शनिवार, १ मे, २०१०

सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिन



महाराष्ट्र दिन

आज १ मे, महाराष्ट्र दिन. कालच्याच वृत्तपत्रात वाचले की महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी वेगळे खाते तयार केले आहे. असे करून मायमराठीचा किती सन्मान केला जाईल हे बघणे आहे. ''मी महाराष्ट्रात जन्माला आलो-आले ह्याचा मला अभिमान आहे, मी मराठी-माझी मराठी'' वगैरे वगैरे आजकाल खूपच ऐकायला येतंय. किती खरंय हे पडताळून पाहण्याची वेळ आता आली आहे आणि ही वेदना देणारी बाब आहे. मुंबई-पुणे सारख्याच शहरांमधे मराठीला तितके महत्व दिले जात नाही. आणि त्यातल्या त्यात दुःखाची गोष्ट अशी पण आहे की मराठी विषयाची मानसिकता न्यूनगंडाची आहे. घरांत जरी मराठी बोलत असतीलही तरी घराबाहेर हीच आपली मराठमोळी मुले सर्रास फक्त इंग्रजीच बोलतात. परप्रांतात राहणारे आपले मराठी लोक घरांत पण मराठी बोलतांना दिसत नाहीत. आंतरजातीय विवाहांचे सध्या चलन आहे त्यातही पुढच्या पीढीसाठी भाषेचा तोडगा म्हणून इंग्रजी भाषाच निवडली जाते. मातृभाषा व जर पितृभाषा वेगळी असेल तर ती पण घरांत शिकवली जायला हवी असे वाटते. मातृभाषा उपेक्षिली जाऊ नये हा मराठी माणसाने प्रयत्न सतत करायला हवा. परदेशातील महाराष्ट्र मंडळांमधे इंग्रजी चे च चलन असते. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे.

वर्षानुवर्षे गेलीत.. काही शब्द इंग्रजी मधले मराठी मधे आले आणि ते मराठीचेच होऊन राहीले आहेत ज्याचा वापर झाला तरी गैर वाटत नाही. त्याला समानार्थी मराठी शब्द वापरला तर अर्थ समजेल की नाही अशी परिस्थिति आहे. सकाळ ची सुरूवात Good morning ऐवजी सुप्रभात, Good night ऐवजी शुभ रात्री,  Happy b'day ऐवजी वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा hi च्या जागी नमस्कार व्हायला हवे.  

 मी स्वतः मातृभाषा मराठी व अधिकृत मानली जाणारी हिंदी ह्या भाषांना प्रामाणिक पणे जगणारी व जगवणारी आहे. सतत मराठी लोकांबरोबर मराठीतच व अन्य भारतीयांबरोबर आपल्या हिंदीचा वापर करणे ह्यावर माझा कटाक्ष असतो. 'मी मराठी-माझी मराठी' म्हणणारेच पुढच्या पावलांवर इंग्रजी बोलतांना दिसतात. संगणकावर आता प्रत्येक भाषेमधे काम करण्याची संधी आहे व उपलब्धता पण आहे. देवनागरी वापरण्यास थोडेच प्रयत्न करावे लागतात. जीटॉक, एमएसएन, याहू सारख्या ठिकाणी पण बोलतांना मिंग्लिश लिहीण्याची आता गरज नाही. ऑरकुट मधे सोय असून पण ६० टक्के लोक तर मराठी असून पण इंग्रजी मधेच बोलताना आढळतात. उरलेले कदाचित २० टक्के मिंग्लिश व २० टक्केच देवनागरीचा वापर करतांना दिसतात. जीटॉक मधे देव काकांनी 'मराठी माणसाशी संवाद साधतांना रोमन लिपीत न लिहीता देवनागरीतच लिहावे आणि कटाक्षाने मराठीत बोलावे' असे लिहून ठेवले आहे. हे शंभर टक्के खरे आहे पण किती जण ही गोष्ट अमलांत आणतात? आमचे नेहमी ह्या विषयावर बोलणे होत असते. परदेशांत एकीकडे खूप मराठी लेखन होतेय.. मराठीमधे ब्लॉग्स बनवले गेले आहेत. उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वाचकांच्या पुढे येतेय. त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. एक आहे ह्या गोष्टी अशाच हळूहळू पुढे जातील व मराठीचे साम्राज्य महाराष्ट्रात व भारतात हिंदी ला पण प्रोत्साहन मिळेल अशी आशा आपण का ठेवू नये? भारतात व भारताबाहेर आपल्या मराठी जनांनी मराठीला आपलेसे करण्याची जबाबदारी समजायला हवीय.

दूरदर्शन वर मराठी वाहिन्या बर्‍याच सुरू झाल्या आहेत. मराठी आणि हिंदी वाहिन्यांवर इतके प्रत्येक वाक्यागणिक इंग्रजी असते की ज्याला पर्यायी मराठी शब्द आहेत जे अगदी नेहमीच्या वापरातले आहेत पण लक्ष दिले जात नाही. असे पण आहे की हल्ली दूरदर्शन गावोगावी पोहोचला आहे जिथे हिंदी मराठी समजण्यास सोपे असेल जितके की शिक्षणा अभावी इंग्रजी समजणे कठिण आहे. पण कोण विचार करतो ह्याचा.. चालू आहे.. चालू आहे... जसे तसेच चालू आहे!!!!

परप्रांतात राहून मुलांना आम्ही मराठीची व्यवस्थित संवय लावली होती पण आता परदेशात स्थायिक झालेल्या त्याच मुलांची पुढची पीढी किती मराठी भाषेशी प्रामाणिक राहते तेच बघणे आहे. जसे मातृभाषेचे व हिंदी भाषेचे प्रेम त्यांना घालून-समजावून दिले तसेच पुढे तो वारसा चालवणे सर्वस्वी त्यांच्या हाती आहे.

चला तर आजच्या ह्या महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्याने ठरवू या की शक्यतोवर मराठी माणसाशी बोलतांना मराठीतच बोलू या...

दीपिका 'संध्या'

११ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

उत्तम लेख.

परंतु

>> अन्य भारतीयांबरोबर आपल्या राष्ट्रभाषा हिंदीचा वापर करणे ह्यावर माझा कटाक्ष असतो.

हा उल्लेख खटकला. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही !!

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

हेरंब..

प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही हे मी प्रथमच आपल्याकडून ऐकतेय. ह्यावर प्रकाश टाकावा व सांगण्याची विनंती करावी की मग आपली राष्ट्रभाषा कोणती आहे? माझ्या पण ज्ञानांत भरच पडेल.

दीपिका जोशी 'संध्या'

हेरंब म्हणाले...

आभार संध्या(दीपिका)ताई,

हो.. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. ती अनेक अधिकृत भाषांपैकी एक आहे. आपल्या देशाला कुठलीही राष्ट्रभाषा नाही. आहेत त्या सगळ्या अधिकृत भाषा. मध्यंतरी सलील कुळकर्णी यांनी भारत सरकारशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून हे कबुल करवून घेतलं आहे. यासंबंधीचे लेख आपण खालील दुव्यांवर बघू शकता.

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले. सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)
http://tinyurl.com/2fvnvwq


“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले. सलील कुळकर्णी)
http://tinyurl.com/246zoqg

केंद्र सरकारचं मूळ हिंदी पत्र
http://tinyurl.com/yhsba4j

पत्राचं मराठी भाषांतर
http://tinyurl.com/yb35fj4

पत्राचं इंग्रजी भाषांतर
http://tinyurl.com/ycslmcq

-हेरंब

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

अच्छा असे आहे तर.. पण जर का हिंदी राष्ट्रभाषा नसून फक्त एक अधिकृत भाषा आहे तर मग 'हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती' जी आहे त्याचा काय कार्यभाग आहे व कोणत्या आधारावर राष्ट्रभाषा ह्या शीर्षकाखाली हिंदीचा प्रचार होताय...हे कळत नाहीये.. असो..

हेरंब म्हणाले...

'हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती' वाल्यांना ही पत्रं दाखवून त्यांनाच खुलासा विचारला पाहिजे.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

होय नक्कीच प्रयत्न करीन मी..

धन्यवाद..

नरेंद्र गोळे म्हणाले...

छान, संतुलित लेख!

मराठी वापरण्याबद्दल मी आपल्याशी सहमत आहे.

हिंदी वापरण्याबाबतही मी आपल्याशी शतप्रतिशत सहमत आहे.

राष्ट्रभाषा म्हणा वा न म्हणा इतर कुठल्याही भाषेपेक्षा हिंदी आपल्याला जास्त जवळची आहे. तुम्ही स्वतः ज्या निष्ठेने तिच्या उन्नतीचे प्रयत्न करत आहात त्याबद्दल मला आनंद आहे.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

श्री नरेंद्र गोळे...

धन्यवाद. खरंय राष्ट्रभाषा म्हणा वा न म्हणा... मराठी सारखीच हिंदी पण मला खूप जवळची आहे. त्याचमुळे गेली ११ वर्षे दोन हिंदी साप्ताहिकांचे काम बघतेय आणि आनंद मिळतोय तो वेगळाच.. असो..

हेरंब म्हणाले...

नरेंद्रजी, दीपिका ताई,

हिंदी भाषा जवळची/लांबची किंवा आवडती/नावडती आहे किंवा नाही, किंवा कटाक्षाने वापरणे/न वापरणे याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. तो प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु तिचा 'राष्ट्रभाषा' म्हणून केला गेलेला उल्लेख मला खटकला. कारण ते वस्तुस्थितीशी विसंगत आहे.

मी फक्त माझं मत सांगितलं. राग/गैरसमज नसावा.. !!

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

हेरंब...

गैरसमज काही नाही कोणाचाच. आपले म्हणणे पटले म्हणून मी लेखात दुरूस्ती पण केली आहे. फक्त तेच आहे की आपल्या मराठी माणसाला मातृभाषेव्यतिरिक्त बोलणे सोपे व तशी भारतभर चालणारी भाषा हिंदी आहे किंवा चलनात ती ज्यास्तं यावी व म्हणून त्या अधिकृत भाषेचा वापर व्हावा व ह्या गोष्टीला प्रोत्साहन मिळावे इतकेच काय ते..

होणारी चर्चा किंवा त्यातुन काही ज्ञान मिळत असेल तर मला तरी ते सुखदायीच ठरते हे नक्की.

जयश्री म्हणाले...

ओहो....असं आहे तर....!!
मीपण ह्या क्षणापर्यंत हिंदीला आपली राष्ट्रभाषा समजत होते.
दीप्स..लेख छानच झालाय हं !!