बुधवार, २७ मे, २००९

येणार कधी रे...

सजली फुलली रास फुलांची
संध्या छेडते व्यथा मनाची
कातर रात्र घायळ करी रे
सांग सजणा येणार कधी रे

जीवा जळवी वैशाख वणवा
मृगजळ तो आहेच फसवा
अश्रुतच काया चिंब ओली रे
सांग सजणा येणार कधी रे

प्रेम तराणे कानी गुणगुणावे
बेभान धुंदीत स्वप्नी विहरावे
मिसळू दे हा श्वास श्वासात रे
सांग सजणा येणार कधी रे

प्रीतीत हा दुरावा सोसवेना
व्यथित मन कुठेच रमेना
असा मजवरी रुसू नको रे
सांग सजणा येणार कधी रे

दीपिका 'संध्या'

सोमवार, २५ मे, २००९

तू येणार नाही?

बर्‍याच दिवसांनी आज लेखणी हातात घेतली आहे.

गेल्या १० मे ला झालेल्या मातृदिना च्या निमित्याने आई बद्दलच लिहून आता लिखाणात नियमितता आणण्याचा सदैव प्रयत्न करत राहीन असं ठरवलंय तरी..बघू या....

आधी आई बद्दल लिहून झालेच आहे पण तरी आई सदैव ध्यानी मनी असतेच त्यामुळे पुन्हा एकदा थोडे...

माझ्या आई ला जाऊन ४ वर्षे झालीत पण ह्यावेळी असा योगायोग होता की १० मे ला तिचा वाढदिवस व मातृदिवस पण. मागे वळून बघता वाटलं की आई ची सेवा करण्याची संधी आली पण अन गेली पण... कधी सेवा साध्य झाली कधी खंत राहीली. लग्नानंतर जी मी दुसर्‍या प्रांतात गेले ती दूर दूरच राहीले. दरवर्षी आमच्या येण्याची आतुरतेने वाट बघत बसणारी आई आज पण डोळ्यासमोर येते. नागपुर रेल्वे स्टेशनवर प्रत्येक वेळी आमच्या आगमनाच्या वेळी आनंदाने आम्हा दोघींचे पाणावलेले डोळे तर परततांना आता पुढे कधी याल...कधी भेटतील माझी नातवंडे ह्या विचाराने डोळ्यातील अश्रु पापण्यांपलीकडे लपवणारी आणि आई बाबांकडे खूप लाड करून घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली मी अश्रु गाळत असे. कारण तिच्यासारखी सहनशील कदाचित मी नसेन. मला अश्रु आवरणे शक्य होत नसे. जसे जसे वय वाढू लागले तशी ही सहनशक्ति तिची कमी होत जातांना दिसली. गळ्यात पडून रडणारी आई सामोरी येऊ लागली.

आम्ही औरंगाबादला असतांना हे कुवैत ला आलेत आणि मी मुलांना घेऊन तिथेच राहीले. आमच्या आई कधी बरोबर असायच्या कधी कुठे गांवाला जायच्या. त्या ३ वर्षात जेंव्हा कधी मला कुवैत ला भेट द्यायची असायची तेंव्हा आई बाबा रुचिर शिशिर जवळ येऊन रहायचे. किती सारखे तिला गृहित धरले जायचे ह्याची खंत करावी तितकी थोडी आहे. त्यांचे खूप लाड करायचे. थोड्या दिवसांपुरते का होईना पण मुलांवर होणारी माझी...''हे खायलाच हवे..ते खायलाच हवे'' ही जबरदस्ती बंद व्हायची. त्यामुळे ते ही खुश. आज असं वाटतं तिच्यावर सगळी जबाबदारी टाकून मी जात असे...तिला होणार्‍या त्रासाची मी कधी पर्वाच केली नाही. कुवैतहून जे काही थोडे फार तिच्यासाठी नेले तर नको नकोच करायची. खरंच आई वडिलांची कधीच कसली अपेक्षा नसते. जेंव्हा मी परत यायचे तेंव्हा असं वाटायचं की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घालावे, गरम पोळी वाढावी...

प्रत्येक वेळी तिला म्हणायचे की पुढच्यावेळी मी येईन तेंव्हा कुठ्ठे जाणार नाही...आपण खूप गप्पा मारू.. पण मला बाकी माझ्या संसाराच्या रहाटगाडग्यातून तिच्यासाठी वेळ काढायला कधी जमलेच नाही. जेंव्हा जेंव्हा मी तिला आवाज दिला तेंव्हा ती धावत आली पण कधी तिने मूकपणाने हाक मारली पण असेल, मला ऐकूच आली नाही. नातेवाईकांच्या गराड्यात जेंव्हा तिच्याकडे फक्त बॅग ठेवायला जायचे तेंव्हा तिच्या प्रेमभरल्या रागाकडे पण दुर्लक्षच केले गेले. असो...

फक्त तिची एकच अपेक्षा असायची ती म्हणजे माझ्या दर आठवड्यात मिळणार्‍या पत्राची. आम्हा दोघींना इतकी हौस पत्र लिहीण्याची.. जो माझ्या मते फारच विरळा छंद असावा. किती सुख होते त्या पत्रांमधे हे शब्दात सांगणं कठिण. आज ती नाहीये पण त्या पत्रांच्या गठ्ठ्याच्या रुपाने तिच्याशी मी बोलत असते आणि ती माझ्याशी. कारण पत्रांमधे जावयाची बाजू घेऊन मला कधी रागवली आहे, मुलांसाठी कुठला उपदेश केला आहे, कधी समजूतीचे स्वर आहेत, प्रेमाने ओथंबलेली तर आहेतच आहेत. खूप आधार वाटतो ह्या सगळ्याचा मला. परदेशात एकटेपणा खूप आहे पण आमच्या आईंना व माझ्या आई ला १०-१२ दिवसांनी एकदा फोन करून आमचं बोलणं झालं की पुढच्या फोनपर्यंतचे दिवस आनंदात जायचे. आता ती पोकळी भरून कशी निघणार? हल्ली कुटुंब आकुंचन पाऊ लागली आहेत. आणि सगळेच आपापल्या विश्वात रमणारे.

कुठेतरी माहेर थोडे दूर गेल्यासारखे वाटतंय....आता मातृदिनीच काय सदैव ध्यानी मनी वसणार्‍या ह्या दोघीही आई आमच्यात नसल्यात तरी आमच्यातच आहेत हा विश्वास आहे.

आपलेच सगळे माझ्या अवतीभवती
तुजसम मजला दिसले कुणीच नाही

भासले मी वेढलेली प्रेमवलयांत परी
तुझ्या प्रेमाची त्या कणभर सर नाही

जरी भिजले चिंब चिंब पावसांत मी
तुझ्या स्पर्शाचा ओलावा त्यात नाही

सुखदुःखात सगळेच माझ्या संगती
पण नयनांच्या कडा ओलावत नाही

आसवांनी भरू घातली माझी ओंजळ
पुसण्या तव कधीच तू येणार नाही?

आईचीच लाडाची लेक

दीपिका 'संध्या'
१८ मे २००९

काही प्रतिक्रिया

१८ मे २००९

स्मिता- किती सुरेख लिहीले आहेस गं दीपिका...खरंच आईबद्दल लिहावे तितके कमीच असते नं...

१९ मे २००९

अंजला- अगदी मनाला स्पर्श करून गेले....आयुष्यातील उणींव जाणवली...

बाबा एकदा तरी पुन्हा याल ना......

जेंव्हा माझी आई गेली तेंव्हा आम्ही तर खूपच काही गमवून बसलो होतो पण बाबांसाठी मनांत यायचं..त्यांच्या मनाची काय अवस्था असेल. ५ मे २००५ ला च त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. आणि लगेच १५ मे ला ती गेली. इतका ५० वर्षांचा सहवास, संगिनीच्या जाण्याचं दुःख काय ते कधी बाबा बोलून दाखवित नसत. किती विचारलं तरी अवाक्षर ही तोंडातून काढले नाही. पण तिचे असे निघून जाणे आणि तो त्यांना बसलेला धक्का... त्या धक्क्यातून ते कधी वर आलेच नाहीत हे मात्र खरं.

डायबिटीस सारख्या रोगाने त्रस्त होतेच पण असं पण म्हणता येईल की त्यांनी डायबिटीस ला सुद्धा हरवले होते. एक अनोखे उदाहरणच म्हणता येईल. आम्हा मुलांना नेहमी काळजी वाटायची की ह्या डायबिटीस ने बाबांचं कसं होणार कारण कवडीचेही पथ्य पाणी मंजूर नव्हतं. आंबे खाऊ नका असं आम्ही म्हणत राहू आणि आम्ही त्यासाठी शिव्या खाव्या आणि त्यांनी खावा हापुस आंबा.... असंच सुरू राहिलं शेवटपर्यंत. जेंव्हा शुगर ४०० झाली व डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी काही म्हणायच्या आत ते म्हणत, ''माझी नॉर्मल शुगर इतकीच आहे हो...त्यामुळे मला काहीच त्रास नाही.''

वयोपरतत्वे व आई च्या जाण्याने व नाही म्हणता डायबिटीस ने तब्येतीत खूप फरक पडला होता. वजन कमी होत चाललं होतं. गेल्या दिवाळीला आम्ही बर्‍याच वर्षांनी पुण्यात गेल्यामुळे ते खुश होते. दिवाळी सगळ्यांनी मिळून साजरी केली. नंतर लगेच काही तरी निमित्य होऊन पडलेत. मांडीचे हाड मोडले. ऑपरेशन झाले, रॉड घातला. पण डायबिटीस ला मात देऊन जखम तीन दिवसांत बरी झाली. रक्तदाब, डायबिटीस पण, व बाकी शरीर तसं सगळं ठीक सुरू (डायबिटीस ला २० वर्षे जोपासून इथपर्यंत चा प्रवास बघता व्यवस्थितच म्हणावं लागेल) .त्यामुळे डॉक्टर पण तसे आश्चर्यचकितच होत असत. जिथे डायबिटीस ने आईचे ह्रदय, एक किडनी, डोळे, पोटाचा त्रास..सगळंच सुरू होऊन त्यातच ती हरली होती, तिथे बाबांचं हे सगळंच चांगलं होतं. नाही म्हणायला थोडा पोटाचा त्रासच काय तो सुरू झाला होता पण त्या मानाने क्षुल्लकच..

नोव्हेंबर मधे पायाचे ऑपरेशन झाल्यावर मी कुवैतला परतले. त्यावेळी नमस्कार केल्यावर मला म्हणले होते की पुन्हा आपली भेट होईल नं ग.... हे वाक्य ऐकून वाटलं की जीवनाची हार मानली होती त्यांनी व आता ह्यातुन बाबा तसे सावरायला तयार नव्हते. मनाने व शरीराने पण. झोपल्या झोपल्या सगळ्यांनाच होतात तसे बेडसोर होऊ लागलेत. अस्थिपंजर शरीर बघवत नव्हते. माझ्या भाऊ भावजयीने कष्टांची व सेवेची पराकाष्ठा केली पण १४ जानेवारीला रात्री आम्ही पूर्णपणे पोरके झालोत. ६ जानेवारीला त्यांचा ८१ वा वाढदिवस झाला होता, मी फोन केला पण त्यांना फोनवर बोलता येत नसल्यामुळे आमच्या शुभेच्छा सांगी-वांगीच त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात.

त्यात कहर म्हणजे इतक्या वर्षांत प्रथमच असं झालं की जेंव्हा बाबा गेल्याचा फोन आला तेंव्हा त्याच क्षणी इथून निघालो तर खरं पण जवळपास २४ तासांने हे नेहमीचे ३ तासांचे अंतर पार करता आले. व बाबा मला अभागीला शेवटचे दिसलेच नाहीत..पण तशी तर मी खूप भाग्यवान की बाबा माझेच बाबा होते..प्रेमळ... जीव लावणारे..दोघी नाती व दोन्ही नातवांवर अपार माया....कसे कसे त्यांना वर्णावे तेव्हढे कमीच...थोडे फार पुन्हा कधी....जानेवारी नंतर लगेच आत्ता एप्रिल मधे पुण्याला जायचा योग आला....घरांत तर खूपच बाबांची उणीव भासली.

आज पितृदिनाच्या दिवशी माझ्या बाबांना ही मानवंदना...

टाकता पाउले हळूच हात सोडत होता
जीवनाची वाटचाल कशी, शिकवित होता
पुढचा मार्ग पण तुम्हीच दाखवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

बोलके हसरे तुम्ही किती आधी होतात
वयापरत्वे अबोल असे का हो झालात
पुन्हा अम्हा मुलांना तसेच हसवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

ध्यानी मनी स्वप्नी तुम्हीच असता
पडद्याआड गेलात जसा लपंडाव खेळता
एकच वेळा स्नेहाचा हात तो फिरवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

तुमचीच लाडकी

संध्या

८ जून २००८


काही प्रतिक्रिया

१० जून २००८

जयश्री

दीपिका…… अगं किती सुरेख लिहिला आहेस लेख !! तुझ्या लेखातून तुमच्या दोघांच्या भावजीवनाचं फ़ार सुरेख वर्णन केलं आहेस गं! अतिशय हळवा आहे लेख !!

माझी दुनिया

१० जून २००८

दिपिका…..खरंच आई वडीलांचं नसणं विशेषत: मुलीचे म्हणजे माहेरचं तुटणं……मी अनुभवतेय ही परिस्थिती…… नंतरच्या आयुष्यात कितीही माणसं आली तरी ही उणीव कधीही भरून निघू शकत नाही.

श्रीकांत सामंत

१५ जून २००९

नमस्कार दीपिका, आत्ता माझ्या लक्षात आलं की कोण ही संध्या आणि कोण ही दीपिका.

आपला ” माझे बाबा” हा पोस्ट मी वाचून माझ्या पत्नीला पण वाचून दाखवला होता.आणि दोघं अक्षरशः रडलो. एक तर मुलगी लिहीतेय-म्हणजे स्त्री आणि प्रेम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-आणि किती ते प्रेम आपल्या आईवडिलांवर?.

मला वाटलं होतं की आमचीच मुलगी आमच्यावर एव्हडं प्रेम करणारी आहे.पण ते खोटं ठरलं. आणि ते तसं ठरलं हे बरंच झालं. कारण आपल्या आईवडिलांची जागा आम्ही कदापि जरी घेवू शकलो नाही तरी आम्हाला माधवी बरोबर दीपिका पण एक मुलगी मिळाली नव्हे तर आपल्या आईवडिलांवर इतकं उत्कट, प्रेम आणि त्यापुढे जावून, वडिलांना उद्देशून अंतःकरणापासून लिहीलेली ती कविता, “बाबा एकदां तरी तुम्ही याल ना” ही कविता वाचून क्षणभर, “माझे मरण पाहिले म्यां हेची डोळा”असंच वाटलं. म्हणतात ना, “वेदने नंतरच निर्मिती होते” हे खोटं नाही. निसर्गाचाच तो नियम आहे.

माझ्या लेखनाची आपण भरून भरून प्रशंसा करता पण, “आप भी कुछ कम नही” आपल्या दुःखातही दुसऱ्याला गुलाबाचं फूल पुढे करायला धजता. खरोखरंच आपल्या आईवडिलांचे हे संस्कार असावेत. मंगेश पाडगांवकर म्हणतात,

“एक गोष्ट पक्की असते
तिन्ही काळ नक्की असते
तुमचं न माझं मन जुळतं
त्या क्षणी दोघानाही गाणं कळतं”

अगदी अगदी खरं आहे. आपले हे ही दिवस निघून जातील.

सामंत

संध्या

१७ जून २००८

ती. सामंत काका..
तशी मी तुम्हाला मेल केलीच आहे…पण..इथे पण सांगते…आता तुमच्या अभिप्रायाने माझे डोळे पाणावलेत…
खूप खूप धन्यवाद..

दीपिका ‘संध्या’

महाराष्ट्र दिन २००८

मैतर...

महाराष्ट्र दिनानिमित्य झालेल्या मंडळाच्या कार्यक्रमाला होऊन आठवडा झाला पण अजूनही आम्हा सगळ्यांमधे त्याचीच चर्चा जिकडे तिकडे आहे...ह्या वर्षी कुवैत महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची जेंव्हा रूपरेखा समजली तेंव्हापासूनच सगळेच १६ मे ची वाट बघू लागले होते. इमेल ने सगळ्यांना कळविण्यात आले होते की 'मैतर' हा कार्यक्रम होणार आहे. त्याच बरोबर कुवैत महाराष्ट्र मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार होतं. यंदा २६ वर्षे पूर्ण झालीत मंडळाला. ५-६ वर्षांपुर्वी स्मरणिकेचा प्रयत्न केला गेला होता पण एक-दोन वर्षांतच ते बंद झालं. मागच्या वर्षी पुन्हा सुरू झाले ते आता दरवर्षी सुरू राहीलच ह्यात शंका नाही.

१६
मे चा कार्यक्रम होणार होणार...आणि इथल्या अमीर च्या १४ मे ला झालेल्या निधनाने सर्वत्र ३ दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. आता कसं होणार.. कार्यक्रम होतो की नाही..पण मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी अथक प्रयत्न करून ह्या कार्यक्रमांत थोडा बदल करून शनिवार १७ मे ला दुपारी १२ वाजता ठरवला. कार्यकारी मंडळाबरोबरच भारतीय दूतावासाचे श्री भाटिया ह्यांचा मोलाचा सहभाग हा कार्यक्रम सफल करण्यात होता. ह्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करायलाच हवेत.

'मैतर' कार्यक्रमांत आपापल्या क्षेत्रातले सगळे हीरे च आहेत। सुबोध भावे, शौनक अभिषेकी, शर्वरी जमेनिस, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि बेला शेंडे. ह्या सगळ्या नांवातच आहे सगळं की वेगळ्याने त्यांच्या कलेची ओळख करून द्यायचीच गरज नाही. ह्या दिग्गजांची आपापली व्यस्तता आहे, त्यांनी सगळ्यांनीच एकाच वेळी तेव्हढा वेळ काढून बरोबर येणे आणि कार्यक्रम करणे हेच कौतुकास्पद आहे.

कार्यक्रम
थोडा उशीरा सुरू झाला खरा पण इतक्या छान कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतांना हा असा उशीर कोणाला जाणवलाच नसेल. .. सुबोध भावे ह्यांनी सगळ्या मैतर सदस्यांची ओळख करून दिली व कार्यक्रमाला सुरूवात झाली. ह्या सगळ्या मैतरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय दूतावासाचे श्री भाटिया हे कार्यक्रम सुरू झाल्यावर पोहोचले त्यामुळे मधे ५ मिनिट कार्यक्रम थांबवून श्री भाटिया ह्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे खूप आभार मानण्यात आलेत.

शौनक
अभिषेकींच्या आवाजाची तर जादूच आणि बेला शेंडे चा मोहक अप्रतिम सुंदर आवाज... ह्या दोघांची सुरेल गाणी, सलील कुलकर्णी संदीप खरे.. आयुष्यावर बोलू काही ची जोडी..संदीप खरे चे कविता वाचन, शर्वरी चे नृत्य..तिच्या भराभर अति वेगाने त्या गिरक्या..थिरकणारी तिची पावले आणि सुबोध भावेचा किती सहज अभिनय..बिना ग्लिसरीन चे अभिनयात डोळ्यात पाणी येऊ शकते हे आम्ही सगळेच प्रत्यक्ष बघत होतो..सगळेच शहारले असणार... नजर खिळवून ठेवली होती सगळ्यांनीच..किती वाखाणावे तेव्हढे कमीच. सगळे एका जागी स्तब्ध बसलेले...कधी हे संपायलाच नकोय....मधे मधे होणारे विनोदी भाष्य...मस्करी आम्हा सगळ्यांना हसवत होतेच.

मध्यांतरात
गरम समोसे...थंड ताक... हवा असेल तर गरम चहा कॉफी.....सगळ्यांनी आस्वाद घेतला व कार्यक्रमाचा दूसरा भाग सुरू झाला. ह्या भागात तर अनपेक्षित असंच बघायला मिळालं. खूपच कौतुकास्पद.. सगळ्याच कलाकारांनी आपापल्या क्षेत्राच्या विपरीत सादरीकरण केलं. संदीप खरे, सलील कुलकर्णी, बेला शेंडे आणि शौनक अभिषेकी ह्यांनी अभिनयाचे छोटे छोटे प्रवेश उत्तम केलेत.. बरोबरच सुबोध भावे आणि शर्वरी ने म्हंटलेलं द्वंद्व गीताने पण रंगत वाढवली. डॉ सलील कुलकर्णींच्या इंग्लिश गाण्याने सगळेच डोलायला लागले होते. मज्जा आली.....बघता बघता साडे तीन तास संपलेत पण....महाराष्ट्र मंडळ सातत्याने चांगले कार्यक्रम देतच आलेय पण ह्या मैतर कार्यक्रमासाठी तर वेगळ्याने धन्यवाद द्यायलाच हवेत महाराष्ट्र मंडळाला...

सगळेच
कलाकार इथल्या आदरातिथ्याने भारावून गेलेत....कुवैत चा हा मराठी परिवार त्यांना आपलाच वाटला ह्यात सगळंच मिळालं नं आम्हा कुवैतकरांना...

दीपिका
जोशी 'संध्या'
२६ मे २००८