गेल्या १० मे ला झालेल्या मातृदिना च्या निमित्याने आई बद्दलच लिहून आता लिखाणात नियमितता आणण्याचा सदैव प्रयत्न करत राहीन असं ठरवलंय तरी..बघू या....
आधी आई बद्दल लिहून झालेच आहे पण तरी आई सदैव ध्यानी मनी असतेच त्यामुळे पुन्हा एकदा थोडे...
माझ्या आई ला जाऊन ४ वर्षे झालीत पण ह्यावेळी असा योगायोग होता की १० मे ला तिचा वाढदिवस व मातृदिवस पण. मागे वळून बघता वाटलं की आई ची सेवा करण्याची संधी आली पण अन गेली पण... कधी सेवा साध्य झाली कधी खंत राहीली. लग्नानंतर जी मी दुसर्या प्रांतात गेले ती दूर दूरच राहीले. दरवर्षी आमच्या येण्याची आतुरतेने वाट बघत बसणारी आई आज पण डोळ्यासमोर येते. नागपुर रेल्वे स्टेशनवर प्रत्येक वेळी आमच्या आगमनाच्या वेळी आनंदाने आम्हा दोघींचे पाणावलेले डोळे तर परततांना आता पुढे कधी याल...कधी भेटतील माझी नातवंडे ह्या विचाराने डोळ्यातील अश्रु पापण्यांपलीकडे लपवणारी आणि आई बाबांकडे खूप लाड करून घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली मी अश्रु गाळत असे. कारण तिच्यासारखी सहनशील कदाचित मी नसेन. मला अश्रु आवरणे शक्य होत नसे. जसे जसे वय वाढू लागले तशी ही सहनशक्ति तिची कमी होत जातांना दिसली. गळ्यात पडून रडणारी आई सामोरी येऊ लागली.
आम्ही औरंगाबादला असतांना हे कुवैत ला आलेत आणि मी मुलांना घेऊन तिथेच राहीले. आमच्या आई कधी बरोबर असायच्या कधी कुठे गांवाला जायच्या. त्या ३ वर्षात जेंव्हा कधी मला कुवैत ला भेट द्यायची असायची तेंव्हा आई बाबा रुचिर शिशिर जवळ येऊन रहायचे. किती सारखे तिला गृहित धरले जायचे ह्याची खंत करावी तितकी थोडी आहे. त्यांचे खूप लाड करायचे. थोड्या दिवसांपुरते का होईना पण मुलांवर होणारी माझी...''हे खायलाच हवे..ते खायलाच हवे'' ही जबरदस्ती बंद व्हायची. त्यामुळे ते ही खुश. आज असं वाटतं तिच्यावर सगळी जबाबदारी टाकून मी जात असे...तिला होणार्या त्रासाची मी कधी पर्वाच केली नाही. कुवैतहून जे काही थोडे फार तिच्यासाठी नेले तर नको नकोच करायची. खरंच आई वडिलांची कधीच कसली अपेक्षा नसते. जेंव्हा मी परत यायचे तेंव्हा असं वाटायचं की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घालावे, गरम पोळी वाढावी...
प्रत्येक वेळी तिला म्हणायचे की पुढच्यावेळी मी येईन तेंव्हा कुठ्ठे जाणार नाही...आपण खूप गप्पा मारू.. पण मला बाकी माझ्या संसाराच्या रहाटगाडग्यातून तिच्यासाठी वेळ काढायला कधी जमलेच नाही. जेंव्हा जेंव्हा मी तिला आवाज दिला तेंव्हा ती धावत आली पण कधी तिने मूकपणाने हाक मारली पण असेल, मला ऐकूच आली नाही. नातेवाईकांच्या गराड्यात जेंव्हा तिच्याकडे फक्त बॅग ठेवायला जायचे तेंव्हा तिच्या प्रेमभरल्या रागाकडे पण दुर्लक्षच केले गेले. असो...
फक्त तिची एकच अपेक्षा असायची ती म्हणजे माझ्या दर आठवड्यात मिळणार्या पत्राची. आम्हा दोघींना इतकी हौस पत्र लिहीण्याची.. जो माझ्या मते फारच विरळा छंद असावा. किती सुख होते त्या पत्रांमधे हे शब्दात सांगणं कठिण. आज ती नाहीये पण त्या पत्रांच्या गठ्ठ्याच्या रुपाने तिच्याशी मी बोलत असते आणि ती माझ्याशी. कारण पत्रांमधे जावयाची बाजू घेऊन मला कधी रागवली आहे, मुलांसाठी कुठला उपदेश केला आहे, कधी समजूतीचे स्वर आहेत, प्रेमाने ओथंबलेली तर आहेतच आहेत. खूप आधार वाटतो ह्या सगळ्याचा मला. परदेशात एकटेपणा खूप आहे पण आमच्या आईंना व माझ्या आई ला १०-१२ दिवसांनी एकदा फोन करून आमचं बोलणं झालं की पुढच्या फोनपर्यंतचे दिवस आनंदात जायचे. आता ती पोकळी भरून कशी निघणार? हल्ली कुटुंब आकुंचन पाऊ लागली आहेत. आणि सगळेच आपापल्या विश्वात रमणारे.
कुठेतरी माहेर थोडे दूर गेल्यासारखे वाटतंय....आता मातृदिनीच काय सदैव ध्यानी मनी वसणार्या ह्या दोघीही आई आमच्यात नसल्यात तरी आमच्यातच आहेत हा विश्वास आहे.
आपलेच सगळे माझ्या अवतीभवती
तुजसम मजला दिसले कुणीच नाही
भासले मी वेढलेली प्रेमवलयांत परी
तुझ्या प्रेमाची त्या कणभर सर नाही
जरी भिजले चिंब चिंब पावसांत मी
तुझ्या स्पर्शाचा ओलावा त्यात नाही
सुखदुःखात सगळेच माझ्या संगती
पण नयनांच्या कडा ओलावत नाही
आसवांनी भरू घातली माझी ओंजळ
पुसण्या तव कधीच तू येणार नाही?
आईचीच लाडाची लेक
दीपिका 'संध्या'
१८ मे २००९
काही प्रतिक्रिया
१८ मे २००९
स्मिता- किती सुरेख लिहीले आहेस गं दीपिका...खरंच आईबद्दल लिहावे तितके कमीच असते नं...
१९ मे २००९
अंजला- अगदी मनाला स्पर्श करून गेले....आयुष्यातील उणींव जाणवली...
1 टिप्पणी:
आई गं....... !!
आईच्या आठवणीनी हळवं व्हायला झालं गं :(
टिप्पणी पोस्ट करा