शनिवार, २७ जून, २००९

रूपात तुझिया

अवतरला चंद्र नभीचा रूपात तुझिया
खुणवतो चंद्र अंगणीचा रूपात तुझिया

हसणे अवखळ,गात्री चैतन्याची सळसळ
असे मादक दरवळ मिलनात तुझिया

घेशील गीत माझे कुशीत जेंव्हा रात्री
स्वप्ने चांदराती रंगली रंगात तुझिया

नांव तुझे ह्या ओठावरी जणु विसावले
रोमांचित मी सामावले ह्रदयात तुझिया

आहेस अपार अथांग तू सागरासम
विरले सरिते परी अंतरात तुझिया

ऋणानुबंधच हे, होता जरी नवखा तू
जीवन मम फुलले जीवनांत तुझिया

दीपिका 'संध्या'

शब्द आणि संवाद

शब्द आणि संवाद सध्याच्या धकाधकीच्या आणि भागा-दौडीच्या आयुष्यात दुर्मिळ होत चालले आहेत. धावत-पळत काही लोक संवाद साधतात.. तर कोणी घरी वेळ मिळत नाही म्हणुन फोनवर बोलतात. वेगळ्या वेगळ्या वेळी कामावर जाणार्‍या एकाच घरांतील नवरा बायकोला चिठ्ठी लिहून संवाद साधावे लागतात. ह्या सगळ्या प्रकरणात संवादात ज्यास्त शब्दांना जागाच नसते. अगदी मोजके आणि त्रोटक असतात.

जुनी नाती जपायला जुने संवाद अनमोल ठरतात. शाळेतल्या किंवा कॉलेज च्या मित्र-मैत्रिणींबरोबरची आपली शब्दखेळी वयाच्या पन्नाशी ला पोहोचल्यावर सुद्धा मनाला आनंद देऊन जाते. ते मंतरलेले प्रेमाने भरलेले दिवस जरी उडले असतील तरी मनांच्या कोंदणात कोरलेले असतात. त्याच वेळी जुने शब्द-संवाद कटु आठवणीची सल देत असतात. अशा आठवणींना मनांत पक्के रोवू न देणेच योग्य असते. ज्यांच्याशी संबंधित ह्या कटु आठवणी असतात त्यांची नंतर आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत कधी भेट पण होत नाही मग त्या संवादांची आठवण कशाला हवी... पण असं होत नाही...

शब्दांची किंवा संवादाची भाषा पण तर वेगवेगळी असते. कवि आपल्या कवितेत-शब्दात, तबला वाजवणारा त्याच्या ठेक्यात, गायक आपल्या सुरांत शब्द संवाद साधत असतो. ह्या सगळ्याची जाण असणार्‍याला त्याच्या संवादाचा अर्थ पण नक्कीच समजतो. प्रत्येक ठिकाणी अर्थांचा गाभारा खूप मोठा भासतो. तो उलगडून-समजून आपल्याला ते शब्द-संवाद जाणवावे लागतात.

त्या-त्या वेळी उच्चारलेले ते ते शब्द-संवाद कधी कोणाला दुखवू शकतात तर कधी खूपच सुख देऊन जातात. परिमाण व परिणाम वेगळे-वेगळे... बोलण्याच्या व रागाच्या भरांत मने दुखवली जातात व पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही...नंतर असं पण जाणवतं की कधी कधी मौनाचीच भाषा.. मौन शब्द-संवादाचाच मोलाचा वाटा असू शकतो.

लहान बाळाचे बोबडे बोल बिनाअर्थाचे खूप काही सांगून जातातच. तसंच निसर्गाशी वारा-पानांची सळसळ, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल पण आपल्याशी जणू संवादच साधत असतात. जवळीक निर्माण करत असतात.

मनांतल्या मनांत साधणारे आपलेच संवाद मात्र कधी कधी वाचायचे बोलायचे राहूनच जातात.

एका आजींची गोष्ट आठवते. मुलगा राजू आधी शिक्षण आणि नंतर नोकरीच्या निमित्याने अमेरिकेत स्थायिक होतो. सुरूवातीला नियमित होणारे फोन अनियमित होतात. दरवर्षी होणारी भारतभेट पुढे जाऊन दोन-तीन वर्षाने होऊ लागली. राजू अमेरिकेला गेल्यानंतर ३ वर्षांनी त्याच्या वडिलांचा स्वर्गवास झाला. आईला पैसे पाठवणे ज्याची की खास अशी गरज नव्हतीच पण राजू स्वतःचे तेव्हढेच कर्तव्य समजून पार पाडत होता.

४ वर्षांनी जेंव्हा १० दिवसांचा वेळ काढून तो एकटाच आला कारण मध्यंतरीच्या काळात त्याने तिकडच्याच अमेरिकन मुलीशी विवाह केला होता. आई ला चालणार आहे की नाही ह्याची विचारणा पण न करता लग्नं केले.

भारतात आईला भेटायला आल्यावर त्याच्या लक्षात आले की आई स्वतःशीच संवाद करते. त्याला कळेना हे काय चाललंय... स्वावलंबन तर आई चं होतंच पण हुनर होतं की मी एकटी राहू शकते. संगी साथी असे की जे मुलाने सोडली तशी साथ कधीच सोडणारे नाहीत हा विश्वास.

'रात्री आला नाहीस म्हणुन बरी रे झोप झाली माझी' असं डासाला उद्देशून म्हणायची. नारायणा ला म्हणायची, 'चल बाबा कामाला लागू.'
दार उघडल्याबरोबर वार्‍याची झुळुक काय आली तर म्हणे आई, 'अगदी वाटच बघत असतोस रे दार उघडण्याची...' केर काढता काढता केरसुणी ला म्हणत, 'तुझं आणि माझं नशीब सारखंच गं...काम झालं की कोपर्‍यात निमुट बसून रहायचं..खरंय नं....' आणि हसली आई....
झोपाळा कुरकुरला की म्हणायची, 'कुरकुर करून कसं चालेल...जितकं आयुष्य देवानं बहाल केलं आहे ते आनंदाने जग रे बाबा...'

दिवस रात्र असे आई चे स्वतःशी संवाद ऐकुन राजू घाबरला. त्याला वाटले आई ला वेड लागले आहे व मानसिक विकार तर नाही तिला ह्या विचाराने त्याने तिला मानसोपचारतज्ञ कडे नेण्याची गरज आहे.

शेजारच्या काकूंना जेंव्हा हे समजले तेंव्हा त्यांनी सांगितले राजू ला की सगळ्याला जबाबदार त्यांचे एकटेपण आहे. त्यांना डॉक्टर ची नाही सहवासाची आणि संवादाची गरज आहे. पुढे त्या काकू म्हणल्या की त्यांच्या एकटेपणात त्यांनी ह्या सगळ्या साथादारांना आपल्या जीवनांत समाविष्ट करून घेतले आहे ज्यांच्या सहवासात त्यांना एकटेपणा जाणवत नाही त्यांच्याशी त्या गप्पा मारून आपलं मन रमवतात.

जगाने कदाचित त्यांना वेडं ठरवलं पण असेल...पण त्यांना गरज संवादाचीच आहे...

बघितलंत नं मंडळी...किती शब्द-संवादाचं महत्व आहे आपल्या जीवनांत...

शब्द शब्द गुंफुनी प्रेम धागा विणू या
नको भाषा मौना ची सुसंवाद साधू या

दीपिका 'संध्या'