गुरुवार, २५ मार्च, २०१०

जपणार का रे ही नाती....

ह्या इंटरनेट आणि संगणकामुळे सगळे जवळ आलेत असं म्हणतात.. खरं पण आहे. अशा-तशा कारणाने नाती दूर होऊ लागली आहेत. ह्या नात्यांमधे टिकवून ठेवलेली जवळीक दुरावत चालली आहे. आमच्या पीढी ने संभाळलेले संबंध कसे टिकवून ठेवायचे किंवा काय करायला पाहीजे म्हणजे पुढची पीढी ते जपू शकेल हे कळेनासे झाले आहे. १५-२० वर्षापुर्वी पत्राद्वारेच संपर्कात राहता येत असे. तेंव्हा सगळे व्याप.. घरचे बाहेरचे.. पत्र लेखन सगळे करतच असत. कारण जीवाला जीव लावलेला असायचा. जरी भारंभार पत्र नाही लिहीले तरी आंतर्देशीय पत्र.. नाहीच तर निदान पोस्टकार्ड खरडायला वेळ मिळतच असे. महीन्यात एखाद्या अशा पत्राची देवाण-घेवाण झाली की प्रत्येक पत्रामधुन कोणाकडे लग्न ठरले..कोणाकडील काही दुःखद समाचार.. कोणी पास झाले.. कोणाकडे गोड बातम्या.... बरंच काही काही कळत असे.

सध्याच्या धावपळीत म्हणायला सोपे काम इमेल करण्याचे पण होईनासे झालेय. दिवसभर संगणकाची साथ आहे पण त्याचा उपयोग ही नाती टिकवण्यासाठी होऊ शकतो हे आजकालच्या पीढी ला कसे लक्षात येत नाही. परदेशात विखुरल्या गेलेल्या अशा अनेक कुटुंबांच्या ह्या व्यथा आहेत. अंतराचे कारण पुढे येऊन आपुलकी दूर ढकलली जातेय. आधी होणारा दुतर्फी पत्रव्यवहार आज ई-मेल्स एकतर्फी होऊन पुढे खुंटला जातो.

गेल्या ऑक्टोबर मधल्या अमेरिका भेटीत मुलांच्या घरी समोर खूप मोठी पत्रपेटी प्रत्येक घराची वेगळी... अशी लावलेली आहे हे बघून खूप आनंद झाला होता. मुलींना सांगितले होते की आता मी तुम्हाला पत्र पाठवणार. रोज होणार्‍या संगणकावरील भेटीमुळे पत्रात काय लिहू असा विचार येऊन पत्र माझ्या हस्ताक्षरांत लिहीण्याचे राहूनच गेलेय. पत्र लिहीण्याची संवय पण इतकी गेली आहे की अक्षर कुठे जाईल ह्याचा ही नेम नाही राहीला.. पण प्रयत्न करायला कुठे हरकत... शुभस्य शीघ्रम् करणे आलेच.....

जेंव्हा जेंव्हा लग्नाच्या निमित्याने भारतात जाणे होते (मी बहुतेक नातेवाईकांबरोबर आप्तस्वकीयांच्या.. जुन्या मित्र परिवारातील लग्नांना आवर्जून जातेच). शक्यच नसेल तरच जाणे जमत नाही. सगळ्यांची भेट, त्यातील मिळणारा आनंद हा सांगुन कळणारा नाही. आत्ता नोव्हेंबर मधे लग्नाला गेलो असतांना आम्ही सगळे भाऊ (माझे चुलत दीर-जावा... कधी काळी कोणाचे काही मतभेद झाले असतील तरी ते विसरून..) रात्री १२ पर्यंत गप्पा मारत बसलो होतो. आमच्या लग्नापासुन च्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. आमच्या पेक्षा वयस्कर असणारी (सगळे आजी-आजोबा झोपले होते...)लहान मुलांना काही त्यातले कळत नव्हते त्यामुळे जरासे कंटाळल्यासारखे करत होते म्हणुन कोणी तरी म्हंटले 'चला आइस्क्रीम खायला जाऊ'. आता इतक्या रात्री कुठले दुकान उघडे असणार. पण पुण्यात हे शक्य आहे किंवा पुणेरी लोक रात्री १ पर्यंत आइस्क्रीम पार्लर उघडे ठेवू शकतात ह्याचा प्रत्यय त्यादिवशी आला. आम्ही तीन गाड्यांमधे सगळे कुचकुन आइस्क्रीम च्या शोधात भटकत होतो. पुण्याचे रस्ते खोलात जाऊन खास कोणाला माहीत नव्हते. शोध-शोध शोधून रात्री एक ला पाच मिनिट कमी असतांना शोध लागलाच व जिंकल्याच्या आनंदात मुलांनी याऽऽऽऽऽऽहू सुरू केले. १५-१७ जणांची धाड आलीये म्हंटल्यावर त्याने 'दुकान बंद होतंय' हा पुणेरी खाक्या दाखवला नाही. नॅचरल्स च्या आइस्क्रीम मुळे अजूनच सोने पे सुहागा. बाजुलाच असलेल्या पानाच्या दुकानातुन मस्तं मसाला पानाचा आनंद त्यावर लाल रंग चढवून गेला. सगळे आनंदात परत गेलोत.... सकाळी लग्नासाठी लवकर उठायचे होते....

हे सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की आम्ही सगळे फक्त लग्न-कार्याच्या निमित्यानेच एकत्र येत असतो. बाकी वेळी हल्लीच्या नियमाप्रमाणे पत्र-ईमेल्स ला वेळ मिळत नाही तर संपर्कात नसतो. पण आधीच्या टिकवलेल्या मजबूत असलेल्या नात्यांना आता त्याची गरज वाटत नाही. सगळे भेटतो.. प्रेमाच्या गप्पा... मोठ्यांची आस्थेने-आपुलकीने चौकशी.. आजी-आजोबांची नातवांसाठी होणारी काळजीची घालमेल वगैरे वगैरे.... पुढच्या पीढीला हा आनंद कधीच मिळणार नाही. आमच्या मुलांच्या चुलत-आते-मामे बहिण-भावांची आपापसात कधी भेटच होत नाही. लहान असतांना बघितलेले ५-७ वर्षात सगळ्यांमधेच इतके बदल होतात की समोर आले तरी ओळखू शकतील की नाही शंकाच आहे. परदेशात असल्यामुळे कुठल्याही प्रसंगाला यायला जमेनासे होते. भेट नाही.. नाती माहीत नाही... संबंध नाही त्यामुळे भेटण्याची ओढ नाही.. म्हणून येणे दुरापास्त आहे.

अशा सगळ्या भानगडीत आजकालच्या ह्या मुलांना सख्खे असो... चुलत असो... नातेवाईक कसे टिकणार... आजकालच्या प्रथेप्रमाणे एकुलत्या एक मुलांना तर कोणीच राहणार नाही पुढे... त्यांच्या मुलांना कोणी काका-मामा राहणारच नाहीत... आपुलकीची किती कमतरता भासेल ह्या सगळ्या विचारानी माझे मन सुन्न आणि खिन्न होते. विज्ञानाच्या व बाकी पण असंख्य क्षेत्रांमधे चमकणारी....आपापल्या विश्वात रममाण होणारी ही पीढी खुप गोष्टींना मुकणार आहे. मित्र तर असतील... अडचणीला धावून पण येतील पण बाकी वेळी ह्या नेटच्या स्वच्छंदी होणार्‍या स्वैराचारात त्यांना आपलेपणा मिळेल का? दुनिया गोल है म्हणणार्‍या ह्या जगात... होणार्‍या नव-नवीन शोधांमधे... हिंडुन-फिरून पुन्हा खो दिलेल्या त्या नात्यांना आपल्या जागेवर येऊन बसता यावे ही सदिच्छा!!!

आजच्या माझ्या मुलांच्या पीढीला थोडं सांगावसं वाटतंय....

शब्द-ओळींच्या मोत्यांनी
अतुट स्नेहबंधने गुंफावी
घट्ट असाव्या रेशीमगाठी
कधी न ही नाती सुटावी

रक्ताची वा असो मनाची
काळी वेळी सदा वसावी
स्वार्थ स्वत्वापायी अशी
कधी न ही नाती विखरावी

प्रेम मेघ दवबिंदु तुषारी
सगळी नाती चिंब भिजावी
अळवावरील पाण्या सम
कधी न ही नाती ढळावी

प्रेम जिव्हाळ्याने जपावी
ही नाती जरूर टिकवावी
आजीवन ही मनी वसावी
विस्मरणात कधी न जावी

दीपिका 'संध्या'

५ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

खूप सुरेख लिहिलंस दीपिका. अगदी मनातलं! काव्य तर खासच आहे. मनापासून आवडलं.

आशिष देशपांडे म्हणाले...

दीपिका ताई, अगदी बरोबर बोललात तुम्ही! छान विषय निवडला लिखानासाठी. कविता सुद्धा सुंदर झाली आहे.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

क्रांति, आशिष... खूप खूप आभार.. प्रोत्साहन अतिशय महत्वाचे असते लेखनासाठी जे तुम्हा सगळ्यांकडुन मिळत राहील ही अपेक्षा...

दीपिका

जयश्री म्हणाले...

अगदी बरोबर दीप्स ...!! इंटरनेटचा उपयोग नाती जोडण्यापेक्षा पैसा कमावण्यासाठीच जास्त होतोय. सुरेख लिहिलं आहेस.

कविता खूप आवडली !!

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

धन्यवाद जयश्री.. बस प्रयत्न सुरू असतो... लेखन करण्याचा... मनांतले काही सगळ्यांना सांगून त्यांना पण सामिल करण्याचा... असेच प्रोत्साहित करत रहा... हुरूप येतच असतो असे कौतुक वाचून...

दीपिका