मंगळवार, १८ मे, २०१०

आनंददायी दोन दिवस...

पिकनिक व महाराष्ट्र दिन.... अविस्मरणीय... !!! 

१३-१४ मे.. ह्या आठवड्याचा शेवट छान जाणार असे माहितच होते. १३ तारखेच्या गुरुवारी मसीला बीच वर बारबीक्यू चा कार्यक्रम ठरला होता. बारबीक्यू म्हंटले की च धम्माल येतेच. कोळसे आणा.. काड्या लावा...पेटवण्यापासुनच मजा सुरू. वारं असलं की तर कधी खूप जोरात आच असते तर कधी मंद होते. कांदे बटाटे रताळी भाजायला घातली की जळायच्या भीतिने कोणीतरी लक्ष ठेवण्याची जबाबदारी घेतलेली असतेच. शाकाहारी-मांसाहारी बारबीक्यू चा सगळ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. गप्पा, हसणे-खिदळणे, वेळ कसा गेला कळलेच नाही. संध्याकाळपासुन धुळवड चालूच होती थोडी थोडी. रात्री ११ वाजेपर्यंत फारसे जाणवले नाही पण नंतर मात्र एकदमच वाढू लागली. त्यामुळे २४ मे ला कल्पनाच्या वाढदिवसानिमित्य केक कापण्याचा कार्यक्रम लवकर-लवकर आटोपला. भऱाभर सगळ्यांनी खाल्ला आणि बारबीक्यू चा चहा राहीलाच करायचा ही खंत मनांत घेऊन आम्ही आमचे चंबूगबाळे गुंडाळले. पण तरी सगळ्या छान छान पदार्थांच्या छान छान चवी तोंडावर रेंगाळवत आम्ही निघालो हेच म्हणत की 'उद्या संध्याकाळी ४ वाजता भेटूच... !!!'

१४ मे ला कुवेत महाराष्ट्र मंडळा चा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आहे हे माहीतच होते. महाराष्ट्र मंडळा कडुन वर्षाच्या सुरुवातीला जी दिनदर्शिका दिली जाते त्यात वर्षाच्या कार्यक्रमाचा आराखडा दिलेला असतो. खूप छान उपक्रम असतो हा मंडळाचा. काही अडचणी आल्या तरच तो दिवस बदलला जातो. ह्यावेळी सलील कुलकर्णी, सारेगमप ची विजेती उर्मिला धनगर व समुह येणार होते. १३ तारखेच्या संध्याकाळपासुन हे धुळीचे थैमान शुक्रवारी दुपारी पण बर्‍यापैकी सुरूच होते. उत्सुकतेपोटी संध्याकाळी ४ वाजता कार्यक्रम होता म्हणुन वेळेवर पोहोचलो. खेतान शाळेच्या त्या सभागृहावर सुंदर तोरण होते.

आत गेल्यावर महाराष्ट्राच्या भल्या मोठ्या नकाशाने लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील एकापेक्षा एक प्रसिद्ध व्यक्ति... संत तुकाराम-ज्ञानेश्वरांपासुन गावस्कर-तेंडुलकर पर्यंत, वैज्ञानिकांपासुन तर संगीतसम्राटांपर्यंत, टिळक, पु.ल.. ज्योतिबा फुले... किती नांवे घ्यावीत पण सगळे त्या आपल्या अभिमानी महाराष्ट्राच्या नकाशावर दिमाखात विराजमान होते. स्टेज पण छान सजवलेले होते. केळीचे
खांब सगळे शुभ आहे हे वर्तवित होते.थोडा वेळ मागे-पुढे.. पण भारताचे राजदूत अजय मल्होत्रा आलेत व त्यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळाच्या च्या पुस्तिकेचे अनावरण झाले. मंडळाचे अध्यक्ष व राजदूतांचे दोन-दोन शब्द संपून मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. संगीताचा कार्यक्रम सादर करणारे सगळे कलाकार मंचावर येऊन बसले होते. सलील कुलकर्णी ची गाणी तर आधी ऐकली होती पण उत्सुकता उर्मिला च्या लावण्यांची होती. कृष्णा मुसळे ह्यांनी वाजवलेल्या ढोलकीला तर तोडच नाही. त्यांचे हात ढोलकीवर वाजत होते आणि प्रेक्षकांना काय आणि कशी तारीफ करावी हे कळेनासे झाले होते. एकदा पुन्हा.. एकदा पुन्हा.. टाळ्यांचा कडकडाट सुरूच राहीला. अतिशय उत्कृष्ट लावण्या तिने सादर केल्याच पण रेशमा ने गायलेले 'लंबी जुदाई... ' हे गाणे तर फारच अप्रतिम सादर केले. बरोबर असलेली मेघना सरदार हीने 'देही वणवा पिसाटला...' हे गाणे गाऊन बसलेल्या हौशी-उत्साही प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. नाचण्याची झलक इथे बघायला मज्जा येईल....
http://www.youtube.com/watch?v=ow9mglVfREA

आदित्य आठल्ये आणि कृष्णा मुसळे ह्यांच्या तबला व ढोलकी ची जुगलबंदी ने तर स्तिमित केले. नुलकरांचे अप्रतिम सूत्रसंचालन उत्कृष्ट होतेच. भडकमकरांनी कीबोर्ड वर खूप छान साथ-संगत दिली. दोन भागांत विभागलेला हा कार्यक्रम ९.३० वाजता संपला. भुर्रकन वेळ संपली.


ह्यावेळी कार्यक्रम सुरू असतांना लिंबाचे सरबत बसल्या जागी मिळाले तर खूप मजा आली. शेवटी जेवणाचा आस्वाद घेत असतांना एकच चर्चा होती... काय छान गाणी झालीत उर्मिला आणि मेघना ची.

महाराष्ट्र मंडळ नेहमीच स्तुत्य उपक्रम राबवत आले आहे. त्यातलाच हा एक ठरला ह्यात जरा ही शंका नाही. पुढील अशाच छान छान कार्यक्रमांच्या प्रतिक्षेत सगळेच सभासद असतीलच हे नक्की. कार्यकारी मंडळाच्या सगळ्या सदस्यांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

दीपिका 'संध्या'