बुधवार, २० मे, २००९

आम्ही असे भेटलोत..





मी आणि पूनम






मातृभाषेवर माझे निस्सीम प्रेम आहे. वाचनाची खूप आवड होतीच. इथे कुवैत ला सप्टेंबर १९९७ मधे आल्यावर वेळ घालविण्यात ह्या पुस्तकांनी माझी खूपच साथ दिली. एकटेपणा, भारतापासून...आपल्या आप्त-स्वकीयांपासून दूर आल्याची भावना माझ्या मनांत कमी रूजली. हळूहळू मराठी व बाकी इतर मित्रमंडळी भेटलीत व इथले जीवन सुखकर होण्याच्या मार्गावर आले. त्यानंतर वर्षभरांतच कंप्यूटर व नेट च्या सहवासाने सोन्याहून पिवळे झाले. नेट वर पण बरीच मित्र-मैत्रिणी भेटू लागलीत. कॅनडा चा अश्विन गांधी आणि दुबई ची पूर्णिमा वर्मन त्यातलेच।

नेट वर अंतराला आणि कुठल्या देशांत. . .ह्याला काही महत्वच राहिले नाही नं! समवयस्क असल्याने नेट वरच छान गट्टी जमली. काही तरी भरघोस करावे असे विचार मनांत येऊ लागलेत. बाकी सविस्तर पुन्हा कधी आमच्या त्रिकुटा बद्दल... पण इतके खरे की आज आम्ही तिघांनी मिळून जे अभि-अनु सुरू केले आहेत त्यांना अभिमानाने आणि नेटाने... मेहनतीने आणि सफलतेने प्रगतीपथावर पूढे नेत आहोत. अशा माझ्या जवळच्या मित्रांबद्दल चार ओळी-

होती तहान एक थेंबाची
पुढ्यात हा सागर उसळावा
वाटे हसावे एक फूल अंगणी
असंख्य फुलांचा ताटवा फुलावा
अश्विन पूनम सम जिवलग मित्रांचा
अचानक असा लाभ व्हावा

आज बस येव्हढेच.....

पण असं म्हणुन चैन पडत नाहीये....तर थोडं पुढे जाऊच या..कारण ह्या मैत्रीची पुढची वाटचाल पण खूपच गम्मतशीर आहे......


नेट वर आम्ही भेटलो तो पण एक मस्तं मजेशीर किस्साच आहे....

"ठक, ठक!!"
कोणी तरी माझ्या कंप्यूटर वर आवाज देते होते. एक नांव दिसले, 'पर्ल'.
नाव बघून तर वाटले कोणी तरी महिला असावी, कुठल्या देशाची, किती वयाची, काय करत असावी, वगैरे-वगैरे किती तरी विचार माझ्या मनांत फेर धरून नाचू लागले. जेंव्हा त्या "ठक ठक" ला उत्तर दिले तेंव्हा कळले की तिचे नांव 'पूर्णिमा' आहे, ती पण आमच्या प्रमाणेच भारतीय आणि समवयस्क गृहिणी असून नुकतेच दुबई मधे सध्या आहेत. इंटरनेट आणि कंप्यूटर मुळे सगळे जग किती जवळ आले आहे हेच खरे. इंटरनेटशी नाते जुळले की बाकी पण बरीच नाती-गोती, मित्र-मैत्रिणी मिळू लागतात ज्यांच्याशी पुढे जाऊन मनाची जवळीक होते. आपुलकीचे संबंध व्हायला वेळ लागत नाही.जवळपास ८ वर्षांपासून इंटरनेट शी नाते आहे माझे, पण सुरूवातीला इंटरनेट फक्त वेळ घालविण्याचे साधन होते मला. खोलात शिरले तेंव्हा उमजले की इंटरनेट इतके असीम आहे की कोणत्याही दिशेला स्वैराचार आणि हवा तो विषय इंटरनेट वर उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे प्रथम मराठी व हिंदी दैनिक वर्तमान पत्र, बाकी काही साप्ताहिके वाचण्याला प्रारंभ केला. हे करता-करताच समजले की हया इंटरनेटच्या माध्यमातून मित्र-परिवार पण वाढवू शकतो, पण कसा? हा विचार मनांत असतानांच पूर्णिमा ने आवाज दिला होता.

गप्पा सुरू झाल्या, विचारांचे आदान-प्रदान झाले तर समजले की खूप साम्य आहे आमच्या दोघींच्या विचारात. ती तर हिंदी भाषी आहेच पण माझ्या हिंदी भाषेच्या प्रेमाने आम्ही दोघी अजुनच जवळ आलो. रोज सकाळी ठरलेल्या वेळी इंटरनेट वर दोघी एकमेकींची वाट बघत असू. दोन-तीन महीन्यांतच खूप आपलेपणा जाणवू लागला. पुढे वर्ष कसे संपले कळलेच नाही. आता 'तुमच्या-आमच्या' वरून गप्पा करतांना 'तुझे-माझे' वर आलो होतो. नकळत ती माझ्यासाठी 'पूनम' आणि मी तिच्यासाठी 'संध्या' झाले. माझ्यापेक्षा थोडीच मोठी आहे ती वयाने पण कधी कधी चिडवायला तिला 'ताई' पण म्हणायला मी कमी करत नाही. पण सगळयाच्या वर आमच्या मनाची जवळीक फारच अनमोल आहे. पत्रकार क्षेत्रांतील असल्यामुळे तिने आधी भारतात असतांना पुष्कळ मासिक साप्ताहिकांसाठी काम केले होते. बदलत्या काळाबरोबर कंप्यूटर क्षेत्रातले ज्ञान पण खूप मिळविले आहे. इंटरनेट मुळे खूप लोकांच्या सान्निध्यात ती आहे. नंतर समजले की ती एका इंटरनेट पत्रिकेसाठी पण काम करते.

आता आम्ही दोघी एकमेकींना खूप समजू लागलो होतो. माझ्या स्वभावानुसार आणि उत्साह बघून ती मी नवीन-नवीन गोष्टी शिकाव्यात म्हणून प्रोत्साहित करत असे. ती ज्या इंटरनेट हिंदी मासिकासाठी काम करत होती त्यासाठी मी काही लिखाण करावे असे सांगण्याचा प्रयत्न करत होती. मी कधीच काही लेखनासाठी पेन हातात घेतले नव्हते, जरा अवघड वाटणारी गोष्ट तिच्या मदतीने थोडी फार सोपी झाली व माझा पहिला लेख लिहून तयार झाला। अश्या प्रकारे तिने मला म्हणण्यासाठी का होईना पण लेखिका बनविले. पूढे आजतागायत लिहिण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे. तिने मला खूप काही शिकविले आहे, कंप्यूटरची जवळून ओळख करून दिली आहे. नविन नविन चांगल्या मित्रांच्या भेटी घडवून दिल्या आहेत, जे तिच्या परिचयाचे आहेत. त्यातलेच एक आहेत अश्विन गांधी. कॅनडा ला ३० वर्षांपासून वास्तव्यात असलेले अश्विन खूपच मजेदार स्वभावाचे वाटले. आता आमच्या तिघांच्या इंटरनेट वर भेटी सुरू झाल्यात, कधी गप्पा कधी काम! कॅनडाला रात्र तर आमच्या इथे दिवस, पण आम्ही जरूर भेटत असू रोजच.तिघांनी एकमेकांना फोटो पाठविलेत की अशी पण ओळख होणे आवश्यक होते. एक दिवस अचानक पूनम ने म्हंटले, "आपण तिघे मिळून एक इंटरनेट पत्रिका सुरू करू या का!" पत्रकारिता क्षेत्रातला अनुभव पूनमचाच खूप ज्यास्त होता त्यामुळे मुख्य जबाबदारी तिचीच असणार होती. आम्हाला मात्र नवीन काही तरी करायला मिळणार हया आनंदात सगळेच सहमत झालेत. नंतर त्या दिशेने विचार व चर्चा सुरू झाली. २ महीन्याच्या अथक प्रयत्नानंतर आमच्या 'अभिव्यक्ति' चे इंटरनेट च्या जगांत पदार्पण झाले. आमचा कामाचा उत्साह अधिकच वाढला होता. आमचे तिघांचे ही कामाचे क्षेत्र अगदी वेगवेगळे आहे जे आपापल्या जागी अतिशय महत्वाचे आहे. आधी पंधरवाडयाला प्रकाशित होणारा 'अभिव्यक्ति' चा अंक लवकरच आम्ही प्रत्येक सप्ताहात प्रकाशित करू लागलो. गद्य आणि पद्य ने सजलेले 'अभिव्यक्ति' साप्ताहिकाला नंतर थोडयाच दिवसांत 'अनुभूति' हया कवितांच्या वेगळया साप्ताहिकाची साथ मिळाली. अशा प्रकारे गद्य व पद्यची साप्ताहिके वेगवगळी प्रकाशित होऊ लागलीत.अभि-अनु सुरू झाल्यापासून पूर्णपणे कामात डूबलो होतो. इंटरनेट वर भेटी तर सुरूच होत्या पण आता प्रत्यक्ष भेटावेसे वाटू लागले. अश्विन त्यांच्या कॉलेज च्या सुट्टयांमधे उन्हाळयात भारतभेट करणारच होते. त्यांना दुबई ला येण्याचा आग्रह केला. आम्हाला कुवैत हून जाणे इतके कठिण नव्हतेच. इतक्या दिवसांची मैत्री, एकमेकांना बघितले नव्हते पण आता भेटीचा योग आलेला दिसत होता. मनांतून तर मी केंव्हाच दुबईला पूनम च्या घरी पोहोचली होती.

माझे पति जरा द्विधा मन:स्थितित होते, असे जावे की न जावे. पण माझी सगळयांच्या भेटीच्या इच्छेपुढे त्यांना पण जाण्याचा निर्णय घ्यावाच लागला. आम्ही कुवैत ला राहत असल्यामुळे आम्हाला दुबई बघण्याचे जरा ही आकर्षण नव्हते. दुबई साठी रवाना होण्यापूर्वी अशीच पूनम शी गप्पा मारत होते तर मला विचारू लागली, "संध्या, साडीचा रंग तर सांग जेणेकरून मला तुला एयरपोर्ट वर ओळखणे सोपे जाईल." मला खूपच हसू आले. मी मुद्दामच न सांगता, काही न बोलता इंटरनेट आणि कंप्यूटर बंद केला आणि उत्साहात दुबई ला निघालो. प्रवासात आमची दोघांची हीच चर्चा की कसे वाटेल बघून व प्रत्यक्षात भेटून. एयरपोर्ट वर एकमेकाला ओळखणे अजिबात कठिण गेले नाही. माझ्या साडीचा रंग विचारण्याची काहीच गरज नव्हती हे पूनम ला पण जाणवले. भावनेने भरलेल्या आम्ही सगळयांनी एकमेकाला मिठया मारल्यात, तो क्षण अजूनही ७ वर्षांनी पण माझ्या मनात मी जपून ठेवला आहे.














जितके दिवस बरोबर होतो सगळे, तितके दिवस सगळयाच विषयांवर चर्चा केली, इंटरनेट वरच्या आणि प्रत्यक्षात होत असलेल्या भेटीत कसा फरक आहे तो पण अनुभवला. अश्विन ने माझ्यासाठी फ्रंटपेज चे पुस्तक आणले होते, वर विचारणे कसे, "माहीत आहे ना संध्या, हे पुस्तक कशाला दिले आहे तुला! मी पण माझ्या मजेदार शैलीत उत्तर दिले, "होय तर, मग शिकायचेच आहे येऽऽऽस अश्विन।" पुष्कळ काही शिकून झाले आहे तसेच खूप शिकणे पण उरलेले आहे जे पूनम शिकविण्याचा आणि मी शिकण्याचा प्रयत्न करीतच आहोत. हे माझे मित्र अभिमान बाळगण्यासारखेच आहेत, आम्ही प्रत्येक जण आपल्याला जे येतय त्याची देवाण-घेवाण सतत करत असतो, नवीन नवीन एकमेकाला शिकवित असतो.
दुबई चा फेरफटका, सुंदर दृष्टिसौंदर्य बघता बघता खूप फोटो काढलेत, खूप आठवणी साठवल्या आहेत. दुबई चे समुद्रात स्थिरावलेले अल बुर्ज हॉटेल चे सौंदर्य रात्री बघण्यासारखे आहे, अर्थात आम्ही बाहेरूनच बघितले. आम्हाला खास आकर्षण दुबई च्या वाळवंटातील सफारी चे होते. बारीक वाळूच्या खूप ऊंच टेकडीवरून जीपने खुद्द खाली खोल उडी मारणे, खूपच भयंकर पण खूपच मजेदार! हीच तर मजा मला घ्यायची होती ज्याच्याबद्दल मी आजपर्यंत फक्त ऐकूनच होते.
दुबईतले चार दिवस कसे संपले कळलेच नाही. रात्री उशीरापर्यंत गप्पा मारत बसणे, पूनमच्या अंगणातील हिरवळीवर बसून सकाळचा गरम गरम चहा कधीच विसरता येणार नाही. परतण्याची वेळ आली तेंव्हा असे ठरविले की असेच दर वर्षी सगळयांनी भेटायचे, पुढच्या वर्षी आमच्याकडे कुवैत ला भेटू या नंतर अश्विन कडे कॅनडाला, तेंव्हा तर सगळयांनी होकारात्मक मान हलविली.

अश्विन भारताकडे आणि आम्ही आपल्या कुवैत ला परत आलो. पोहोचता क्षणीच पुन्हा इंटरनेटच्या भेटी सुरू झाल्यात. काही नाती वेळेनुसार खोलवर रूजतातच, भेटी मुळे अजूनच जवळीकीची होतात। ही आमची इंटरनेटची मैत्री माझ्या नजरेत एक वेगळाच आदर्श आहे.

जसे पहिल्या भेटीत ठरविले होते तसे कुवैत आणि कॅनडा ला तर आमचे सम्मेलन होऊ शकले नाही पण दुबईलाच पूनम कडे दोनदा भेटी झाल्यात. पहिल्या भेटीच्या वेळी कधी भेटलेलो नसल्यामुळे कुठेतरी मनांत भिती होती तोच मोकळेपणा हयावेळी अधिक होता. सगळयाच बाबतीत सगळेच खूप पूढे निघालो आहोत, ज्ञानात भर पडली आहे, 'अभि-अनु' ची पण खूप प्रगती झाली आहे, आमचा तिघांचा सतत प्रयत्न चालूच असतो त्यांना पूढे नेण्याचा. प्रयत्नाला यश पण मिळतेच आहे, आपल्या राष्ट्रभाषेला-हिंदी ला- जगात खूप पूढे नेण्याची इच्छा ठेवून आम्ही त्यात सतत व्यस्त असतो.
बघता बघता अभि-अनु चे सातव्या वर्षात पदार्पण झाले आहे. आता आम्हाला काम करायला वेळेची कमतरता भासू लागला आहे असेच म्हणा ना...एकदम खरी गोष्ट आहे हो ही.....
दीपिका जोशी 'संध्या'




दीपिका जोशी 'संध्या'

१८ जून २००६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: