सोमवार, २९ मार्च, २०१०

खिन्नता मनाची...

१२वीच्या परीक्षा झाल्यात की कळत-नकळत माझ्या मनांत जुन्या आठवणी दरवर्षी डोकवत असतात. कठिण वर्ष असते सगळ्यांनाच ते. मुलांचे पुर्ण भविष्यच थोडक्यात ह्यावर आहे. दरवर्षीचे बदलते नियम, किती टक्के मिळतील ही....एडमिशन कुठे मिळेल... ह्या काळज्या, पैशाचे चाळे तर आता आहेतच. साधारण परिस्थितीच्या आई वडिलांना जोडीला ही पण चिंता. मुलांचे हट्ट असतात.. इथे नको तिथे हवी... मित्र तिथे जाणार... जिवलग मैत्रिण ह्या ठिकाणी एडमिशन घेणार तर मला पण तिकडेच जायचंय...नाना प्रकार....

आजकाल सगळ्याच ठिकाणी एडमिशन च्या पूर्व परीक्षा होतात. आयआयटी मधे सुरुवातीपासुनच आहे. निरनिराळ्या शहरांत हल्ली ह्या ७-८ वर्षात खूप संस्था निघाल्या आहेत जिथे आयआयटी च्या पूर्व परीक्षेची तयारी करवली जाते. अभ्यास इतका कठिण आहे की आधी-आधी दोन वर्ष तरी (१०वीच्या उन्हाळ्यापासुन तर १२वी चे वर्ष संपून मे मधे ही परीक्षा होईपर्यंत चा काळ) करावीच लागत असे. आता तर ऐकिवात आहे की ८वी संपले की त्याचा अभ्यास सुरू करतात.

३-४ वर्षापुर्वीच मी कोटा येथील बन्सल इंस्टीट्यूट चे नांव ऐकले होते. त्याचा हौवा इतका वाढला आहे हे आज टीवी वरील एक कार्यक्रम बघुन जाणवले. मन विचारांनी भरकटले व त्याही पेक्षा सगळ्याचा विचार करण्यात गढले....

कोट्याच्या निरनिराळ्या संस्थांमधे निदान पन्नास हजार मुलं येतात. कोणत्या क्लास मधे एडमिशन मिळणार ह्याची प्रचंड मारामारी असते. ह्या आयआयटी च्या पूर्वतयारी च्या क्लास मधे पण पुर्व परिक्षा घेतली जाते. आहे नं कमाल... त्याचे फॉर्मस विकत घेणे... ठरल्यावेळी तिथे हजर राहून परीक्षा देणे. मग रिझल्ट ची वाट बघणे. सगळे पार पडणारच कारण हे सगळे पैशाचे खजिने भरण्यासाठीच आहेत. लाखो रुपये फी आहे तर एडमिशन सगळ्यांना मिळतेच मिळते. गणितासाठी कोणत्या तरी प्राध्यापकांची ख्याति तर कोणते प्राध्यापक केमिस्ट्री मधे प्रसिद्ध. मग चढाओढ तिथे जाण्याची. ह्या प्राध्यापकांचा बोलबाला असणारच. पैशांचा पाऊस पाडणारे विद्यार्थी असतांना कोणी का त्यात चिंब भिजणार नाही.
आजकाल काही क्लासेस तर इतके हायटेक आहेत की स्टुडिओ मधे बसून-उभे राहून कोट्यालाच काय पण हे पुण्यापर्यंत पण पोहोचले आहेत असे म्हणतात.

मोठी मोठी स्वप्ने दाखवणार्‍या ह्या कोट्याचे... आधी थोड्या-फार प्रमाणात लहान शहराचे आता मोठ्या व उन्नत शहरात रुपांतर झाले असल्यास नवल नाही. ह्याचे सगळे श्रेय कोटा निवासी ह्या आयआयटी च्या पूर्वतयारीच्या संस्था-तिथले प्राध्यापक... अर्थातच हुशारीला देतात. इतके नांव झाले आहे तर प्राध्यापक निश्चित हुशार असणार ह्यात शंका नाही.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेंव्हा पन्नास हजार विद्यार्थी बाहेरून येणार तर त्यांच्या जीवनांची प्रत्येक गरज पुरविणार्‍या लोकांना पण रोजगार मिळणार. राहण्यासाठी घरे बांधली गेलीत, खानावळी वाढणार... पुस्तकांच्या दुकानांचे तर विचारूच नका.. सगळ्यात आधी तेच हवे. सेकंड हँड पुस्तकांच्या दुकानांच्या रांगाच रांगा. सगळ्याच दुकानांची चांदी झालीये.

सायबर कॅफे रात्रभर उघडे असतात. अभ्यासाव्यतिरिक्त बाकी नेटवर जे उपलब्ध आहे त्याचाच उपयोग केला जातो. नाही नाही ते ज्ञान मुलं गोळा करत असतात. ह्या मुळे पण गुन्हे वाढतात. महागाई मुळे ४-५ मुलं मिळून राहणे भाग पडते व पटत नसेल तर त्यातुन वैमनस्य... संतप्त स्वभावामधुन कधी विपरित घडत असतं... खुनाखनी प्रकारांना पण सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे कधी कधी एकमेकांशी जी चुरस असते त्यातुन मनःसंतुलन गमवून आत्महत्येचे प्रमाण वाढतंय. पोलिसांच्या मते दरवर्षी ५-७ मुले अशी आत्महत्या फक्त कोट्यामधे होतात व तीच मुले करतात जी बाहेरून आली असतात... जी जीवावर दडपण घेऊन जगत असतात.

काही आई वडिल मुलांच्या ह्या ध्येयासाठी जमीन विकुन... जर तेव्हढ्याने पण नाही झाले तर कर्ज घेऊन पोटाला चिमटा देऊनच हा खर्च पूर्ण करतात. जाणीव असणार्‍या मुलांच्या ह्या गोष्टी मनांत घर करून असतात. खूप दडपणाखाली वावरतांना दिसतात. स्वतःच्या स्वप्नांबरोबर आई वडिलांची स्वप्नपूर्ति करण्याची दोन ध्येये समोर मांडून असतात. ह्या सगळ्या प्रकरणांत थोडे कमी ज्यास्तं झाले तर मानसिक तणावाचे शिकार होतात. त्यातुन परीक्षेच्या रिझल्ट चे तर सोडाच... परीक्षा होण्याआधीच मृत्युला कवटाळतात.

येणारे विद्यार्थी सगळ्या स्तरांतील येतात. १०वी नंतर तिथे जावे लागणार म्हणजे ११वी-१२वी तिथेच करावे लागणार म्हणजे कॉलेजमधे जाणे आलेच. त्याचा अभ्यास असणारच. शिवाय बोर्ड वेगळे. तिथे गेल्यानंतर कळतं की ११-१२वी ला अजिबात महत्व दिले जात नाही कारण प्राधान्य आयआयटी चे आहे नं तिथे. मुलं भारतभरांतुन येतात कारण आता प्रसिद्धि तशीच आहे कोट्याची. साधारण पन्नास हजारांपैकी साधारण ७-८ हजार मुलांना समजा सफलता मिळाली तरी बाकी मुलांचं काय होणार हा प्रश्न विचार करायला लावणारा व मन खिन्न करणारा आहे. १२वी मधे खूप चांगले पास होण्याची तिथे खात्री नाही. भविष्याचा रस्ता अंधारमय भासू लागतो. पुढे शिक्षणासाठी बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागण्याची ही सुरुवात असते कधी कधी.

एक रस्ता यशाकडे जाणारा आणि दुसरी गल्ली अपयशाकडे जाणारी आहे. धैर्याने आणि संभाळून पावले टाकणार्‍या मुलांना यशाच्या उंबरठ्यावर पोहोचायला वेळ लागत नाही.

आयआयटी चा अभ्यास करतांना दोन्ही गोष्टींची मनाची तयारी ठेवावीच लागते. कारण ही आयआयटी ची परीक्षा अतिशय कठिण व पारखुनच विद्यार्थी घेतले जातात.

रुचिर शिशिर च्या वेळी पण आमचा अनुभव असाच होता. दोघांनी ह्या आयआयटी च्या प्रवेश परीक्षेला बसावे ही आमची नितांत इच्छा... पण १२वी कडे दुर्लक्ष करणे आम्हाला मंजूर नव्हते. तेंव्हा खूप चांगले क्लासेस फक्त चेन्नई ला ब्रिलियंट टुटोरियल्स च असे क्लासेस होते जे नावाजलेले होते. ते तर आमच्या पोहोचण्याच्या पलीकडचे होते. पण त्यांचे पोस्टाने अभ्यासाची पुस्तके येण्याची सोय होती तर तो असा पोस्टल कोर्स त्यांना लावून दिलाच होता. नागपुरलाच नशिबाने एक मॅडम भेटली व तिने १२वी व आयआयटी चा खूप छान अभ्यास करवून घेतला. तिच्याकडे ही पहिलीच बॅच ह्या ५ मुलांची होती. तिचा ही पूर्ण प्रयोगच होता पहिला. त्यावर्षी आयआयटी ची पेपर फुटीमुळे पुनःपरिक्षा झाली व नशिबाची साथ नसल्यासारखे कोणालाही व त्या मॅडमला यश मिळाले नाही. पण आज १० वर्षानी तिची संस्था नागपुरमधे किंवा विदर्भात एक नंबरची संस्था म्हणून तिचे नांव आहे. व विशेष म्हणजे ७० टक्के मुलं यशस्वी होत आहेत दर वर्षी हे ही नसे थोडके.... त्या मॅडम चे खूप अभिनंदन...

जरी आता आमचा ह्या शिक्षण-विषयाशी संबंध नसला तरी पण सगळा सारासार विचार करता मन विषण्ण होऊन जातंय. शिक्षणाचा हा खेळखंडोबा.. मुलांची होणारी दयनीय अवस्था... ह्या सगळ्यात आई वडिलांची मानसिक-शारीरिक-आर्थिक होणारी होरपळ... ओफ....... !!!!!!

दीपिका 'संध्या'

रविवार, २८ मार्च, २०१०

तू गीत नवीन द्यावे

अवचित येणे तुझे
घोर लावून गेले
हुरहुर क्षणाक्षणाची
मन विषण्ण झाले

अलवार मुक्त थेंब
ओठावरी दवाचा
अलगद गोड भास
तुझ्या प्रेम स्पर्शाचा

बंद केलीच होती
किवाडे पापण्यांची
चाहूल तुझी लागली
लोचनी डोकावण्याची

रुसवे तुझ्यावरीचे
खोटेच ते ठरावे
आर्जवाने नव्या
गालात मी हसावे

रित्या रित्या मैफिलीत
सुरांनी का अवघडावे
सुन्या सुन्या स्वरांना
तू गीत नवीन द्यावे

दीपिका 'संध्या'