सोमवार, ८ जून, २००९

आजीचा खाऊ

फरीदाबाद ला होतो तेंव्हा दिल्ली ला जाणे येणे आगगाडीने किंवा बसने करत असू. मुलं लहान असतांना बस पेक्षा आगगाडीने प्रवास थोडा सुखाचा वाटत असे. एकदा असंच दिल्ली ला निघालो होतो. बसायला जागा मिळालीच होती. आमच्या समोरच्याच बाकावर एक जख्ख म्हातारी बाई बसली होती. सुरकुत्यांनी भरलेले शरीर, तोंड बिना दातांचे गोल गोल, सुपारी सारखा छोटासा आंबाडा, हातात एक पिशवी होती जी चिप्स, नमकीन, काही मिठाई, बिस्किटांनी भरलेली होती. माझ्या मनांत आले बहुतेक आपल्या नातवंडांसाठी घेऊन जातेय ही आजी इतका मोठा खाऊ...हसायलाच आले मला..

जसे एक दोन स्टेशन्स गेलेत...ती आजी उठून उभी राहीली. हात पाय थरथरतच होते. कधी लोकांच्या खांद्यावर तर कधी बाकाला धरून पुढे पुढे जात होती. जेंव्हा तिने ''चिप्स घ्या, मिठाई घ्या...आपल्या मुलांना खुश करा...'' असे म्हंटले तर माझा विश्वासच बसेना.

पण झाले असे की ती आजी दुसर्‍या दिशेला निघाली होती. ऐकायला पण बहुधा तिला कमी येत असावे त्यामुळे गाडीतल्या बाकीच्या आवाजात माझी हाक तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही. उठुन जाईन म्हंटले तर मुलं मांडीवर होती व गर्दी पण खुप. व क्षणभर विचार पण मनांत आला की कुठे सामान वाढवा, मुलं बरोबर आहेत, दिल्ली ला उतरल्यावर बस रिक्षा ने पुढचा प्रवास करायचा आहे...म्हणुन पण दुर्लक्ष झाले असेल माझे. त्याचमुळे मी ह्याची काहीच वाच्यता न करता चुपचाप आपल्या दिल्ली स्टेशनची वाट बघत बसले. पण इथुन माझी नजर त्या आजीवरून मात्र ढळत नव्हती. चुकल्यासारखे वाटत होते. पुढच्या भागात बसलेल्या एका महिलेने आजीकडुन खुप सामान विकत घेतलेले मी बघत होते. मनांतुन आनंदले होते मी की त्या म्हातार्‍या आजीला थोडा तर हातभार नक्कीच लागला असेल. व तिच्या पिशवी मधला भार-वजन कमी झाले असेल.... पण माझी खंत इतकी वाढली ते बघुन की मी ती थोडी माझ्या दृष्टिपथात होती किंवा मी उठुन का गेले नाही की जेणे करून मी तिला थोडी खुशी देऊ शकले असते व त्याच खुशीत मी स्वतःला पण खुश ठेऊ शकले असते.

आता उपयोग नाही.. बराच काळ लोटला आहे पण त्या आजी ला मला भेटण्याची मनांपासुन इच्छा आहे. नंतर मुलांना गोष्टी सांगतांना त्या आजीबद्दल मी खुप काही सांगितले आहे. तर त्याच आज्जीकडुन खाऊ आणुन मुलांना खाऊ घालावा असं वाटत राहीले. माझी झालेली चुक कशी होती ते सांगत असते जेणे करून मुलांनी पुढे असा कधी प्रसंग आलाच तर नेहमी मदतीचा हात पुढे करावा. अशा स्वाभिमानी लोकांना मदतीचा हात भीक म्हणुन नव्हे तर त्यांच्या श्रमाचा मोबदला म्हणुन हवा असतो. मी त्यानंतर कधीही अशी चुक केली नाही. ठेच लागली की माणुस बघुनच पावले टाकतो. पण ही चुक पुन्हा होणे नाही आणि करणे पण नाही हं मंडळी.

आजी ती कुठे रे हरवली
खाऊ सगळ्यांनाच देणारी
पेपरमिंट चिप्स बिस्किट
बालगोपालांनाच वाटणारी

नव्हते दांत तिच्या मुखी
आशीर्वादाचे बोल बोलणारी
होई भार हा गरिबीचा अति
पण स्वाभिमानाने पेलणारी

ऐकुच येत नाही हो तिजला
साद कुठली तिला पोचणारी
नयन शोधती त्या आजीला
खंत आहे कधी न संपणारी



दीपिका 'संध्या'