मंगळवार, २१ जुलै, २००९

तू मजसाठी असावा...

शांत काजवे
निःशब्द चांदवे
जागवाया अशा रात्री तू मजसाठी असावा

स्वच्छंदी सरिता
समर्पण धरिता
अंतरी सामावणारा तू मजसाठी असावा

सप्तरंगी नभात
बरसला मोकाट
परि रिमझिमणारा तू मजसाठी असावा

बहर वसंताचा
गंधित फुलांचा
सुवासात धुंदणारा तू मजसाठी असावा

रुतणार काटा
भिजणार वाटा
मन खुळे, हसविणारा तू मजसाठी असावा

वदली नजर
मौनांचे स्वर
स्पर्शात समजाविणारा तू मजसाठी असावा

दीपिका 'संध्या'

सोमवार, ६ जुलै, २००९

मित्रतेला समर्पण....

माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींन्नो....

गरजेसाठी कधीच दोस्तीचे नाते जो़डू नकोस
वाटले तरी तितक्या सहजतेने हे तोडू नकोस

रक्ताचे नाते नसू दे मातीमोल हे कधीच नसते
आपुलकीची मित्रता सदैव अनमोलच असते

जीवन वाटेवर मन-नवीन नाती जुळतीलच बघ
ओंजळीत प्रेमवर्षावाची फूले तर साठतीलच बघ

सामंजस्य असावे आपणांत मित्र होऊ समाधानी
ओझ्याचे हे नाते नव्हे, खूणगांठ बांधू या रे मनी

देणे घेणे व्यवहार, मैत्रीत अपुल्या नसावेत रे
मदतीचे हे अपुले हात सदैव तत्पर असावेत रे

बाकी नसे मागणे काही, चार शब्द विश्वासाचे
प्रेम असेच अनंत असावे, नसावे चार दिसांचे

दीपिका 'संध्या'

रविवार, ५ जुलै, २००९

तुझ्या माझ्यात....

झाली कशी नजरेची खेळी तुझ्या माझ्यात
श्वास होते श्वासात भिनले तुझ्या माझ्यात

ओल्या सांजवेळी जसे निनादले सूर भैरवीचे
गीत एक चिंब तसे भिजले तुझ्या-माझ्यात

नयनांची होती भाषा अपुली हात हाती गुंफले
स्पर्शातले जिव्हाळे खुदखुदले तुझ्या माझ्यात

मोकाट रानवार्‍याने वनी फुलवला मोरपिसारा
प्रीत मोर साजणी इथे नाचले तुझ्या माझ्यात

आव्हान जरी असले अपुल्या प्रेमात गं विरहाचे
आठव गुजगोष्टींचे होते रुजले तुझ्या माझ्यात

नको साठवू नयनी अश्रु नको अश्रुंची बरसात
ओघळू दे मोती शिंपल्यातले तुझ्या माझ्यात

गूढ नाते अपुले कधी उकलावे कधी उमलावे
अनेक हळवे क्षण गहिवरले तुझ्या माझ्यात

वेड्या मनाने केली असेल का रे मनाची खोडी
तरीच भुलुनी हे स्वप्न हरवले तुझ्या माझ्यात

धुंद धुंद मधुमास झाला गंधित मंद मंद श्वास
मिलन हे असे अवचित घडले तुझ्या माझ्यात

दीपिका 'संध्या'