शनिवार, २५ जुलै, २००९

लग्न आणि लग्नं.....रुचिर शिशिर चं....

गेल्या गणपतिच्या वेळी आम्ही चौघे पुण्याला गेलो होतो. उद्देश रुचिर शिशिर चे लग्न ठरवणे हाच होता. म्हणतात नं..योग जसा असेल तसेच घडत असते. अंधश्रद्धेच्या विरोधात असणारी मी मात्र योग आणि नशिबाची साथ ह्यावर थोडा विश्वास ठेवू लागलेय.

त्यामुळे नेहमी सगळ्याच गोष्टी बरोबर-बरोबर होणार हेच आमच्या मनांत घट्ट रुतलेलं आहे पण रुचिर-शिशिर च्या बाबतीत ह्यावेळी थोडे वेगळे घडायचे होते. त्यामुळे ६ सप्टेंबर २००८ ला शिशिरचा आणि २५ डिसेंबर २००८ ला रुचिर चा साखरपुडा झाला. रुचिर-प्राची आणि शिशिर-मृणालिनी, ह्या जोड्यांना १५ एप्रिल २००९ ला नवीन प्रेमाच्या नात्यात आणि लग्नबंधनांत बांधण्याचे ठरले.

इथे एक खास गोष्ट सांगाविशी वाटते की रुचिर-शिशिर चे लग्न एकाच बोहल्यावर एकाच वेळी होण्याचे-करण्याचे स्वप्न आम्ही दोघांनी बघितले होते. सगळंच बरोबर होत गेलं त्यांचं दोघांचं तर लग्नं पण तसंच व्हावं ह्या दिशेने पावलं उचलून आम्ही कसून प्रयत्नशील होतोच. पण ह्यात पूर्णपणे साथ आम्हाला मृणालिनी आणि प्राची च्या आई बाबांची मिळाली त्याचमुळे हे शक्य होऊ शकले ह्यात शंकाच नाही. कारण एक ठाण्याचे आणि दूसरे मिरजेचे... त्यांना उठून येऊन पुण्याला लग्न करायचे होते. खरं तर आम्ही पण उठूनच पुण्याला येऊन लग्नाची तयारी करणार होतो. सध्या आम्ही नुसते नांवालाच पुणेकर आहोत..पण पुणे आम्हाला पूर्णपणे नवीनच आहे. जेमतेम ३ वर्षापासुन पुण्यात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्ही तिघांनी पण एकमेकांच्या सहकार्याने लग्न पुण्यात साकार करण्याचे ठरवले. तसेही आमची मते थोडी वेगळी आहेत त्यामुळे मुलाची बाजू-मुलीची बाजू असले काहीच डोक्यात ठेवायचे नाही हे पण ठरलेच होते. आपल्याकडील लग्नाच्या पद्धतिप्रमाणे पाय धुणे, विहीणीची पंगत वगैरेच्या मी अगदीच विरोधात...तर कदाचित ह्यामुळे पण लग्नाच्या दिवशी वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याला मदतच होणार होती. कोणीच दडपणाखाली वावरू नये हा आमचा प्रयत्न होता. थोडी ज्यास्त जबाबदारी आम्हीच घेतली कारण त्या दोघांपेक्षा आमची आणि पुण्याची ओळख थोडी ज्यास्तं होती. सोबतीला नातेवाईक भरपुर आहेत ज्यांच्या सहकार्याने ही दोन कार्ये आनंदाने व सफलतेने पार पाडणे फारसे कठिण तेंव्हा वाटलेच नाही.

३१ डिसेंबर २००८ ला रुचिर शिशिर परत गेलेत. आम्ही दोघे पुढे थोडे थांबुन जी काही थोडी फार तयारी करता येईल ती करायचे ठरवले होते. १४-१५ जानेवारी ला माझ्या बाबांचे वर्षश्राद्ध होते, त्यासाठी मी थांबणारच होते. ४-५ जानेवारी पर्यंत ह्यांची सुट्टी होती. त्यात कशी कशी कामं करता येतील ते ठरवले.

सगळ्यात प्रथम नंबरवर काम होते ते म्हणजे लग्नाचा हॉल ठरविण्याचे... दोन लग्नं एकदम होणार आहेत तर हॉल पण मोठा लागणार. एप्रिल मधे पुण्याला गरमीचा कहर असतो त्यामुळे हॉल वातानुकुलीत हवा होता....तर त्याची शोधाशोध सुरू केली आणि अरोरा टॉवर्स हॉटेल चा हॉल ठरवला. प्रशस्त आणि छान वाटला. आणि इथे एक नमूद करावेसे पण वाटते की जरी हॉटेल चार सितारा वगैरे असले तरी फारसे महाग नाही. तिथे बाकी सजावटीची गरज नाही. जेवण उत्तम प्रतीचे आहे व बाकी पण सोय खूपच चांगली आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच तो आवडला होता.

नंतरचे महत्वाचं काम होतं पत्रिकेचं. पुणेरी खाक्या पुढे आला...पुणेरी झटके व धक्के खायला प्रारंभ झाला...पण झाले पत्रिकेचे काम. ४ दिवस त्याचे प्रूफ रीडींग सुरू होते. करता करता मजकूर तयार झाला...८ दिवसांनी मिळणार होत्या. मी जाऊन आणायचे ठरवले. निमंत्रणपत्रिकेमधे छानशी कविता मीच लिहून द्यायची असं ठरलं होतं पण वेळेअभावी ते राहूनच गेले... पण तरी......पत्रिकेतील मजकूर बोलका होता....

''काही नाती फुलवायची मोर पिसार्‍यासारखी,
काही नाती जपायची बिल्लोरी कंकणासारखी,
काही नाती सांभाळायची मनांच्या कुप्पीत अत्तरासारखी
अशी नाती दृढ होऊन संपन्न होणार आहे हा शुभविवाह सोहळा!!!''

हा सोहळा होणार होता १५ एप्रिल २००९ ला दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी...

माझ्या कुवैत च्या एका मैत्रिणीने येवल्याच्या पैठणीचे प्रकरण डोक्यात बसवले होते. जर का दोन मुलांची लग्नं आहेत तर येवल्याला जाऊनच पैठण्या आणायच्या. २ जानेवारीला सकाळी ६ वाजता तवेरा ठरवून आम्ही दोघे, दिलीप भाऊजी, उत्तरा आणि मनीषा येवल्यासाठी रवाना झालोत. रस्ता ६ तासांचा तरी नक्कीच होता. प्रचंड उत्साह..... सोनी च्या दुकानांत १२ वाजता जे पोहोचलो...खरेदी करता करता तिथेच आम्हाला ५ वाजलेत. पण एकदम वेगळा अनुभव. सगळ्यांनाच मनांपासुन वाटले की जर ही संधी सोडली असती तर येवल्याला कधीच जाणे झाले नसते. तिथे भरपूर खरेदी केली. बस..एक इच्छा राहीली ती त्यांचा हातमाग बघायची. खूपच उत्सुकता होती पण वीज गेल्यामुळे बघता आले नाही. माझी जी खास पैठणी आहे ती विणायला त्यांना ३ महीने लागतात म्हणे...तर किती ही मेहनत...किती मोबदला त्या मेहनतीला मिळत असेल हा विचारच करत बसलो आम्ही....कष्टाचं आयुष्य जगत आहे संपूर्ण येवला... पण कलाकारी म्हणाल तर जगप्रसिद्ध. तिथल्या सारख्या पैठण्या मुंबई पुणे सारख्या शहरात सुद्धा मिळणे नाहीत....

तिथेच देण्याघेण्याच्या साड्या आणि खास म्हणजे माझे व माझ्या मुलींचे पैठणीच्या कापडाचे सुट चे कापड....एकदम वेगळे अलौकिक......आणि अर्थातच येवला प्रकरण पण एक अलौकिक अनुभवच आहे जो अशा लग्नप्रसंगी सगळ्यांनीच जरूर घ्यावा हे माझं प्रामाणिक मत आहे.

येवला प्रकरण व दागिन्यांची खरेदी करून हे कुवैत ला परत आलेत. मी बाकी कामं करायची ठरवलीत. एक वेळ अशी होती की कुठुन सुरूवात करायला हवी हेच कळेना. सुरूवात तर मुहूर्ताने करायला हवी होती. त्याप्रमाणे ७ जानेवारी ला मुहूर्त केला. निलीमा, गौरी, प्रिया, उत्तरा, मामी, वैष्णवी, विद्युत वगैरे सगळ्या जणी येऊन मज्जा आली. सगळ्यांसाठी मस्तं बटाटे वडे, गाजर हलवा...थंड थंड पन्हं केलं....मुहूर्त छान झाला..मग उरलेली खरेदी करायला जोर आला.

मैत्रेयीच्या लग्नाचा अनुभव ताजा असल्यामुळे उत्तरा-दिलीप भाऊजींचीच मदत ज्यास्त घेणार होतो. त्याप्रमाणे चौकशा सुरू झाल्या. फोटोग्राफर, बाकी फुलांची सजावट...सगळ्यांशी बोलून ठेवले. कुवैतहून ज्या छान पिशव्या देण्या-घेण्यासाठी नेल्या होत्या त्यात साडी वगैरे ठेवून त्यावर नांवाची चिठ्ठी लावून ठेवली. ही फक्त प्राथमिक तयारी होती. जे काय देण्याघेण्याचे उरले ते आणून ठेवले. मी १७ जानेवारी ला परतणार होते. बाकी टेंट वाला, सगळ्या जेवणाची ऑर्डर कोणाला द्यायची वगैरे मी व माझ्या भाऊ-भावजयीने मिळून ठरवून व त्यांच्याशी बोलून ठेवले. पत्रिका छापुन आल्या होत्या त्यावर तयार यादीतुन पत्ते लिहून तिकीटं लावून ठेवलीत. इतक्या लवकर तर पाठवायच्या नव्हत्या पण १५ मार्च पर्यंत पाठवायच्या असं ठरवलं होतं. दोन्ही लग्नं ठरून १५ एप्रिल तारीख लगेच नक्की झाली असल्यामुळे ह्यांनी कुवैत ला परत जाण्याच्या आधी पहिले आमंत्रण केलेच होते. कारण बहुतेक सगळे परगांवाहून येणारे असल्यामुळे तितकी वेळेची मुदत देणं आवश्यकच होतं. लग्नासाठी जेंव्हा पुन्हा पुणे गाठू तेंव्हा दुसर्‍यांदा पुन्हा फोन करणारच होतो आम्ही...

बर्‍यापैकी तयारी करून मी पण कुवैतला परतले. तसा आराखडा पूर्ण तयार असला तरी डोक्यात चक्र फिरतच असतात. लग्न म्हंटलं की वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. इथे माझ्या मैत्रिणी वेगवेगळ्या दिशेने विचार करत त्यातुन पण नवीन काही तरी पुढे येत असे. परत आले आणि ठरवले होते की मंगलाष्टका आपणच लिहायच्या. थोडे फार लेखन करत असल्यामुळे त्या लेखनाला सुरूवात केली. माझी मैत्रिण व मी मिळून छान लयीत बांधल्या. तर हे एक काम हातावेगळे झाले.

होत असं होतं की एक काम हातावेगळं करेपर्यंतच दूसरे कुठले तरी खूळ डोक्यात आलेले असायचे. बाकी तयारी बरोबर मुलांसाठी मला खास तयारी पण करायचे मनांत होते. त्यात दोन गोष्टी होत्या. फोटोफास्ट मधे त्या दोघा-दोघांचे फोटो असलेले मग्ज तयार करून घ्यायचे होते. आणि दूसरे म्हणजे सुंदर नवीन आयुष्याची सुरूवात आणि त्या नवीन दिवसाच्या नवीन भासणार्‍या नवीन सूर्याला साक्षीला ठेवणारी कविता लिहायची होती. अर्थातच दोघांना वेगवेगळ्याच. कविता लिहून झाल्यावर फोटोशॉप मधे वेगवेगळे चित्र घालून सेटिंग सुरू केले. मग्ज साठी वेगळे व कवितांसाठी वेगळे ग्राफीक्स बनवायचे होते. फोटो मुलींचे जसे हवे तसे नव्हते माझ्याजवळ...ते मी त्यांच्याकडुन घेऊ कसे ह्याचा विचार करू लागले कारण सगळं गुपित ठेवायचं होतं हे.... पण जमवलंच मी....चाह जहाँ...राह वहाँ.....

रुचिर-प्राची साठी...


नवजीवनाची नवी पहाट
सोनेरी किरणांनी नाहली

मौन स्वरांची मौन भाषा
क्षणांत परी ती उमगली
चिंब चिंब मन मोहरता
प्रीत मेंदीत भिजली
नकळत हलके हलके
प्रेमबंधना विणून गेली


शिशिर-मृणालिनी साठी...

नवजीवनाची नवी पहाट
सोनेरी किरणांनी नाहली

रंग बावर्‍या प्रीतीची
उधळण अवनीवरली
असेल मौनखेळ परी
शब्द-शब्द उमगली
मनमोर नाचता उतरे
स्वर्ग सभोवताली


कविता तयार झाल्या फोटोंबरोबर ग्राफीक्स घालून फ्रेम साठी चित्र पूर्ण तयार झाले. प्रिंट झाले...म्हणजे आता पुण्याला गेल्यावर फक्त फ्रेम करणे बाकी आणि तयार ग्राफीक्स घालून मग्ज तयार करणे बाकी....जमलं तर....

अजून एक गोष्ट मनांत घोळत होती कधीची... रुचिर शिशिर चं बालपण बाकी मुलांपेक्षा वेगळं नक्कीच नव्हतं पण दोघांचं एकदम....बरोबर.... वेगळेपणा ही घेऊनच आलं होतं. सगळ्या नातेवाईकांमधे, मित्रांमधे नेहमीच चर्चेचा विषय असायचे... लग्नाला सगळेच येणार तर त्यांचे बालपण, त्यांचे मोठे होतानाच्या ज्या काही आठवणी फोटोंच्या रुपात आहेत त्यांना सगळ्यांपुढे मांडण्याचे खूप मनांत होते. आजी आजोबा सगळेच खुश होतील, आत्या मामा काकांना मांडीवर खेळवलेले रुचिर शिशिर पुन्हा हसवून जातील... आधी काही लग्नांमधे ठिकाणी मी काही फोटोंना संग्रहित करून एका बोर्ड वर लावलेलं बघितलं होतं. त्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा मानस होता. संगणकाची आणि माझी दोस्ती आहेच तर ह्याचाच फायदा घ्यावा. पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन तयार करता करता पूर्णतेकडे जात होते. रोजचा तो एक ध्यासच होऊन बसला होता. काही तरी त्यात फेरबदल व्हायचे...मैत्रिणींना दाखवले तर अजून नवीन छान सल्ले मिळत मिळत इथून निघेपर्यंत त्यावर प्रयोग सुरूच राहीलेत.

बाकी तयारी इथुन (कुवैत) आम्हाला फारशी करायचीच नव्हती. छान छान सजावटीचे सामान, रंगीत व सुगंधी मेणबत्त्या वगैरे ची खरेदी केली.

मी २० मार्च ला च कुवैत पुन्हा पूर्ण तयारीनिशी सोडले.
फारसे काम नाहीये पण चैन पडेना म्हणून पुणे लवकर गाठले. उरलेली तयारी आणि नवीन येऊ घातलेली नव-नवीन तयारीची-कामाची यादी पुढ्यात जशी वाढू लागली तसे वाटले दिवस कमी उरलेत की काय आणि कामं होणार की नाही..... ह्या ज्या कामाचं मी म्हणतेय ती कामं निव्वळ माझ्या हौशीखातर होती हे नक्कीच. हे पण ५ एप्रिललाच पोहोचलेत पुण्याला.
मुलींच्या आणि विहिणींच्या साड्या छान छान बॅग्ज, फुलं-पानं, लेस वगैरे लावून सुंदर सजवल्या होत्या...बाकी देण्याघेण्याच्या बॅग्ज मधे आहेराबरोबर ओटी साठी तांदुळ व मोत्याची सुपारी आणि लाडू चिवड्याच्या ऐवजी थोडा सुका मेवा आकर्षक पिशव्यांमधे भरून दिला...

नवीन महत्वाचं एक काम होतं फुलांचा अंतरपाट बनवून घेण्याचं. बर्‍याच फुलवाल्यांना विचारलं पण कोणीच आधी बनवलेला नव्हता. पण बनवून देऊ ह्याचं आश्वासन देत होती ती लोकं पण मला विश्वास नव्हता की कसा बनवतील व माझा पोपट न होवो.... फुलांच्या अंतरपाटाचा माझा आग्रह व इच्छा येव्हढ्यासाठी होती की मी लिहीलेल्या मंगलाष्टकांमधे फुलांच्या अंतरपाटाचा उल्लेख होता. आणि दिसायला सुंदर दिसणार व फुलांचा दरवळणारा सुगंध नक्कीच आनंद देऊन जाईल.....शोधून शोधून एक फुलवाला भेटला ज्याने ह्या आधी बनवला होता...

गाड्यांची सजावट, घरची सजावट, जेवणावळीची तयारी (सगळ्या ऑर्डर्स), पाव्हण्यांची राहण्याची सोय, आजकाल चहा-पाण्यासाठी, नाश्त्यासाठी वगैरे प्लास्टिकच्या किंवा थरमोकोलचे कप आणि प्लेट्स वापरायचीच पद्धत आहे जी की एकदम चांगलीच आहे.....त्याची पण खरेदी झाली....सगळेच झालेय...

१२ तारखेपासुन पाव्हणे (खरं तर सगळेच घरचे...पाव्हणे कुणीच नव्हते) यायला सुरूवात झाली होती. ११-१२ एप्रिल च्या रात्री उत्सवमूर्ति रुचिर शिशिर पोहोचलेत. बाकी पण येऊच लागले होते. आलेल्या पाव्हण्यांबरोबर १२ एप्रिल ला रात्री मामा-मामी ने धडाक्यात केळवण करून लग्नसमारंभाची सुरूवात केली. वेळेअभावी बाकी कुठेच केळवण झाले नाही.

१३ एप्रिल ला घर ४०-४५ लोकांनी गच्च भरले होते. संध्याकाळी मेहंदी चा कार्यक्रम होता. पावभाजी, दहीभात आणि रसमलाई हा रुचिर शिशिरच्या आवडीचा बेत ठेवला होता. रुचिर शिशिर ची अमेरिकेची मैत्रिण रॉबिन खास लग्नासाठी आली होती. हातभर बांगड्या (जशा मी घातल्या होत्या तशाच आणि तेव्हढ्याच हव्या म्हणे) आणि दोन्ही हातभर मेहंदी लावून घेतली. बाकी पण सगळ्यांना मज्जा आली...मनसोक्त असे मेहंदी ने हात रंगले होते सगळ्यांचे...थोडी मेहंदी रुचिर शिशिर च्या हातावर पण काढली..

१४ एप्रिल ला सकाळी देवब्राह्मण आणि देवदेवक बसवले. पंचपक्वान्नाचे जेवण होते. संध्याकाळी व्याही भोजनाचा कार्यक्रम.... व्याही मंडळींन्ना यायला जरा उशीर झाला त्यामुळे आपले सगळे जरा कंटाळून गेले होते पण चलता है.....मुली छान नटून-थटून आल्या होत्या माझ्या...छान वाटले...

आणि आलाच की १५ एप्रिल चा दिवस....गुरूजींनी सांगितल्याप्रमाणे वेळ पाळण्याचा बराच प्रयत्न सगळ्यांनीच केला.... पण सगळे विधि वेळेत होऊ शकले नाहीत....मधल्या थोड्या वेळात दोन्ही फोटोग्राफर दोन्ही जोड्यांना घेऊन असे गायब झालेत की शोधाशोध सुरू झाली.....मज्जा आली...

मधल्या ह्या कंटाळवाण्या वेळासाठीच ते पॉवरपॉइंट प्रेजेंटेशन चा घाट घातला होता आम्ही... २ दिवस आधीच प्रोजेक्टर ची सोय हॉटेल मधे करून ठेवली होती..आम्ही बघून आलो होतो... फक्त लॅपटॉप जोडून तो शो सुरू केला...कोणालाच ह्याचा अंदाज नव्हता त्यामुळे आधी आश्चर्य आणि मग आनंद सगळ्यांच्या चेहर्‍यावर बघण्यासारखा होता.. बाकी मुलीकडच्यांना कदाचित ह्याने मजा आली नसेलही..साहजिकच आहे...पण मोठ्या पडद्यावर रुचिर-शिशिर चा आजपर्यंतचा लहानपणापासुन चा प्रवास बघतांना बाकी जोशी परिवार व सगळ्याच आप्तेष्टांना खूप खूप मज्जा आली...जुने छोटे छोटे रुचिर शिशिर पुन्हा जवळ आल्यासारखे वाटलेत......

लग्नाची वेळ आली तरी रुचिर शिशिर धोतर झब्ब्यांमधेच फिरत होते...पटापट दोन्ही मुलं आणि दोन्ही मुली तयार होऊन आलेत आणि बोहल्यावर उभे राहीलेत...
काय धन्य वाटत होते आम्हा दोघांना...अर्थात थोडे आगळे-वेगळेच दृश्य होते हे की एकाच वेळी दोन लग्नं....सगळ्यांनाच कुतुहल वाटत असेल..फुलांचे अंतरपाट बघून सगळेच आश्चर्यचकित झालेत... आणि झाले असे की ते मोगर्‍याच्या फुलांचे करून पण हलके झालेच नाहीत आणि गुरूजी आणि मुलींचा भाऊ ह्या चौघांना खूप कठिण गेले तो अंतरपाट सांभाळणे...आणि झाले असे की ज्यासाठी अंतरपाट मधे धरला जातो तो सफल झालाच नाही...पूर्ण वेळ 'नजरानजर होऊ देऊ नका' असे मंगलाष्टकांमधे सांगत होतो तरी दोघा-दोघांची नजर एकमेकांवरच खिळली होती...आहे नं मज्जा....

लग्न लागून आता जोड्या सुंदर सजवलेल्या स्टेज वर उभे होते....आनंदाने माझ्या पापण्या ओल्या होत्या...आता पूर्ण जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले... सगळ्यांना सांगितले होते की पेढ्याबरोबर एक कार्ड देऊ ते कृपा करून फेकू नका...ते एका संस्थेकडून घेतलेले होते... Foot and Mouth paintings... (ही संस्था तशी कोणाकडून मदत स्वीकारत नाही, पण तिथे असलेल्या लोकांना हात नसल्यामुळे ते तोंड आणि पायाने केलेले पेंटिग्ज विकत देतात जी आपल्याकडून त्यांना मिळणारी फूल न फूलाची पाकळी असते...) गुलाबाची फुले देऊन नंतर पायदळी तुडवली जाण्यापेक्षा ही कार्डस रूपी फुले आम्ही सगळ्यांना दिलीत.

फोटो प्रकरण इतके लांबले की जेवायला उशीर झाला... नंतर लक्ष्मीपूजन वगैरे विधि आटोपुन शेवटी आम्ही आमच्या मुलींना घेऊन ५ वाजता घरी जायला निघालो. बरीच मंडळी आधीच घरी पोहोचली होती..घरी मुलींच्या स्वागताची तयारी करायची होती.....

घरी पोहोचणार तर शेवटच्या वळणावरच आमच्या दोन्ही गाड्या थांबवल्या गेल्या कारण १०,००० फटाक्यांची लड बरीच दूरपर्यंत पसरली होती....आमच्या अमेरिकावासियांच्या मनाविरुद्धच जाऊन (कारण ते हवेचे आणि आवाजाचे प्रदुषण आहे..) माझे खरे केले होते... खूप आवाज खूप आवाज...खूप ढणढणाट..... वाजत गाजत मुली घराच्या आवारात आल्यात...

लिफ्ट ने ७ व्या मजल्यावर पोहोचल्यावर तर दृश्य बघण्यासारखे होते...काय सुंदर काय सुंदर सजवले होते... सगळीकडे फुलेच फुले....खूप दिवे...आणि मी एक आठवडा आधी ग्लासेस मधे गहू पेरून आज प्रत्येक ग्लास मधे बोटभर उंच आलेले सुंदर हिरवे हिरवे गार कोंब तयार होते ते ग्लासेस मधे मधे ठेवले होते.(असे म्हणतात की असे गव्हाचे कोंब शुभ असतात घरी येणार्‍या मुलींसाठी.)...अतिशय सुंदर...

आकर्षक माप ओलांडून राण्या घरात आल्यात... नंतर थोड्यावेळाने केक कापून थोडे अमेरिका पद्धतिने पण मुलींचे welcome home... केले...
१६ एप्रिल ला सत्यनारायण आणि सहस्र आवर्तनांनी या खास लग्नाची सांगता झाली...

हळू हळू पाव्हणे परतू लागलेत...थोडेफार कमी ज्यास्त झालेही असेल पण स्मरणात राहणारा हा सोहळा नक्कीच झाला असे प्रेमाने सांगणारे फोन पण प्रचंड आलेत व आम्ही धन्य झालोत... अर्थात मुलं आणि त्यांच्या राण्या पण खुश असतीलच...
खूप सगळ्या आप्तस्वकीयांमुळेच व त्यांच्या सहकार्य व मेहनतीनेच हे कार्य मनांसारखे पार पाडता आले ह्यात शंकाच नाही.

नवदांपत्यांना वैवाहिक नवजीवनाच्या खूप खूप शुभेच्छा....!!!

इति

दीपिका 'संध्या'

मंगळवार, २१ जुलै, २००९

आज मिलन होणार गं...

मनमोर नाचणार गं..
आज मिलन होणार गं..

निशिगंध फुलोरा दरवळतो
गुंजनात भ्रमर सैरभैरतो
मोहरली धरती, आसमंत हसणार गं
आज मिलन होणार गं

चढणार साज ह्या सुरांना
नाद पाउलीच्या पैंजणांना
स्वर भारलेले, एक तान छेडणार गं
आज मिलन होणार गं...

कळ्या नाजूक समयीच्या
खुणवणार बटा भाळीच्या
अंग अंग वसंती आज मी फुलणार गं
आज मिलन होणार गं

दीपिका 'संध्या'

तू मजसाठी असावा...

शांत काजवे
निःशब्द चांदवे
जागवाया अशा रात्री तू मजसाठी असावा

स्वच्छंदी सरिता
समर्पण धरिता
अंतरी सामावणारा तू मजसाठी असावा

सप्तरंगी नभात
बरसला मोकाट
परि रिमझिमणारा तू मजसाठी असावा

बहर वसंताचा
गंधित फुलांचा
सुवासात धुंदणारा तू मजसाठी असावा

रुतणार काटा
भिजणार वाटा
मन खुळे, हसविणारा तू मजसाठी असावा

वदली नजर
मौनांचे स्वर
स्पर्शात समजाविणारा तू मजसाठी असावा

दीपिका 'संध्या'