महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी सदस्यांना थोडी चिंता असणं साहजिकच होते कारण दिवाळीचा दिवस आणि तो पण शुक्रवार.. वेळ सकाळी ७.३० ची आणि तो पण किर्तनाचा कार्यक्रम.. थोडी आशा नंतरच्या नाट्यगीतांमुळे होती पण तरीही किती प्रतिसाद मिळेल ही धाकधुक असेलच.
चारुदत्त आफळे बुवांचे नांव खूप ऐकले होते पण ऐकण्याचा योग आला नव्हता तो महाराष्ट्र मंडळाने आणलाय त्यामुळे शुक्रवार ५ नोव्हेंबर ची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो आणि तो दिवस आला.
छान तयार होऊन.. भरजरी साडी दागिने घालून कार्यक्रमाला गेलो. स्वागत पण मस्तं... प्रवेशद्वारापासुनच सगळे शालु पैठण्या दागिने.. झब्बे-कुरते...छान सजलेले... सुंदर रांगोळी, हळदी कुंकू टिळा व अत्तर चा सुगंध.... एकदम मराठी-मराठी... मराठमोळे वातावरण फुलले होते. बहुतांश लोकांना पण अमुच्या मायबोलीमधेच ‘शुभ-दीपावली-दिवाळीच्या शुभच्छा’ असे म्हणताना ऐकुन तर मस्तं वाटले.
पोहोचलो तेंव्हा बुवा हजर होते. मंच सुदंर सजलेला होता. टिमटिम दिव्यांच्या माळांनी चमकत होता. दीप प्रज्वलन झाले. बुवांबरोबर त्यांच्या साथीला असलेले तबल्यावर मिलिंद तायवाडे व पेटीवर रेशमा मरकळे ह्यांची पण ओळख करून देण्यात आली. आफळे बुवा नाटक पण करतात अशी ओळख न करून देता आफळे बुवा संगीत नाटकात काम करतात असे सांगितल्याने जाम खुश होते. खोडकरी मजाच नं !!!
त्यांनी जशी बोलायला सुरूवात केली तसेच सगळ्यांना जाणवले असणार की आजचा हा कार्यक्रम रंगणार व आपल्याला एका जागी खिळवून ठेवणार. प्रथम किर्तन व मध्यांतरानंतर थोडी नाट्यगीते गायीली जातील असे त्यांनी सांगितले. सुरूवात झाली किर्तनाला. अहाहा... काय त्यांचा प्रसन्न चेहरा.. सतत हास्यवदन. त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, कदाचित फारशी कोणाला नसलेली वृत्तांची ओळख, सुरेल सुंदर भजनं व पदं... आणि नरकचतुर्दशी वरील किर्तनाने व त्यांच्या मधल्या मिश्किल हावभावाने कोणत्याही वयोगटाचा पण मंत्रमुग्ध झाला नसेल तरच आश्चर्य आहे. एक दीड तास कसा संपला कळलेच नाही व पांडुरंगाच्या आरतीनंतर मध्यांतर झाले.
आफळे बुवांनी मंत्रमुग्ध केलेच होते.. त्यावर दिवाळीच्या फराळाने जिभेचे चोचले पण किती पुरवावे... चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू व गरम गरम उपमा.. दिवाळी पहाटेच्या कौतुकाचे बोल सगळ्यांच्याच तोंडी होते..गरमागरम चहा घेता घेता नाश्ता प्रकरण आवरते घेतले कारण पुढचे नाट्यसंगीत खुणावत होते.
तासाभरानंतर पुन्हा बुवांसह सगळेच आपापल्या जागेवर येऊन बसलेत. नाट्यसंगीताची ओळख करून द्यावी ती आफळे बुवांनीच. नाट्यसंगीत काय असते, त्यातील हरकतींबद्दल, कशा तर्हेने बदलतात.. त्यांचे महत्व गाता गाताच सांगत होते. सुरुवात तर नांदी ने झाली पण पुढे ‘चंद्रिका ही जणू’ ‘ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी...’ जो रंग चढत गेला तो दाट दाट होत गेला. ‘ऋणानुबंधाच्या... ह्या गाण्याबद्दल बोलतांना द्वंद्व गीत का म्हणतात.. प्रेमाच्या गाण्यामधे द्वंद्व कशाला असे मिश्किलपणे सांगुन प्रेक्षकांत हशा पिकवला. गाण्यातला लटकेपणा गातांना त्यांच्या चेहर्याचे हावभाव अफलातुन होते. आलाप वेगळे ताना वेगळ्या.. स्वरांना सजवणे हे त्यांनीच करावे.
नाट्यगीत नाटकांत गाताना किती कठिण असते.. हात हलवु नका.. तोंड असे करू नका.. चिकटवलेल्या मिशा संभाळा... मजेदार किस्से...तासभर कसा संपला व भैरवीची वेळ आली. भैरवीने कार्यक्रमाची सांगता होणार हे कळल्याबरोबर मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षक भानावर आलेत. भैरवी गायनानंतर पुढे काही बोलायचे नसते म्हणुन त्यांनी मधेच आभार मानलेत व कुवेतच्या मराठी लोकांचे आई वर (मराठी भाषेवर व आपल्या मातृभूमिवर) असलेल्या प्रेमाचे कौतुक केले. टाळ्यांच्या कडकडात भैरवी संपली पण टाळ्या तशाच सुरू होत्या. खुर्चीवर खिळलेले प्रेक्षक भानावर आल्यावर जागीच उभे होते व जणु आफळे बुवांना शतशः धन्यवाद देत होते... सुरेल कार्यक्रम झाल्याची ती त्यांना पण ही एक पावतीच होती.
मला नेहमीच महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक आहे तसेच ह्या वेळी पण अप्रतिम व उत्कृष्ट कार्यक्रम दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचे खुप खुप आभार. इच्छा असलेल्या पण आत्तापर्यंत योग न आलेल्या चारुदत्त आफळे बुवांचे किर्तन, त्यांची सुरेल व सतत स्मरणात राहतील अशा नाट्यगीतांचा अनुभव दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समितीचे कौतुक!!!!
आगामी कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा !!!
दीपिका
1 टिप्पणी:
दिपुताई,वृत्तांत मस्त लिहिलात...आमच्यापर्यंत कार्यक्रम पोचला बरं का!
टिप्पणी पोस्ट करा