बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

कविता माझी फक्त तुझ्याचसाठी

करतात स्वप्ने लोचनात दाटी 
कविता माझी फक्त तुझ्याचसाठी

कलली सांज,वाट तशी अनोळखी

ओढीने तुझ्या ती खुणवी सारखी

स्मरते भेट अपुली ती पहिली 

स्पर्शाने तव मोहीनीच हसली

आठवांचा बांध भलताच आगळा 

वाटले शब्दामधे व्हावा मोकळा 

पुनवेस रात्र कशी ही बावरी 

गंधीत सायली फुलली अंतरी

हात गुंफता रुजल्या प्रेमगाठी 

कविता माझी फक्त तुझ्याचसाठी 

दीपिका जोशी 


बुधवार, २६ जानेवारी, २०११

अविस्मरणीय दिवस...

२०१० सरले, नव्या कार्यकारी मंडळाच्या सान्निध्यात आता काय पर्वणी आहे ह्याची उत्सुकता होतीच. महाराष्ट्र मंडळाची साईट अधिकच सजली. पहिल्या आठवड्यात इमेल द्वारे कळले की २१ जानेवारी ला गजलसम्राट भीमराव पांचाळे येणार. सध्या त्यांच्या स्तुति करण्यात अख्खा महाराष्ट्र तल्लीन आहे. गेल्या वर्षी थेट अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळात पण त्यांनी आपल्या गजल गायनाने ज्यांची मने जिंकली आहेत त्यांना प्रत्यक्ष गजल गाताना बघायचा व ऐकायचा योग महाराष्ट्र मंडळाने आणला आहे ह्या कल्पनेतच आधी खुप सुखावलो होतो. मंडळाच्या साईटवर लगेच त्यांचा फोटो, त्यांच्याबद्दलचे निरनिराळ्या वर्तमानपत्रातील कौतुक झळकु लागले. कधी एकदा येणार २१ जानेवारी.... 

दुपारी ४ वाजता बरोबर कार्यक्रम सुरू होणार हे ठरले होते. (Early birds)  लवकर येणारं पाखरू ही स्पर्धा असल्यामुळे बर्‍यापैकी सगळे वेळेवर येणार आणि ठरल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचा आराखडा न गडबडण्यास ह्याची नक्कीच मदत होणार होती. आल्या आल्या आधी तासभर संक्रांतीचे हळदीकुंकू होते. पारंपारिक वेशभूषेच्या स्पर्धेमुळे अजुनच सगळीकडे नटणे-थटणे दिसत होते. ही स्पर्धी पुरुषांसाठी पण असल्यामुळे त्यांना पण प्रोत्साहन मिळाले आहे हे सगळ्यांकडे बघुन कळत होते. छान स्वागत, हळदीकुंकू, सौ. प्रज्ञा ने केलेली चविष्ट तीळगुळाची वडी, आकर्षक आणि उपयोगी वाण.. ह्या वेळी अजून एक वेगळी कल्पना होती ती जे एकटे पुरुष इथे आहेत त्यांना पण छोटीशी भेटवस्तु (वाण) दिली. मज्जाच होती. 
गरम गरम चहाचा आस्वाद घेऊन सगळे सभागृहाकडे वळत होते. 

मी आणि अश्विनी... पारंपारिक वेशभूषेचे परिक्षक म्हणुन..

मंच कार्यक्रमासाठी तयार होता. संक्रांतिचे प्रतीक असलेले...काळी साडी, हलव्याचे दागिने, तर्‍हे-तर्‍हेचे पतंग.. सगळ्या हॉलभर उडत होते. सजावट एकूणच लोभस आणि प्रसन्न मराठमोळी होती.


मंच आणि मंचावर जयश्री च्या सूत्रसंचालनासोबत भीमराव पांचाळे आणि त्यांचे सहकारी गजलगायनास तयार...

पारंपारिक वेशभूषेची एक झलक...

कार्यक्रमाला सुरुवात झाली ती जयश्री अंबासकर च्या मधूर लयबद्ध संचालनाने. सर्वप्रथम गणेशवंदना झाली.... अगदी ताला-सुरा-नृत्यावर. नव्या कार्यकारी समितीची ओळख, अध्यक्षांचे छोटे से भाषण झाले. त्यानंतर श्री. भीमराव पांचाळे, तबलावादक डॉ. श्री.देवेंद्र यादव व पेटीवर साथ देणारे श्री  जगदीश मिस्त्री, ह्यांची ओळख करून दिली गेली. श्री. पांचाळे ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तिघेही स्थानापन्न होऊन गजलगायकीला प्रारंभ झाला. गजल गायन हा इथे अगदी नवीनच प्रयोग होता.

गजल हा काव्याचा प्रकार वाचण्यात सगळ्यांच्याच आला असणार पण तरी ही भीमरावांनी गजल थोडी अजून आमच्या जवळची करून दिली आणि सगळ्यांनाच त्यात आवड निर्माण केली. वेगवेगळ्या गजलकारांच्या गजला... भीमरावांचा आवाज... तबला व पेटी ची अप्रतिम साथ...मधे मधे जयश्री चे सुरेल गोड सूत्रसंचालन... अगदी मंत्रमुग्ध झालो. ‘’अंदाज आरशाचा...’’ पासून जी मैफिल मस्तं रंगली... ‘’तू चोर पावलांनी...’’, ‘’ख्वाब के जैसे झूठे मेरे यकीं निकले’’.. वा वा... रंगत रगंतच गेली. मराठी व उर्दू(हिंदी) ची सम्मिश्र गजलेने तर कहरच केला. रसिकांचा दिल खुश हो गया. दाद किती मिळावी.....हे सगळे कधी संपूच नये असे वाटत असून ३ तास संपलेतच. अविस्मरणीय अनुभव आहे हा.

बर्‍याच लोकांची इच्छा असणार व ते अनायसे एक दिवस अजून इथे राहणार होते तर रविवारी पुन्हा सुरेल मैफिलीचे आयोजन श्री. दिवेकर ह्यांच्या घरी केले. सगळेच गजलचे चाहते अति उत्साहात हजर होते. बहुतेक श्री भीमराव पांचाळे पण आज जरा ज्यास्तंच अफाट व कडक गजलांचा वर्षाव करण्याच्या तयारीने आले असावेत. 

तिथली रंगत कशी होती हे शब्दात सांगणे कठिण आहे. अगदी समोरासमोर बसून उर्दू गजलांचा आस्वाद घेणे... नशिबानेच घ्यावे लागते म्हणायला हरकत नाही. त्यांनी गजलगायकी मधे केलेले निरनिराळे यशस्वी प्रयोग अफलातून आहेत. गजल गाताना अर्थ कसे कसे बदलू शकतात हे सांगताना हशा पिकवला.  
मराठी गजलांमधे सुरेश भटांची... ‘’हा असा चंद्र....’’, संगीता जोशींची... ‘’आयुष्य तेच आहे....’’ अशी यादी तर बरीच मोठी आहे. उर्दू गजलांमधे... ‘’ठंडी हवा के झोंके...’’ वा वा... 

सहा सात आणि आठ मात्रांची खेळी कशी हे ‘’तू दिल्या जखमात मी हरवून गेलो...’’ ह्या गजलेत प्रयोग करून केली... तारीफ करत व टाळ्या वाsssssssजवतच राहीलो आम्ही.

रविवारी अशी रंगली पुन्हा एकदा मैफिल...

'आयुष्य तेच आहे.... ' वा वा.. काय सुंदर गजल..

कमाल आहे गजलकारांची आणि नंतर भीमराव पांचाळे सारख्या गजलगायकांची...
त्या सुखद क्षणांतुन.. त्या स्वप्नवत वाटणार्‍या गजल गायकीच्या सुरातुन बाहेर यावेसेच वाटत नाहीये. अजून तरी त्यातच मशगुल असल्यासारखे वाटतेय. पुन्हा कधी योग येईल ह्या सगळ्याचा ... पुन्हा पुन्हा यावा असे मनांत आहेच पण सध्या तरी आत्ता त्या मैफिलीतुन उठायची इच्छा नाहीये. त्यांनी गात रहावे व मैफिलीत गजलांचा सतत वर्षाव होत रहावा..... 

इतक्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे प्रचंड धन्यवाद व आभार.

सगळ्या सभासदांच्या सहकार्याने पुढचे आपल्या ह्या महाराष्ट्र मंडळ रूपी कुटुंबाचे सम्मेलन उत्कृष्ट होईलच ह्यात शंका नाही.  

धन्यवाद.
अनेक शुभेच्छा !!   


शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

तू आणि मी...तू आणि मी..

आली पुन्हा २१ जानेवारी....लग्नाला इतकी वर्षे झालीत ह्यावर विश्वासच बसत नाही. बरीच नाती नवीन निर्माण झालीत ह्या इतक्या वर्षात पण आमच्या नात्याची गुंफण अधिकाधिक गुंफत व वीण घट्ट होत गेलीय....  गतवर्षींचा कालपट आज नजरेसमोरून जातोय... जुन्या आठवणींत रमले... ह्या काव्यरूपी थोड्या आठवणी....

मेहेंदी कशी खुळी रंगावी 
रातराणी सम रात्र गंधावी  

होता साक्षीस रातीचा चांदवा 
प्रीतफुलांचा फुलला नव ताटवा  

होती ती पहाटच गुलाबी ओली  
गर्द धुक्यात कुठे अवचितच विरली 

झाकून पापण्या नयनांत वसलो  
आसुसलेल्या मुक्त स्पर्शात जगलो

थेंब टपोरे बोलले केसावरी
सूर अमृती सजले ओठावरी

कधी राग थोडा लटके रूसवे
होती पुन्हा नवनवीन आर्जवे

आजही तेंव्हासारखेच.....

लपू दर्पणी विसावू जरासे पुन्हा
नवी साद घालू एकमेका पुन्हा

साकारावे आज नवस्वप्न पुन्हा 
जगावे त्याच वेडात आज पुन्हा

लग्न वर्षगाठीच्या शुभकामना !!

दीपिका

शनिवार, ८ जानेवारी, २०११

भारतभेट.. पारिवारिक सम्मेलन

आत्ताच्या २०१० च्या डिसेंबर मधे भारतात जायचे होते. २५ डिसेंबर ला बहिणीच्या लग्नाचे निमित्य होते. लग्न व ते पण नागपुर ला.... मग काय विचारता... आनंदाला उधाण...नागपुर अगदी रोमा-रोमात आहे.. अपार प्रेम आहे ह्या नागपुरवर माझे.
नोव्हेंबर मधे माझ्या चुलत दीरांचा फोन आला की आमच्या काकांचे सहस्रचंद्र दर्शन सोहळा त्यांनी आयोजित केला आहे. आम्हा जोशींकडे असा कुठलाही कार्यक्रम असला की सगळ्यांची भेट हे एक खूप मोठे आकर्षण असते. बाकी वेळी जमले नाही तरी अशा कार्यक्रमांना आवर्जून ज्यांना शक्य आहे ते येतातच येतात. अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अनुपस्थिति असते.

१८-१९ डिसेंबर, हे दोन दिवस मस्तं मज्जा येणार हे माहीतच होते. १८ ला दुपारी सगळे जमायला सुरूवात झाली. इतक्या पाव्हण्यांची सोय कशी होणार म्हणुन हल्ली सरळ हॉटेलच्याच खोल्या घेतात. १८ ला संध्याकाळी चाट खास काकांच्या आग्रहावरून ठेवली होती. नातवंडांनाच काय.. आमच्या पीढीला पण अजून काय हवे. नंतर ७.३० ला कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. त्या कविंनी काका काकूंवर अप्रतिम कविता केल्या होत्या. नंतर नातवंडांचा नाच गाण्याचा कार्यक्रम झाला. वेळेचे बंधन ठेवून बरोबर ९ वाजता केळीच्या पानांवर पुरणाच्या पोळीच झक्कास जेवण. रात्री सगळे बसले गप्पा मारत. काकूंनी येऊन सांगितले की ४ वाजलेत पहाटेचे.. आता तासभर तरी झोपा. मगच सगळे आपापल्या खोल्यांमधे जाऊन थोडा वेळ लवंडले.
१९ तारखेला सकाळी ८ वाजता पुजा सुरू होणार होती. होम हवन सगळे एका संस्थेच्या बायकांनी केले... एकदम साग्रसंगीत. पुजा संपल्यावर ती. काकांना ८० दिव्यांच्या ताटाने ओवाळले. खुप छान वाटत होते. त्यांच्या तीनही मुलांचा-सुनांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. काका काकू नक्कीच धन्य झाले असणार. असा छान योग सगळ्याच मुलांच्या वाट्याला येत नाही. सौ. काकूंच्या मैत्रिणी, बाकी परिचित असे बरेच लोक जमले होते. घोळक्या-घोळक्यात हॉल मधे बैठकी जमल्या होत्या. लहान मुलं स्टेजवर काही तरी उद्योग करण्यात गर्क होते. बाकी उत्कृष्ट जेवण, सूप, सलाद बरोबर गाजर हलवा अतिशय स्वादिष्ट होताच.
सगळे परतीच्या दिशेने वळू लागलेत. पुन्हा एकदा जोशी परिवाराचे सम्मेलन ह्या निमित्याने घडवून आणले. ती. काकांना दीर्घायुषाच्या खुप खुप शुभेच्छा आणि काका-काकूंच्या लग्नाच्या ५० वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

२५ तारखेला नागपुरला लग्नाला जायचे आता वेध लागले होते. २३ डिसेंबर ला लग्नघरी पोहोचले. आता माहेरचे सम्मेलन सुरू झाले. भरीत भर रुचिर-शिशिर ची आयआयटी चा अभ्यास घेणार्‍या निशा मॅडम चा फोन आला. तिला कळले होते की मी नागपुरला आले आहे. ह्या १२-१३ वर्षात तिची इतकी उत्तरोत्तर प्रगति झाली आहे की सांगायलाच नको. तिच्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांपैकी हे दोघे आहेत त्यामुळे कायम स्मरणात आहे ही जोडी. फोनवरच का होईना पण खुप गप्पा मारल्या. छान वाटले. लग्नं पण मस्तं झाले. २६ डिसेंबर ला पुण्याला परतले. व २८ डिसेंबरला कुवैत चा परतीचा प्रवास.
ह्यावेळेची भारत यात्रा नेहमीपेक्षा जरा वेगळी व ज्यास्तंच स्मरणांत राहील. नेहमी अशाच काही न काही निमित्यानेच भारतात जाणे होते पण ह्या वेळी विशेष काही खास वाटले...मधल्या वेळात बाकीची महत्वाची कामे पण झालीत त्यामुळे विशेष आनंद. सगळेच आपले भेटले की त्या आनंदात इथे सगळ्यांपासुन दूर राहणे कदाचित थोडे सुसह्य असते म्हणुन मी अशा कार्यक्रमांना जातेच जाते. कुवैत ला वास्तव्य जितके दिवसांचे आहे तितके दिवस भारतात ह्या सगळ्याच कारणाने जाण्याची ओढ राहणारच.

दीपिका

वेदना उराची ह्या असह्य जाहली

जरी असेल हा खेळ पाठशिवणीचा
अवनीवर लपंडाव उन पावसाचा
रुसवा मेघांचा श्रावणसर उदासली
वेदना उराची ह्या असह्य जाहली

धुंद शब्द कळ्यांना परि रंग चढेना

वसंती ह्या अक्षररुपी फुले फुलेना
स्वच्छंद लेखणी कशापरी रूसली
वेदना उराची ह्या असह्य जाहली

होते स्वप्न जीवन सागर तारणे

आनंदाचे शंख शिंपले वेचणे
नाव मनीची किनार्‍यास न लागली
वेदना उराची ह्या असह्य जाहली

मार्ग चालले सौख्याच्या शोधांचा

चहूओर कल्लोळ छदमी हास्याचा
का कुणा माझी खुशी न भावली
वेदना उराची ह्या असह्य जाहली

चुका दूर दूर कुठे मजला दिसेना

कसे काय झेलावे या लांछनांना
न ठेवली प्रेमास परिसीमा कुठली
वेदना उराची ह्या असह्य जाहली

दीपिका