आनंद कशास म्हणू.....
असे म्हणू शकतो आपण की आनंदाचा पाठपुरावा करत आणि शोधतच आयुष्य वेचले जाते. वाचन-लेखनाचा जसा जोर वाढतो तसा तसा साहित्याच्या आपण ज्यास्तं जवळ जातो. अभि-अनु च्या कामामुळे माझे तसेच झाले. हिंदी मधे लेखन सुरू करून मातृभाषेत पण सुरू झाले. अभि-अनु च्या कामांत खूप शिकायला मिळाले आणि मिळतेय. हास्य कवि अशोक चक्रधर भारतांत व भारताबाहेर अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेख व कविता अभि-अनु मधे आम्ही प्रसिद्ध करत असू. त्यात त्यांच्या लेखांची एक खूप विशेषता होती ती अशी की लेख ज्या पण विषयावर असेल त्याला अनुसरून लेखाचा शेवट ते एका कवितेने करताना मला दिसले. त्यांचे तसे ते लेख वाचणे व नंतर ची ती कविता... मला फारच आनंद देऊन जात असे. कसा प्रभाव पडतो बघा एखाद्या व्यक्तिचा की आताशा लेख कुठल्याही विषयावर लेख लिहून झाला की मला त्याचा शेवट कवितेने करण्याची हुक्कीच येते म्हणा. नेहमीच कविता तिथे चांगली दिसेल किंवा मी करेनच असेही नाही. कुठल्याही वाचनानंतर त्याची प्रतिक्रिया लिहीणे जसे आवश्यक वाटते किंवा लेखकाला पण त्याने समाधान मिळते तसेच असे काहीसे खूप शिकायला पण मिळते. कित्येकांचे लेखन वाचून आपली विचारदृष्टि, लेखन शैली पण प्रभावित होते. आजकालच्या परिस्थितित... बदलत्या वातावरणात चांगलेपणा घडवायला हे चांगले मध्यस्थी करतात. विचारवंत बनवतात.
संगणक व इंटरनेट चा विषय तर नेहमी असतोच... कुवैत मधे राहून नेट वरच सगळे मराठी वर्तमानपत्रं आणि बाकी पण बरेच वाचन करावे लागते. नेटमुळेच खूप जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या आहेत. प्रोत्साहन व आनंद देणारे दिवसांतले खूप क्षण त्यांच्याबरोबर पण पडद्याच्या मागेच राहून रोज जगता येतात. माऊ ला माझ्या बोलण्याची पद्धत तर मोनिका ला माझा आवाजच आवडतो. एक-दोनदा जीटॉक मधे बोललो तर तिला समजले की माझा आवाज कसा आहे. त्यानंतर तिचा रोज आग्रह असे की मी माझ्या आवाजात तिला जीटॉक मधे मेसेज ठेवावा. म्हणते... माझी दिवसाची सुरूवात तुझा आवाज ऐकुनच व्हावी. आता काय बोलणार ह्या प्रेमाला. जसे जमेल तसा माझा प्रयत्न असतो. ती वाट बघत असेल रोजच पण मला कधी जमते तर कधी नाही पण तक्रार नाही तिची. जयश्री च्या प्रोत्साहनाने ब्लॉग लेखनाची सुरूवात झाली. जानेमन करून बोलणारी हास्यवदनी प्रफुल्लित करूनच जाते. कुवैतमधेच असल्यामुळे भेटी-गाठी सुरूच असतात. गद्य-पद्य दोन्ही लेखन शैलीसाठी तिचे मार्गदर्शन मला मिळतच असते. ह्या सगळ्या मैत्रिणींबरोबर जान्हवी, स्मिता सारख्या सख्या माझे लेख वाचून अभिप्राय देतच असतात. सगळ्यांशी एक भावनिक बांधिलकी तयार झाली आहे. ब्लॉग तर इतके आहेत जिथे खूप वाचायला आहे आणि ज्ञानांत भर पाडणारे आहेत.
प्रत्येक वयाच्या टप्प्यात आनंद शोधणे शिकलेच जाते. बालवयात... कोवळ्या मनांचा आनंद अतिशय निर्भेळ व निर्मळ असतो. आपल्या खेळण्यांबरोबर खेळण्यात तर आहेच पण त्याहीपेक्षा बरोबरच्या भावंडाच्या किंवा मित्राच्या हातातील खेळणे खेचून घेण्यातच सार्थकता मानली जाते. किती ती निरागसता...वय वाढते तसे सगळेच बदलते.
११-१२ वर्षाच्या वयांत शाळेतल्या मैत्रिणींमधले सख्य अधिकच वाढले. कोणी मैत्रिणी सोडून गेल्या त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. त्या पत्रांतले मैत्री-प्रेम उचंबळून वहात असे. बोलक्या स्वभावामुळे... नेहमी आनंदी रहायला आवडत असल्यामुळे असेल.. ह्या अशा लहान गोष्टी सुखावून-आनंद देऊनच जात असत.
मग कॉलेजमधल्या सख्या वेगळ्या ज्या अजून ही संपर्कात आहेत. बॅडमिंटन क्लब मधला आमचा कंपू खूपच उत्साही होता. सगळे विखुरलेत पण मनांत घर करून आहेत.
१०-१२ वर्षापासुन ह्या संगणक जगताशी असे नाते जुळले आहे की तिथेच मी माझे सगळे आयुष्य वेचू लागलेय. निर्भेळ आनंद देवाण-घेवाणीचा हा एकदम मस्तं स्रोत आहे हे नक्कीच. ऑरकुट च्या जगात जुन्या मैत्रिणी पुन्हा एकदा भेटल्या. सगळ्याच आपापल्या जगांत आहेत. कोणाच्या जबाबदार्या संपल्या आहेत, कोणाच्या नवीन सुरू झाल्या आहेत.... जुन्या आठवणींच्या सरी येत असतात.. आम्ही
चिंब भिजत असतो त्यात. हा आनंद काही वेगळाच आहे.
मग रुचिर-शिशिर च्या आगमनानंतर चे उल्हासदिन कसे सरले कळलेच नाही.... जगतच गेले जगतच गेले... अजूनही जगतेच आहे. त्यांच्या लहानपणांत माझे लहानपण पुन्हा जगण्यातला आनंद खरा होताच. आज त्याच्या पुढे एक पाऊल उचलले गेले आहे. त्या आनंदाच्या प्रतीक्षेत आता आहोतच सगळे....
बर्याच वर्षापासुन एक आनंद हरवून बसले होते... पत्र लिहीण्यात जो मिळायचा तो.. अचानक मुलींना पत्र लिहीण्याचे मनांत आले आणि लगेच छानशा फुलापानांच्या कागदावर माझ्या हस्ताक्षरांत फुलपाखरांच्या-चांदण्यांच्या स्टिकरने सजवलेले दोन-दोन पानी पत्रं... अर्थातच माझ्या इश्टाइलने छोटेसे ह्या आईबाबांच्या नांवे व वतीने प्रेमकार्ड घालून पाठवण्याचा उपक्रमच केला म्हणा नं.. रुचिर-शिशिर ला पण असे पत्र लिहीण्याचा योग कधी आलाच नाही. त्यामुळे थोडक्यात ही माझी स्वहस्ताक्षरांतली पत्रे माझ्या दोन्ही मुलांना व दोन्ही मुलींना एक सुखद धक्का असेल. आनंद होईल बघून ह्यात शंका नाही. प्रथम आनंदात मी नाहले आहे... आता त्यांची वेळ येऊ घातली आहे.... आनंद आणि आश्चर्य व्यक्त करण्याची... पत्र पोहोचण्याच्या प्रतिक्षेत ही आई आहेच...
सगळा सारासार विचार करता कसे ठरवणार की कधी जीव ज्यास्त आनंदला होता? ज्या काही कधी कोणत्या थोड्या फार मनाचा विरस करणार्या घटना असतील त्या पण ह्या आनंदाच्या आठवणींमुळे माझ्या मनःपटलावरून मिटल्यातच जमा आहेत.... सरतेशेवटी मी आनंदी... मी आनंदी....
दीपिका 'संध्या'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा