्याचा....
एकदम दोघी मुलींचा गृहप्रवेश झाला....इथे चार शब्द माझ्या दोन्ही राण्यांसाठी पण संबोधन एकीलाच उद्देशुन....
वाटेवरीच जिच्या हे
डोळे होते लागलेले
आगमन झाले तिचे
अमुच्या चौकोनी घरकुली
सून नव्हे आम्हा लेक लाभली
स्मित गोड गालावरी
गूज प्रीतीचे सांगूनी
गुंफित नव प्रेमबंधने
हळूवार ती लाजत आली
सून नव्हे आम्हा लेक लाभली
तरुवेली वर गंधसुमने
फुलोरा जाईचा फूले
दरवळली रातराणी
फुलली अंगणी सदाफूली
सून नव्हे आम्हा लेक लाभली
छेडत सूर आसावरी
गान गाता ताल सुरी
सुस्वागत करण्या तिचे
गीत घेऊनी सांज आली
सून नव्हे आम्हा लेक लाभली
दीपिका 'संध्या'