शुक्रवार, २२ मे, २००९

आई च्या आठवणीत मी.....

मातृदिवस परवा आला व गेला. मातृदिवस-पितृदिवस.... ह्या असल्या दिवसांची गरजच नाही असं वाटतं. आई वडिल नजरेसमोर असतील तर.. बरोबर असतील तर त्यासारखा आनंद नाही पण काळाच्या पडद्याआड गेले असतील तरी ते तर आपल्या नजरेत... ह्रदयात ...रक्तातच आहेत..कधी विसर पडणार का आपल्याला की त्यांच्या आठवणी काढाव्या लागतील. मनाचा एक कोपरा असा आहे की जिथे ते नेहमीच वसत असतात. आपण मनोमन सतत त्यांना स्मरतच असतो.

आज
१५ मे... काळ असा जातोय.. क्षणभर ही माझ्या मनातुन जी गेलीच नाहीये त्या आईला जाऊन आज पूर्ण तीन वर्ष झालीत. तेंव्हापासून प्रत्येक कृतित आई हा पदार्थ असा करायची...आई हे असं करायची...आई हे तसं करायची..असं म्हणत म्हणतच माझा दिवस सुरू होतो. सकाळी सकाळी भाजीत घालायला लागणार्‍या गोडा मसाल्यापासून तर संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून रामरक्षा-शुभंकरोती म्हणण्यापर्यंत तुलनाच तुलना.
दुसर्‍या आई चे (माझ्या सासूबाई) पण असंच होतं सगळं. संसार कसा करायचा हे मी त्यांच्याकडुनच शिकले. रुचिर शिशिर जुळे असले तरी त्या बरोबर असल्यामुळे त्यांना वाढवणे कधी कठिण गेलेच नाही। कुवैत ला आम्ही आल्यामुळे त्या मुंबईतच होत्या. दर वर्षी चक्कर असायचीच आमची. माझे आई बाबा व त्या....कुवैत भेटीत कायम बरोबर यायचे... गप्पांमधे दिवस घालवित असत पण इथे यायचाच कंटाळा करत कारण इथे बाकी काहीच विरंगुळा नाही। भारताच्या झटपट-पळापळीच्या जीवनाची इथे काय ती सर येणार... दिवस जात होते.

२००३ पासून गेली ४-५ वर्षें बरीच धकाधकीत गेलीत. माझे कुवैत ला राहणे कमी व भारतभेट चकरा वाढतच होत्या. माझे आई बाबा आणि सासूबाईंच्या तब्येतीच्या कुरकुरी सुरू झाल्या होत्या. तिघांचेही वय बोलू लागले. २००४ च्या जून महीन्यांत आमच्या आई आजारी पडल्यात. दवाखान्यात आहेत म्हंटलं की.....धावत मुंबई गाठली. माझ्या सौं वीणावंस त्यांची अतोनात सेवा करतच होत्या. मोठ्या बहीणीची, सौ.वीजूवंसची साथ होतीच. गरमीची रणरण..माझे आई बाबा भाऊ भावजय सगळेच गाडीने आईंना भेटायला पुण्याहून आलेत. आईंना असे हॉस्पिटल मधे बघून सौं. आई हबकली. आमच्या आईंना म्हणते, ''सिंधूताई, हे असं कसं चालेल, लवकर उभ्या रहा, तब्येत सावरा..''आईंच्या चेहर्‍यावर सौं. आईला बघून स्मितहास्य. सगळ्यांनाच बरं वाटलं. पुढे म्हणते...''आपण ठरविले आहे नं की लवकरच आपल्या रुचिर शिशिर कडे त्यांचे घर बघायला जायचे आहे. इतका लांबचा प्रवास आहे, आपल्याला तिघांना हिम्मतीने सगळे पार करून अमेरिका गाठायची आहे नं...''

आमच्या
आईंच्या मधून मधून होणार्‍या नागपुर भेटीमधे गप्पांमधे नातवांच्या घरी अमेरिकेला जायचे स्वप्न तिघे मिळून रंगवायचे. सिंगापुर बैंकाक, युरोप नंतर आता अमेरिका वारी नातवांच्या घरी होऊ घातली होती. काय काय दोघींचे बेत ठरले होते ते कधी कळलेच नाहीत.

आई
बर्‍या होऊन घरी आल्यात. आम्ही दोघे कुवैत ला परत आलोत. थोडेच दिवस गेले होते मधे तर आता सौं आईसाठी धावत जाणं झालं.. डायबिटीस ने शरीर थकत चालले होते. मे नंतर ३ महीन्याचत म्हणजे ऑगस्ट मधे भाचीच्या लग्नाला औरंगाबादला जायचे होते तर जाता-जाता आई बाबांना भेटून पुढे जावे अशा विचाराने पुणे गाठले. तिथली परिस्थिति माझी जून महीन्याची भेट आणि त्यावेळी असलेल्या परिस्थितिपेक्षा फारच वेगळी होती. फक्त ३ महीन्यांतच सौ. आई सगळीकडूनच थकलेली मला भासली. माझे भाऊ भावजय प्रचंड सेवेत होते आई बाबांच्या. त्यांच्या तब्यतीकडे बघून माझा पाय निघेना व भरीत भर ते दोघेही काढू देईनात त्यामुळे भाचीच्या लग्नाच्या १ आठवडा आधी सौं वीणावंसकडे पोहोचायचे असे ठरवून कुवैतहून निघालेली मी जेमतेम लग्नाच्या २ दिवस आधी औरंगाबादला पोहचु शकले.. लग्न आटोपून मी कुवैत ला परत आले. लग्नांत आमच्या आईंची तब्येत बरीच सावरली होती. नातीचे लग्न त्यांनी छान अनुभवले, लग्नाची मजा घेतली. सगळ्या कार्यक्रमात प्रयत्नांति सहभागी झाल्यात.

दोघी
आयांच्या तब्येती बाबत मधले ५-७ महीने असेच फोनाफोनी...''वरखाली होतच राहणार..इथला काळजी करू नका...चलता है..'' अश्या वाक्यांचा कुठे तरी दिलासा भारतातून मिळत राहिला व दिवस-महीने पुढे जात गेले. २००५ च्या मार्च मधे १५ तारखेच्या सुमारास आम्हाला फोन आला की सौं. आईला आयसीयू मधे ठेवले आहे तर लवकर ये.. दुसर्‍याच दिवशी मी पुण्यात पोहोचले. नंतर समजले की हार्ट अटॅक आला होता व एंजिओग्राफी करून कळले की बायपास सर्जरी करावी लागणार. धाबे दणाणलेच होते आमचे सगळ्यांचे पण हल्ली ते पण इतके सोपे झाले आहे... आणि आमच्याच घरांत बरेच आहेत ज्यांचे बायपास नंतर जीवन एकदम सुरळीत सुरू पण आहे. हो हो नाही नाही, एकमेकांना धीर देणे, संदीप चा हात हातात घेऊन तिचे रडणे, पुढची सांत्वने, एका आठवड्यांत पुन्हा घरी परत येण्याचा शेवटचा मिळालेला दिलासा.... ह्या सगळ्याची काही तासांत देवाणघेवाण झाली व शेवटी बायपास झाली.

आमच्या
आईंना तिला खूप भेटायला यायचे होते. ती दवाखान्यातुन घरी परत आली की या असे मी म्हंटले होते कारण त्यांची पण तब्येत कुठे ठीक होती इतकी. ९ मे २००५ ला तिची बायपास झाली. १० मे ला सौं. आईचा ६९वा वाढदिवस झाला. सगळ्या डॉ. नी व आम्ही बाहेरून तिला शुभेच्छा दिल्यात. (ती आय.सी.सी.यु. मधे होती तर भेटता येतच नव्हते) असे समजत होतो की तिच्यात सुधारणा होते आहे, पण तिला तिथे खूप एकटे वाटत असावे. सौं मनीषा (तिची सून.....माझी भावजय) च्या नावाचा जप सुरू होता. डॉ. नी तिची परिस्थिति बघुन सौ. मनीषा ला भेटण्याच्या तिच्या इच्छेला मान दिला. सौ. मनीषा ने आंत जाऊन तिला समजावले की उद्या इथून बाहेर स्वतंत्र खोलीत आपण जाऊ या. १६ मे ला सकाळी आयसीसीयू मधून बाहेर वॉर्ड मधे आणणार वगैरे सगळे ठरले असतांना अचानक १५ च्या रात्री काय घडले असावे आंत काही कळलेच नाही. अत्यधिक परिस्थितिची जाणीव होण्यापुर्वीच तिच्या जाण्याचा निरोप येणे आमच्या समजण्या पलीकडचे होते. इतके जिवाला थकवून गेले की शब्दांत सांगणे खूपच कठीण. रात्री मी व सौ. मनीषा दवाखान्यात राहात असू. त्यामुळे आम्हालाच त्या हळव्या व कठिण प्रसंगाला तोंड द्यावे लागले. सगळंच कसं सुन्नं झालं होतं. कधीच आम्हा कोणाला त्या 'बायपास' ची भिती वाटली नव्हती. मग असे का व्हावे. डॉ तरी काय उत्तर देणार..आमचे प्रश्न तर अनंत होते. सगळ्यात वाईट ह्याचे वाटत असतं सतत की तिला आम्ही कधीच एकटे सोडले नाही, बाहेर बसून सतत तिच्या बरोबर असण्याचे आम्हाला भासत होते पण ती एकटीच आहे, तिच्याजवळ कोणी नाहीये हे तिला भासत होते व त्याच दुःखात ती आम्हाला सोडून निघून गेली.

मुंबईला
आमच्या आईंना कळल्याबरोबर त्यांची सौं आईला भेटायला न मिळण्याची खंत खूपच वाढली. आल्याच धावत त्या आईला भेटायला व असे कधीही न बोलणार्‍या सुधाताईंना बघायला.... त्यांच्या मनांत खूपच वादळ सुरू झाले असावे. त्या वादळाची काय....पण साधी हवेची झुळुक पण आम्हाला जाणवलीच नाही. मुंबईला परत जाता-जाताच त्यांचे सुरू झाले की मला आता जगायचं नाही. आयुष्य ही देवाची देण आहे, मनांत काही आले तरी असलेले आयुष्य जगणे तितकेच अपरिहार्यच आहे हे कळत असूनही त्यांना वळत मात्र नव्हते. तशा तर त्या खुप विचारी व जग...जगातली सुख दुःख बघितलेल्या...टक्के टोणपे खाल्लेल्या असल्याने खंबीर भासत असत पण कधी कधी असले धक्के त्यापलिकडे जाऊन खंबीर असलेल्या माणसाला कोसळायला भाग पाडतात..तसंच झालं.

दुःखातच
सतत राहिल्याने त्यांच्या तब्येतीवर परिणाम जाणवण्याइतका झाला. ४ जूनला दवाखान्यांत भरती करण्यापर्यंत मजल गेली. ३ दिवसांनी म्हणजे ७ जून ला हे मुंबईला त्यांच्याजवळ दुपारी पोहोचले. (३ जून ला च माझे एक मोठे ऑपरेशन झाले त्यासाठी हे पुण्याला आलेच होते. ते पार पडल्यावर व मी दवाखान्यातुन घरी आल्यावर हे मुंबईला आईंकडे गेलेत ते पण सरळ दवाखान्यातच) ह्यांना आलेले बघितले...दोन-चार शब्द काही तरी बोलल्या मुलाशी. संध्याकाळ होता होता घर-घर वाढलीय असे वाटले आणि कळायच्या आंतच आईंनी पण शेवटचा श्वास घेतला. जशी ह्यांचीच वाट बघत असल्यासारखे ह्यांना भेटून बघूनच मग गेल्यात. माझी परिस्थिति अशी की उठायचेच नव्हते. किती कमनशीबी मी की शेवटचे बघता पण आले नाही मला....माझी आई त्यांची छान मैत्रीण, आपल्या मैत्रीणीलाच भेटायला गेल्यासारख्या त्या इथे आम्हा सगळ्यांना पोरके करून गेल्या होत्या. दोघींची आपल्या नातवांचे अमेरिकेतले सुंदर घर, त्यांचे वैभव बघण्याची इच्छा मात्र मागे ठेवून...बरोबर राहून दोघींचे एकसारखेच वेळोवेळी आशीर्वाद होतेच आणि नंतर ही राहणारच...पण...

कुठलाही
क्षण असा नाहीये आम्हा दोघांचा की मनांत त्या नाहीत....मागे राहिलेल्या सुखद-दुःखद आठवणींना तर अंतच नाही दोघींच्या पण....
दोघी आई माझ्या आठवणीतच.... सतत माझ्या बरोबरच राहणार्‍या...
आमच्या दोघी आयांसाठीच हे चार शब्द...

कठिण आई बद्दल लिहीणे
'आई'ला ते व्यक्त करणे
शब्द अपुरेच हो पडती
आई... बस ती आईच होती

वेदनेत आईच सदा आठवली
उन्हात असते तीच सावली
मायेची उब थंडीत मिळती
आई... बस ती आईच होती

परिसापरी ती सदैव झिजली
पण, दिन आम्हा आले सोनेरी
मान-स्वाभिमान ठेवून होती
आई...बस ती आईच होती

जुळ्या नातवांवर माया भारी
दुधावरच्या सायी सम प्यारी
आजी सदैव कौतुक करती
पण....आई...बस ती आईच होती
आई...बस ती आईच होती

दीपिका 'संध्या'
१५ मे २००८

काही प्रतिक्रिया

आशा जोगळेकर

खूपच भावस्पर्शी लेख. आई म्हणजे आई..फक्त आईच असते. तिची तुलना आणखी कशाने होतच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: