मंगळवार, १६ मार्च, २०१०

चैत्र शुद्ध१ वर्षप्रतिपदा... गुढीपाडवा..

आज पाडवा.. गुढीपाडवा... युगाब्द ५११२. शालीवाहन शके १९३२. विकृति नाम संवत्सर आरंभ. म्हणजेच मंगळवार १६ मार्च २०१०.जुने दिवस आठवले तर गुढीपाडव्याचे महत्व किती वेगळे होते. होळी झाली की दिवस मोठा होतो. गरमी सुरू होते. मग चैत्राचे आगमन... नवीन वर्ष सुरू होते गुढीपाडव्याने. साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त. नवीन कपडे, साग्रसंगीत स्वयंपाकाबरोबर गुढीच्या.. ह्या दिवसाच्या महत्वाच्या कथा सांगितल्या जात असत आम्हाला. तेंव्हाच्या शिक्षणपद्धति मधे शाळेतच हे कथा-कथन असावे. माझ्या मुलांच्या वेळेपर्यंत नोकरीमुळे प्रदेश बदललेत, त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणांत फरक पडला. (मुले लहान असतांना फरीदाबादला होतो जेंव्हा त्यांना हे सण-वार समजावून द्यायची वेळ व जबाबदारी आमची होती. घरी आजी होतीच ह्यासाठी.. मुलांबरोबर दारी उभारलेल्या गुढीचे महत्व शेजार्‍या-पाजार्‍यांनाही समजावून सांगत असू. त्यांना मजा वाटत असे व आम्हाला आमच्या संस्कृतिचा अभिमान.) शाळांची माध्यमे बदलली. इंग्रजी माध्यमे आलीत..त्यामुळे जे घरी करू तेच मुलांना कळणार. अशा ठिकाणी असलेल्या मराठी मित्रमंडळींबरोबर वर्षभर सगळेच सण साजरे करण्याचा मुख्य उद्देश हाच असायचा.

साडेतीन मुहूर्त... दिवस चांगले.. तरी आधी लग्नाचे मुहूर्त वेगळे असत. पण आजकाल पूर्ण वर्षभर लग्नाचे मुहूर्त काढता येतात... श्रावण काय भाद्रपद काय...त्यामुळे हे साडेतीन मुहूर्त तर मग उत्तमच नं....
उत्तरेला आपले हे मराठी महीने जसे अमावस्येनंतर येणार्‍या प्रतिपदेला सुरू होतात तसे त्यांचे पौर्णिमेपासून सुरू होतात. त्यामुळे १५ दिवसांचा फरक. हा फरक श्रावण महीन्यात ज्यास्त जाणवतो.

चैत्र शुद्ध१ वर्षप्रतिपदा - ह्या दिवसाचे महत्व पिढ्यान्-पिढ्या तसेच आहे पण मन-मनांतून ते किती टिकून आहे? संगणक, इंटरनेट व त्यावरून ई-मेल ने निरनिराळी माहीती मिळत असते. ह्यावेळी तर पाडव्याला गुढीची पूजा कशी करायची पासून ई-मेल मिळाल्या आहेत. लेखाच्या सुरूवातीला जे मी लिहीले आहे ते मला असेच समजले आहे. माझ्या ज्ञानांत (ज्यांना ही ईमेल मिळाली आहे त्यांना पण बहुतेक) नक्कीच भर पडली आहे. इतकी साग्रसंगीत पूजा तर कोणी करत नसेल. संगणकाच्या आणि खाजगी नोकर्‍यांच्या दुनियेत बर्‍याच लोकांना सुट्टी पण नसते. सकाळी घाईनेच पूजा आटोपली जात असेल. गेल्या वर्षी पुण्यात होते गुढीपाडव्याला तर ३-४ आकारात लहान-मोठ्या गुढ्या ज्याला गोल पाया व अतिशय सुंदर रेखीव सगळ्या वस्तुंनी सजलेली गुढी बाजारात उपलब्ध होती. घरी आणा, देवाजवळ किंवा योग्य जागी ठेवा(उभारा), पूजा करा. उत्तरपूजा करून उचलून ठेवा व बहुतेक दुसर्‍या वर्षी पुन्हा तीच.... आहे नं सुटसुटीत पद्धत...
इतके खरे की सगळ्यांच्याच नजरेत ह्या सणांचे महत्व पटवून देण्याची वेळ आली आहे. प्रबोधन फेरी मधून गुढीपाडव्याचे महत्व पटवावे लागतेय. दिखाव्याच्या ह्या प्रत्येक क्षणाला, टीवी वर दिसणार म्हणून अगदी नथ, फेटे घालून सगळ्याच वयाचे मराठमोळी वेषभूषा करतात.

असे म्हणतात की गुढीवर ठेवले जाणारे.. तांब्याचा तांब्या किंवा ग्लास असो पण तो उलटा किंवा पालथा ठेवला जातो. त्यामागचे कारण संकल्प करा तो फक्त देण्याचा.. आणि वस्त्र जे आपण लावतो ते विणलेले असते व धाग्या-धाग्याने ते वाढत जाते तसाच तुमचा संकल्प पण वाढत जावा. साखर व कडुलिंबा चा समन्वय ठेवायला हवा व म्हणाल तर कडू आठवणींना विसरून जा आणि गोड आठवणी घेऊन पुढे जा.. संकल्प गोड असावा म्हणून श्रीखंड तर खायचेच पण सात्विक असावा म्हणून कडुलिंब, सुंठ, आलं पण खायचा संकल्प घ्यायला हवा म्हणून त्याचे महत्व.

एक छान संदेश वाचायला मिळाला. कडुलिंबाची फांदी आणा, गुढीला लावा, चटणी करून खा पण त्याचबरोबर एक कडुलिंबाचे वृक्षारोपण करा. खूपच आवडले.

ह्या सणांच्या निमित्याने बाजारपेठा सजतात. गुढी साठी गाठी, जर घरी शक्य नसेल तर आंब्याची व कडुलिंबाच्या डहाळ्या अशा वस्तुंच्या बरोबरच आता आकर्षणे मोठ्या मोठ्या वस्तुंची असतात. नवीन वर्षाची सुरूवात खरेदीने केली जाते. ह्याचबरोबर कुठल्या गोष्टींचा नियम पण आजच्या दिवसापासून करावा हे किती जणांच्या मनांत येतं? संकल्प केले तरी किती टिकतात? आणि वर म्हणायचे की संकल्प असतात ते मोडण्यासाठीच... (नियमित लेखनाचा संकल्प मी पण आज करतेय... मोडणार नाही ह्याचा वेगळा संकल्प करतेय.. हसा हसा.. ) असो..

ह्या दिवशी आजकाल पुण्यासारख्या संस्कृति-शहरामधे नव-वर्षाची पहाट संगीताने जागवली जाते. नागपुरला १११ फुट उंचीची गुढी उभारून वेगळेच आकर्षण निर्माण केले जाते. ईमेल्स ने निरनिराळी शुभेच्छापत्रे पाठवली जातात. मोबाईल वर छान छान शुभकामना दिल्या जातात. विज्ञानाच्या नव-नवीन शोधांबरोबर प्रत्येक सणाचे स्वरूप पण बदलत चालले आहे. सत्यनारायणाची पूजा, गणपतिची पूजा म्हणे इंटरनेटवरून करतात, पूजा मांडलेले चित्र दिसेल संगणकावर तर त्यालाच हळदीकुंकू वाहण्याचे दिवस पण दूर नाहीत. बदलत्या काळात आपल्या वडीलधार्‍यांना... त्यांच्या मतांना कुठे जागा उरली आहे? न बोललेच बरे...


दीपिका 'संध्या'