शनिवार, २० जून, २००९

नको दुरावा...

मौनाचा कोलाहल आता सोसवेना
एकांताचा आकांत आता सोसवेना

व्यर्थता आहे आज जागण्यात ही
स्वगत माझे मलाच आता ऐकवेना

नाही धरबंध ह्या बोलण्या हसण्याला
स्वप्नांचा पसारा पण आता आवरेना

बेधुंद रोज रात्री आठवांत तुझिया
नयनी अश्रुंना शांत आता बसवेना

धरी हात घट्ट हातात सोडू नको
विरह अन हुरहुर आता पेलवेना

बकुळीच्या फुलांनी सजव रानवाटा
ठेचाळत काट्यांवरी आता चालवेना

दीपिका 'संध्या'

रविवार, १४ जून, २००९

तूच आठवावी....


आज अचानक....

१० जून ची गंध-सुगंधित फुले....

१० जून चा दिवस दरवर्षी येतो आणि जातो. गेल्या ५-६ वर्षात वाढदिवस साजरे करणे आमचे कमीच झाले आहे. दोघंच दोघं आणि हल्ली काही साजरं करायचं म्हंटलं की रात्री बाहेर जेवायला जाणे हेच... मधेआधे तसंही बाहेर जेवायला जातच असतो तर त्याचाही कंटाळाच येऊ लागलाय.

कालचा १० जून पण नेहमी सारखाच जाणार हे जवळपास ठरलेलंच होतं. मुलं अमेरिकेला आहेत पण त्यांच्या रात्री १२ वाजता म्हणजे इथल्या १० जून ला सकाळी चहा घेता घेताच स्काइप मधे शुभेच्छा मिळाल्यात. आणि दिवसाची सुरूवात झक्कास झाली... आणि ऑरकुट कडे वळले. ऑरकुट मधे कमीत कमी २० दिवस आधीपासुनच सांगायला सुरूवात होते की वाढदिवस येतोय वाढदिवस येतोय...

ऑरकुट ची इतकी सारी मित्रमंडळी...सगळ्यांच्याच शुभेच्छांचा पाऊसच पडला होता. खूप छान वाटलं. चिंब चिंब भिजलेच जणु. फोनवर पण शुभेच्छा सुरूच होत्या. कुठल्या न कुठल्या मेसेंजर मधे कुणी न कुणी ठक-ठक करतंच होतं. सगळ्यांशी बोलता बोलता व ऑरकुट मधे धन्यवाद देता देता दिवस सरत आला. दोघांनाच कुठे जायचा कंटाळा येतोय असं ऐकल्याबरोबर स्मिता म्हणे की आपण सगळे जाऊ या आणि आजचा दिवस नेहमीपेक्षा जरा वेगळा साजरा करू या......त्यामुळे रात्री बाहेर जेवायला जायचा कंटाळा होणार नव्हता....५ वाजतांच बहुतेक हे घरी येतील असा अंदाज होता पण तो थोडा चुकला. त्याला कारण ही तसंच होतं.

वाट बघतच होते तर फोन वाजला...एका फ्लॉवर शॉप मधुन फोन होता. तुमच्यासाठी फुलांचा गुच्छ आला आहे तर तो घरी आणुन द्यायचा आहे तर पत्ता सांगा. अंदाज आलाच होता की हे अमेरिकेहुनच आले असणार. सगळ्याच गोष्टींमधे लग्नानंतर फरक पडतो तसा मुलांच्या लग्नानंतरचा हा पहिला बदल मला जाणवला. एकदम प्रशंसनीय बदल...आमची एकमेकांची शुभेच्छा देणे-घेणे त्या-त्या महत्वाच्या दिवशी होतेच..ह्यात शंकाच नाही. ह्या चार पाच वर्षात ऑनलाइन फुले काय, वस्तु काय...सगळ्याचीच देवाण-घेवाण जगभरात कुठेही होते हे माहीत होतेच पण कधी त्या दिशेने आम्ही चौघांनी विचार केला नव्हता. मुलांची लग्न ठरल्यानंतर पण लग्नाच्या आधी माझ्या मुलींना इथुन त्यांच्या वाढदिवसाचे वगैरे काही पाठवायचे होते म्हणुन ह्या ऑनलाइन भेटवस्तु देण्याचा प्रथम प्रयोग आम्ही व अमेरिकेहून मुलांनी केला. भारतात तर पूर्णपणे यशस्वी झाला. त्याच प्रकाराने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमची मुलं आणि मुलींनी(सुना) अशी फुले आई ला पाठवायचे ठरवुन ह्या आईला एकदम चकित आणि आनंदित केले. जेंव्हा मला ती फुले मिळालीत...सांगता येणे अशक्य आहे माझ्या मनांतले विचार...नेहमीप्रमाणे आनंदाने, प्रेमाने, कौतुकाने....डोळे पाणावलेच.. माझा जिवलग तर जवळ आहेच...पण काही क्षण त्या विश्वात रमले जिथे माझी ही चारही मुलं ह्या फुलांच्या जागी हसत असलेली वाटली... मनांत नाच धरून नाचत असलेल्या मुलांचा (अमेरिकेत तेंव्हा सकाळ झाली होती नं...) तेंव्हाच फोन पण आला शुभेच्छांसाठी... चौघांनी पण एकाच सुरात आई ला ''आई...वाढदिवसांच्या शुभेच्छा....'' म्हंटले....(जसं तुला आत्ता छान वाटलंय नं..तसंच तुझी फुलं मिळाल्यावर आम्हाला वाटलं होतं गं आई...असं माझ्या मुली म्हणायला विसरल्या नाहीत...धन्य धन्य ही आई....)

संध्याकाळी ह्यांची वाट बघतच होते. बेल वाजली..दार उघडुन बघते तर काय...हातात सुंदर फुले घेऊन अहो उभे होते...आज तर धक्के वर धक्क्यांचा दिवस उजाडलेला दिसतोय. असे तर कधी झाले नव्हते. खुप खास वर्षांचा असावा (जसा ५० वा) असा काही आजचा वाढदिवस पण नाही...मग काय झालं बुवा एकदम... असे पण विचार डोकवुन गेले मनांत की मुलींनी आणि बाबांनी मिळुन ९ तारखेला काहीतरी चर्चा करून ठरवलेलं दिसतंय. अशी संगनमतं आई मुलींची किंवा बाबा मुलींची सुरू असतात.. मज्जा येते. आनंदात अजुनच भर पडली. आता अजुन पुढे काय काय आश्चर्य माझी वाट बघताहेत कुणास ठाऊक...
घरी थोडे फोटो काढलेत...फुलं आमची बैठक सजवत व सुगंधित करत होते. रात्री जेवायला जायचेच होते. स्मिता कडचे सगळे व आम्ही जेवायला गेलो. तिथे मेणबत्तीच्या अंधुक उजेडात....सुंदर सुंदर पेयांचे रंग-बिरंगी ग्लास, मस्तं चविष्ट जेवण.. टेबल सजले होते. जेवणाचा आस्वाद मनसोक्त घेतच होतो तर हॉटेल चे काही थोडे लोक व बाकी सगळ्यांनी गाणं गाऊन वाढदिवसाची सांगता झाली. गाणं वगैरे म्हणजे जरा लाजच वाटली...हे काय ह्या वयांत...

पण इतकं मात्र खरं की न ठरवता व ध्यानी मनी नसतांना कुठेतरी वेगळाच वाढदिवस साजरा झाला. हे माझ्या वाढदिवसाच्या कौतुकाबद्दल लिहीणे नाही तर माझा हा संपुर्ण दिवस ज्यांच्यामुळे इतका मला आनंद देऊन गेला त्या माझ्या पतिराजांचे, माझ्या मुला-मुलींचे आणि अर्थातच मैत्रिण व तिच्या परिवाराचे.....सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी आहे... भावना पोहोचवायला असे काही करण्याची गरज नसते हे नक्की पण त्यांना करण्यात आणि मला करवुन घेण्याचा पण आनंद अपरिमीत आहे.

यंदाचा योगायोग पण असाच आहे की २८ एप्रिलचा ह्यांचा वाढदिवस २-३ दिवस आधीच (कारण आम्ही सगळेच पुण्याहुन रुचिर शिशिर चे लग्न आटोपुन २५ ला निघणार होतो) मजा म्हणुन चारही मुलांनी अवघ्या तासांभराच्या तयारीने आम्हाला उभयतांना उडवुनच टाकले होते. आम्ही दोघे बाहेर जाऊन तासाभरांत परत आलो तर दार उघडल्याबरोबरचे दृश्य विश्वास बसेना असे होते. एकदम जय्यत तयारीने चौघांनीही बाबांचे स्वागत केले व केक वर मॅजिक कैंडल लावुन आपल्या बाबांची खूप परिक्षा पण घेतली ज्या शेवटपर्यंत ह्यांना विझवताच आल्या नाहीत. मज्जाच मज्जा. एकमेकांना केक खाऊ घालण्यात रमले सगळेच.. त्यावेळी हे पण सगळे जाणुनच होतो की असा योग पुन्हा जेंव्हा येईल तेंव्हा...हा दिवस आमचा सगळ्यांचा..

तसाच माझा हा वाढदिवस पण सगळीकडुन आश्चर्य व आनंदाने न्हालेला अभूतपूर्व होता. काही काही क्षण असे होते कालचे की मी खूप भरभरून जगलेय..अशीच ही प्रेमभरली संजीवनी आम्हा उभयतांना मिळत राहणार हा विश्वास आहे.

तर असे ह्यावर्षी आमचे दोघांचे ही वाढदिवस काही तरी वेगळेपण जगवून गेलेत...आनंदावर बोलून गेलेत...


कुसुमासम फुलणारा दिवस आजचा
गंध सुगंधित होणारा दिवस आजचा

अवचित अगणित सुख हसले अंगणी
चैतन्याने मोहरणारा दिवस आजचा

भावना अंतरातील आप्त स्वजनांच्या
चिंब चिंब भिजवणारा दिवस आजचा

साजर्‍या स्वप्नांतच की सत्यात मी?
कधीच न विसरणारा दिवस आजचा

दीपिका'संध्या'