शनिवार, ८ जानेवारी, २०११

भारतभेट.. पारिवारिक सम्मेलन

आत्ताच्या २०१० च्या डिसेंबर मधे भारतात जायचे होते. २५ डिसेंबर ला बहिणीच्या लग्नाचे निमित्य होते. लग्न व ते पण नागपुर ला.... मग काय विचारता... आनंदाला उधाण...नागपुर अगदी रोमा-रोमात आहे.. अपार प्रेम आहे ह्या नागपुरवर माझे.
नोव्हेंबर मधे माझ्या चुलत दीरांचा फोन आला की आमच्या काकांचे सहस्रचंद्र दर्शन सोहळा त्यांनी आयोजित केला आहे. आम्हा जोशींकडे असा कुठलाही कार्यक्रम असला की सगळ्यांची भेट हे एक खूप मोठे आकर्षण असते. बाकी वेळी जमले नाही तरी अशा कार्यक्रमांना आवर्जून ज्यांना शक्य आहे ते येतातच येतात. अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अनुपस्थिति असते.

१८-१९ डिसेंबर, हे दोन दिवस मस्तं मज्जा येणार हे माहीतच होते. १८ ला दुपारी सगळे जमायला सुरूवात झाली. इतक्या पाव्हण्यांची सोय कशी होणार म्हणुन हल्ली सरळ हॉटेलच्याच खोल्या घेतात. १८ ला संध्याकाळी चाट खास काकांच्या आग्रहावरून ठेवली होती. नातवंडांनाच काय.. आमच्या पीढीला पण अजून काय हवे. नंतर ७.३० ला कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. त्या कविंनी काका काकूंवर अप्रतिम कविता केल्या होत्या. नंतर नातवंडांचा नाच गाण्याचा कार्यक्रम झाला. वेळेचे बंधन ठेवून बरोबर ९ वाजता केळीच्या पानांवर पुरणाच्या पोळीच झक्कास जेवण. रात्री सगळे बसले गप्पा मारत. काकूंनी येऊन सांगितले की ४ वाजलेत पहाटेचे.. आता तासभर तरी झोपा. मगच सगळे आपापल्या खोल्यांमधे जाऊन थोडा वेळ लवंडले.
१९ तारखेला सकाळी ८ वाजता पुजा सुरू होणार होती. होम हवन सगळे एका संस्थेच्या बायकांनी केले... एकदम साग्रसंगीत. पुजा संपल्यावर ती. काकांना ८० दिव्यांच्या ताटाने ओवाळले. खुप छान वाटत होते. त्यांच्या तीनही मुलांचा-सुनांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. काका काकू नक्कीच धन्य झाले असणार. असा छान योग सगळ्याच मुलांच्या वाट्याला येत नाही. सौ. काकूंच्या मैत्रिणी, बाकी परिचित असे बरेच लोक जमले होते. घोळक्या-घोळक्यात हॉल मधे बैठकी जमल्या होत्या. लहान मुलं स्टेजवर काही तरी उद्योग करण्यात गर्क होते. बाकी उत्कृष्ट जेवण, सूप, सलाद बरोबर गाजर हलवा अतिशय स्वादिष्ट होताच.
सगळे परतीच्या दिशेने वळू लागलेत. पुन्हा एकदा जोशी परिवाराचे सम्मेलन ह्या निमित्याने घडवून आणले. ती. काकांना दीर्घायुषाच्या खुप खुप शुभेच्छा आणि काका-काकूंच्या लग्नाच्या ५० वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

२५ तारखेला नागपुरला लग्नाला जायचे आता वेध लागले होते. २३ डिसेंबर ला लग्नघरी पोहोचले. आता माहेरचे सम्मेलन सुरू झाले. भरीत भर रुचिर-शिशिर ची आयआयटी चा अभ्यास घेणार्‍या निशा मॅडम चा फोन आला. तिला कळले होते की मी नागपुरला आले आहे. ह्या १२-१३ वर्षात तिची इतकी उत्तरोत्तर प्रगति झाली आहे की सांगायलाच नको. तिच्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांपैकी हे दोघे आहेत त्यामुळे कायम स्मरणात आहे ही जोडी. फोनवरच का होईना पण खुप गप्पा मारल्या. छान वाटले. लग्नं पण मस्तं झाले. २६ डिसेंबर ला पुण्याला परतले. व २८ डिसेंबरला कुवैत चा परतीचा प्रवास.
ह्यावेळेची भारत यात्रा नेहमीपेक्षा जरा वेगळी व ज्यास्तंच स्मरणांत राहील. नेहमी अशाच काही न काही निमित्यानेच भारतात जाणे होते पण ह्या वेळी विशेष काही खास वाटले...मधल्या वेळात बाकीची महत्वाची कामे पण झालीत त्यामुळे विशेष आनंद. सगळेच आपले भेटले की त्या आनंदात इथे सगळ्यांपासुन दूर राहणे कदाचित थोडे सुसह्य असते म्हणुन मी अशा कार्यक्रमांना जातेच जाते. कुवैत ला वास्तव्य जितके दिवसांचे आहे तितके दिवस भारतात ह्या सगळ्याच कारणाने जाण्याची ओढ राहणारच.

दीपिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: