सोमवार, २५ मे, २००९

बाबा एकदा तरी पुन्हा याल ना......

जेंव्हा माझी आई गेली तेंव्हा आम्ही तर खूपच काही गमवून बसलो होतो पण बाबांसाठी मनांत यायचं..त्यांच्या मनाची काय अवस्था असेल. ५ मे २००५ ला च त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. आणि लगेच १५ मे ला ती गेली. इतका ५० वर्षांचा सहवास, संगिनीच्या जाण्याचं दुःख काय ते कधी बाबा बोलून दाखवित नसत. किती विचारलं तरी अवाक्षर ही तोंडातून काढले नाही. पण तिचे असे निघून जाणे आणि तो त्यांना बसलेला धक्का... त्या धक्क्यातून ते कधी वर आलेच नाहीत हे मात्र खरं.

डायबिटीस सारख्या रोगाने त्रस्त होतेच पण असं पण म्हणता येईल की त्यांनी डायबिटीस ला सुद्धा हरवले होते. एक अनोखे उदाहरणच म्हणता येईल. आम्हा मुलांना नेहमी काळजी वाटायची की ह्या डायबिटीस ने बाबांचं कसं होणार कारण कवडीचेही पथ्य पाणी मंजूर नव्हतं. आंबे खाऊ नका असं आम्ही म्हणत राहू आणि आम्ही त्यासाठी शिव्या खाव्या आणि त्यांनी खावा हापुस आंबा.... असंच सुरू राहिलं शेवटपर्यंत. जेंव्हा शुगर ४०० झाली व डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी काही म्हणायच्या आत ते म्हणत, ''माझी नॉर्मल शुगर इतकीच आहे हो...त्यामुळे मला काहीच त्रास नाही.''

वयोपरतत्वे व आई च्या जाण्याने व नाही म्हणता डायबिटीस ने तब्येतीत खूप फरक पडला होता. वजन कमी होत चाललं होतं. गेल्या दिवाळीला आम्ही बर्‍याच वर्षांनी पुण्यात गेल्यामुळे ते खुश होते. दिवाळी सगळ्यांनी मिळून साजरी केली. नंतर लगेच काही तरी निमित्य होऊन पडलेत. मांडीचे हाड मोडले. ऑपरेशन झाले, रॉड घातला. पण डायबिटीस ला मात देऊन जखम तीन दिवसांत बरी झाली. रक्तदाब, डायबिटीस पण, व बाकी शरीर तसं सगळं ठीक सुरू (डायबिटीस ला २० वर्षे जोपासून इथपर्यंत चा प्रवास बघता व्यवस्थितच म्हणावं लागेल) .त्यामुळे डॉक्टर पण तसे आश्चर्यचकितच होत असत. जिथे डायबिटीस ने आईचे ह्रदय, एक किडनी, डोळे, पोटाचा त्रास..सगळंच सुरू होऊन त्यातच ती हरली होती, तिथे बाबांचं हे सगळंच चांगलं होतं. नाही म्हणायला थोडा पोटाचा त्रासच काय तो सुरू झाला होता पण त्या मानाने क्षुल्लकच..

नोव्हेंबर मधे पायाचे ऑपरेशन झाल्यावर मी कुवैतला परतले. त्यावेळी नमस्कार केल्यावर मला म्हणले होते की पुन्हा आपली भेट होईल नं ग.... हे वाक्य ऐकून वाटलं की जीवनाची हार मानली होती त्यांनी व आता ह्यातुन बाबा तसे सावरायला तयार नव्हते. मनाने व शरीराने पण. झोपल्या झोपल्या सगळ्यांनाच होतात तसे बेडसोर होऊ लागलेत. अस्थिपंजर शरीर बघवत नव्हते. माझ्या भाऊ भावजयीने कष्टांची व सेवेची पराकाष्ठा केली पण १४ जानेवारीला रात्री आम्ही पूर्णपणे पोरके झालोत. ६ जानेवारीला त्यांचा ८१ वा वाढदिवस झाला होता, मी फोन केला पण त्यांना फोनवर बोलता येत नसल्यामुळे आमच्या शुभेच्छा सांगी-वांगीच त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात.

त्यात कहर म्हणजे इतक्या वर्षांत प्रथमच असं झालं की जेंव्हा बाबा गेल्याचा फोन आला तेंव्हा त्याच क्षणी इथून निघालो तर खरं पण जवळपास २४ तासांने हे नेहमीचे ३ तासांचे अंतर पार करता आले. व बाबा मला अभागीला शेवटचे दिसलेच नाहीत..पण तशी तर मी खूप भाग्यवान की बाबा माझेच बाबा होते..प्रेमळ... जीव लावणारे..दोघी नाती व दोन्ही नातवांवर अपार माया....कसे कसे त्यांना वर्णावे तेव्हढे कमीच...थोडे फार पुन्हा कधी....जानेवारी नंतर लगेच आत्ता एप्रिल मधे पुण्याला जायचा योग आला....घरांत तर खूपच बाबांची उणीव भासली.

आज पितृदिनाच्या दिवशी माझ्या बाबांना ही मानवंदना...

टाकता पाउले हळूच हात सोडत होता
जीवनाची वाटचाल कशी, शिकवित होता
पुढचा मार्ग पण तुम्हीच दाखवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

बोलके हसरे तुम्ही किती आधी होतात
वयापरत्वे अबोल असे का हो झालात
पुन्हा अम्हा मुलांना तसेच हसवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

ध्यानी मनी स्वप्नी तुम्हीच असता
पडद्याआड गेलात जसा लपंडाव खेळता
एकच वेळा स्नेहाचा हात तो फिरवाया
बाबा एकदा तरी पुन्हा याल ना

तुमचीच लाडकी

संध्या

८ जून २००८


काही प्रतिक्रिया

१० जून २००८

जयश्री

दीपिका…… अगं किती सुरेख लिहिला आहेस लेख !! तुझ्या लेखातून तुमच्या दोघांच्या भावजीवनाचं फ़ार सुरेख वर्णन केलं आहेस गं! अतिशय हळवा आहे लेख !!

माझी दुनिया

१० जून २००८

दिपिका…..खरंच आई वडीलांचं नसणं विशेषत: मुलीचे म्हणजे माहेरचं तुटणं……मी अनुभवतेय ही परिस्थिती…… नंतरच्या आयुष्यात कितीही माणसं आली तरी ही उणीव कधीही भरून निघू शकत नाही.

श्रीकांत सामंत

१५ जून २००९

नमस्कार दीपिका, आत्ता माझ्या लक्षात आलं की कोण ही संध्या आणि कोण ही दीपिका.

आपला ” माझे बाबा” हा पोस्ट मी वाचून माझ्या पत्नीला पण वाचून दाखवला होता.आणि दोघं अक्षरशः रडलो. एक तर मुलगी लिहीतेय-म्हणजे स्त्री आणि प्रेम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-आणि किती ते प्रेम आपल्या आईवडिलांवर?.

मला वाटलं होतं की आमचीच मुलगी आमच्यावर एव्हडं प्रेम करणारी आहे.पण ते खोटं ठरलं. आणि ते तसं ठरलं हे बरंच झालं. कारण आपल्या आईवडिलांची जागा आम्ही कदापि जरी घेवू शकलो नाही तरी आम्हाला माधवी बरोबर दीपिका पण एक मुलगी मिळाली नव्हे तर आपल्या आईवडिलांवर इतकं उत्कट, प्रेम आणि त्यापुढे जावून, वडिलांना उद्देशून अंतःकरणापासून लिहीलेली ती कविता, “बाबा एकदां तरी तुम्ही याल ना” ही कविता वाचून क्षणभर, “माझे मरण पाहिले म्यां हेची डोळा”असंच वाटलं. म्हणतात ना, “वेदने नंतरच निर्मिती होते” हे खोटं नाही. निसर्गाचाच तो नियम आहे.

माझ्या लेखनाची आपण भरून भरून प्रशंसा करता पण, “आप भी कुछ कम नही” आपल्या दुःखातही दुसऱ्याला गुलाबाचं फूल पुढे करायला धजता. खरोखरंच आपल्या आईवडिलांचे हे संस्कार असावेत. मंगेश पाडगांवकर म्हणतात,

“एक गोष्ट पक्की असते
तिन्ही काळ नक्की असते
तुमचं न माझं मन जुळतं
त्या क्षणी दोघानाही गाणं कळतं”

अगदी अगदी खरं आहे. आपले हे ही दिवस निघून जातील.

सामंत

संध्या

१७ जून २००८

ती. सामंत काका..
तशी मी तुम्हाला मेल केलीच आहे…पण..इथे पण सांगते…आता तुमच्या अभिप्रायाने माझे डोळे पाणावलेत…
खूप खूप धन्यवाद..

दीपिका ‘संध्या’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: