सोमवार, ६ जुलै, २००९

मित्रतेला समर्पण....

माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींन्नो....

गरजेसाठी कधीच दोस्तीचे नाते जो़डू नकोस
वाटले तरी तितक्या सहजतेने हे तोडू नकोस

रक्ताचे नाते नसू दे मातीमोल हे कधीच नसते
आपुलकीची मित्रता सदैव अनमोलच असते

जीवन वाटेवर मन-नवीन नाती जुळतीलच बघ
ओंजळीत प्रेमवर्षावाची फूले तर साठतीलच बघ

सामंजस्य असावे आपणांत मित्र होऊ समाधानी
ओझ्याचे हे नाते नव्हे, खूणगांठ बांधू या रे मनी

देणे घेणे व्यवहार, मैत्रीत अपुल्या नसावेत रे
मदतीचे हे अपुले हात सदैव तत्पर असावेत रे

बाकी नसे मागणे काही, चार शब्द विश्वासाचे
प्रेम असेच अनंत असावे, नसावे चार दिसांचे

दीपिका 'संध्या'

रविवार, ५ जुलै, २००९

तुझ्या माझ्यात....

झाली कशी नजरेची खेळी तुझ्या माझ्यात
श्वास होते श्वासात भिनले तुझ्या माझ्यात

ओल्या सांजवेळी जसे निनादले सूर भैरवीचे
गीत एक चिंब तसे भिजले तुझ्या-माझ्यात

नयनांची होती भाषा अपुली हात हाती गुंफले
स्पर्शातले जिव्हाळे खुदखुदले तुझ्या माझ्यात

मोकाट रानवार्‍याने वनी फुलवला मोरपिसारा
प्रीत मोर साजणी इथे नाचले तुझ्या माझ्यात

आव्हान जरी असले अपुल्या प्रेमात गं विरहाचे
आठव गुजगोष्टींचे होते रुजले तुझ्या माझ्यात

नको साठवू नयनी अश्रु नको अश्रुंची बरसात
ओघळू दे मोती शिंपल्यातले तुझ्या माझ्यात

गूढ नाते अपुले कधी उकलावे कधी उमलावे
अनेक हळवे क्षण गहिवरले तुझ्या माझ्यात

वेड्या मनाने केली असेल का रे मनाची खोडी
तरीच भुलुनी हे स्वप्न हरवले तुझ्या माझ्यात

धुंद धुंद मधुमास झाला गंधित मंद मंद श्वास
मिलन हे असे अवचित घडले तुझ्या माझ्यात

दीपिका 'संध्या'

मी तर आत्ताच हे केलंय......

काचेची बरणी आणि दोन कप चहा

आयुष्यात जेंव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात आणि दिवसाचे चोवीस तासही अपुरे पडतात तेंव्हा काचेची बरणी आणि दोन कप चहा आठवून पहा.

तत्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तू बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँग चे बॉल भरू लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा डब्बा घेऊन त्या बरणीत रिकामा केला. आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली कां म्हणून विचारलं. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हंटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामी केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पूर्ण भरून निघाली. विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले, ''आता ही जी बरणी आहे तिला तुमचं आयुष्य समजा.

पिंगपाँगचे बॉल ही महत्वाची गोष्ट आहे- देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद- - - ह्या अशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी उरल्यात तरी तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल.... दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर आणि कार किंवा तत्सम.... उरलेलं सारं म्हणजे वाळू- म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी....ज्या आवश्यक जरी नसल्यात त्या असतांना आपल्या जीवनांतील आनंद द्विगुणित करण्यात मदत जरूर करतात.

''आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॉल किंवा दगड-खडे यांच्यासाठी जागाच उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ति लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच राहणार नाही. तेंव्हा... आपल्या सुखासाठी महत्वाचं काय आहे त्याकडे लक्ष द्या.''

''आपल्या मुलांबाळांबरोबर खेळा. मेडीकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा. घराची साफसफाई करायला आणि टाकाऊ वस्तुंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल.''

''पिंगपाँगच्या बॉल ची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे.''

सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं, ''ह्यात चहा म्हणजे काय?''
सर हसले नि म्हणाले, ''बरं झालं तू विचारलंस, तुझ्या प्रश्नाचा अर्थ असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते.''

आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर हा विचार वाटून घ्या.
मी तर आत्ताच केलंय ते...तुम्हाबरोबर....खऱंय नं....

दीपिका 'संध्या'