रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

कठिण... खूपच कठिण....

समस्यांना मर्यादा नाहीत असं भासतंय. आजच्या सकाळ मधे बालवाडीच्या प्रवेशाबाबत पानंच्या पानं आणि संदर्भी फोटो बघून हैराण झाले. बालजगत आणि ३ वर्षाच्या बाळांचे विश्व आधी काय होते आणि आता काय आहे. खरं तर त्यांच्या विश्वात थोडाफारच बदल झाला असेल पण त्यांच्या पालकांचे आपल्या मुलांच्या बालवाडीच्या प्रवेशाचा प्रश्न अत्यंत जिकरीचा झाला आहे. त्यांची ही ससेहोलपट कशी टाळता येईल किंवा ही प्रक्रिया कशी थोडी सोपी केली जाईल अशी पण चर्चा आहे. काही वर्षांनी कदाचित असे पण होईल की बाळ येऊ घातलेय कळल्याबरोबर कोणती शाळा चांगली ह्याबाबतच्या विचारांनी भावी आई वडिल चलबिचल होतील.

परवाच माझ्या बंगलोर च्या भाचीने बालवाडी मधे तिच्या मुलाच्या प्रवेशाबद्दल फेसबुक मधे लिहीले होते. मग मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्यात. कोणाला काय प्रश्न विचारले माहीत नाही पण नंतर कळले की दोन शाळांमधे त्याला प्रवेश मिळाला आहे. कुठे जायचे ते ठरवले नव्हते अजून. जिंकलीच म्हणायची...

आमची पीढी तर हेच बोलतेय की आमच्या वेळी असे नव्हते... आमच्या मुलांच्या वेळी पण असे नव्हते. आमच्या मुलांच्या वेळी बालवाडीसाठी असे नक्कीच नव्हते पण आज आठवण आली रुचिर-शिशिर च्या १० वीच्या रिझल्ट नंतरचे दिवस. नागपुरला अभ्यंकर नगर मधे गणिताच्या शिकवणुकीसाठी पत्तरकिनी सरांकडे प्रवेश घ्यायचा होता. रविवारी सकाळी फॉर्मस् मिळणार होते तर मी सकाळी ७ वाजता जाईन ठरवून आपल्या बाकीच्या कामात होते. त्यांच्या राहत्या घरीच ते क्लासेस होते. समोरच माझा भाऊ राहत होता. शनिवारी संध्याकाळी ५ वाजताच त्याचा फोन आला की इथे तर आत्तापासूनच रांग लागायला सुरूवात झालीय. त्यांच्या क्लासचे नांव खूपच होते त्यामुळे इथे जर क्लासला नाही गेलीत आपली मुले तर कसे होणार हाच विचार प्रत्येक पालकांचा होता. म्हणून सगळी धडपड. मी पण तिकडे डोकवून बघायचे ठरवले. मी पोहोचेपर्यंत रांग बरीच वाढली होती. सोसा-सोसाने मी पण तिथे उभे राहिले. तास दोन तासाने कंटाळा आला व हे प्रकरण काही इतके सोपे नाही. आत्ता तर फक्त ६ च वाजले आहेत संध्याकाळचे.. उद्या सकाळी ७ ला दार उघडणार आहे. विचित्रच सगळे... आणि विचारांनी बधिर झाले होते.

रात्र होऊ लागली तशी हळू हळू लोकांनी पथार्‍या पसरायला सुरूवात केली. आम्ही पण चटई घातली... सगळ्यांचाच थोडा राग... थोड्या शिव्या... पण शेवटी हे जे काय घडतेय ते काही त्या सरांनी थोडीच सांगितले होते. हे तर आपणच करतो आहोत हे कोणाच्याच लक्षात येईना. आई च्या ऐवजी बाबा आले.. बाबांना जेवायला घरी पाठवायला आजोबा त्यांच्या जागी येऊन बसले. असेच आम्ही पण केले. मुलांसाठी मध्यरात्री पर्यंत मी व रात्री २ नंतर ह्यांनी तिथे नंबर पकडून ठेवला होता. आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्याचा फायदा कोणी कसा करून घ्यावा.... गल्ली लहानशीच होती ती. कोणी थर्मास मधे चहा बनवून आणून तो विकायला सुरूवात केली. त्याचे बघून एका दांपत्याने चक्क टेबल ठेवून त्यावर गॅस ठेवला व सरळ सरळ मिरची भजी- कांदा भजी.... आणि अस्सा खप झाला होता सगळ्याचा. लोकं दूर-दूरून आली होती. रात्री झोप येणार नव्हती तिथे मातीत बसून.. मग वेळ घालविण्याचे हेच एक साधन होते. गप्पांबरोबर चाय पकौडे हो जाए...

सकाळी ७ ला दार उघडले, आमचा नंबर लागला फॉर्मस मिळालेत.. हुश्श.. काय अगदी एवरेस्ट सर केल्यासारखा सगळ्यांचा आनंद होता. काय तर म्हणे पत्तरकिनी सरांकडचा प्रवेश-फॉर्म मिळाला... फॉर्म चे पैसे वेगळे.. मग प्रवेश घेतला.. पैसे भरले.....अजून एकदा जीवात जीव आला...(भांड्यात जीव तर काय म्हणेन.. जीवातच भांडे पडले होते..) आणि सरतेशेवटी झाले असे की काही कारणास्तव रुचिर शिशिर त्या क्लासला गेलेच नाहीत. पैसे.. वेळ... सगळाच हिशोब जिथल्या तिथे राहीला...आहे नं गम्मत.

आता ह्या बालवाडी प्रवेशासाठी जर का पंधरा तास रांगेत उभे रहावे लागणार असेल तर.... उफ्.... फोटोंमधे दिसतेच आहे.. चहापाणी.. कदाचित खाली बसता येत नसणारे.. म्हणुन खुर्चीवर बसलेले आजोबा. कोणी काका कोणी मामा मदतीला आलेले. हातात सकाळचा चहा व त्याबरोबर वर्तमानपत्र, पण आज ते पण त्या रांगेतच... काही थकलेले चेहरे.. पण त्यातही काही हसणारे.. भान हरपणारे की आता आमचे बाळराजे बालवाडीत जाणार. व्यक्ति तितक्या प्रकृति....

माझ्यासारखेच १५ वर्षांनी ह्यातील काही लोक असाच लेख लिहीतील आणि मनांत हसत असतील...

दीपिका

२ टिप्पण्या:

नरेंद्र गोळे म्हणाले...

दीपिका,

मला सांगायला आनंद होतो की, सदरहू लेखातील सदरहू पथ्थरकिने सर आम्हाला नूतन भारत विद्यालयात गणित शिकवत असत. त्यांनी नुकतेच क्लासेस सुरू केलेले होते. मात्र त्या काळी फक्त नापास होणारेच विद्यार्थी क्लास लावत असत. त्यामुळे आम्हाला तशी गरज नव्हती. ह्ल्ली त्यांचे प्रस्थ एवढे वाढले असेल अशी कल्पना नव्हती.

असो. या लेखामुळे जुन्या आठवणी उजळल्या.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

श्री गोळे....
होय खरं आहे तुमचं... आमची मुलं पण क्लास लावायचा म्हणजे किती संकट.. असेच होते. पण १२ वी महत्वाची आहे हे पटवून पटवून राजी केले होते. व काय घडले पुढे ते लिहीलेच आहे.
आता काय प्रस्थ आहे माहीत नाही.. ही गोष्ट पण सुमारे १५ वर्षापुर्वीची आहे.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..