झाली कशी नजरेची खेळी तुझ्या माझ्यात
श्वास होते श्वासात भिनले तुझ्या माझ्यात
ओल्या सांजवेळी जसे निनादले सूर भैरवीचे
गीत एक चिंब तसे भिजले तुझ्या-माझ्यात
नयनांची होती भाषा अपुली हात हाती गुंफले
स्पर्शातले जिव्हाळे खुदखुदले तुझ्या माझ्यात
मोकाट रानवार्याने वनी फुलवला मोरपिसारा
प्रीत मोर साजणी इथे नाचले तुझ्या माझ्यात
आव्हान जरी असले अपुल्या प्रेमात गं विरहाचे
आठव गुजगोष्टींचे होते रुजले तुझ्या माझ्यात
नको साठवू नयनी अश्रु नको अश्रुंची बरसात
ओघळू दे मोती शिंपल्यातले तुझ्या माझ्यात
गूढ नाते अपुले कधी उकलावे कधी उमलावे
अनेक हळवे क्षण गहिवरले तुझ्या माझ्यात
वेड्या मनाने केली असेल का रे मनाची खोडी
तरीच भुलुनी हे स्वप्न हरवले तुझ्या माझ्यात
धुंद धुंद मधुमास झाला गंधित मंद मंद श्वास
मिलन हे असे अवचित घडले तुझ्या माझ्यात
दीपिका 'संध्या'
1 टिप्पणी:
तुझ्या कवितांच्या जगात आज पहिल्यांदा वावरताना ,जाणवत राहिली तुझी प्रतिभा....
शब्दांचे तुला मिळालेले वरदान अन तुझ्या विश्वातल्या कल्पनांचे सुंदर वर्णन
तुझ्याशी मैत्री करताना एकाच गोष्ट जाणवली होती पहिल्या प्रथम , तुझा मोकळा आणि लाघवी स्वभाव....
मग पहिली तुझ्यातली लेखिका ,कावियेत्री .......
सुंदर लिहितेस ग!
अशीच लिहित रहा .......
- तुझी
मोनिका (श्रिया)
टिप्पणी पोस्ट करा