शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९

आनंदाची बरसात....

सप्टेंबर महिन्यात काही कामाने पुण्याला जायचा योग आला. त्याच दरम्यान अमेरिकेला वेगळेच वारे वाहत होते. तिथली आमची चारही मुलं वेगळ्याचं विचाराने व्यापले होते. सध्याच्या परिस्थितिचा फायदा घेऊन मोठ्या मोठ्या बंगल्यांचे मालक होण्याचे मनांत घोळू लागले होते. बने-बनाए घर घेण्याची पद्धत, त्यामुळे नेट वर शोधाशोध सुरू होती. साधारण महिन्याच्या प्रयत्नांना यश आले आणि रुचिर-प्राची आणि शिशिर-लीनू जोडीने आपापली घरं कोणती असणार ह्यावर शिक्कामोर्तब केले.
नोव्हेंबर मधे राहते घर सोडायचे असल्यामुळे वेळेचा अभाव होताच. उत्साहात वास्तुपुजा लवकर करू दिवाळीच्या सुमारास असे त्यांचे मत होते. सगळ्यांचेच आई बाबा असावेत ह्या खुशी मधे सहभागी होण्यास असे वाटणे साहजिकच आहे. कोणाचाच विचार ठरला नव्हता.

जेंव्हा जमेल तेंव्हा मुलांची घरे बघायला जाऊच ह्या विचाराने मुलींना विचारून नेहमीप्रमाणे पुण्याहून आणायच्या सामानाची यादी हनुमानाचे शेपुट बनत चालली होती. काही आठवल्यास पुण्याला फोन करून बिनधास्त कळवा असे सांगून आम्ही पुणे गाठले. ३-४ दिवसांच्याच वास्तव्यात बर्‍याच कामांचा उरका पाडायचा होता. पुण्याला जायच्या आधीच अमेरिकेचे पक्के ठरवावे असे माझे मत होते आम्ही २० सप्टेंबर ला जाऊन २६ सप्टेंबर ला परत येणार होतो. व अमेरिकेला जायचेच असेल तर अगदी १ ऑक्टोबरला निघणे होते. पण ह्यांच्या सुट्टी प्रकरणात तसे होऊ शकले नाही. डामाडोल परिस्थितिमधे अमेरिका वारी होऊ शकेल की नाही....सगळेच प्रश्नचिह्न होते. चौघा मुलांना मनांची तशी तयारी ठेवायला सांगितली होती की येणे जमले तर मज्जा.. नाही तर चौघे मिळून वास्तु पुजा करून घ्यावी लागणार...व लगेच जसे जमेल तशी चक्कर तर मारणारच होतो तिकडे त्यामुळे पुणे खरेदीला उधाण आले होते.

भरपुर खरेदी करून मोठ्या मोठ्या बॅगा भरून आम्ही पुण्याहून २६ सप्टेंबर ला ठरल्याप्रमाणे परतलो. अजूनही काही ठरवता येत नव्हते. २९ तारखेला शेवटी तिकीट घेतलं व आमचा प्रवास कॅन्सस च्या दिशेने १ ऑक्टोबर ला रात्री KLM ने सुरू झाला. २ ऑक्टोबर ला संध्याकाळी कॅन्सस ला पोहोचलो. चौघेही गाड्या घेऊन आमच्या स्वागताला तयारच होते. कॅन्सस विमानतळ जरा छोटे असल्यामुळे थेट आत येता येतं तर आंतच मिठ्या मारून झाल्यात एकदम. ५ महिन्यांनंतर आमची व आमच्या चारही मुला-मुलींची भेट होती ही. माझ्या फिरक्यांना सुरूवात झाली......(कदाचित जोड्या ह्याची वाटच बघत असतील...कुठेतरी गुदगुल्या होतातच नं फिरक्यांनी...आवडतं... पण सांगणार कसं नं....)

खरं तर अमेरिकेच्या मानाने मी म्हणेन की खूपच लवकर योग आला होता. आत्ता आमच्या जाण्यामागचे खरे कारण तर त्यांनी घेतलेली घरे बघायला जाणे हाच एकमेव होता. अन्यथा विचार झाला असता की नाही...सांगता येत नाही. वेळ अशी मस्तं साधली गेली होती की वास्तु पूजा आणि दिवाळी मुलांबरोबर घालवता येणार होती.

इथून निघायच्या आधीच सर्वानुमते असे ठरवले होते की जितके दिवस आम्ही तिथे आहोत (बरोबर २० दिवस) तेव्हढ्यात अर्धे दिवस शिशिर-लीनू कडे आणि अर्धे दिवस रुचिर-प्राची कडे सगळ्यांनी मिळून रहायचे. कारण लग्नानंतरचा मुलींचा सहवास आम्हाला खास हवा-हवासाच होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणेच सगळे घडले.














५ ऑक्टोबर, सोमवारी शिशिर-लीनू च्या घराची वास्तुपूजा झाली. सामान सगळे आधीच नेऊन ठेवले होते. ...नटून-थटून.. ह्या जोडीने फुलांचे तोरण, दारांत सुंदर रांगोळी अशा सजलेल्या घरात प्रवेश केला. होम-हवन करून पूजा यथासांग तिथल्या गुरुजींनी साधारण २ तासांत साध्य केली. सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करून आमची जेवणे झालीत. सुट्टीचा दिवस नसल्यामुळे व अपरिहार्यतेमुळे रुचिर ला ऑफिसमधे जाणे होते. म्हणून जेवणे जरा विभागून केली गेली हीच खंत.... संध्याकाळी तेथील मंदिरात जाऊन सगळ्याच देवांचे दर्शन घेतले.

मंगळवारपासून रुचिर शिशिर सकाळी डब्बा घेऊन ऑफिसला रवाना होत असत की आम्ही दोघे आणि आमच्या मुलींचेच राज्य... खूप गप्पा-टप्पा.. त्यांचे लहानपण, शाळा कॉलेज.... मैत्रिणी..... रुचिर शिशिर चे लहानपण.....खूप विषय होते बोलायला. ३-४ दिवस कधी नाश्ता राहून गेला तर कधी आंघोळीला उशीर झाला...कोणालाच भान राहत नसे....उरलेल्या वेळांत थोडे फार घर लावण्याच्या कामांला पण लागत असू. मागच्या पॅटिओ मधे सोफा ठेवा, झूला लावा.....पाऊस आला आला... त्या सोफ्यावरील गाद्या उचला उचला....धम्माल एकदम...शनिवारी संध्याकाळी बारबीक्यू करायचे ठरले. थंडी म्हणते मी पण काय तो उत्साह सगळ्यांनाच... थंडी मुळे सगळे त्या भल्या मोठ्या बारबीक्यू च्या अवती-भवती उभे....पण मधे मधे आम्ही मात्र दूर पळत होतो कारण त्या लॉन्ग कोट ची मज्जा आम्हाला दोघांना घ्यायची होती..नाही तर तो घालणार कधी हो...कौतुकाने मुलांनी आणुन दिलेल्या त्या कोटांचा तिथे त्या एकच दिवशी खूप उपयोग झाला... तरी इतक्या थंडीत तो मस्तं गरम आल्याचा चहा घेतांना काय मज्जा आली असेल सगळ्यांना म्हणून सांगू...घराचे आवार भलतेच मोठे... त्यात असलेली झाडे फॉल सीजन मुळे लाल पिवळे रंग बदलतांना दिसत होती.... सोमवारी दारासमोरचे झाड हिरवे कंच होते.....रोज फोटो घेऊन त्या झाडाचे बदलते रंग कॅमेर्‍यामधे टिपले आहेत.....शुक्रवार पर्यंतच्या ४ दिवसांत ते झाड रंग बदलून पूर्ण लाल झाले होते...काय निसर्गाची किमया असावी...

तळघरांत व बैठकीमधे सोफे ठेवून बसण्याची सोय खूपच गमतीदार वाटते. भला मोठ्टा टीवी वगैरे म्हणे फक्त तळघरांतच जाऊन बघायचा. बैठक सोडून बाकी.. स्वयंपाकघर, झोपायच्या खोली...सगळ्यादूर वेगवेगळे टीवी स्थानापन्न झालेले आहेत...आहे नं गमतीदार...सगळीकडे जीनेच जीने... मस्तंच एकदम...

११ ऑक्टोबर रविवारी रुचिर-प्राची च्या घराचा वास्तु ठरला होता. शनिवारी मोठ्ठा ट्रक आणून जुन्या घरून सामान हलविण्याचे काम करायचे होते. ट्रक रुचिर ने चालवला पण बाकी आम्ही सगळ्यांनी मिळूनच केले...असा काय तो वेळ लागणार होता..
संध्याकाळी बाहेर जाणे, घरचे सामान तर कधी बाकी काही खरेदी चालत असे. ११ तारखेच्या वास्तुची पण तयारी झालीच होती. शिशिर-लीनू कडे रोज काही तरी नवीन पदार्थांची फर्माईश असायची...कधी मुली बनवत असत कधी मी....थट्टा-मस्करी मधे कोणीच कुणाला पुरे पडत नसत...सगळेच बरोबरीचे, बोलण्यास धरबंध नसल्यासारखेच करत होतो, त्यात आगळे-वेगळेपण होतेच......नात्याची सीमा न ठेवण्यात मला यश आल्यासारखे त्या क्षणी वाटत असे. मी त्या चौघांची 'ए आई' आणि हे त्या चौघांचे 'बाबा' होतो.


११ ऑक्टोबर ला सकाळी रुचिर-प्राची ने छान तयार होऊन सजलेल्या घरात गृहप्रवेश केला. वेळेत पुजा पण आटोपली. जेवणाचा बेत श्रीखंडाचा होता. सुट्टी असल्यामुळे ह्या पुजेला जेवणाचा आस्वाद आम्हाला सगळ्यांना मिळून घेता आला. संध्याकाळपर्यंत सगळी आवरासावर करून निवांत बसता-बसताच मंदिरात दर्शनाला जायची वेळ आली. खूप प्रसन्न वाटतं मंदिरात सगळ्या देवांच्या दर्शनाने आणि तेथील संध्याकाळच्या आरतीने.
ह्या घरी तर ज्याला पॅटिओ म्हणतात तसे दोन आहेत... एक स्वयंपाकघराला व दुसरा बैठकीला लागून. तिथे पण सोफा, झूला...सगळे सेट केले गेले. इथे मागच्या व पुढच्या मोठ्या अंगणात भली मोठी झाडे आहेत. रंग बदलण्याची मजा इथे पण आम्ही घेतच होतो सगळे... इथे पण बारबिक्यू चा भरपूर उपभोग घेतला...रात्र झाली होती पण तितकीच ती रंगली होती.
रुचिर-प्राची चे घर गारमिन पासून खूपच जवळ आहे. गाडीने ३ मिनिटांचा रस्ता...बस... तर इकडे होतो तितके दिवस रुचिर शिशिर एकाच गाडीने ऑफिसला फक्त नाश्ता करून जात व १ वाजता गरम डब्बा घेऊन दुसर्‍या गाडीने आमची चौकडी जात असे. घरून निघतांना फोन करून त्यांना ह्या मुली येण्याची सुचना देत व आम्ही तिथे पोहोचपर्यंत दुक्कल खाली हजर असे. त्या दोघा-दोघांची डब्बा देऊन थोड्या प्रेमबोलांची देवाण-घेवाण.. आम्ही दोघे गाडीतच बसून कौतुकाने बघत बसत असू.. घरी जाऊन आमचे जेवण होईपर्यंत गारमिन मधून दोन मोबाईल वर त्यांच्या त्यांच्या राण्यांना फोन हजर.... ''वॉव..काय जेवण झक्कास होतं आजचं....हेहे...'' आता डब्बा कोणी दिला त्यावर गोडी वाढणारच नं....अरे...अरे....आता पुढे ज्यास्तं सांगणे न लगे...

१६-१७ तारखेला दिवाळी मनवली. दोन्ही घरी पुजा, संध्याकाळी दिवे लावणे, आरती... सगळ्यांचे छान तयार होणे आणि मग दोन्ही घरी आमचे फोटो काढायची प्रक्रिया बरीच लांबत लांबत लांऽऽऽऽऽबत गेली. कारण असा योग पुन्हा कधी येणार नं... घर नवीन.. तिकडची घरे वेगळीच...खूपच धम्माल...ह्या जिन्यात..त्या जिन्यात....असे बसू...तसे उभे राहू.....ओफ......





निघायच्या एक दिवस आधी अचानक हवा खूपच छान झाली, ऊन पडले...अहाहा!!!





तसेही शनिवारी बारबिक्यू करतांना रात्रीच ठरले होते की उद्या... रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवसभर फिरून यायचे. ३ दिवसांचा बेत आधी ठरवून ठेवलेला होता चौघाही मुलांनी पण दिवाळी असल्यामुळे थोडा आमच्याकडून विरस केला गेला ह्यात शंका नाही. पण मुलींचा दिवाळसण, एकत्र दिवाळी ती पण त्यांच्या स्वतःच्या घरांत...हा योग आम्हाला गमवायचा नव्हता. असो...

एक दिवस तर एक दिवस असा विचार करून रविवारी आनंदाने बाहेर पडलो. जायचे कुठे तर रुचिर-शिशिर चे एम.एस. (KSU) वाले कॉलेज बघितले नव्हते मुलींनी तर तिकडे जाऊ या... ते शिकत असतांना आम्ही गेलो होतो पण आठवणींना उजाळा द्यायला काहीच हरकत नव्हती. जायचे तर सगळ्यांनी एकाच गाडीत त्यामुळे मोठी SUV भाड्याने घेतली. मस्तं गाणी ऐकत, गप्पा मारत, दिवाळीचा फराळ... चिवडा लाडू, चकली, मठरी... मधे थांबून आवडती व्हॅनिला कॉफी घेत मैनहट्टन (ही त्यांची युनिव्हर्सिटी मैनहट्टन ला आहे) ला कधी पोहोचलो हे कळलेच नाही.















मस्तं ऊन, झाडांचे बदलते रंग, रुचिर शिशिर चा कॉलेज चा अभिमान, मुलींना आम्ही काय धम्माल करत होतो हे सांगण्याची घाई, मधेच तिथल्या KSU च्या दुकानांत जाऊन कुठे टीशर्ट घे, कुठे काही घे.... असे सगळेच आपापल्यापरी बोलत होते.... सगळेच बघत होते आणि मजा घेत होते. त्यांचे बास्केटबॉल चे स्टेडियम बघायला गेलो. दोघे काय तिथे गुंगले होते जुन्या आठवणीत की काय वर्णावे. खंत व्यक्त केली गेली की जेंव्हा इथे होतो तेंव्हा अभ्यासामुळे त्या खेळाची मजा घेताच आली नाही, त्यात रममाण होणे, खूप आरडा-ओरडा करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे वगैरे करता आले नाही जे आता टीवी समोर घरी बसूनच करावे लागते. युनिवर्सिटी शी इमानदार राहणे अमेरिकेमधे खूपच दिसते. रुचिर-शिशिर सारखी उत्साही मुले तर एखादा महत्वाचा जेमतेम २ तासांचा गेम बघायला ८ तासांचे ड्राइविंग करून जातात. आत्ता पण ऑफिस संभाळून जरी कामाच्या वारी असा चा गेम असेल तर ही जोडी आजचे ऑफिस संपवून ३ तासांचा रस्ता पार करून मैनहट्टन गाठते व रात्री १२ ला घरी परत पोहचून पुन्हा दुसर्‍या दिवशी कामांवर हजर असते. (लग्नानंतर हे होणे नाही हे त्यांना माहीत होते म्हणून असे पण अनुभव गाठीशी आधीच ठेवून घेतलेत...हुश्श्शारच बाबा...)तर हे असे आहे....
मुलांच्या प्रेमांत जरा भरकटले नं......हं तर काय सांगत होते...

दिवसभर त्यांच्या कॉलेजच्या आवारांत फिरून तिथल्याच एका रेस्टॉरंट मधे 'चिपोटले' नावांचा छान पदार्थ....पूर्ण जेवणच असते म्हणा...खाऊन रात्री घरी आलो. दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी आम्हाला निघायचे होते. नेहमीप्रमाणे कोणी पण गांवाला जाणार असेल तर आधल्या रात्री आपण बसतो व ज्यास्तं गप्पा मारतो पण सगळेच थकले असल्यामुळे तसे घडले नाही व सगळे आपापल्या खोल्यात गट्टम झालेत.

आम्ही निघणार म्हणून मुलींनी मस्तं भरली वांगी, फ्रूट सैलेड- कस्टर्ड चा बेत केला होता. रुचिर शिशिर दुपारी घरी जेवायला आलेत. जेवून विमानतळावर रवाना व्हायचेच होते. सगळ्यांचेच चेहरे उदास झाले होते.

डोळे आनंदाश्रुंनी भरलेले होते माझे.... अभिमान वाटावा असाच तो क्षण होता. लहान वयातील इतक्या मोठ्या उपलब्धिला तोड नाही हेच खरं... माझी आणि मुलींची निरोपाची मिठी-भेट सुटेना.... आवर घालायलाच हवा होता.

आम्ही तृप्त पण थोडे भारी मनाने त्यांचा निरोप घेतला. कदाचित त्यांना पण घरी जाऊन आमची उणींव भासलीच असेल. २७ तासांचा प्रवास करून आम्ही कुवैत ला परत पोहोचलोत व तिकडे त्यांची आपापली दिनचर्या सुरू झालीय. बस...पुन्हा नेट वर गप्पांमधे समाधान मानण्याचे दिवस परतले आहेत....समोरासमोरच्या फिरक्या संपून नेट वर बोलतांना माझ्या फिरक्या सुरूच आहेत...माझ्या हसवणार्‍या स्वभावाचे कौतुक झाले मुलींकडुन हे ही नसे थोडके ...माझ्यासाठी....




रुचिर-प्राची चे घर
वनराईतच जणु घर हे
शृंगारात नटले हसले
उधळू आशीर्वादांची फुले





शिशिर-लीनू चे घर
रंग ढगाळ असा माखुनी
ऐश्वर्यात जणू घर नाहले
उधळू आशीर्वादांची फुले








शतायु व्हा!!!