गुरुवार, २१ मे, २००९

काही माझ्या मनांतले...

मंडळी!!

जीवनांत उलाढाल्या किंवा चढउतार नाहीत तर मग ते कसले जीवन! अशा पण घटना असतात ज्या मनांवर कायम कोरल्या जातात। कोणाला तरी सांगावाश्या वाटतात. त्यातीलच ही एक, कदाचित तुम्हाला पण वाचून मजा येईल असा विचार करून आपल्यापुढे ठेवण्याचा हा प्रयत्न! तशी हया घटनेला २८ वर्षे झालीत पण जेंव्हा विचार करते तेंव्हा लक्षात येते कि ही सगळी काळाची किमया आहे जो हातातून निसटतच राहतो. जेंव्हा मला समजले होते कि मी आई होणार तेंव्हा आनंदाने मी तर हरखले होते पण खुशी लाजेपाई प्रगट करू शकले नाही असा हया घटकेला माझा अंदाज आहे. पाचव्या महिन्यांतच डॉ. ने जुळे होण्याची शंका वर्तविली होती. पण त्या काळच्या सुविधानुरूप हा संभ्रम आम्हाला पुढचे दोन महिने संभाळावा लागला. तेंव्हा सोनोग्राफी नसल्याने आठव्या महिन्यात एक्स-रे जेंव्हा केला तेंव्हा हया गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले कि मला जुळे होणार. हया गोष्टीने माझ्या मनांवर काय परिणाम झाला होता हे आता फारसे लक्षात नाही पण फक्त इतके समजले होते की सगळयांपेक्षा वेगळे काही तरी होणार! म्हणायला म्हणतात कि जुळे प्रकरण अनुवंशिक आहे पण आमच्या घराण्यात आधी कुठे जुळे होण्याचे ऐकिवात नाही त्यामुळे ही परंपरा आम्हीच सुरू केली असे म्हणायला हरकत नाही. पूर्ण दिवस घेवून मला ९ मिनिटांच्या अंतराने दोन गोड मुले झालीत. जुळया मुलांना बघण्यासाठी नेहमी माझ्या खोलीत गर्दी असायची, त्या वेळी त्यांच्याबरोबर माझेही महत्व वाढल्याचे मला जाणवायचे. मुलीची मला आधीपासूनच खूप आवड, पण काही हरकत नाही, दोन्ही मुले झालीत तर.... पण मुलांकडे बघून मी खुश पण तितकीच आहे, असो. मुलगी होवो या मुलगा, आई होणे हे स्त्री जीवनाचे एक स्वप्न असते परंतु हीच जाणीव ९ मिनिटांच्या अंतराने दोनदा अनुभवणे हे तर माझ्या सारखी जुळया मुलांची आईच समजू शकते.


त्यांची नांवे रुचिर आणि शिशिर ठेवली आहेत. मला माझ्या लहानपणी लहान मुलांचा अति लळा. छोटया छोटया मुलांमधे माझे मन खूप रमायचे. म्हणूनच जेंव्हा माझी आई होण्याची वेळ आली तेंव्हा देवाने माझी लहान मुलांची हौस जरा ज्यास्तच पूर्ण केली. मी पण आनंदाने हे जुळया मुलांचे आव्हान स्वीकारले होते।

जरी जुळे होते तरी सुरुवातीला ते अगदी वेगळे दिसत. मला कधीही असे लक्षात नाही की त्यांना सांभाळायला कधी त्रास झाला आहे. साधारण ७-८ महिन्यांचे झाल्यावर ते बरेचसे एकसारखे दिसू लागलेत. प्रकृति व उंची म्हणाल तर बरेच साम्य. एकमेकांसमोर त्यांना ठेवले तर कदाचित त्यांना मजा पण वाटत असेल, त्यांचे एकमेकांकडे बघून हुंकार देणे आमचे मात्र मन रमवित असे. एकसारखे कपडे घातले तर अजूनच कौतुकास्पद व्हायचे. एक मजेदार प्रसंग सांगते, जेंव्हा दोघे साधारण ३-४ वर्षांचे होते. मला नेहमी लोकांचा सहज प्रश्न असायचा की दोघांमधे मोठा कोण? एकदा अशाच प्रश्नाचे उत्तर देतांना मी बोलून गेले, "रुचिर मोठा आहे." जवळच बसलेल्या शिशिरला हे उत्तर पटले नाही. माझ्या उत्तराला प्रत्युत्तरच म्हणा ना, लगेच "नाही, नाही, आम्ही जुळे भाऊ आहोत त्यामुळे कोणीच मोठे नाही, आम्ही बरोबरीचे आहोत!" असे म्हणून पार झाला. माझे वक्तव्य चूकीचे आहे ही समज मला मुलांनीच दिली व ती चुक मी पुन्हा कधीही केली नाही।



जेंव्हा शाळेत जाऊ लागले तेंव्हा मित्रमंडळींची व शिक्षकांची धमाल येऊ लागली, कोणता रुचिर व कोणता शिशिर! पण हया दोघांनी त्याचा कधी फायदा घेतला नाही. लहान असतांना जेंव्हा 'अरे! जुळे दिसताहेत' असे कोणी म्हणायचे तेंव्हा त्यांना खूप मजा वाटायची. चौथ्या इयत्तेत होते तेंव्हाची गोष्ट. त्यांच्या शाळेत सकाळी प्रार्थनेच्या वेळी एका विद्यार्थ्याने ताज्या बातम्या सांगण्याची प्रथा होती. एक दिवस रुचिर चा नंबर होता, त्याने सांगितल्या. दोन तीन दिवसांनी शिशिर वर वेळ आली. जेंव्हा शिशिर तिथे उभा राहिला तेंव्हा त्यांच्या प्रिन्सीपल चे कथन खूप मजेदार होते. 'दोन दिवसापूर्वीच तर तू सांगितल्यास ना ताज्या बातम्या, आज कोणी दूसरा सांगेल' सगळया मुलांमधे हंशा पिकला. नंतर असमंजस मधे पडलेल्या प्रिन्सीपलांना हया जुळया भावांबद्दल सांगण्यात आले. मग त्यांनीच रुचिर ला पण मंचावर बोलविले व सगळयांनी टाळयांचा कडकडाट केला. त्यांच्या शाळेत हयांच्याशिवाय जुळयांची जोडी नव्हती म्हणून अजूनच सगळयांनी मजा घेतली. त्या क्षणी कसे वाटले होते, त्यांच्या त्यावेळच्या भावना मात्र ते व्यक्त करत नाहीत।


अभ्यासाच्या बाबतीत तसे दोघेही चांगले आहेत पण 'अगदी एकसारखे मार्कस कसे मिळणार' त्यामुळे अशा प्रत्येक वेळी मोठा नाजुक प्रसंग येत असे. अशा प्रसंगी त्यांना समजाविण्याचे नवीन नवीन उपाय मला योजावे लागत. जुळया मुलांची मानसिकता कशी असते हे समजून घेण्यासाठी हया विषयावरील बरीच पुस्तके मी वाचली. त्याच आधारावर त्यांची मने सांभाळण्याचा माझा प्रयत्न असे.जसे थोडे मोठे झालेत तसे तुझे माझे समजू लागले. एकमेकांच्या वस्तु वापरणे नामंजूर होऊ लागले. भांडणे सुरू झालीत पण फक्त घरात, बाहेर मात्र एकदम जीवाभावाचे भाऊ असल्याची वर्तणूक, किती गोड. ते दोघे एव्हाना एकमेकांचे मित्र पण होतेच पण त्याही पेक्षा त्यांच्यात एक वेगळाच दुवा होता जे तेच अनुभवू शकतात. असे म्हणतात कमीत कमी लहान असतांना तरी जुळया मुलांना एकमेकांपासून दूर करू नये व हया वक्तव्याला आमची पूर्ण सहमति आहे।

आम्ही सुरूवातीपासूनच स्पर्धात्मक परिक्षांसाठी त्यांना प्रोत्साहित केले आहे. पाचव्या वर्गात असतांनाच महाराष्ट्रात होत असलेल्या सैनिक स्कूल च्या प्रवेश परीक्षेपासून हयाची सुरूवात झाली. स्पर्धात्मक परिक्षा म्हंटल्या की जरा कठिण असणारच. मेहनतीला न घाबरता दोघांनीही मन लावून हया परिक्षेची तयारी केली. दोघेही पहिल्या दहा मधे येऊन गौरव प्राप्त केला. नंतर इंटरव्यू सातारा येथे होता. नऊ वर्षाच्या वयात सैनिकी ऑफिसरांसमोर होणारा इंटरव्यू पण हया जोडीने हिम्मतीने पार पाडला. आमच्या लक्षात आले ते असे की त्यांच्या लेखी 'भिती' हा शब्दच नाहीये व इथूनच त्यांच्या हिम्मतीत अधिक भर पडली.



जेंव्हा हे दोघे आठव्या वर्गात होते तेंव्हा त्यांचे बाबा नोकरीच्या निमित्याने परदेशात गेलेत. आता तर हया वाढत्या वयाच्या मुलांची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरच होती. पण प्रत्यक्षात झाले उलटेच. जशी त्यांनीच माझी जबाबदारी घेतली होती. खूपच समजुतदार झाले होते एव्हाना. १३-१४ व्या वर्षीच त्यांचे बालपण हरवल्यासारखे झाले ही खंत माझी आयुष्यभराची आहे हयात शंका नाही. आता तर त्यांचे व माझे मित्र-दोस्तीचे नाते झाले होते. आम्ही तीघे सगळया विषयांवर बोलत असू. आम्ही त्यांना आधी तीन व नंतर दोन चाकी सायकल वेगवेगळया घेतल्या होत्या तरीही भांडणे होत असत. पण जेंव्हा स्कूटर चालवायची वेळ आली तर की मात्र एकच! दोघांनी समजूतीने चालविली खरी. दोन चाकी सायकल मी स्वत: त्यांना त्यांच्या मागे धावून धावून शिकविली होती. त्याच माझ्या चिमुकल्यांनी मोठे झाल्यासारखे माझ्या मागे बसून मला स्कूटर शिकविली व मला जाणवून दिले की किती मोठे झालेत.



दहावी व बारावी मधे अतिशय उत्कृष्टपणे पास झालेत. पुण्याला इंजीनियरिंग पूर्ण करून आपल्या पुढच्या अभ्यासासाठी दोघेही अमेरिकेला रवाना झालेत. उच्च शिक्षणपूर्ण होताच दोघेही कामाला लागले आहेत. आम्ही दोघे कुवेत मधे व ते दोघे तिकडे. ह्या वयांत पोहोचता-पोहोचता जरा ज्यास्तच जवळ आल्यासारखे वाटतात एकमेकांच्या आणि न भांडता खरे मित्र. कितीही लहान काम असो, दोघेही बरोबर जाऊनच करणार।




बाकी जुळया मुलांच्या आई बाबांचा काय अनुभव आहे हे मला माहित नाही. पण आमच्या मुलांनी आमचा नेहमी सन्मान वाढविलाच आहे. त्यामुळेच अभिमानाने म्हणावेसे वाटते की मुले व्हावीत तर जुळी व ती ही आमच्या मुलांसारखी. आज असे जाणवते की आम्ही दिलेल्या संस्कारांचे व शिक्षणाचे त्यांनी पुरेपूर चीज केले आहे. माझ्या मनांत नेहमी येते की काय मागच्या जन्मीचे माझे पुण्य आहे की हया जन्मी मला अशी गुणी मुले लाभलीत. सुरूवाती पासूनच माझे वर्तन जरा शिस्तीचे व कडक होते. त्याचा असर त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडण्यात झाला असावा असे मी समजून चालते. हया कडक शिस्तीची त्यांना काही खंत आहे का, त्यांच्या मनांत काही अढी आहे का, हे प्रश्न आज पण माझ्यापुढे अनुत्तरित आहेत.
जेंव्हा जुळी मुले झालीत तेंव्हा सांभाळायला थोडा त्रास तर होणारच होता पण त्यांना दोघांना बरोबर बरोबर वाढताना बघायला, त्यांच्या एकेक बाललीला बघतांनाची जी खुशी मला मिळाली आहे, ती अवर्णनीय आहे।

दीपिका जोशी 'संध्या'
५ ऑक्टोबर २००७

1 टिप्पणी:

नरेंद्र गोळे म्हणाले...

बाकी जुळया मुलांच्या आई बाबांचा काय अनुभव आहे हे मला माहित नाही. पण आमच्या मुलांनी आमचा नेहमी सन्मान वाढविलाच आहे.>>

जुळ्याच कशाला कुठल्याही मुलांनी माता-पित्यांचा सन्मान वाढवला की त्यांना आभाळ ठेंगणे होते. या सद्भाग्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!

जीवनाबद्दल इतक्या कृतद्न्यतेने लिहीता येणे हेच जीवनातले यश आहे. आपले लेखन आवडले.