शुक्रवार, २२ मे, २००९

मला पुन्हा शाळेत जायचंय....


आमच्या वेळेचा काळ कृष्ण-धवल. किती गोड त्या आठवणी असाव्यात शाळेतल्या. मनांत साठलेल्या, कुठेतरी जशी काय मी घडले आहे त्यात सहभागी झालेल्या.... घडलेल्याला कोरीव रेखीव बनवण्यात किती तो मोठा वाटा असतो ना त्यांचा. इतका काळ लोटला...नंतर मुलांच्या शाळेचे दिवस संपूनही बरीच वर्षे झालीत. त्यांच्या शाळेच्या दिवसांत मी पुन्हा माझे बालपण...शाळेचे दिवस जगल्यासारखे वाटून गेले होते. अर्थात दोन्हींमधे फरक तर जमीन-आसमानाचा होताच पण तरी....

एकदा कुठेतरी अशीच एक कविता वाचनांत आली होती, बरेच दिवस झालेत त्याला. आज पुन्हा प्रकर्षाने आठविण्याचा प्रयत्न करत होते। थोडी फार त्याच आशयाची ही कविता... मला खूपच आवडला होता तो विषय...

एकदा तरी मला शाळेत पुन्हा जायचेच आहे......
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय,
धावतजाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खडया आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपलं नांव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडून
नळाखाली हात धरूनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या
चिंचा बोरं पेरू काकडी सगळं खायचय

सायकलच्या चाकाला स्टंप धरून
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का
हाविचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय

घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करून
सायकलची रेस लावूनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधून निघून बाहेर पळायचय,
ती पळून जायची मजा अनुभवायला
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळून पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय
आदल्या रात्री किती ही फटाके उडविले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचंय
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझ पाठीवर वागवायचंय
कितीही उकडत असू दे व़ातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचंय
कितीही तुटका असू दे, ऑफिसातल्या एकटया खुर्चीपेक्षा

दोघांच्या बाकावर तीन मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...

ही कविता माझी नाहीये पण मी ह्या कवितेत जगले मात्र अगदी पूर्णपणे.......

दीपिका जोशी 'संध्या'
११ डिसेंबर २००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: