शनिवार, १७ एप्रिल, २०१०

विवाहबंधन वर्षगाठ... प्रेमाने भरलेले आशीश...

१२ एप्रिल चा दिवस उजा़डला आणि गेल्या वर्षीचे हे दिवस मी जगू लागले. रुचिर शिशिर १२ एप्रिलला भारतात आले होते. १५ एप्रिल २००९ ला लग्नं झाले दोघांचे व आपापल्या राण्यांना घेऊन २५ एप्रिल ला अमेरिकेला रवाना झालेत.

वर्ष कसे गेले खरंच कळलेच नाही. इंटरनेट मुळे सतत संपर्कात असल्यामुळे जरी दूर असले तरी वेबकॅम मुळे बघत होतो, माझ्या फिरक्यांनी त्यांना बेजार करणे माझे अगणित सुरू होते. बर्‍याच छान छान गोष्टी ह्या काळांत घडल्या... सुखावून गेल्यात. ऑगस्ट-सप्टेंबर मधे रुचिर-प्राची व शिशिर-लीनू ने आपापले मोठे बंगले घ्यायचे ठरवले... घेतलेत आणि ऑक्टोबर मधे वास्तुपूजा आणि दिवाळी साधून आम्ही अमेरिका गाठली व सगळेच एकमेकांना आनंद देऊन गेलो.

नोव्हेंबर मधे अजून एक खुशखबरी कानांवर आली आणि मी मुलींच्या प्रेमात वेडी पुन्हा एकदा जानेवारी मधे तीन आठवड्याची अमेरिकेची फेरी करून आले. आता काळजी व कौतुकाने हे दिवस सरताहेत. आनंदोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू झालीच आहे... व त्याच्या प्रतिक्षेत आम्ही सगळेच आहोत...

ह्या सगळ्यांत वर्ष संपले आणि पुन्हा १५ एप्रिल चा दिवस उजाडला पण २०१० चा... एक जोडी हवाई ला आणि दूसरी जोडी न्यूयार्क-वॉशिंग्टन फिरायला गेले आहेत.. धम्माल करताहेत. १५ एप्रिल ला फोन ने शुभेच्छा देऊन झाल्याच आहेत पण तरीही..अशा हौशी व उत्साहाने भरलेल्या माझ्या राजाबेट्यांसाठी व त्यांना पुरेपूर साथ देणार्‍या माझ्या मुलींसाठी माझे प्रेम ह्या भेटकार्डात व्यक्त केले आहे.रविवार, ११ एप्रिल, २०१०

तुझे माझे स्वप्न....!!!

आठवते नजर पहिली?
भाषा तिची न कळली
कसे व्यक्त व्हावे आपण
माझी जीभ न वळली

अवसेच्या राती त्या
जणु चांदणे पाहिले
खोल डोळ्यात तुझ्या
गुपित काय दडविले

नांव मनी कोरण्या
शब्द शब्द जुळविले
बांधली प्रीत पुजा
मी प्रेम फूल अर्पिले

गाली खट्याळ हास्य
मन अधीर हरवले
अधरावरील दवाने
चिंब मजसि भिजवले

प्रीत मेघ अनंत
लोचनांत विसावले
अस्तित्वाने तयाच्या
सखया मी भारावले

आता नको दुरावा
नको क्षण विरहाचे
रंग नभी रंगवू
अपुल्याच स्वप्नांचे

दीपिका 'संध्या'