शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

महाराष्ट्र मंडळाचा वार्षिक कार्यक्रम... अफलातून....

बघता बघता २०१० संपत आले. महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतिक्षा सुरूच असते. आपल्याच सगळ्यांमधील कलांना ह्या कार्यक्रमात खूप वाव असतो. बच्चे कंपनी आपल्यापरी तर मोठे आपल्यापरी कसून प्रयत्न करत असतात. ३-३ महीन्यांचा सराव.. कोणासाठीच इतका सोपा नाही.
१० डिसेंबर ला दुपारी २.३० ला केंब्रिज शाळेत जमणार होतो. कोणी छान छान साड्यांमधे..कोणी पंजाबी ड्रेस मधे... रंगबिरंगी..चमचम... महाराष्ट्र मंडळ व सगळेच सदस्य चमकत होते. थोडा उशीरा कार्यक्रम सुरू झाला. छुटकू मुलांनी मज्जा आणली. ह्या ३-४ वर्षात महाराष्ट्र मंडळात खूप बदल जाणवतो की नाटकाव्यतिरिक्त मोठ्यांचे नाच किंवा तत्सम कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. लग्नानंतर थोडी संवय कमी झाली असेल असे वाटणे आजकाल महिलांची नाच करण्याची कमाल बघून एकदम चुकीचे ठरते. उत्कृष्ट संयोजन व दिग्दर्शन दिसून येते. प्रेरणा वलिवडेकर तर ह्या क्षेत्रात माहीर आहेच पण यंदा मुग्धा सरनाईक चे पण कौतुक करावे तितके कमी आहे. ‘राधा ही बावरी’ ही तिची दिग्दर्शित दर्जेदार नृत्यकला आणि सगळ्यांची सारखी वेषभुषा... सगळ्यांच मैत्रिणींनी छान नृत्य केले.
श्रृति हजरनीस ने नेहमीप्रमाणे मुलांवर किती मेहनत घेतली असेल ह्याचा प्रत्यय आलाच.
एकाच वेळी ३-४ कार्यक्रमात भाग घेणे किती अवघड पण ते मुलांना सोपेच असते हेच तिने दिग्दर्शित नाचांमधे करून दाखवले. लहान मुलांना आपल्या तालावर नाचवणे किती कठिण असेल हे तीच जाणे. तिला सलाम... व कौतुक आहे.

मधेच गणपति बाप्पांच्या आगमनाचे आणि बाल्या नृत्याची ओळख कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी करून देऊन एकदम मज्जा आणली.

ऐकुन होतो की शेवटच्या नंबरवर असलेली लावणी बघण्यासारखी आहे. सौ.मुग्धा सरनाईक दिग्दर्शित व सौ. भारती वासेकर आणि सौ. तृप्ती पराडकर यांनी सादर केलेली लावणी म्हणजे कार्यक्रमाची पर्वणीच होती. कौतुकाला शब्द नाहीत. ‘वाजले की १२’ ही नावाजलेली लावणी  इतक्या ताकदीने पेलणे म्हणजे खेळ आणि मजा नाही.. अप्रतिम.. वन्स मोर मिळाल्यावर असे वाटले की बाप रे.. आधीच ह्या दोघी इतक्या थकल्या आहेत..(जवळपास ६-७ मिनिटांची ती लावणी आहे) आम्हाला काय लागतंय पुन्हा नाचा म्हणायला.. पण त्या दोघींची कमाल की त्या पुन्हा हजर झाल्या. त्यांची पावले तितक्याच जोमाने थिरकत होती. प्रेक्षक पण उत्साहात आले.. थिरकले... आणि धम्माल आली... इंग्रजीत म्हणायचेच झाले तर मुग्धा आणि भारती व तृप्ती पुढे hats off…..

मध्यांतरात गरम मस्त मसालेदार चहाचा आस्वाद घेऊन नंतर आता नाटकाची प्रतीक्षा संपणार होती. प्रसन्न देवस्थळी चे दिग्दर्शन असलेले नाटक दरवर्षीच अफलातुन असते. यंदा होते ‘चार दिवस प्रेमाचे’. कलाकार मंडळी नेहमीचीच.. नावाजलेली... क्या कहने... विशेष कौतुक जयश्री अंबासकर आणि मृदुला रानडे ह्या दोघींचे... थोडा कंटाळा आल्यासारखा झाला होता तो ह्याने पुन्हा तजेला देऊन गेला.
थोडा उशीर झाला कार्यक्रम संपायला पण आनंददायी होता हे नक्कीच. पण लहान मुलांचा अंत बघितला गेला.. बिचारे फारच कंटाळले होते. ‘आई-मम्मी.. चल घरी जाऊ नं..’ हेच कानांवर पडत होते सारखे.

अध्यक्ष श्री अष्टीकर ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सगळा अहवाल सांगितला जो की आम्हाला आधी छापील देण्यात आलाच होता. सदस्यांचे व समितीचे कौतुक करून झाल्यावर त्यांनी काही वक्तव्य केले ते जरा खटकले. कुठल्याही कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया यायला पाहीजे ही अपेक्षा पण त्या अनुकूलच व चांगल्याच असाव्यात हे बरोबर नाही. प्रतिकूल प्रतिक्रिया आपल्याला काही सुधारणा करायला कामी येतात. सध्याच्या कार्यकारी मंडळाला किंवा भावी मंडळाला सुद्धा. त्यांनीच आधी आपल्या भाषणात सांगितले होते की प्रत्येक कार्यक्रम प्रत्येकाला आवडेल असे नाही. कोणत्या कारणाने तो कार्यक्रम आवडला नाही हे समजले तर मंडळाच्या ते फायद्याचेच आहे. कारण आजकाल पाहुणे कलाकार भारतातुन येणारे विविध लोक विविध कला घेऊन येतात. व अशा चांगल्या कामाचे कौतुक मंडळाला सतत मिळतच असते. पण त्यातही अशा थोड्या हटके प्रतिक्रियांनी कार्यक्रम कोणते आणायला हवे किंवा साधारण कोणते कार्यक्रम प्रेक्षक बघु इच्छितात हे ठरवायला मदतच होणार आहे. तरी कुठल्याच कार्यकारी मंडळाने नेहमी चांगलीच प्रतिक्रिया द्या हा आग्रह धरणे मला आक्षेपार्ह आहे.

करता करता कार्यक्रम सुरू व्हायला ३.३० पेक्षा ज्यास्त वाजून गेले होते. लोक येत नाहीत म्हणुन कार्यक्रम सुरू करता येत नाही .. आणि कार्यक्रम वेळेवर सुरू होत नाही म्हणुन लोक १ तास उशीरा येतात.. हे समीकरण कोणी तरी बदलायलाच हवे. आमच्या सारखे पण हाताच्या बोटावर मोजण्याइतके तिथे २.३० ला जे हजर होते ते नंतर कंटाळून जाणे साहजिक आहे.

बाकी वार्षिक सम्मेलनाचा हा सोहळा उत्कृष्ट पार पाडल्याबद्दल सगळ्याच कार्यकारी सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!!

आगामी नव्या स्थापित मंडळाला भरपूर शुभेच्छा. व नव-नवीन मनोरंजन व सम्मेलन-भेटीगाठींच्या अपेक्षेत....

दीपिका