शुक्रवार, २२ मे, २००९

असा माझा ऑरकुट परिवार...

ऑरकुट परिवाराची रंगत-संगत

मध्यंतरी ४-५ वर्षाच्या काळात घरातील बाकी काही कारणांमुळे सतत भारतात जाणे होत असे. मी घरीच असल्यामुळे कधी काही निरोप मिळाला की लगेच भारत गाठायचे हाच नियम होऊन बसला होता. कुवैत महाराष्ट्र मंडळात सभासद होतो पण वर्षभर होणार्‍या कार्यक्रमांत सहभागी होताच येत नसे. त्यामुळे हळू हळू बाकी इतरत्र आपल्या मराठमोळ्यांच्या पण गाठी भेटी कमी होत गेल्यात. तुमच्या कायम होणार्‍या अनुपस्थिति ने आपण सगळ्यांच्या विस्मरणांत जातो. चार पाच आप्तस्वकीय राहिलेत ज्यांच्याशी कुवैत मधे आल्यापासून जी मैत्री झाली होती ती तशीच टिकली त्या मुळे घनिष्ट होती. त्यांच्याच बरोबर दिवस जात होते. सुख-दुःखात तेच होते बरोबर...

कुवैत
मधे आल्यापासून माझा आवडता हा संगणक आणि मी.. असे समीकरण झाले आहे. जालावर (नेट वर) खूप मित्र मैत्रिणी भेटल्या आहेत. मला कामाची, काही करून दाखविण्याची थोडी दिशाही मिळाली. गेली ७-८ वर्षे मी त्यात पूर्णपणे गुंतलेली आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग आणि बरोबरच मनोरंजन सुरू असतं..

ऑरकुट
ऑरकुट चा हो-हल्ला ऐकून होते पण फारसे लक्ष दिले नाही त्याकडे. आपल्या कामांतच दिवस जात होते. सहा महीन्यांपुर्वी ठामपणे ठरविले की आता बघायचेच हे ऑरकुट काय भानगड आहे ती. जीमेल ची सभासद होऊन एकदाचे ऑरकुट सुरू केले. प्रोफाइल लिहीण्यापासून सुरूवात झाली. आपल्याबद्दल काय काय लिहायचे हे अगदी विचार करून करून लिहीत होते कारण सगळ्यांनीच (इथे कोणी यावे कोणी जावे असे आहे नं) ते वाचण्यासारखे पण असावे. ( ही झाली जरा गंमत.. :-) ). मग शिकले की मित्रमंडळी कशी गोळा करायची. सगळ्यात आधी माझ्या रुचिर शिशिर ला माझ्या मित्रांच्या यादीत सामिल केले. कुवैत मराठी मंडळींची कम्युनिटी वैभव काजरेकर (वैशाली चा मुलगा) ने सुरू केल्याचे दिसले त्यात मी सहभागी झाले. तिथे तर इथले सगळेच दिसले मला...वा!! काय आनंदाचा क्षण होता तो माझ्यासाठी. सगळ्यांना धडाधड माझे मित्र होण्यासाठी अनुमति (friend request) मागितली आणि सगळ्यांनीच मान्य केली. महीन्याभरांत माझे स्क्रॅप बुक वाढत चालले होते...मित्रमंडळींची संख्या तर विचारूच नका... मस्त वाटत होतं.

रोज
सकाळी सुप्रभात चा स्क्रॅप टाकणे हा एक छंद म्हणा... नियम म्हणा... होऊन बसला आहे आता. वैशाली व विवेक काजरेकर, जयश्री कुळकर्णी अंबासकर, अदिती जुवेकर, स्मिता काळे, हर्षदा रोंघे, सुरुचि लिमये, प्रसन्न आणि अश्विनी देवस्थळी, सौदामिनी(सविता) कुलकर्णी... (सविता इथे येऊन जाऊन असते.) किती नांवे घेणार. ही सगळी कुवैत ची मंडळी... नंतर माझ्या तोंडात सारखे ऑरकुट ऑरकुट...किती मज्जा येते वगैरे समजले तर शिल्पा धुमे पण आता आमच्यात आलीय...सहीच एकदम...

आणि
त्यात अजून एक लहान बहीण भेटली...कॅनडा ची मोनिका रेगे...इतकी जवळ आली आहे की रोज तिचा मला आणि माझा तिला व्हॉइस मेसेज असतो. किती किती ह्या ऑरकुट मंडळींचे किती किती प्रकाराने प्रेम मिळतंय...शब्दात सांगणंच कठिण...

ह्या
व्यतिरिक्त खूप आप्तस्वकीय भेटले आहेत. त्यात सगळ्यात आधी देव काका...(काका म्हंटले आहे त्यामुळे ते रागवणार मला...कारण आम्ही थोडे फार एकाच वयाचे..पण थोडी फिरकी चालतेच आहे नं... ) आधी स्क्रॅप व नंतर आता तर जीटॉक जिंदाबाद..सकाळी सकाळी सुप्रभात सुरू होतं.. किती कितींबद्दल सांगावे कळत नाहीये...असे तर खूप माझी मित्रमंडळी उल्लेखामधून सुटणार...तर माफ करा मला जी सुटलीत...त्यांच्याबद्दल पुन्हा कधी..

तर
सांगत होते की सहज मनांत आले आणि विचार केला की ह्या कुवैत च्या ऑरकुट मंडळींना मस्त घरी धम्माल करायला बोलवावं.... माझीच संकल्पना माझ्याच निरनिराळ्या कल्पनांनी आकार घेऊ लागली. दूध्व(दूऱ ध्वनि- फोन) करून विचारले तर कधी हिला वेळ नाही कधी कोणाला कुठे जायचे आहे...असे सगळ्यांचे ताळ-मेळ बसवून मी ५ एप्रिल ला ठरविले रात्रि भोज चे..... ४ तारखेला आमची महाराष्ट्र मंडळाची सहल होती..तिथे सगळेच होते.. एकदा आठवण करून दिली. (सगळ्यांच्याच मनांत ऑरकुट परिवाराचे सम्मेलनच नक्की आहे की माझ्याकडे अजून बाकी काही कारणाने मी बोलवते आहे...कारण संकल्पना जरा नवीन होती...पचनी कशी पडावी... ) जेवणाचा बेत तर ठरवून ठेवलाच होता. श्रीखंड (पुरी नाही कारण हल्ली वजन वाढणे व त्यावर ताबा..ह्या भानगडीत तळकट खायला कोणी तयार होत नाही) पोळ्या, दोन भाज्या, वरण भात हिरवी मिरची कोथिंबीरीची चटणी वगैरे वगैरे...
सगळे ठरल्या वेळी आलेत....दारांत 'ऑरकुट परिवार.. स्वागत' हे रांगोळीत लिहीलेले वाचून सगळेच आनंदलेत. मग गप्पा-टप्पां बरोबर एक घास चिवड्याचा आणि एक खारा शंकरपाळा सगळेच उचलत होते. खूपच रंगली होती महफिल. जेवणाची वेळ होत आली होती. सगळे मनसोक्त कौतुक करत जेवणाचा आस्वाद घेत होते. श्रीखंड व चटणीची (काय विरोधाभास हा.. :-).) खूप तारीफ झाली. जेवणे आटोपल्यावर मसाला पानाने (विडा) अजून मजा आणली.

निरोप
घ्यायच्या वेळी जयश्री चा नवीन अल्बम आल्याबद्दल तिचे कौतुक तिला सुंदरसा फुलांचा गुच्छा देऊन केले. आनंद आमच्या दोघींच्या डोळ्यात सामावत नव्हता. आनंदाश्रु डोळ्यात होते दोघींच्या पण....पण खूप छान वाटले...

दुसर्‍या दिवशी सगळ्यांनाच ऑफिस होते त्यामुळे गप्पा अर्धवट सोडून व खंत करत सगळेच साढे दहाच्या सुमारास घरी परतलेत। फक्त असे ठरवूनच की पुढची अशी भेट गुरुवारी किंवा शुक्रवारी (कारण इथे शुक्रवार शनिवार सुट्टी असते॥)रात्रीच घडवून आणायची...म्हणजे धूम करायला सगळेच मोकळे....

बाकी सगळ्या कार्यक्रमात फोटो काढायचे राहून गेलेत...पुन्हा कधी...पुढच्या वेळी... :-)दुसर्‍या दिवशी माझ्या ऑरकुट मधे किती किती स्क्रॅप आलेत म्हणून सांगू...आनंदाने वेडीच झाले होते...सुखावले होते...
इति.....
असा आमचा ऑरकुट परिवार प्रसन्न प्रसन्न... :-)

दीपिका
जोशी 'संध्या'
७ एप्रिल २००८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: