बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

क्षण आला मम भाग्याचा....

१५ एप्रिल २००९ ला रुचिर शिशिर चे लग्नं झाले. मुलींच्या आगमनाची आस वर्षानुवर्षांची होती. दोघांची लग्नं ठरल्यानंतर एक वेगळेच आकर्षण आणि आनंद होता. त्याचे शंभर टक्के कारण मुलींचे आमच्या घरांत आगमनच होते. एक लीनू ठाण्याला आणि प्राची बंगलोरला होती. हल्लीच्या फोन आणि संगणक-इंटरनेट मुळे त्या दूर आहेत असं कधी वाटलंच नाही. सुट्टीच्या दिवशीच बोलणं होत असे. मी शनिवार रविवारची वाट बघत असे. कधी इकड-तिकडच्या गप्पा...कधी त्यांची आम्हांबद्दलची आपुलकीने चौकशी करणे... कधी साड्या खरेदी..बरेच विषय असत बोलायला. मला तर खूपच मस्तं वाटायचं...मुलींबरोबर अशा गुजगोष्टींचा खूप आनंद मी घेत होते. लीनू चा वाढदिवस आला मधे तर तिला छानशी फुले, चॉकलेट ह्या आई बाबांनी नेटद्वारे पाठवली. वाढदिवसाचा दिवस तिच्या शिशिर ने पाठविलेल्या गुलाबांना आईबाबांनी पाठविलेल्या गुलाबांची जोड मिळाली. आणि लीनू ने फोन करून घर फुलांनी आणि त्याच्या सुवासाने दरवळल्याचे सांगायला लगेच आम्हाला फोन केला. तिचे घर आणि इकडे आमचे घर आनंदाने नाहून निघाले.....

प्राची चा वाढदिवस नेमका तेव्हढ्या काळात नव्हता. पण असा भेदभाव हे आई बाबा कधीच करणार नाहीत. एका लेकीचे कौतुक झाल्यावर दुसरीचे होणारच.. रुचिर ने तिला काही भेटवस्तू व फुले पाठविल्यानंतरच्या आठवड्यात आम्ही तिला एक छानशी पर्स आणि फुले पाठवलीत. तिच्यासाठी आम्ही पाठविलेली भेट आश्चर्य देणारी असेल..... फोन करून तिने सांगितले की सकाळी सकाळी मला अकस्मात आनंद मिळून पुढचा दिवस छान गेला.


असेच उरलेले दिवस प्रतीक्षेत चिंब भिजत गेलेत. तिकडे त्यांची दोघींची वेगळी चलबिचल असेल आणि इकडे आमची वेगळीच.... ह्या ३-४ महीन्यांच्या मधल्या काळात अशा गप्पा मारून आमच्यात नातं निर्माण झालेच होते. त्यांना सुरूवातीपासूनच 'ए आई' वर सीमित केले होते त्यामुळे लेकींची जवळीक झाली असं म्हणता नाही येणार कारण आम्ही दूर कधी नव्हतोच... बस आता त्यांच्या आगमनाची तयारी करता करता दिवस गेलेत व लग्नं होऊन राण्या आपल्या घरी आल्यात.... क्षण असे भाग्याचा....

एकदम दोघी मुलींचा गृहप्रवेश झाला....इथे चार शब्द माझ्या दोन्ही राण्यांसाठी पण संबोधन एकीलाच उद्देशुन....


वाटेवरीच जिच्या हे
डोळे होते लागलेले
आगमन झाले तिचे
अमुच्या चौकोनी घरकुली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

स्मित गोड गालावरी
गूज प्रीतीचे सांगूनी
गुंफित नव प्रेमबंधने
हळूवार ती लाजत आली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

तरुवेली वर गंधसुमने
फुलोरा जाईचा फूले
दरवळली रातराणी
फुलली अंगणी सदाफूली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

छेडत सूर आसावरी
गान गाता ताल सुरी
सुस्वागत करण्या तिचे
गीत घेऊनी सांज आली
सून नव्हे आम्हा लेक लाभली

दीपिका 'संध्या'

२ टिप्पण्या:

mau म्हणाले...

अग्ग् किती छान लिहीले आहेस...खुप शिकण्यासारखे आहे तुझ्या कडुन...भगवान् देता हे तो छप्पर फ़ाडके देता हे,एक बेटी मांगी थी,उसने दो दे दी..[:)]

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

होय खरंय....दोन राण्या मिळाल्यात मला एकदम...
धन्यवाद...