शनिवार, १५ ऑगस्ट, २००९

१५ऑगस्ट चा माझा दुहेरी आनंद...

आज १५ ऑगस्ट
स्वतंत्रतादिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!!!






अमुचा तिरंगा अमुच्या हाती.....


स्वतंत्रता दिनाच्या जुन्या आठवणी तर खूप आहेत. जेंव्हा शाळेत होते तेंव्हा १५ ऑगस्ट ची तयारी १४ ऑगस्ट च्या संध्याकाळीच सुरू व्हायची. आई पांढरा स्वच्छ फ्रॉक धुवून इस्त्री करून तयार ठेवलेला असायचा. पांढरे स्वच्छ कॅनवास चे बूट तयार करणे महा कर्म कठिण. कारण पावसाळा दिवस आणि दर शनिवारी पांढरे बूट घालावे लागत शाळेत. त्यामुळे त्यावर कळाच चढलेली असे पण १५ ऑगस्ट ला नीटनेटके जाणे मनामधे ठाम असे. खूप स्वच्छ धू-धा करून बुटाला पांढरे पॉलिश करत असे मी. १५ ऑगस्टला पांढरा फ्रॉक, लांबसडक केसांना लाल रंगाची रिबन लावून त्या दोन वेण्या, पांढरे बूट घालून आम्ही सगळीच मुलं खूप उत्साहात आनंदात ध्वजवंदनाला जात असू.

माझ्या मुलांपर्यंत जरा चित्र बदलेलं होतं. १५ ऑगस्ट ला शाळेत जाण्याचा उत्साह कमी झाला होता मुलांमधे. बाकी मुलांचा कसाही कल असेल... 'कुठे जाता शाळेत सकाळी सकाळी ७ वाजता.. झोपू या झालं...' असा विचार मित्रांचा असला तरी त्यांच्या म्हणण्यात रुचिर शिशिर कधी आले नाहीत. माझ्या शाळेत जाण्याच्या आग्रहाला कधी विरोध केला नाही. बोलता बोलता आम्ही काय करत होतो ते सांगत असे त्याचाही परिणाम असू शकतो.. पण मित्रांना पटवून त्यांना पण शाळेत जायला भाग पाडत. माझी तयारी मी करून घेत असे शाळेत जाण्याची...आता थोडा फरक असा होता की मीच कटाक्षाने सगळी त्यांची तयारी करून देत असे. पाऊस असेल तर त्यांचे बाबा त्यांना शाळेत घेऊन जात असत. मी सांगत असे की शाळेत गोड खाऊ मिळेल... शाळेत जरी नाही मिळाला तरी मी घरी ह्या दोघांसाठी व बरोबर येणार्‍या मित्रांसाठी काहीतरी खाऊ (निदान एक छोटे छोटे चॉकलेट तरी...) आणून ठेवत असे. शाळेत काय भाषण झाले... कोणत्या शिक्षकांनी स्वतंत्रता ह्या विषयावर काय माहीती दिली विचारत असे... (फारसे काही सांगता येत नसे कारण ध्वजवंदन व राष्ट्रगीत जरी उत्साहात म्हंटले असेल तरी बाकीचे बरेच बरे होते....ते तर माझ्याकडून माफ होते..काही झाले तरी बालपणच होते नं...)...


पुढे जाऊन सगळंच बंद झाल्यासारखं झालं. बराच काळ तसाच लोटला. कदाचित फक्त टीवी वर बघण्यापर्यंतच सीमित राहीले. अमेरिकेला जेंव्हा उच्च शिक्षणासाठी रुचिर शिशिर गेलेत तेंव्हा पुन्हा एकदा तिथे भारतप्रेम दिसलेच. कन्सास च्या भारतीय दूतावासामधे ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला दोन्ही वर्षी उपस्थित राहीलेत. फोटो काढलेत... आम्हाला दाखवलेत....


स्वतंत्रतादिन असो किंवा प्रजासत्ताक दिन...तिरंग्याच्या सन्मानार्थ भारतीय दूतावासात जातातच पण जिथे जिथे भारताचा संबंध आहे जसे सानिया मिरझा च्या प्रोत्साहनार्थ तिच्या टेनिस मॅचसाठी ह्या जोडीने थेट न्यूयार्क गाठले होते. तसंच मित्रमंडळींना एकत्र करून विश्वचषक क्रिकेट चा अंतिम सामना भारतातून मागवलेले विश्वचषकाचे कपडे घालूनच बघितला होता. अभिमान आहे आम्हाला आमच्या मुलांचा... भारताबाहेर राहून भारतीयत्व जपताहेत ह्याचा....
भारत माता की जय!!!



स्वतंत्रता दिनाच्या माझ्या आठवणी झाल्या.... तिरंग्याचा अभिमान होताच...आजही आहेच..पण त्याचबरोबर आता गेल्या ९ वर्षापासून माझे आयुष्य इंद्रधनुषी रंगांनी रंगवले आहे आमच्या अभिव्यक्ति या साप्ताहिकाने. १५ ऑगस्ट हा अभिव्यक्तिचा वाढदिवस. १०व्या वर्षात पदार्पण करणारी 'अभि' माझ्या ह्रदयाच्या एका कप्प्यातच आहे. कधी कधी निरुत्साही वाटणार्‍या जीवनांत आनंदाची, उत्साहाची उधळणच होत असते. दिवस सकाळी ५.३० वाजता संगणकावर 'अभि' बरोबर सुरू होतो. व संपतो पण 'अभि' बरोबरच... 'अभि' च्या सहवासात 'अनु' (अनुभूति) आल्यावर तर अजूनच रंग खुललेत. कथा-कविता वाचन वाढले. हळूहळू लेखनाचा स्रोत मिळाल्यासारखे वाटले व लेखन पण जोमाने सुरू झाले.




२००० साली 'अभि' ला सुरूवात झाली. प्रथम मासिक प्रसिद्ध करत होतो. दरमहीन्याच्या १ तारखेला. सगळंच नवीन होतं आम्हाला. पण नेटाने करत राहीलो आणि १ जानेवारी २००१ ला पाक्षिक केले. चांगला प्रतिसाद आणि आमचा उत्साह वाढला. तोपर्यंत जरा स्थिरावलो होतो म्हणून १ मे २००२ पासून त्याला आम्ही साप्ताहिक बनवले. महीन्याच्या १, ९, १६ आणि २४ तारखेला प्रकाशित करत असू. बराच काळ हा असाच प्रवास सुरू राहीला. १ जानेवारी २००८ पासून मात्र त्यात पण बदल केला व आता दर सोमवारी नवीन अंक आम्ही प्रकाशित करतो.

ही ९ वर्षे कशी पळलीत-धावलीत...कळलंच नाही. खूप नव-नवीन चांगल्या व्यक्तिमत्वांची ओळख झाली. नवीन शिकायला मिळाले. माझ्या आणि पूनमच्या अथक प्रयत्नांना भरघोस यश सगळ्या वाचकांमुळे मिळत गेले व पुढे पण मिळत राहीलच.... राष्ट्रभाषीय प्रत्येक व्यक्तिचे, त्याच्या लेखनाचे इथे नेहमीच स्वागत केले जाते...

वाचकांच्या प्रतिक्रिया आणि काही चांगल्या सूचनांमुळे 'अभिव्यक्ति' वेग-वेगळ्या प्रसंगी नव-नवीन रूपात येत असते. 'अभि-अनु' चे वाढदिवस आमच्यासाठी आपल्या मुलांच्या वाढदिवसांप्रमाणे एक उत्सवच असतो... फरक इतकाच की मी व पूनम सगळे काम बरोबर करतो आणि संगणाच्या रूपाने जवळ असतो त्यामुळे 'अभि-अनु' चे वाढदिवस पण संगणकावरच मनवले जातात....अति उत्साहात..अति आनंदात..!!!!!



दिन वर्षांची उलटली पाने
'अभि' बहरली बहरतच गेली
आपुल्याच पण दूरदेशींच्या
भारतीयांना जी भावली

कधी भिजली चिंब जलधारेत
वसंतोत्सवी कधी फुलली
साहित्याचे तुषार उडवित
सगळ्यांना तू भिजवत आली

वाढता दिनोंदिन महिमा तुझा
ह्रदयी सकलांच्या विराजिली
आठवडी घेते नवरूप तू
वाढदिवशी आज 'अभि' हसली

'अभि' ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!

तर असा हा माझा १५ ऑगस्ट चा दुहेरी आनंद....

दीपिका 'संध्या'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: